Next
खिचडी शिजविणाऱ्या बबिता ताडे बनल्या करोडपती
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जिंकले एक कोटी
BOI
Tuesday, September 17, 2019 | 04:31 PM
15 0 0
Share this article:

बबिता ताडे

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथे शालेय पोषण आहाराची खिचडी शिजविणाऱ्या बबिता ताडे यांचे नशीब ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे उजळले आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर एक कोटी रुपये जिंकून रातोरात त्या करोडपती झाल्या आहेत. 

बबिता ताडे करोडपती झाल्या, तो भाग १८ आणि १९ सप्टेंबर रोजी प्रसारित होणार आहे. एक सामान्य स्त्रीसुद्धा तिचे स्वप्न पूर्ण करू शकते, हे त्यांना सिद्ध करायचे होते आणि त्यांनी ते करून दाखवले. सध्या अमरावती जिल्ह्यात बबिता ताडे यांच्या यशाची चर्चा सुरू आहे. बबिता ताडे करोडपती झाल्याची घोषणा सोनी टीव्हीने ट्विटरवर केली असून, अमिताभ बच्चन आणि बबिता यांचा शोमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

बबिता सुभाष ताडे या अंजनगावसुर्जी शहरातील पंचफुलाबाई हरणे विद्यालयात शालेय पोषण आहार बनवण्याचे काम करतात. त्यासाठी त्यांना महिन्याला केवळ दीड हजार रुपये पगार मिळतो. बबिता यांचे पती सुभाष ताडे गेल्या २३ वर्षांपासून हरणे विद्यालयात शिपाई म्हणून काम करतात. बबिता या पदवीधर असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे एक वर्षही त्यांनी पूर्ण केले आहे; मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी संसारावर लक्ष केंद्रित केले. ताडे यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगी पुण्याला, तर मुलगा अंजनगाव येथे शिक्षण घेत आहे. 


वाचनाची आवड असल्याने त्या वेळ मिळेल तेव्हा पुस्तके वाचत होत्या. याच बळावर त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला आणि अकराव्या पर्वामध्ये त्या ‘हॉटसीट’पर्यंत पोहोचल्या. महानायक अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने अचूक उत्तरे दिली आणि त्या करोडपती झाल्या. बबिता यांच्या घरात एकच फोन असल्याने या कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना एक मोबाइल फोनही भेट दिला.

बबिता या सध्या सुरू असलेल्या पर्वातील दुसऱ्या करोडपती असून, महिलांमध्ये त्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत. या पर्वात त्यांच्या आधी सरोज राज हे पहिले करोडपती झाले आहेत.  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search