Next
सीमेवर ‘असीम’ काम करणारा सारंग
BOI
Thursday, November 23, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

सारंग गोसावी

सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुण पदवीदान समारंभातलं भाषण ऐकून वेगळा विचार करतो आणि थेट काश्मीर गाठतो. गेली १६ वर्षं तो  तिथली परिस्थिती समजून घेण्यासाठी, तिथल्या लोकांना ‘मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझेच आहात’ हे सांगण्यासाठी, रोजगार मिळवून देण्यासाठी, त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी, तिथे जातच आहे. सीमाप्रश्नावरून धुमसत असलेल्या काश्मीरमध्ये शांततेसाठी असीम कार्य करतो आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज पाहू या पुण्यातल्या सारंग गोसावी या तरुणाची प्रेरणादायी गोष्ट...
..........
काश्मीरचं नाव काढलं, की डोळ्यांसमोर येतात बर्फाचे पहाड, पाण्यातली लाकडी घरं (शिकारा), लालचुटूक सफरचंदांच्या बागा, चिनारचे मोठमोठे वृक्ष, रंगीबेरंगी फुलं, सुंदर तरुण-तरुणी, काश्मिरी गालिचे, पश्मिना शाली.... पृथ्वीवर स्वर्ग अवतरावा असं सगळं वातावरण... हे सगळं दृश्य आपल्या डोळ्यांसमोर आपण काश्मीरला न जाताही उभं राहतं. याला कारण काश्मीरला आपल्यापर्यंत आणण्यात हिंदी चित्रपटांचा फार मोठा वाटा आहे. ‘दीवाना हुआ बादल’ म्हणणारी ‘कश्मीर की कली’ शर्मिला टागोर असो, की जिच्यासाठी ‘याहू’ अशी आरोळी ठोकावी ती सायरा बानो असो.... काश्मीरची सगळी दृश्यं मनाला मोहवून टाकणारी! आयुष्यात एकदा का होईना काश्मीरला जायलाच हवं असं वाटायला लावणारी!

विज्ञानाचे धडेगेल्या काही वर्षांमध्ये मात्र काश्मीरचं नाव समोर आलं, की समोर येतात ते नाकातोंडाला रुमाल बांधलेले दहशतवादी किंवा लष्कराचं सैन्य... टीव्ही लावावा, पेपर वाचावा तर त्यातही काश्मीरमधल्या अतिरेक्यांकडून झालेल्या कुठल्या तरी हल्ल्याची बातमी... या सगळ्या दबावाच्या वातावरणात काश्मीरला जाण्याची इच्छा तर सोडाच, पण नुसत्या कल्पनेनंही जीव गुदमरायला लागतो. 

