Next
दुर्दम्य इच्छाशक्तीचा स्रोत; स्टीफन हॉकिंग
BOI
Wednesday, March 14, 2018 | 06:33 PM
15 0 0
Share this story

स्टीफन हॉकिंग

१९६३मध्ये ‘फक्त दोनच वर्ष जगेल’, असं तज्ज्ञ डॉक्टरांनी भाकित करूनही, मृत्यूला तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ ओशाळवणारा स्टीफन हॉकिंग ग्रेटच होता. सगळ्या शरीराच्या अवयवांनी आपलं काम थांबवल्यानंतरही केवळ आपल्या मेंदूच्या साहाय्यानं संगणकाचा आधार घेऊन अव्याहतपणे वयाच्या ७६ वर्षांपर्यंत काम करणाऱ्या हॉकिंगला मृत्यूची कधीही भीती वाटली नाही हे विशेष... अशी दृढ इच्छाशक्ती असलेल्या या अवलियाने आज (१४ मार्च) जगाचा निरोप घेतला, त्याची ही एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली आहे... ‘स्टीफन हॉकिंग’बद्दलचा हा विशेष लेख...
...................................... 
‘आयुष्य सरळ, साधं आणि सोपं मुळीच नसतं; पण मिळालेल्या आयुष्याला सुंदर बनवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा’, असं म्हणणाऱ्या ‘स्टीफन हॉकिंग’ यांनी वयाच्या ७६व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला, ही बातमी ऐकून धक्का बसला. आपलं जवळचं कोणी माणूस अचानक निघून जावं असं काहीसं वाटलं. मीच नव्हे, तर माझ्या ओळखीच्या आसपासच्या अनेकांना हॉकिंग प्रेरित करत होता. 

स्टीफन हॉकिंगची तुलना जगप्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईनबरोबर केली जायची. इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित अशा केंब्रिज विद्यापीठात ल्युकेशियन प्रोफेसर म्हणून हॉकिंग कार्यरत होता. स्टीफन हॉकिंग या वैज्ञानिकानं चक्क सहा वेळा डॉक्टरेट मिळवली! आणि त्याला जगातले प्रचंड प्रतिष्ठित किती म्हणजे किती पुरस्कार मिळावेत..? एडिंग्टन मेडल, ह्यूजेस मेडल, रॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचं गोल्ड मेडल, फ्रँकलिन मेडल, मॅक्सवेल मेडल, वोल्फ प्राईझ इन फिजिक्स, अल्बर्ट आईनस्टाईन पुरस्कार, प्रिंन्स ऑफ अस्तूरियस पुरस्कार, कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा एलिझाबेथ राणीनं दिलेला पुरस्कार, अमेरिकन फिजिकल सोसायटीतर्फे दिला जाणारा ज्यूलियस एडगर लिलनफिल्ड पुरस्कार, रॉयल सोसायटी फेलो म्हणून निवड, अमेरिकेचा ‘प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम’, हा सर्वोच्च नागरी पुरस्कार अशा अनेकविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी हॉकिंगला गौरवण्यात आलं.

जगप्रसिद्ध संशोधक म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्टीफन हॉकिंगने विज्ञानावर अनेक उत्कृष्ट पुस्तकं लिहिली आणि ती प्रचंड गाजली. त्यातली ‘अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ आणि ‘दी युनिव्हर्स इन एनटशेल’सारखी पुस्तकं सर्वसामान्यांना कळतील अशी सोपी, सुलभ आणि रसाळ होती. त्याची ‘गॉड क्रिएटेड दी इंटिजर्स’सारखी अनेक गणिती सूत्रांनी भरलेली गुंतागुंतीचीही पुस्तकं होती. हॉकिंगने आपल्या मुलीबरोबरही लहान मुलांसाठी विज्ञानकथा लिहिल्या. त्याचं २०१३मध्ये लिहिलेलं ‘माय ब्रिफ हिस्ट्री’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आणि जगभरातल्या लोकांनी त्याला पसंतीची पावती दिली. तसंच त्याचं थिऑरॉटिकल कॉस्मॉलॉजी (सैद्धांतिक खगोलशास्त्र), क्वांटम ग्रॅव्हिटी (पुंज गुरुत्वाकर्षण), स्ट्रिंग थिअरी आणि स्पेस अँड टाईम (अवकाश आणि काळ) यांच्यावरचं त्यांचं संशोधन संपूर्ण जगाला चकित करणारं आहे.  

