Next
‘आश्चर्य वाटलं नाही, तर आयुष्य म्हणजे चोथा’
अनिकेत कोनकर
Sunday, August 13, 2017 | 04:59 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘माणसाला आश्चर्य वाटलं पाहिजे. आश्चर्य वाटलं नाही, तर सगळं आयुष्य म्हणजे चोथा आहे. वेगळं काय आहे तिकडे लक्ष गेलं पाहिजे. हा सगळा तुमच्या घडणीचाच भाग आहे. हा गुण केव्हाही तुमच्यात येऊ शकतो. म्हातारपण हे शारीरिक वय आहे. मनाने तुम्ही कायम तरुण राहू शकता. मला आजही प्रश्न पडतात आणि आजही मी त्यांच्या मागे लागतो,’ अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट उर्फ बाबा यांनी आपल्या लेखनामागे असलेल्या आणि या वयातही जागृत असलेल्या कुतुहलाबद्दल सांगितले. 

‘बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’मध्ये वाचन जागर महोत्सवानिमित्त शनिवारी (१२ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात डॉ. अवचट बोलत होते. त्यांच्यासह लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांनीही या वेळी उपस्थित रसिक वाचकांशी विविध विषयांवर संवाद साधला. ‘बुकगंगा’च्या सुप्रिया लिमये यांनी या लेखकद्वयीचे स्वागत केले. अदिती अत्रे हिने या दोन्ही लेखकांना बोलते केले आणि त्या दोघांच्या दिलखुलास उत्तरांनी गप्पागोष्टींचा हा कार्यक्रम जवळपास दोन तास रंगला. कार्यक्रम संपूच नये, असे वाटत असल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. या कार्यक्रमाला लहान मुलांसह विविध वयोगटातील वाचकांची मोठी गर्दी होती.

‘वनात, जनात,’ ‘सृष्टीत गोष्टीत’ रमणारे, ‘सरल तरल’ लिहिणारे, ‘माणसं’ वाचणारे, ‘कुतुहलापोटी’ प्रत्येक क्षेत्राचा ‘वेध’ घेऊन ‘अक्षरांशी गप्पा’ मारायला लावणारे, अनेक छंद जोपासणारे आणि ‘छंदांविषयी’ भरभरून बोलणारे, ‘स्वतःविषयी’ आणि ‘दिसले ते’ मोकळेपणाने मांडणारे आणि म्हणूनच ‘आपलेसे’ वाटणारे ‘कार्यमग्न’ ‘बाबा’ म्हणजेच डॉ. अनिल अवचट यांनी सुखी आणि आनंदी राहण्याचा मूलमंत्र गप्पांमधून दिला. ‘डॉक्टरला आयत्या वेळी महत्त्वाचे निर्णय घेता यायला लागतात; पण मी डॉक्टर झाल्यानंतर पेशंटला पाहिल्यावर स्तंभित व्हायचो. काय करायचं, ते मला सुचायचं नाही. त्यातूनच मला समजलं की माझं व्यक्तित्व डॉक्टर होण्याच्या लायकीचं नाही. नंतर सुनंदानं (पत्नी) ‘मी कुटुंबांची आर्थिक जबाबदारी सांभाळीन, तू तुला आवडेल ते कर,’ असं सांगितल्यानं मला चित्रं, रांगोळ्यांचा छंद जोपासता आला. नंतर आम्ही ‘युक्रांद’सारखी संघटना काढली; पण त्यातही मन रमलं नाही. मग लिहायला लागलो ‘साधने’त... पण तिथंही फारसा आनंद मिळत नव्हता; मग ‘साधना’ सोडून ‘फ्री-लान्स’ लिहू लागलो... ‘मनोहर’मध्ये आणि मग मला लक्षात आलं, की आपल्याला आनंद देणारं, हवं ते सापडलंय. आपली आवड शोधण्याचा हा प्रवास खरं तर प्रत्येकाला करता यायला हवा; पण प्रत्यक्षात मात्र तसं होत नाही. अभ्यास, त्यातून डिग्र्या, मग अमुकच व्हायचंय, या सगळ्यातून माणसं स्वतःच्या आवडीपासून दूर जातात,’ अशा शब्दांत डॉ. अवचट यांनी आपला डॉक्टर ते लेखक हा प्रवास मांडला आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्यही केले. 