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं. त्या वेळी काश्मीरमध्ये हरिसिंग या हिंदू राजाची सत्ता होती. काश्मीर हा हिमालयाच्या खोऱ्यातला एक प्रदेश! इथे बुद्धिस्ट, शिया मुस्लिम, सुन्नी मुस्लिम, हिंदू आणि अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात. काश्मीर व्हॅलीमध्ये मात्र बहुसंख्य मुस्लिमांचं वास्तव्य! काश्मीरवर फार पूर्वीपासून अनेक आक्रमणं झाली. अफगणिस्तानचं आक्रमण, मुघल बादशहा अकबराचं आक्रमण, पंजाबचा राजा रणजीसिंग यांचं आक्रमण आणि त्यानंतर ब्रिटिशांचं आक्रमण.... ही सगळी आक्रमणं काश्मीरनं पचवली. त्यानंतर ब्रिटिशांनी डोगरा घराण्यातला गुलाबसिंग याला काश्मीर चक्क काही अटी घालून विकलं. गुलाबसिंगानंतर वारश्याप्रमाणे त्याचा नातू हरिसिंग राज्यावर आला. जेव्हा भारत-पाकिस्तान फाळणी निश्चित झाली, तेव्हा भारतातले अनेक संस्थानिक आणि त्यांची राज्यं भारतात विलीन झाली. काश्मीरनं काय करावं हा मुद्दा समोर आल्यावर तिथला राजा हरिसिंग, नॅशनल कॉन्फरन्सचा नेता शेख अब्दुला यांनी आपण भारत किंवा पाकिस्तान कुठेच जायचं नाही तर स्वतंत्र राहायचं, असा निर्णय घेतला. फाळणीनंतर पाकिस्तानमधल्या सहा हजार घुसखोरांनी काश्मीरमध्ये प्रवेश केला. सगळ्यात आधी त्यांनी एअरपोर्टवर ताबा मिळवायचं ठरवलं होतं. पाकिस्ताननं केलेल्या घुसखोरीचा बीमोड करणं आवश्यक होतं. नेहरूंना ही बातमी समजताच प्रतिकार करण्याची हरिसिंगाची फारशी ताकद नसल्याचं ओळखून त्यांनी त्या वेळी तुरुंगात असलेल्या शेख अब्दुलाला सोडायला लावलं. शेख अब्दुलाचं नेतृत्व त्यांना मान्य होतं. काश्मीर भारतात विलीन व्हायला तयार आहे, या बाबीवर हरिसिंगाची स्वाक्षरी घेतली. परराष्ट्र धोरण, दळणवळण आणि संरक्षण यात भारताला अधिकार असतील आणि बाकी बाबतीत काश्मीर स्वतंत्रपणे निर्णय घेईल, असं हरिसिंगानं लिहून दिलं. याला पाठिंबा म्हणून शेख अब्दुलानं स्वाक्षरी केली. शेख अब्दुलाचा स्वतःवर आणि काश्मिरी जनतेवर खूप विश्वास होता. त्याला काश्मीरचा पंतप्रधान करण्यात आलं. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची ही घुसखोरी हाणून पाडली. त्यानंतर काश्मीर जेव्हा पूर्णतः शांत होईल तेव्हा आपण जनमताचा कौल घेऊ असंही ठरलं; पण तेव्हापासून आतापर्यंत भारतानं काश्मीरच्या संरक्षणावर ३० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे; पण काश्मीर अद्यापही पूर्णपणे शांत नाही आणि त्यामुळेच जनमताचा कौल घेणं अजूनही भारताला जमलेलं नाही. 

गणिताशी मैत्रीसध्या काश्मीर खोऱ्याचा दोन तृतीयांश भाग भारताच्या ताब्यात असून, जम्मू आणि काश्मीर या राज्याचा भाग भारतात येतो. एक तृतीयांश भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. जो भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे, त्या भागाला ‘आझाद काश्मीर’ किंवा ‘पाकव्याप्त काश्मीर’ असं म्हणतात. काश्मीरमध्ये सतत हल्ले होत असल्यानं तिथे खूप मोठ्या प्रमाणात लष्करी यंत्रणा कार्यरत आहे. कधी अतिरेकी, दहशतवादी हल्ले करतात, तर कधी लष्कराकडून हल्ला होतो. यात बहुतांश वेळा सर्वसामान्य माणसं भरडली जातात. विकासाची कामं होत नाहीत. कधी काळी मोकळं असलेलं तिथलं वातावरण आज दबावाखाली आहे. लोक पर्यटनालाही जायला घाबरतात. त्यातच प्रसारमाध्यमं वा ‘रोजा,’ ‘दिल से’ यांसारखे चित्रपट... यातून दहशतवादी हल्ला करतील ही भीती इतर ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात बसलेली आहे. 

अशा वेळी एक तरुण काश्मीरला जायचं फक्त तिकीट घेऊन जातो, गेली १६ वर्षं जातच राहतो आणि तेही तिथलं निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी नाही, तर तिथली परिस्थिती समजून घेण्यासाठी, तिथल्या लोकांना ‘मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझेच आहात’ हे सांगण्यासाठी, त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी, त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी, त्यांना भारत कसा आहे हे सांगण्यासाठी! हे सगळं याच तरुणाला का करावंसं वाटलं? तुम्हा-आम्हाला त्याच्यासारखं का नाही वाटलं? कुठल्या गोष्टींनी त्याला तिथे जायला प्रेरित केलं? कोण आहे हा तरुण? कुठल्या गावचा, कुठल्या राज्याचा?

