Next
प्यार की दुनिया में पहला कदम...
BOI
Sunday, March 18, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

तीन आठवड्यांपूर्वी अचानक ‘सदमा’ देऊन श्रीदेवी गेल्या आणि त्यांच्या निधनाला महिना होण्याच्या आतच शम्मी आंटींच्या निधनाची घटना सहा मार्च रोजी घडली. श्रीदेवी यांच्याप्रमाणे शम्मी आंटींना ‘सुपरस्टार’पद मिळाले नव्हते; पण म्हणून त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान तसे पटकन विसरण्यासारखेही नाही. १९५१ ते २०१३ अशी ६७-६८ वर्षे शम्मीजी हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या ‘मल्हार’ या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे... प्यार की दुनिया में पहला कदम...
..............
आज गुढीपाडवा! नवीन संवत्सराची सुरुवात! एक आनंदाचा सण! सर्वांना त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा! नवीन संवत्सर ज्ञानाचे, मनोरंजनाचे, सौख्याचे जावो. नवीन वर्षाच्या काही संकल्पना असतात, नियोजन असते, तसेच माझेही नियोजन आहे, की तुमच्यासाठी या सदरातून आणखी काही ‘सुनहऱ्या गीतां’बद्दल लिहावे.

...पण या नियोजनात वास्तवाचेही भान ठेवावे लागते आणि भूतकाळातील स्मृतींचीही जाणूक करावी लागते. काळ तर पुढे पुढे जात असतो आणि त्यामध्ये एकेक घटना घडत राहतात. त्यांचे परिणाम मनावर, लेखनावर होत राहतात. या सदरातून ‘सुनहऱ्या गीतां’बद्दल लिहीत असताना १९५१च्या ‘मल्हार’ चित्रपटातील अनेक ‘सुनहऱ्या गीतां’पैकी एका तरी गाण्याबद्दल लिहावे, असा विचार होता; पण येणारा नवीन दिवस आणि त्या दिवसाशी निगडित गत काळातील घटना यामुळे ‘मल्हार’मधील गीताचा विषय बाजूलाच राहिला होता.

तीन आठवड्यांपूर्वी अचानक ‘सदमा’ देऊन श्रीदेवी गेल्या आणि त्यांच्या निधनाला महिना होण्याच्या आतच शम्मी आंटींच्या निधनाची घटना सहा मार्च रोजी घडली. आता एखादा म्हणेल, की श्रीदेवी आणि शम्मी आंटींची तुलना होऊ शकत नाही. हे बरोबर आहे; पण दोघीही हिंदी चित्रपटसृष्टीत होत्या. दोघीही अभिनेत्री होत्या. हां! आता श्रीदेवी यांच्याप्रमाणे शम्मी आंटींना ‘सुपरस्टार’पद    मिळाले नव्हते; पण म्हणून त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान तसे पटकन विसरण्यासारखेही नाही.

१९५१ ते २०१३ अशी ६७-६८ वर्षे शम्मीजी हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. तारुण्य ओसरल्यावर चरित्र अभिनेत्री म्हणून त्या पडद्यावर दिसत होत्या. मुळात चित्रपट हा केवळ मुख्य अभिनेत्याचा अगर अभिनेत्रीचा नसतो. त्यामध्ये लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, संगीतकार, गायक, गीतकार, संकलक इत्यादी सर्वांचे योगदान असते, तसेच ते सहकलावंतांचेही असते. नायकाचा मित्र, नायकाची मैत्रीण, आई, वडील, नोकर, माळी, ड्रायव्हर अशा छोट्या-मोठ्या भूमिका करणारे कलावंतही चित्रपट निर्मितीच्या कामात महत्त्वाचे असतात. आणि शम्मी आंटी तर चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना नायिकाच होत्या.