छायाचित्रे : सौरभ बुचके‘आई घरासमोरचं अंगण सारवायची, छान रांगोळी काढायची. तिचं कोणी कौतुक करायचं नाही; पण ती स्वतःच्या आनंदासाठी हे सारं करायची,’ अशी आपल्या लहानपणची आठवणही डॉ. अवचट यांनी मांडली. ‘लाकूडकाम करताना त्या लाकडाशी संवाद साधता येतो. प्रत्येक लाकूड म्हणजे त्या त्या झाडाचा इतिहासच असतो. तो इतिहास त्या संवादातून कळत जातो. लाकूडकाम असो, चित्रकला असो, ओरिगामी असो, बासरीवादन असो किंवा स्वयंपाक असो, त्या छंदातून आपल्याला मिळणारा आनंद महत्त्वाचा. त्या आनंदासाठी ती गोष्ट करायची. मग त्या कलाकृतीला बक्षीस मिळालं पाहिजे, नंबर आला पाहिजे, वगैरे अपेक्षा ठेवल्या, की त्यातला आनंद संपतो,’ असे बाबांनी सांगितले.

पत्नी सुनंदाच्या सकारात्मक विचाराची एक हृद्य आठवणही त्यांनी शेअर केली. ‘सुनंदाला कॅन्सर झाला होता. त्या वेळी तिनं कॅन्सरचेही वीस फायदे लिहून काढले होते. त्यातला एक फायदा म्हणजे ‘कॅन्सरमुळे आपण दोघं अधिक जवळ आलो’ हा होता,’ असे अनिल अवचट यांनी सांगितले. ‘दर वर्षी प्रत्येकाच्या वाढदिवसाला आम्ही सिंहगडावर जायचो. एकमेकांच्या न आवडणाऱ्या गोष्टी सांगायच्या आणि पुढचं वर्षभर त्यात सुधारणा करायची, असं गिफ्ट दिलं जायचं,’ असेही त्यांनी सांगितले. पती-पत्नीतीले नाते, मुलींचे संगोपन यांबद्दल बोलतानाच बाबांनी सामाजिक प्रश्नांवरही भाष्य केलं. ‘शहरं ही आपली मोठी चूक आहे. विकेंद्रीकरणाची गरज आहे. विस्थापन कमीत कमी होऊन साध्य होईल तो खरा विकास,’ असे त्यांनी सांगितले. कुतुहलातून डास, खारफुटी जंगले यांबद्दल लिहिताना मिळालेली माहितीही त्यांनी रंजकपणे सांगितली आणि कल्पनेतून गोष्ट कशी सुचत जाते, हे सांगण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या भन्नाट गोष्टीत सगळेच रमून गेले.

लेखनातल्या बारीक-सारीक तपशीलांबद्दल विचारल्यावर डॉ. अवचट म्हणाले, ‘मी ‘पेशंट लिसनर’ आहे. मी समोरच्याचं व्यवस्थितपणे ऐकून घेतो आणि निरीक्षणही करतो. ज्याबद्दल किंवा ज्यांच्याबद्दल लिहायचं आहे, त्यांच्यातलंच एक होऊन गेलं, की आपोआप ती माणसं, परिस्थिती वाचता येते आणि लेखनात कृत्रिमता येत नाही. प्रामाणिकपणे लिहिलं आणि चांगलं लिहिलं की लोकांना आवडतं. त्याचा वेगळा असा काही फॉर्म्युला नाही.’ त्या वेळी बाबांनी भंगी, वेश्या, तसेच अन्य वंचित घटकांबद्दल केलेल्या लेखनावेळची आपली निरीक्षणेही मांडली. 

