Next
‘लायन्स क्लबचा पुढाकार कौतुकास्पद’
प्रेस रिलीज
Friday, April 27 | 05:16 PM
15 0 0
Share this story

खासदार वंदना चव्हाण यांचा सत्कार करताना रमेश शहा. डावीकडून सुनीता मंद्रुपकर, वैशाली पाटकर, स्वाती सटाणकर, दादा सांगळे, शहा, अभय शास्त्री, अनिल मंद्रुपकर, विजय रोडे व राजेंद्र गोयल.

पुणे :
‘निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेली नैसर्गिक संपत्ती पुढच्या पिढीसाठी साठवून ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या पुढच्या सुखी-समृद्ध आणि निरोगी पिढीसाठी प्रदूषणमुक्त शहर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. लायन्स क्लबने प्रदूषणमुक्त पुण्यासाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. पर्यावरण आणि महिला सबलीकरण हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय असल्याने या समस्यांवर काम करायला मला नेहमीच आवडते,’ असे प्रतिपादन खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केले.

लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘प्रदूषण फ्री पुणे’ प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. २०१८ ते २०२३ या पाच वर्षांच्या काळात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल अॅड. चव्हाण यांचा सन्मानपत्र देऊन लायन्स क्लबचे उपप्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी अनिल मंद्रुपकर, दादासाहेब सांगळे, अभय शास्त्री, वैशाली पाटकर, रवींद्र धारिया, महेंद्र घागरे, ललित राठी, मुकुंद शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. लायन्स क्लब इको फ्रेंड्स, लेकटाऊन, विजयनगर, आर्या, कोथरूड, पूना सिटी, डिजिटल, सुप्रीम, शिवाजीनगर आणि गॅलॅक्सी या दहा क्लबचा यामध्ये पुढाकार आहे.

अॅड. चव्हाण म्हणाल्या, ‘या पाच वर्षांच्या प्रकल्पामध्ये लायन्स क्लबसोबत मलाही काम करायला आवडेल. प्रकल्पाचे योग्य नियोजन करून त्याची अंमलबजावणी झाली, तर हा प्रकल्प यशस्वी होईल. त्यासाठी आपण सर्वानी या प्रकल्पात योगदान द्यायला हवे. शालेय विद्यार्थी, बचत गटातील महिला यांना आपण बरोबर घेऊन काम केले, तर पुण्याला प्रदूषणमुक्त बनविण्यात आपल्याला यश मिळेल.’

रमेश शहा म्हणाले, ‘सरकारच्या धोरणावर टीका करण्यापेक्षा प्रत्येकाने प्रदूषणमुक्त शहरासाठी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येकाने कमीत कमी एक तरी झाड लावून त्याची संवर्धन करावे. या प्रकल्पाच्या माध्यमातून लायन्स क्लब आणि स्वयंसेवी संस्था चांगले काम करत आहेत.’

‘या प्रकल्पांतर्गत रहदारी, वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन यावर भर दिला जाणार आहे. येत्या पाच वर्षांत पुण्यातील प्रदूषण कमी करण्याच्या या प्रयत्नात आपण सर्वानी सहभाग घ्यावा,’ असे आवाहन मंद्रुपकर यांनी केले.
 
प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर परिणाम कसा होतो, जन्माला येणाऱ्या मुलांवर होणारे परिणाम याविषयी चेस्ट रिसर्च फाउंडेशनच्या मोनिका बारणे यांनी माहिती दिली. रमेश पसरीजा यांनी वाहनांचे प्रदूषण यावर माहिती दिली. प्रास्ताविक मंद्रुपकर यांनी केले. सूत्रसंचालन योगेश कदम आणि सुनीता चिटणीस यांनी केले. आभार विजय बाफना यांनी मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link