हा तरुण आहे पुण्यातला! सॉफ्टवेअर इंजिनीअर होऊन चांगली नोकरी करण्याची स्वप्नं बघणारा सारंग गोसावी नावाचा...! अंतिम परीक्षेत चांगलं यश मिळाल्यावर पारितोषिक वितरण समारंभात त्यानं आपले मित्र, गुरुजन आणि आई-वडिलांच्या साक्षीने खूप आनंदानं पारितोषिक स्वीकारलं. ज्यांच्या हातून पारितोषिक स्वीकारलं ते होते कर्नल लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर! ते भाषणाला उभे राहिले..... बोलत राहिले.... लोक ऐकत होते... देशसेवेचं व्रत निभावणारा एक सच्चा भारतवासी बघत होते.... पाटणकरांनी आपल्या भाषणात आपण इथे किती स्थिर आणि सुखवस्तू जीवन जगतो आहोत आणि आपलाच भाग असलेल्या काश्मीर या भागात सध्या काय स्थिती आहे, याबद्दल सांगितलं. आजच्या तरुणांनी काश्मीरमधल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही करायला हवं, अशा अपेक्षा व्यक्त करून त्यांनी सर्व मुलांना शुभेच्छा देत भाषण संपवलं. 

२००१ साली जुलै महिन्यात सारंगला लगेचच आयटी क्षेत्रातला नोकरीचा छानसा प्रस्ताव आला. काहीच दिवसांत नोकरीवर रुजू व्हायचं होतं; मात्र पाटणकरांचं भाषण, त्यांचा शब्द न शब्द सारंगच्या मनातून जात नव्हता. नोकरीवर रुजू होण्याआधी त्याला काश्मीरला जाऊन त्यांना भेटायचं होतं. आपण काय करू शकतो याची चाचपणी करायची होती. त्यानं आपण काश्मीरला जाऊन येतो असं घरात सांगताच आई-वडिलांनी त्याला कडाडून विरोध केला. आपले आई-वडील काश्मीरला जाण्याची परवानगी देणार नाहीत, ही गोष्ट लक्षात येताच त्याने आई-वडिलांना ‘मग कमीतकमी गोव्याला जाऊन येतो,’ असं सांगितलं.

आई-वडिलांशी खोटं बोलून सारंग काश्मीरला पोहोचला. तिथे गेल्यावर त्याला सगळीकडे बंदुकधारी सैनिक दिसायला लागले. त्यानं एकाला ‘मला कर्नल विनायक पाटणकर यांना भेटायचं आहे,’ असं सांगितलं, तेव्हा त्या नावाचे कोणी अधिकारी इथं नाहीत, असं त्याला सांगण्यात आलं. हे ऐकताच सारंगच्या पायाखालची जमीनच सरकली. पाटणकरांना भेटणं आता तर खूपच आवश्यक होतं. कारण सारंगचे पैसे काश्मीरला पोहोचेपर्यंत संपले होते. परतीसाठी त्याच्याजवळ पैसे नव्हतेच. अशा वेळी तिथेच त्याला लष्करात काम करणारा एक मराठी अधिकारी भेटला. ते जम्मूला असतील, असं त्यानं सारंगला म्हटलं. त्यानं विनायक पाटणकर यांची चौकशी करून त्यांच्याशी सारंगचं फोनवर बोलणं करून दिलं. सारंगला त्यांनी भेटीसाठी बोलावलं. त्यांनी सारंगचं तिथे येणं फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. एका तरुण मुलाचा उत्साह इतकं समजून त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याची परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली.