जग बदलण्यासाठी धडपडणारे ‘जीनिअस’, ‘सुपरहिरों’चा धांडोळा पुस्तकांच्या ‘कॅनव्हास’वर मांडणाऱ्या लेखिका आणि सामाजिक क्षेत्रात स्वतः सक्रियपणे कार्यरत राहतानाच ‘अनवट वाटेवरच्या वाटसरूं’चा वेध घेणाऱ्या कार्यकर्त्या दीपा देशमुख यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत आणि खणखणीत आवाजात कथन केलेल्या आपल्या प्रवासामुळे उपस्थित प्रत्येकामध्येच एक वेगळा उत्साह संचारला. ‘न पटलेल्या गोष्टींविरुद्ध बंड करण्याचा माझा स्वभाव लहानपणापासूनच आहे. जात-धर्म, कर्मकांड यांविषयी त्या वेळपासूनच माझ्या मनात चीड होती. त्यामुळे त्या गोष्टी कधीच पाळल्या/मानल्या नाहीत. माझ्या सगळ्या मैत्रिणी गरीब घरांतल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भावना, अडचणी त्या वयापासूनच कळत गेल्या. मनाला आनंद देणाऱ्या किंवा न पटणाऱ्या गोष्टीही मी लहानपणापासून डायरीत लिहायचे. तेव्हाच माझ्यातल्या लेखकाची बीजं रोवली गेली असावीत. पुढे डॉ. अनिल अवचट यांच्याशी झालेली ओळख, डॉ. अभय आणि राणी बंग यांच्यासोबत ‘निर्माण’ प्रकल्पामध्ये केलेलं काम, आदिवासी भागात केलेलं काम या सगळ्यामुळे सामाजिक विषयांशी, तरुणांशी जोडले गेले. आकाशवाणीत काम करतानाही माझे विषय हे सर्वसामान्यांशी किंवा गरीबांशी निगडित असायचे. डॉ. आनंद नाडकर्णींसारख्या अभ्यासू व्यक्तीकडे ‘आरईबीटी’सारखा कोर्स केल्याने तरुणांचे प्रश्न सोडवण्याची वेगळी दृष्टी मिळाली. डॉ. अच्युत गोडबोले यांच्यासारख्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वासोबत गेली १२ वर्षे करत असलेल्या लेखनाचा अनुभव खूप शिकवणारा आहे. अशा प्रकारे, माझा मूळचा स्वभाव, माझे विचार आणि भेटलेल्या माणसांचा पडलेला प्रभाव यांमुळे माझा लेखक आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून प्रवास होत गेला,’ असे दीपाताईंनी सांगितले. ‘सध्या आपल्या समाजात कार्यरत असलेल्या माणसांविषयी लिहिलं, तर ते वाचून मुला-माणसांना त्यांना भेटता येईल, त्यांची माहिती होईल, अशा विचाराने ‘तुमचे-आमचे सुपरहिरो’ ही पुस्तकमालिका लिहिली,’ असेही त्यांनी सांगितले. 

‘आजच्या तरुणांकडेही समाजभान नक्कीच आहे. कारण माझ्या संपर्कात असलेली अनेक मंडळी सामाजिक कार्यात हिरीरीनं भाग घेतात,’ असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दीपाताईंनी नोंदवले. अर्थात, अशा तरुणांचे प्रमाण आणखी खूप वाढायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तरुणांसोबत काम करत असल्यामुळे आपणही उत्साही राहत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. चांगल्या गोष्टींचा प्रसार करण्यासाठी आणि आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतः सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणाऱ्या दीपाताईंनी सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करता येऊ शकतो, याबद्दलही आपले विचार मांडले. ‘त्या माध्यमातून सकारात्मकता अत्यंत चांगल्या पद्धतीने जगभरातल्या लोकांपर्यंत सहज पोहोचवता येते. अनेक चांगली, अनोळखी माणसं जोडली जाणार असली, तर त्यात वाईट काय आहे? माध्यमाचा वापर चांगल्या प्रकारे करायचा, की वाईट हे आपल्या हातात आहे,’ अशा शब्दांत त्यांनी जणू याबद्दलचा गुरुमंत्रच दिला.

बाबांनी या वेळी रुमालाचा उंदीर, लाल कागदापासून सांताक्लॉज केला, दोऱ्यापासून बाज तयार करून दाखवली; तसेच नाणे गायब करण्याचा जादूचा प्रयोगही करून दाखवला. त्यामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली. कार्यक्रमाच्या अखेरीला बाबांनी स्वरचित दोहे आणि कविता गाऊन दाखवली. दीपा देशमुख यांनीही सुरेल आवाजात कविता सादर केली. दोन्ही पाहुण्यांना ‘बुकगंगा’तर्फे पुस्तकांची भेट देण्यात आली. कोणती पुस्तके दिली आहेत, याच्या उत्सुकतेपोटी बाबांनी लगेचच त्याचे गिफ्ट पॅकिंग उघडून पाहिले आणि आपल्यातले मूल या वयातही कसे जागे आहे, याची उपस्थितांना पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली. शेवटी वाचकांनी या दोन्ही लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यावर त्यांची स्वाक्षरी मिळवण्यासाठी दोघांनाही गराडा घातला होता.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search