‘नर्गिस रबाडी’ नावाची ही पारशी तरुणी १९४९मध्ये जेव्हा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा तिचा आकर्षक चेहरा आणि देखणेपणा, सुदृढ शरीरयष्टी यामुळे तिला नायिकेची भूमिका मिळाली. पार्श्वगायक मुकेश त्या चित्रपटाचा निर्माता होता आणि दिग्दर्शक होते हरीश! या दिग्दर्शकांनीच तिला सल्ला दिला, की चित्रपटसृष्टीत आता एक नर्गिस आहे, तेव्हा तू त्याच नावाने पुढे येऊ नकोस! त्यांनीच तिला ‘शम्मी’ हे नाव दिले आणि चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. १९५१मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचे नाव ‘मल्हार.’ अर्जुन बक्षी हा त्या चित्रपटाचा नायक होता. संगीतकार रोशन, गीतकार इंदिवर या जोडीने नऊ मधुर गीते देऊनही हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही.

शम्मीजींची अभिनेत्री म्हणून वाटचाल सुरू झाली; पण ती खडतर होती. कारण तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत मधुबाला, मीनाकुमारी, नर्गिस अशा एकेक बिनीच्या अभिनेत्री होत्या. त्यांचा तुलनेत शम्मीजी मागे राहिल्या आणि त्यांनीही मग आपल्याला मिळतील ते रोल स्वीकारले. त्यामुळेच त्या चित्रपटांत दिसायच्या; पण सहकलाकाराच्या भूमिकेत!

‘संगदिल’मध्ये मधुबाला-दिलीपकुमार ही जोडी होती व शम्मीजीही होत्या. ‘ये हवा ये रात ये चांदनी’ यासारखे प्रेयसीला आर्जवे करणारे गीत शम्मीजींसाठी दिलीपकुमार गाताना दिसतात; पण तरीही पुढे त्या मुख्य नायिका म्हणून दिसल्या नाहीत. १९५५ च्या ‘मुसाफिरखाना’ चित्रपटात श्यामा व करण दिवाण हे नायक-नायिका होते. त्या चित्रपटात हास्य अभिनेता जॉनी वॉकर व शम्मीजी यांची जोडीही होती आणि ‘थोडासा दिल लगा के देख...’ यासारखे ‘ओपी’स्टाइलचे शमशाद बेगम व रफी यांनी गायलेले गीत शम्मीजींवर चित्रित झालेले होते. ‘दिल अपना और प्रीत पराई’ चित्रपटात मीनाकुमारीबरोबर शम्मीजी दिसतात (‘शीशा ए दिल इतना ना उछालो...’ हे गीत.

ब्लॅक कॅट, फूल बने अंगारे, घर संसार अशा अनेक चित्रपटांत लहान-मोठ्या भूमिका करत, कधी जॉनी वॉकर, कधी आगा, तर कधी सुंदरबरोबर ही अभिनेत्री दिसत राहिली. काळ बदलला, तसे तारुण्य जाऊन प्रौढ बनली. चरित्र भूमिकांत दिसत राहिली. कधी ‘खुदा गवाह’मध्ये, कधी ‘स्वर्ग’मध्ये, तर कधी ‘हम साथ साथ है’मध्ये! २०१३चा ‘शिरीन फरहाद की निकल पडी’ हा त्यांनी भूमिका केलेला अखेरचा चित्रपट! काही टीव्ही मालिकांमाधेही त्यांनी कामे केली. त्यानंतर आजारपणामुळे त्या काम करू शकत नव्हत्या! नव्वदी गाठलेल्या शरीराने साथ तरी किती द्यावी म्हणा! त्यांचे जाणे अकाली नव्हते, तरीही त्या बातमीने मन उदास बनले. आणि जाणवले, अरे आपण ‘मल्हार’च्या गीतांचा विचार करत होतो ना! आणि ‘मल्हार’ची नायिका शम्मीजीच होत्या.

‘मल्हार’ चित्रपटातील प्रेमगीते दुःखद भावनांची आहेत. विशेषतः ‘कहाँ हो तुम जरा आवाज दो...’ हे लता मंगेशकर व मुकेश यांचे द्वंद्वगीत तर अप्रतिम आहे. मुकेश यांचे ‘तारा टूटे, दुनिया देखे’, ‘दिल तुझे दिया था रखने को...’ ही एकल गीतेही श्रवणीय आहेत.