‘विश्वाचे काही नियम आहेत आणि या नियमांच्या आधारेच विश्वाचं भवितव्य सांगता येतं. विश्वाची वाट दोन प्रकारची असू शकते. पहिल्यामध्ये विश्व प्रसरण पावेल आणि नंतर आकुंचन पावून त्याचा शेवट महासंकोचात होईल. दुसऱ्या वाटेत विश्वाचं प्रसरण अनंतकाळापर्यंत चालू राहील. आता विश्व‍ कोणत्या वाटेनं जाईल हे त्याच्या सध्याच्या घनतेवर अवंलबून असतं. सध्याचं विश्व‍ महासंकोच आणि सततचं प्रसरण यांच्या सीमेवर उभं आहे’, असं स्टीफन हॉकिंगनं म्हटलं होतं. विश्वाच्या या अवस्थेविषयी स्टीफन हॉकिंग आणि प्रसिद्ध गणितज्ञ ‘रॉजर पेनरोज’ यांनी संशोधन सुरू केलं. थोडक्यात ‘गॅलिलिओ’ला जाणवलेली, न्यूटननं शोधून काढलेली आणि आईनस्टाईननं अर्थ उलगडून दाखवलेली गुरुत्वाकषर्णाची कथा स्टीफन हॉकिंगनं आणखी पुढे नेली. ‘फ्रीडमन’ आणि ‘हबल’ यांनी प्रसरण पावणाऱ्या विश्वाची निर्मिती अतिशय सूक्ष्मबिंदूतून झाल्याचं म्हटलं होतं. त्यातूनच या वेळ किंवा काळ यांना सुरुवात आणि शेवट आहे का, याविषयी स्टीफन हॉकिंगनं आपलं संशोधन सुरू केलं. स्टीफन हॉकिंगचं आणखी महत्त्वाचं संशोधन म्हणजे ‘कृष्णविवर’बद्दल (ब्लॅकहोल) असलेलं संशोधन. स्टीफन हॉकिंगला ‘कृष्णविवरात शिरणारा शूरवीर’ असं लोक म्हणत. स्टीफन हॉकिंगनं ‘स्ट्रिंग थिअरी’वरसुद्धा काम केलं. 

स्टीफन हॉकिंगनं आणखी एक गंमतशीर विचार मांडला, तो म्हणजे आपल्याला ज्या तऱ्हेनं विश्व दिसतं किंवा जाणवतं, त्याच तऱ्हेनं खरं विश्व असेलच किंवा असतंच असं नाही. कृष्णविवराच्या अस्तित्वाबद्दल आणि हॉकिंग रेडिएशनबद्दल भविष्यात स्टीफन हॉकिंगला नोबेलनं गौरवलं जाईल यात शंकाच नाही. 

काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या स्टीफन हॉकिंगचा जन्म ८ जानेवारी १९४२ला इंग्लंडमधील ऑक्सफर्ड याठिकाणी झाला. लहानपणापासून स्टीफन हॉकिंगला वाचनाची आवड लागली. याचं कारण त्याच्या घरात खूप पुस्तकं असायची. मैदानी खेळ त्याला फारसे आवडत नसत. वयाच्या आठ-नऊ वर्षांपासून हॉकिंग शास्त्रज्ञ व्हायची स्वप्नं बघत. त्याला रिचर्ड वॅग्नर हा संगीतकार खूप आवडत असे. त्याच्या संगीतानं हॉकिंगला जगण्यासाठीची ऊर्जा मिळाली. शालेय शिक्षण संपल्यावर स्टीफन ‘केंब्रिज’मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाला. 