सारंग पुण्यात परतला. नोकरीवर रुजू झाला; पण काश्मीर काही त्याच्या डोक्यातून गेलं नाही. त्यानंतरही तो वेळ मिळेल, सुट्टी मिळेल तसा तिथं जातच राहिला. आपण अनेक गोष्टींचं वाचन करतो; पण वाचलेलं कृतीत उतरणार नसेल तर काय उपयोग असं त्याला वाटायला लागलं. कृती काय करायची हे नीटसं कळत नव्हतं. दर वेळी काश्मीरमधला सगळा परिसर सारंग फिरत राहिला. तिथल्या लष्कराची मानसिकता त्यानं समजून घेतली, तसंच तिथल्या स्थानिक लोकांचे प्रश्नही त्याला त्या भेटीत कळत गेले. जन्मल्यापासून ज्या मुलाला आसपास बंदुकधारी सैनिक दिसत असतील, तर त्याच्या मनावर काय परिणाम होतील याचा विचार सारंग करायला लागला. काश्मीरमधल्या दहशतवादाचा अभ्यासही होत गेला. तिथली बेरोजगारी, पाकिस्तानमधले दहशतवादी, तिथल्या काही लोकांच्या मनातले आझादीचे प्रश्न आणि मग आझादीसाठी पुन्हा दहशतवादी होणं, काश्मीरमधले आठ हजार लोक बेपत्ता झाले आहेत, तर चार हजार स्त्रियांना आपण विधवा झालो आहोत की आपला पती कधीतरी परत येईल हे ठाऊक नाही, अशा अनेक गोष्टी सारंगला कळत गेल्या. इथल्या लोकांना भारतीय लष्कराचा एकच कोरडा चेहरा दिसलाय; पण काश्मीरविषयी भारताला असलेला काळजीचा चेहरा त्या लोकांना दिसलाच नाही अणि हा चेहरा संवादातून, काळजीतून, प्रेमातूनच दिसेल असं सारंगला वाटायला लागलं. 

आपण काय करू शकतो, आपल्यात काय क्षमता आहेत याचा विचार करून सारंगनं तिथल्या स्थानिक युवकांना भौतिकशास्त्र हा विषय शिकवायचं ठरवलं. ठिकठिकाणी जाऊन तो क्लासेस घ्यायला लागला. सुरुवातीला तिथल्या लोकांना हा बाहेरचा तरुण येऊन असं का करतोय का प्रश्न पडला; पण सहवासानं त्यांना त्याचा हेतू कळला. आपल्याच घरातला हा एक मुलगा आहे हेही त्यांना वाटायला लागलं. काश्मीरमध्ये एक म्हण आहे, ‘एखाद्याच्या स्वयंपाकघरात तुम्ही खुल्या मनानं वावरता, तेव्हा तो तुमचा खरा सहकारी आहे, असं खुशाल समजा.’ मुला-मुलींच्या संपर्कातून सारंग प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचला होता. त्यानं कुपवाडा इथं पहिलं केंद्र सुरू केलं. सगळ्यांच्या द्वेषाचा विषय असलेला गणित हा विषय त्यानं सोपा करून शिकवायला सुरुवात केली आणि तिथल्या मुला-मुलींना गणित शिकण्यात मौज वाटायला लागली. शिक्षणाचं महत्व्  समजायला लागलं. तिथली अलफैयाज नावाची शाळा शिक्षकांअभावी बंद पडली होती. तसंच तिथे जायच्या रस्त्यावर भू-सुरुंग पेरलेले असायचे. चुकून भू-सुरुंगाचा स्फोट झाला तर जिवाला धोका असायचा. अशा परिस्थितीत तिथली मुलं त्या रस्त्यावरून जा-ये करायची. सारंगनं ही बंद पडलेली शाळा सुरू करायचं ठरवलं. त्या रस्त्यावरून ये-जा करताना सारंगलाही भीती वाटली नाही. कारण तो त्याच्या ध्येयानं झपाटून गेला होता.

खरं तर हे सगळंच काम इतकं सोपं नव्हतं. बाहेरचा एक मुलगा येतो आणि इथं येऊन रोज काहीतरी नवीन गोष्टी सुरू करतो ही गोष्ट लक्षात आल्यावर दहशतवाद्यांनी सारंगवर नजर ठेवली आणि काही वेळा त्याला त्रासही दिला. सारंगच्या घरी फोन करून धमक्या द्यायलाही सुरुवात केली. सुरुवातीला घरी फोन जाताच सारंगची आई घाबरून रडायची, त्यानं पुन्हा काश्मीरला जाऊ नये म्हणून विनवण्या करायची; पण सारंग शांत होता, आपल्या निश्चणयावर अढळ होता. त्यानं त्या दहशतवाद्यांनाही आपण कुठल्याही अतिरेकी हेतूनं विनाश करायला आलो नसून, फक्त चांगलं काही तरी करू इच्छितो, जे काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठी असेल, असं सांगायचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांना सारंगच्या हालचालीत किंवा कृतीत काहीच आक्षेपार्ह न दिसल्यानं त्यांनी त्याला छळणं सोडून दिलं. 

