Next
‘अर्पित’मधील नृत्यरचनांनी रसिक मंत्रमुग्ध
BOI
Tuesday, August 20, 2019 | 04:10 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सूर, लय, तालाचा मिलाफ आणि घुंगरांचा झंकार... अशा भारावलेल्या वातावरणात डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नृत्यरचनांचा आस्वाद पुणेकर रसिकांनी घेतला. निमित्त होते ‘ऋजुता सोमण कल्चरल अॅकॅडमी’ व ‘ऋत्विक फाउंडेशन’ तर्फे आयोजित ‘अर्पित’ या वार्षिक नृत्य महोत्सवाचे. शनिवारी विमाननगर येथील सिम्बायोसिस इंटरनॅशनल ऑडिटोरियम येथे हा कार्यक्रम रंगला होता.

विद्यार्थिनींच्या कलेला व्यासपीठ मिळावे आणि त्यांना स्वतःची सर्जनशीलता रसिकांसमोर मांडता यावी या उद्देशाने आयोजित केलेल्या या वार्षिक कार्यक्रमात विद्यार्थिनींनी स्वतः रचनाबद्ध केलेल्या कलाकृती गुरुदक्षिणा म्हणून सादर केल्या. ‘मुरली मनोहर...’ या तीन तालातील गीतावरील नृत्यरचना, ‘लास्य तांडव’ संकल्पनेवर सरगम आणि त्रिवट या नृत्यरचना सादर करण्यात आल्या. कथकमधील ‘कवित्त’ या प्रकारात कवितेवर आधारित नृत्याविष्कार विद्यार्थिनींनी पेश केला. विविध भाव आणि मुद्रा यांचा हा अनोखा आविष्कार रसिकांना विशेष भावला. होरी, ठुमरी, तीश्र आणि चातुश्र या जातींचेही या वेळी सादरीकरण झाले. मनोज देशमुख (तबला), मानसी महाजन व अजय पराड (हार्मोनियम), मयूर महाजन (गायन), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), उमेश वारभुवन (काहोन), ऋजुता सोमण, तुलसी कुलकर्णी, अबोली अभ्यंकर थत्ते (पढंत) यांनी साथसंगत केली.

संध्या धर्म

या वेळी विद्यार्थिनींना नवे व वेगळे काही शिकायला मिळावे म्हणून भरतनाट्यम नृत्यांगना संध्या धर्म व रायगड घराण्याच्या कथक नृत्यांगना अनुराधा सिंग या अनुभवी दोन नृत्यांगनांचे एकल नृत्य सादरीकरण झाले. संध्या धर्म यांनी भरतनाट्यम नृत्यशैलीतील ‘कस्तुरी तिलकम्’द्वारा श्लोकम् या पारंपरिक सादरीकरणाने सुरुवात केली. त्यांनी ‘आनंदीबाई पेशवे’ यांच्या जीवनावरील एक विशेष सादरीकरण केले. त्यांनतर शुर्पणखेवर आधारित पौराणिक कथेवरील सादरीकरण त्यांनी केले. भावमुद्रा व थेट हृदयाला भिडणाऱ्या सादरीकरणाने रसिकांची भरभरून दाद मिळविली. सादरीकरणाचा समारोप त्यांनी तिल्लाना पेश करून केला. या वेळी व्यंकटेश (मृदंगम्), दुर्गा कुलकर्णी (व्हायोलिन), मीता पाठक (कथक) यांनी साथसंगत केली.  

अनुराधा सिंग

रायगड घराण्याच्या कथक नृत्यांगना अनुराधा सिंग यांच्या सादरीकरणाचा प्रारंभ शिवस्तुतीने झाला. साडे नऊ मात्रांचा ताल व लयकारीमधील घुंगरू वादन याने सभागृह भारावून गेले. सादरीकरणाचा समारोप त्यांनी राग कलावतीतील अध्धा ताल याने केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search