१९६२मधील हिवाळ्यात ख्रिसमसच्या सुटीसाठी हॉकिंग घरी आला असताना, त्याला आपला पाय दुखतोय असं लक्षात आलं. सुरुवातीला असेल काहीतरी किरकोळ कारण म्हणून त्यानं दुर्लक्ष केलं; पण नंतर सगळ्या तपासण्या केल्यानंतर त्याला ‘मोटर न्यूरॉन’ नावाचा आजार झाल्याचं निष्पन्न झालं. इंग्लंडमध्ये या आजाराला ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ तर अमेरिकेत याला ‘अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (ए.एल.एस.)’, असं म्हणतात. हा आजार खरं तर चाळिशीच्या दरम्यान होऊ शकतो. क्वचित तो तरुण वयातही होतो. याचं प्रमाण लाखात तीन ते सात असं आहे. वातावरणातले अदृश्य घटक या विकाराला कारणीभूत असावेत, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. 

या आजारात शरीरातल्या स्नायूंवर नियंत्रण राहत नाही. स्नायूंची नैसर्गिक हालचाल करणारा मेंदूमधील भाग काम करेनासा होतो. या विकाराची सुरुवात होते, तेव्हा रुग्णाला अशक्तपणा वाटायला लागतो. त्याचं बोलणं अडखळल्यासारखं होतं आणि पुढे अन्न गिळतानाही त्रास व्हायला लागतो. कारण शरीरातले सगळेच म्हणजे घशातले स्नायूही आपलं काम करू शकत नाहीत. शेवटी चालणं, बोलणं सगळंच हळूहळू थांबतं. त्यामुळे जिवंतपणी मरण बघण्यापेक्षाही वाईट अवस्था होते. शेवटी तर श्वास घेणारे स्नायूही काम करेनासे होतात आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण तडफडून मरतो. ‘मोटर न्यूरॉन’ या रोगावर आज तरी औषध नाही. या विकारातली आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रुग्णाचा मेंदू मात्र अखेरपर्यंत शाबूत राहतो. असा विकार होणं म्हणजे भीती, नैराश्य, दुःख यांचा कडेलोटच..! 

या आजाराची कल्पना आल्यावर स्टीफन हॉकिंग आणि त्याचे आई-वडील यांना धक्काच बसला. आपल्याला खूप शिकायचंय, पीएचडी करायचीये आणि हे काय होऊन बसलं.? आपण कणाकणानं आपलंच मरण बघायचं, हे किती कठीण आहे, हे त्याला कळत होतं. त्यातच डॉक्टरांनी त्याला ‘तू केवळ दोनंच वर्षं जगशील’ असं सांगितलं. समोर आपलं मरण दिसत असतानाही हॉकिंगनं पीएचडीचा अभ्यास सुरू करायचं ठरवलं. 

पीएचडीचा अभ्यास सुरू असताना ‘रॉजर पेनरोज’चं ‘सिंग्युलॅरिटी’वर झालेलं एक भाषण हॉकिंगनं ऐकलं. एखाद्या ताऱ्यातलं अणुइंधन संपल्यावर तो तारा लहान लहान होऊन त्याचा एक अमर्याद घनतेचा एक बिंदू (म्हणजेच सिंग्युलॅरिटी) होऊ शकतो, अशी ही थिअरी होती. हॉकिंगच्या मनात अचानक एक विचार आला, ‘हे जर एका ताऱ्याचं होत असेल तर मग हे सगळ्या विश्वाचंही होऊ शकेल’. सिंग्युलॅरिटी हा सिद्धांत संपूर्ण विश्वासाठीच वापरला तर काय होईल.? पुढे हीच कल्पना विकसित करून हॉकिंगनं त्यावर निष्कर्ष काढले आणि त्यानं लिहिलेल्या या प्रबंधाबद्दल त्याला डॉक्टरेटही मिळाली. 

१९६५ सालच्या डिसेंबरमध्ये अमेरिकेतल्या मायामी इथे सापेक्षता वादाविषयी परिषद भरली होती. हॉकिंगच्या वतीनं त्याचा मित्र जॉर्ज इलिस याने हॉकिंगचं भाषण या परिषदेत वाचून दाखवलं. त्यानंतर हॉकिंगविषयी शास्त्रज्ञ मंडळींमध्ये खूपच आदर निर्माण झाला. यानंतर हॉकिंगनं ‘सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेस टाईम’ हा संशोधन प्रबंध लिहिला. त्याबद्दल १९६६मध्ये त्याला ‘अॅडम्स प्राईझ’ मिळालं. याच काळात ‘रॉजर पेनरोज’बरोबरही त्याचं संशोधन सुरूच होतं.