एकदा सारंगनं बडगाममध्ये कम्प्युटर सेंटर सुरू करायचं ठरवलं. त्यानं दहा कम्प्युटर्सची व्यवस्था केली. तिथल्या युवकांना कम्प्युटरवर प्रभुत्व मिळवता आलं, तर त्यांना रोजगार मिळेल असं त्याला वाटायला लागलं. डीटीपी, फोटोशॉप, पेजमेकर शिकणं आणि त्यातूनच मग भेटकार्ड बनवणं वगैरे कामं मुलं कम्प्युटरच्या साह्यानं करू लागली. सारंग ती पुण्यात विकू लागला. हे सगळं सुरळीत सुरू असताना ज्या माणसावर विश्वाास ठेवला, त्यानं दहाही कम्प्युटर्स चोरले आणि परस्पर विकलेही. कम्प्युटर सेंटर बंद पडलं. सारंगला ही बातमी कळताच त्याला आपला विश्वासघात झाल्यानं प्रचंड वाईट वाटलं. दोन दिवस तो आपल्या खोलीबाहेरही आला नाही. दोन दिवस सारंग फक्त रडत राहिला. ‘यातून सावरायला हवं, नव्या दमानं काम करायला हवं. एक माणूस वाईट निघाला तर त्यामुळे सगळं जग वाईट आहे असा समज करायला नको,’ असं सारंगच्या मनानंच त्याला समजावलं. सारंगनं आपले अश्रू पुसले.

सारंगनं बिजबेरा या गावात तिथल्या मुला-मुलींसाठी व्यक्तिमत्व्य विकास शिबिर घ्यायचं ठरवलं. त्यानं हे शिबिर घेण्यासाठी पुण्यातील १७ मुलींना तयार केलं. सारंगवर विश्वासस असलेल्या मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींना काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिली. या मुली काश्मीरमधल्या स्थानिक लोकांच्या घरीच उतरल्या. कोणाच्या घरी उतरल्यानं जवळीक, परस्परांतला संवाद, संस्कृतीची देवाणघेवाण या गोष्टी घडत जातात. या मुलींच्या बाबतीतही हेच घडलं. तिथे असलेल्या दारा शुकोह या बागेमध्ये आयोजित केलेल्या शिबिरात २०० मुला-मुलींनी भाग घेतला. खरं तर या गावात मानवी बॉम्ब असल्याच्या अफवाही होत्या; पण सारंग किंवा सारंगबरोबर गेलेल्या मुली घाबरल्या नाहीत. कारण स्थानिक लोकांचं प्रेम आणि संरक्षण त्यांना मिळालं होतं. 

हे सगळं काम सुरू असताना सारंगच्या लक्षात आलं, की जी मुलं कम्प्युटरबद्दलचं शिक्षण पूर्ण करताहेत त्यांना प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय नोकरी मिळू शकत नाही. यातूनच मग आपण एका संस्थेची उभारणी करायला हवी ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. २०१०मध्ये सारंगसह दहा तरुणांनी एकत्र येऊन ‘असीम फाउंडेशन’ची स्थापना केली. आजघडीला दहाचे शंभर आणि अधिक संख्येनं तरुण त्यात सामील झाले आहेत. 

‘असीम फाउंडेशन’ची स्थापना होताच, सारंगच्या कामाचा वेग वाढला. एकदा तिथल्या एका स्थानिक मुलानं आपल्या बागेतली सफरचंदं सगळ्यांसाठी आणली. ती सफरचंदं खाताना सारंगच्या लक्षात आलं, इथं काश्मीरमध्ये प्रत्येक घराजवळ चार तरी अक्रोडाची झाडं आहेत. अक्रोडांची विक्री आणि भातशेती यातून सहा महिने काम केलं तरी त्यांचा वर्षाचा उदरनिर्वाह सहजपणे होतो; मात्र रिकामं बसणं हे तरुणांसाठी घातक आहे आणि मग अशातून त्यांना पैशाची लालूच दाखवून बहकवलं जातं, हल्ले-दंगे यात खेचलं जातं. कारण नसताना निष्पाप जिवांचे बळी यात जातात. सारंगनं अक्रोड आणि सफरचंदापासून आपण बिस्किट्स तयार करू या असं सगळ्यांना सांगितलं. तिथले तरुण खूश झाले; मात्र बिस्किट्स कशी करायची हे सारंगला ओ की ठो ठाऊक नव्हतं. 