शम्मीजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ; पण आजच्या पाडव्याच्या दिवसाची आनंदी मन:स्थिती पाहता ‘मल्हार’मधील एक सुखद प्रेमगीत आपण पाहू या! एकमेकांवर नितांत प्रेम करणारे प्रियकर आणि प्रेयसी नव्हे, पती-पत्नीसुद्धा आपल्या भावना व्यक्त करताना एकमेकांना काय सांगतील, ते इंदिवर या गीतकाराने किती साध्या-सोप्या शब्दांत मांडले आहे बघा! संगीतकार रोशननी एक मधुर चाल त्यासाठी योजली आहे. त्यामुळे हे गीत आपणही गुणगुणू शकतो.

बडे अरमान से रखा है बलम तेरी कसम 
प्यार कि दुनिया में पहला कदम

हे प्रियकरा, तुझी शपथ घेऊन सांगते, की मोठी स्वप्ने-आकांक्षा बाळगून मी या प्रीतीच्या जगात पहिले पाऊल ठेवले आहे.

यावर तोही म्हणतो, की

जुदा ना कर सकेंगे हमको जमाने के सितम 
प्यार की दुनिया में ये पहला कदम

(हे प्रिये, मीही तुझ्यासोबत) या प्रीतीच्या जगात पहिले पाऊल ठेवले आहे. (आता) या जगातील कोणतेही संकट आपल्याला वेगळे करू शकणार नाही.

प्रीतीचा हा संवाद पुढे नेताना ती म्हणते,

ले उठा प्यार भी अंगड़ाई है दिल भी जवाँ
अजी ऐसे में ले जाते हो तुम बोलो कहाँ?

माझ्या या तारुण्यातील हृदयाची स्पंदने, माझे हे प्रेमाने स्वच्छंदी बागडणे हे सर्व तुझे आहे, तुझ्यामुळे आहे. माझ्या या अवस्थेत मला तू कुठे घेवून जाणार आहेस ते सांग ना!

तिचा या प्रश्नावर तो म्हणतो, 

दूर दुनिया की निगाहों से कही जाएंगे हम
प्यार की दुनिया मे ये पहला कदम 

(या निर्दयी, निष्ठुर) जगाच्या नजरेपासून आपण दूर कुठेतरी जाऊ या. कारण आपण या प्रीतीच्या जगत पहिले पाऊल टाकले आहे.

तो पुढे म्हणतो,

तेरी आँखो में दिखते है मुझे दोनो जहाँ
इन्ही में खो गया दिल मेरा कहो ढूँढू कहाँ

तुझ्या या दोन डोळ्यांमध्ये मला सारे जग दिसत आहे. (पण तरीही) त्यामध्ये हरवलेले माझे हृदय मला दिसत नाही. त्याला मी कोठे शोधू बरे?

‘त्याच्या’ या लडिवाळ तक्रारीवर ‘ती’ काहीच उत्तर न देता उलट त्याला आश्वस्त करते. 

चाँद घटता हो घटे, अपनी मुहब्बत न हो कम
प्यार की दुनिया में ये पहला कदम

प्रीतीच्या या जगात मी पहिले पाऊल टाकले आहे. (तेव्हा तुला सांगते) हा घटत जाणारा, कमी-कमी होत जाणारा चंद्र पाहिलास का? पण त्याच्यासारखे आपले एकमेकांवरील प्रेम घटत, कमी-कमी होत जाणार नाही. ती पुढे म्हणते,

मेरी नैया को किनारे का इंतजार नही

माझ्या प्रीतीच्या नौकेला किनाऱ्यावर येण्याची प्रतीक्षा नाही 

तिच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी तो म्हणतो, 

तेरा आंचल हो तो पतवार भी दरकार नही

तुझा पदर हेच सुकाणू असल्यावर मला अन्य सुकाणूची गरज नाही (अर्थातच तुझी अखंड साथ महत्त्वाची आहे.)
प्रियकराने अशी अपेक्षा व्यक्त केल्यावर दोघेही एका सुरात गातात.

तेरे होते हुए क्यो हो मुझे तूफान का गम 
प्यार की दुनिया में ये पहला कदम हो पहला कदम

तुझी साथ असल्यावर मला कोणत्याही वादळाचे (संकटाचे) दुःख अगर भीती का वाटावी? प्रीतीच्या राज्यातील आमचे हे पहिले पाऊल आहे.

शम्मीजींच्या स्मृतीसाठी हे ‘सुनहरे गीत’ समर्पित!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link