यादरम्यान हॉकिंगच्या मनाचा निश्चय ठाम असायचा, पण त्याच वेळी त्या निश्चयाला हाणून पाडण्यासाठी शरीर हल्ला करायचं. हॉकिंगच्या आजारानं पुन्हा मुसंडी मारायला सुरुवात केली आणि आता मात्र काठी सोडून त्याला चक्क कुबड्या वापरण्याची वेळ आली. कुबड्यांनीही फक्त थोडेच दिवस साथ दिली आणि मग त्यांचाही उपयोग संपला. इतका की काहीच दिवसांत हॉकिंगला हालचाल करणंच अशक्य झालं. मग व्हील चेअरचा आसरा घ्यावा लागला. स्वतःच स्वतःच्या बळावर हालचाल करायची या निश्चयानं हॉकिंग प्रयत्न करत होता. त्याचं व्हील चेअरवर असणं त्याच्या मित्रांनाही बघवत नसे, पण त्याही अवस्थेत हॉकिंग आपल्या संवादातून विनोदाची पेरणी करून इतरांना हसायला लावत असे. या आजाराला आपल्या आयुष्यातलं सर्वोच्च स्थान कधीच द्यायचं नाही असं हॉकिंगनं पक्कं ठरवलं होतं. भविष्याचा विचार करून चिंता करायची नाही आणि वर्तमान हातातून निसटू द्यायचं नाही असं त्यानं ठरवलं.

१९६८मध्ये हॉकिंगला केंब्रिजमधल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ थेरॉटिकल अॅस्ट्रॉनॉमी’ या संस्थेत कामासाठीचा प्रस्ताव आला. आठवड्यातले तीन दिवस तिथं जायचा निर्णय हॉकिंगनं घेतला. तोपर्यंत हॉकिंगइतका प्रसिद्ध झाला होता, की त्याचं नाव ऐकून संस्थेत अनेक खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ त्याला भेटण्यासाठी, त्याच्याशी पाच मिनिटे का होइना बोलण्यासाठी गर्दी करायचे. जगभरातले संशोधक आणि संशोधन करणारे विद्यार्थी यांना हॉकिंगबद्दल प्रचंड कुतूहल वाटे. 

१९७०च्या सुमारास एकदा एका रात्री हॉकिंगला काही भन्नाट कल्पना सुचल्या आणि त्यावर त्यानं बराच खोलवर विचार केला. तो विचार होता कृष्णविवरातल्या विस्फोटाचा. त्यानं आपला तो सिद्धांत ‘नेचर’ या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध करण्यासाठी पाठवला आणि जगभर एकच खळबळ माजली. कृष्णविवरांच्या संशोधनानं हॉकिंगला जगप्रसिद्ध केलं. आईनस्टाईननं ‘सापेक्षतावादा’चा सिद्धांत मांडला होता; पण त्याला त्याविषयी खोलवर विचार करण्याइतकं गणित येत नव्हतं. आईनस्टाईनला त्यामुळे गणितासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागे. हॉकिंगचं गणित चांगलं होतं आणि शिवाय वेळ पडली, तर बरोबर रॉजर पेनरोज होताच. पण आजारामुळे हॉकिंगला सगळी समीकरणं डोक्यातल्या डोक्यात सोडवावी लागत. तज्ज्ञांच्या मते हॉकिंगचा तो शोधनिबंध हा भौतिकशास्त्राच्या इतिहासातला सगळ्यात सुंदर शोधनिबंध होता.