सफरचंद आणि अक्रोड यांचा विचार डोक्यात घेऊनच सारंग पुण्यात परतला. सफरचंदामध्ये पाणी जास्त प्रमाणात असल्यानं बिस्किट्स टिकतील कशी हा मोठा प्रश्न होता. सारंग आणि सारंगचे मित्र मग पुण्यातल्या अनेक बेकऱ्यांमध्ये काम करायला जायला लागले. नोकरीचा वेळ संपला, की सायंकाळी बेकरीत जायचं आणि बिस्किट्स कशी तयार करतात हे शिकायचं याचा सगळ्यांना ध्यास लागला. त्या ध्यासानं, झपाटलेपणानं त्यांना श्रम, थकवा जाणवत नव्हता. अनेक खाद्यतज्ज्ञांशीही या काळात सारंग आणि त्याच्या मित्रांनी चर्चा केल्या. अखेर अनेक चुकांमधून सारंग बिस्किट्स कशी करायची हे शिकला. काश्मीरला पोहोचताच सगळ्यांनी बिस्किट्स बनवणं सुरू केलं. अक्रोड आणि सफरचंदं यांपासून तयार झालेली बिस्किट्स लोकांसाठी नावीन्यपूर्ण होती. अनेकांना रोजगार मिळाला आणि ही बिस्किट्स दिल्ली, पुणे आणि श्रीनगरमध्ये हातोहात खपायला सुरुवात झाली.

शिबिराच्या वेळी सारंगबरोबर काश्मीरमध्ये गेलेल्या मुली तिथल्याच स्थानिक लोकांच्या घरी राहायला होत्या. त्यांचं आणि त्या लोकांचं घट्ट नातं विणलं गेलं होतं. यातूनच आणखी एक कल्पना सारंगच्या डोक्यात आली. पर्यटनासाठी लोक जेव्हा काश्मीरमध्ये जातात, तेव्हा हॉटेलमध्ये उतरण्याऐवजी ते अशा लोकांच्या घरी उतरले तर इथे त्यांची चांगली व्यवस्थाही होऊ शकते आणि घरात राहिल्यामुळे आपलेपणाचा एक संवाद घडू शकतो! यातूनच पुन्हा तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. कुठलीही जाहिरात न करता ही कल्पनाही साकारली गेली आणि यशस्वी झाली. 

सारंगचं काम आज खूपच वाढलं आहे. आज काश्मीरमधली अनेक तरुण मुलं-मुली पुण्यात सारंगकडे म्हणजेच ‘असीम फाउंडेशन’मध्ये शिकण्यासाठी येताहेत. आपल्या मुला-मुलींना सारंगकडे सोपवण्यात काश्मीरमधल्या पालकांचा विश्वाास दिसून येतो. सारंगनं या मुलामुलींची राहण्याची व्यवस्था तर केली आहेच; पण त्यांची शाळा असो वा कॉलेज, तिथला प्रवेश, तिथलं जाणं-येणं, त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची, शहराची, संस्कृतीची माहिती करून देणं हे तो आणि त्याची टीम करत असते. या मुलांमधली कौशल्यं ओळखून त्यांना वाव देण्याचं कामही ते करतात. या मुलांचं पालकत्वच जणू काही त्यानं स्वीकारलं आहे.

पुण्यातील क्रिकेट मॅचवेळी नाणेफेक करताना सारंग गोसावी आणि लेखिका दीपा देशमुखसारंगनं काश्मीरमध्ये मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या होत्या अणि त्या खूपच यशस्वी झाल्या होत्या. खेळामुळे गावागावांमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. त्यातूनच सारंगनं पुण्यातही नुकतंच अशा स्पर्धाचं आयोजन केलं. भौगोलिक आणि मानसिक अंतर मिटवून ही मुलं एकत्र आली. काश्मीर आणि जम्मू इथली मुलं पुण्यात आली आणि पुणे विरुद्ध काश्मीर अशी क्रिकेटची मॅच रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डम आणि मैत्र सोशल फाउंडेशन यांच्या साथीनं पुण्यात रंगली. खेळातून स्पर्धेबरोबरच खिलाडूवृत्ती वाढते, एकत्र येण्यानं एकात्मतेची बीजं आपोआप रुजली जातात, असं सारंगचं मत आहे. 