स्टीफन हॉकिंगचा ब्लॅक होल्सवरचा (कृष्णविवरावरचा) प्रबंध ‘नेचर’ या इंग्लंडच्या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झाला आणि १९७४च्या वसंत ऋतूत त्याची ‘रॉयल सोसायटीचे फेलो’ म्हणून निवड झाली. ही तर प्रचंड बहुमानाचीच गोष्ट होती. हा मानव वयाच्या बत्तीसाव्या वर्षी मिळणं, म्हणजे अचाटच होतं.. हे सदस्यत्व मिळाल्यावर त्याचा एक भव्य ग्रहणविधी असतो. सतराव्या शतकापासून याची एक छान अशी परंपरा आहे. या परंपरेनुसार नवीन सदस्य एका ठरावीक ठिकाणापर्यंत चालत जाऊन तिथे ठेवलेल्या पुस्तकात आपलं नाव लिहून मग त्यापुढे स्वाक्षरी करतात. पण इथे तर हॉकिंगला चालताही येत नव्हतं. मग इतक्या शतकांची परंपरा मोडून त्यावेळचे अध्यक्ष आणि जीवशास्त्रातल्या संशोधनासाठी नोबेल मिळवलेले सर हॉजकिन हे स्वत: स्वाक्षरीचं पुस्तक घेऊन हॉकिंगकडे गेले. हॉकिंगने खूप कष्टांनं, खूप त्रास घेऊन त्यावर जेव्हा स्वाक्षरी केली, तेव्हा तो सोहळा अनेक शास्त्रज्ञ अत्यंत आदरपूर्ण नजरेनं बघत होते. स्वाक्षरी करून झाल्यावर हॉकिंगनं मान वर करून बघताच टाळ्यांचा कडकडाट झाला..!

हॉकिंगचं विद्यापीठातलं अस्तित्व विद्यापीठासाठी सन्मानाची गोष्ट झाली होती. विद्यापीठानं हॉकिंगला पुस्तकाची पानं उलटू शकेल असं खास मशीन दिलं. तसंच कम्प्युटरचं एक टर्मिनलही दिलं. त्याच्यासाठी खास कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली. १९७४पर्यंत हॉकिंग कुणाच्याही मदतीशिवाय खाऊ-पिऊ शकत होता; पण नंतर त्याची प्रकृती ढासळतच गेली. 

स्वतःशी झगडत असताना इतर अपंग बांधवांविषयीदेखील हॉकिंगला तितकीच कळकळ वाटे. केंब्रिजमधली ‘कॉकक्रोफ्ट’ ही इमारत निवडणुकांच्या वेळी मतदानासाठी वापरली जात असे. या इमारतीत अपंगांच्या दृष्टीनं कुठल्याही सोयी सुविधा नसल्यानं अपंग लोकांना त्या इमारतीत जाऊन मतदान करणं अशक्य होतं. मग अपंगत्व असलेली मंडळी निवडणुकांपासून नाइलाजानं दूर राहत आणि आपल्या मतदानाचा हक्क वापरता येत नाही म्हणून खंतावत. ही गोष्ट हॉकिंगच्या लक्षात येताच त्यानं अपंगांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि चक्क लढा दिला. ही इमारत सार्वजनिक नाही त्यामुळे या इमारतीसाठी अपंग व्यक्ती कायदा लागू होत नाही अशी भूमिका केंब्रिज सिटी कौन्सिलनं घेतली; पण हॉकिंगनं या प्रश्नाचा पिच्छा सोडला नाही. अपंगांच्या बाजूनं हॉकिंगसारखा प्रसिद्ध वैज्ञानिक उभा आहे हे वृत्त कळताच जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांनी अपंगांच्या प्रश्नांवर बोलायला सुरुवात केली. मग अनेक लेख छापून आले. शेवटी सिटी कौन्सिलनं आपलं चुकलं, अशी कबुली देत या लढ्यातून माघार घेतली. या सगळ्या लढ्याबद्दल १९७९मध्ये ‘रॉयल असोसिएशन फॉर डिसएबिलिटी अँड रीहॅबिलिटेशन’ या संस्थेनं हॉकिंगला ‘मॅन ऑफ दी इयर’ हा किताब प्रदान केला. यानंतरही हॉकिंगनं सतत अनेक परिषदांमधून अपंगांच्या प्रश्नांवर नेमकं बोट ठेवलं. अपंगांना वेगळं न टाकता सर्वसामान्य मुलांमध्येच वाढवलं पाहिजे असाही त्यानं आग्रह धरला. 

अमेरिकेतला प्रतिष्ठेचा अल्बर्ट आईनस्टाईन पुरस्कार भौतिक शास्त्रातल्या संशोधनासाठी दिला जातो. १९७८मध्ये हा पुरस्कार मोठ्या सन्मानपूर्वक हॉकिंगला देण्यात आला. यानंतर १९७९मध्ये आईनस्टाईनच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंब्रिज विद्यापीठानं हॉकिंगचे अनेक लेख एकत्रित करून एक पुस्तक प्रसिद्ध केलं. तसंच ‘जनरल रिलेटिव्हिटी-अॅन आईनस्टाईन सेंटिनरी सर्व्हे’ याचं हॉकिंगनं सहसंपादन केलेलं पुस्तकही प्रसिद्ध झालं. या दोन्ही पुस्तकांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याच दरम्यान हॉकिंगला केंब्रिज विद्यापीठातलं ‘ल्यूकेशियन प्रोफेसर’ हे मानाचं पदही मिळालं. बरोबर ३१० वर्षांपूर्वी ‘न्यूटन’ची ही याच पदावर नेमणूक झाली होती.

१९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षात हॉकिंगला ऑक्सफर्ड, प्रिन्स्टन, न्यूयॉर्क, लँकेस्टर, नोत्रदाम या इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स देशांतल्या विद्यापीठांनी ‘डॉक्टरेट’ ही पदवी बहाल केली. इंग्लंडच्या एलिझाबेथ दुसऱ्या या राणीनं त्याला ‘कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर (सीबीई)’ ही पदवी ही बहाल केली..! 
यानंतर स्टीफन हॉकिंगनं ‘अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ हे पुस्तक लिहिलं. फक्त अमेरिकेत या पुस्तकाच्या दहा लाख प्रती लगेचच खपल्या, तर एकट्या इंग्लंडमध्ये या पुस्तकाच्या एकाच वर्षात ३३ आवृत्त्या निघाल्या आणि ‘हार्ड कव्हर’च्या प्रती तर साडेपाच लाखाहून जास्त खपल्या. जगातल्या इतर भाषांत त्यांचं भाषांतर झालं आणि त्याच्या पन्नास लाख प्रती बघता बघता संपल्या. संडे टाइम्स’च्या ‘बेस्ट सेलिंग’ पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक सलग १८४ आठवडे म्हणजे चक्क जवळपास साडेतीन वर्ष होतं. या पुस्तकामुळे हॉकिंग घरोघर पोहोचला. या पुस्तकानं हॉकिंगला एवढी प्रतिष्ठा मिळवून दिली होती, की हॉकिंग रस्त्यात जरी दिसला तरी आपण त्याचं पुस्तक वाचलं असून आपल्याला ते का आवडलं हे त्याला आवर्जून सांगायला लोक जमू लागले.

या पुस्तकाच्या खपानं उच्चांक गाठला आणि कळस म्हणजे हे पुस्तक ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डज्’मध्ये जाऊन बसलं. अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचं भाषांतर झालं आणि बेस्टसेलर म्हणून या पुस्तकानं कित्येक महिने आपलं स्थान अबाधित ठेवलं. हॉकिंगचं नाव या पुस्तकामुळे जगभर पोहोचलं. अनेक सुशिक्षित, उच्चभ्रू, श्रीमंत, विज्ञानाशी काहीही संबंध नसणाऱ्या अशा अनेक कुटुंबांच्या दिवाणखान्यात हे पुस्तक दिसायला लागलं. हे पुस्तक चक्क एक ‘स्टेटस सिंबॉल’ बनलं.! १९८८मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकानं २० वर्षात एक कोटीपेक्षा जास्त प्रतींची विक्री केली.  