आज काश्मीर हे सारंगचं किंवा ‘असीम फाउंडेशन’चं अर्थातच दुसरं घर झालं आहे. तिथल्या घराघरात सारंगला लोक ओळखतात. इतकंच नव्हे तर काही गोंधळाची शक्यता वाटली, तर तिथलं लष्करही सामंजस्याचं, शांतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी सारंगला बोलावून घेतं. लष्कर असो, सर्वसामान्य लोक असोत वा दहशतवादी.... सारंगचं काम कोणासाठीच तिरस्काराचं, द्वेषाचं कारण नाही. सारंग म्हणतो, ‘तिथे जायला घाबरणाऱ्या लोकांना ‘कलम ३७०’ भीतिदायक वाटतं. मला काम करायचंय. मला हे कलम कधीच अडथळा आणणारं वाटलं नाही, वाटत नाही.’ 

सारंग जेव्हा पुण्याहून काश्मीरला जातो, तेव्हा तिथल्या कुठल्याही घरात तो राहू शकतो. राहतो. दार उघडताच त्या घरातल्या मुलाची आई सारंगला आपलाच मुलगा म्हणत जवळ घेते, त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवते, त्याच्या येण्यानं तिच्या डोळयातून आनंदाश्रू ओघळत असतात. तिची काश्मिरी भाषा सारंगला फारशी कळत नसली, तरी त्या आईचं प्रेम, तो स्पर्श त्याला कळत असतो अणि त्या वेळी आपल्यासाठी हे जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक आहे, असं त्याला वाटतं. काश्मीरमधल्या लोकांना भारताचा चेहरा आता सारंगच्या रूपातून कळू लागला आहे. माणुसकीचा चेहरा घेऊन, हृदयात ओलावा घेऊन, प्रेमाची भाषा घेऊन, त्यांच्या सुखाचे मार्ग शोधणारा आणि कृतीत आणणारा सारंग आज काश्मीरच्या घराघरात नव्हे, तर तिथल्या लोकांच्या मनामनात जाऊन पोहोचला आहे. 

अनवट वाटेवरनं प्रवास करत आपल्या प्रवासातले काटे दूर करून इतरांच्या वाटेवर फुलं पेरणारा असा हा सारंग... त्याची गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे. (सारंगची एका वृत्तवाहिनीवरील मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

संपर्क :
ई-मेल : info@aseemfoundation.org
वेबसाइट : http://www.aseemfoundation.org/ 

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Smita Damle About
My best wishes to SARANG for his motivating work in Kashmir. Can I get the address where the apple & walnut biscuits are available?
4
0
Sharad pant About
Really motivating work. I am inspired.
4
0
Shirin Kulkarni About
Bravo! It takes commitment and courage to work in sensitive regions like Kashmir. Hats off to Sandip! Very inspirational and nicely penned article by Deepa tai as usual.
4
0
Gajanan M.Pawar About
Read the artical on Sarang Gosavi by Deepatai Desjmukh.The work done by Sarang and his team is just excellent. Keep it up.Presently I am at USA.Comimg back to Pune in Feb 2018.I would like to meet you. Thanks n regards.
4
0
Hema Honwad About
सारंगचं काम असीम आहेच. दीपा देशमुख यांनी त्याच्या कामाची छान सविस्तर माहिती करून दिली आहे. ते आता खूप लोकांपर्यंत पोहोचेल.दीपा देशमुख यांना मनःपूर्वक धन्यवाद.
5
0
Umesh Zirpe About
Excellent work . Very difficult to co ordinate all required things for this most important and necessary cause. Such work definitely builts unity of our nation. Hats off to Sarang and team Aseem.
6
0
Asawari Kulkarni About
Wow.... Another story of a Super Hero! Thnx Deepa. I eagerly await for your value added Thursday article. 😊👍
6
0
Amol Ghuge About
Khup Khup Chan lihilay.👍👍👍
6
0

Select Language
Share Link
 
Search