या पुस्तकाच्या बाबतीत घडलेला एक किस्सा खूपच बोलका आहे. एकदा प्रसिद्ध रशियन वैज्ञानिक आंद्रे लिंडे विमान प्रवास करत असताना त्याच्या शेजारी बसलेला एक व्यापारी ‘अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ पुस्तक वाचताना त्याला दिसला. त्याच्याशी गप्पा मारताना ‘आंद्रे लिंडे’नं ते पुस्तक कसं आहे विचारलं. तेव्हा तो व्यापारी त्या पुस्तकावर भरभरून बोलायला लागला. लिंडेनं मुद्दामच निराशेचा सूर काढत ते पुस्तक कसं जड आहे आणि त्यातल्या अनेक संकल्पना कळत नाही असं म्हटलं. त्या व्यापाऱ्याला आंद्रे लिंडे जगप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ आहे ही गोष्ट ठाऊक नव्हती. त्याला लिंडेचं बोलणं आवडलं नाही. त्यानं लगेचच लिंडेला विश्वाच्या निर्मितीबद्दल आणि कृष्णविवराबद्दल (ब्लॅक होलबद्दल) माहिती सांगायला सुरुवात केली. हे पुस्तक गवंडी, सुतार, प्लंबर, खाटिक यांच्यापासून ते डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिकांपर्यंत सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं हॉकिंगला वाटत असे. आयुष्याचा महत्त्वाचा हिस्सा असलेल्या विज्ञानावरच्या पुस्तकाला घरातघरात स्थान मिळालं पाहिजे, अशी त्याची इच्छा होती ती पूर्ण झाली होती. 

एडी रेडमेनएरॉल मॉरिस या दिग्दर्शकानं या पुस्तकावर ‘अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ याच नावाचा सिनेमाही काढला. यात स्टीफन हॉकिंग यानं चक्क मुख्य भूमिका केली.! या चित्रपटात त्याच्या संशोधनाबरोबरच त्याच्या आयुष्याविषयीही माहिती होती. नुकताच २०१४मध्ये जेम्स मार्श यानं दिग्दर्शित केलेला ‘दी थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात हॉकिंगचं आयुष्य आणि कार्य उलगडून दाखवलं असून स्टीफन हॉकिंगची भूमिका एडी रेडमेन या अभिनेत्यानं अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. यासाठी त्याला उत्कृष्ट अभिनयाचं ‘आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स’बद्दल ‘गिल्ड ऍवार्ड’ मिळालं. या चित्रपटालाही अनेक पारितोषिकं मिळाली. 

आधुनिक विज्ञानाचा जनक गॅलिलिओच्या मृत्यूनंतर बरोबर ३०० वर्षांनी हॉकिंगचा जन्म झाला, याचा हॉकिंगला नेहमीच अभिमान वाटत असे. गॅलिलिओनं आधुनिक विज्ञानाचा पाया रचला. न्यूटननं विज्ञानाला पुढची वाट दाखवली तर आईनस्टाईननं सापेक्षतावादानं विज्ञानाच्या जगात खळबळ उडवली. त्यानंतरचं पाऊल हॉकिंगनं उचललं आणि व्यापक सापेक्षता (जनरलरिलेटिव्हिटी) आणि पुंजवाद (क्वांटम मेकॅनिक्स) या दोन्हीचं एकत्रीकरण करण्याच्या कामात तो गुंतून गेला. १९६३मध्ये ‘फक्त दोनच वर्ष जगेल’, असं तज्ज्ञ डॉक्टरांनी भाकित करूनही, मृत्यूला तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ ओशाळवणारा हॉकिंग ग्रेटच होता. सगळ्या शरीराच्या अवयवांनी आपलं काम थांबवल्यानंतरही केवळ आपल्या मेंदूच्या साहाय्यानं संगणकाचा आधार घेऊन अव्याहतपणे वयाच्या ७६ वर्षांपर्यंत काम करणाऱ्या हॉकिंगला मृत्यूची कधीही भीती वाटली नाही हे विशेष. ‘मला अजूनही खूप काम करायचंय, अनेक सिद्धांत शोधून काढायचेत, संशोधन पुढे न्यायचंय’, असं हॉकिंग म्हणायचा. त्याच्या चिकाटीला, जिद्दीला आणि बुद्धीला सलाम..!!

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kailash About 362 Days ago
छान
0
0
Shekhar About
Khup chan Lihil ahe
1
0

Select Language
Share Link