Next
३... २... १... ०... आणि चांद्रयान-२ झेपावले!
BOI
Monday, July 22, 2019 | 02:53 PM
15 0 0
Share this article:

फोटो : दूरदर्शन

श्रीहरिकोटा :
३... २... १... ०... उलटगणती संपली आणि तो अतीव उत्सुकतेचा क्षण आला! सर्व भारतवासीयांच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्ने घेऊन चांद्रयान-२ चंद्रावर निघाले! ऐन वेळी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार हे यान १५ जुलैला उड्डाण करू शकले नाही; मात्र भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी अक्षरशः रात्रीचा दिवस करून बिघाड दुरुस्त केला आणि २२ जुलैला दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी म्हणजे अवघ्या एका आठवड्यात हे यान चंद्राकडे झेपावले! ४८ दिवसांनी म्हणजेच सात सप्टेंबर २०१९ रोजी हे यान चंद्रावर पोहोचणार आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे. 

रितू करिधल, मुथय्या वनिताजीएसएलव्ही मार्क थ्री या भारताच्या सर्वांत यशस्वी प्रक्षेपकाद्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यानाचे प्रक्षेपण झाले. प्रक्षेपण आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक उत्तम झाले, असे डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे. प्रक्षेपणानंतर १५ मिनिटांनी प्रक्षेपकाने यानाला निर्धारित कक्षेत सोडले आहे. त्यामुळे उड्डाण यशस्वी झाले आहे. प्रक्षेपणाचा कालावधी एका आठवड्याने पुढे गेला असला, तरी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच हे यान चंद्रावर उतरणार आहे. पहिले २२ दिवस हे यान पृथ्वीभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत राहील. त्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाण्याच्या दृष्टीने अधिकाधिक उंची गाठली जाईल. २३व्या दिवशी यान चंद्राच्या कक्षेच्या दिशेने निघेल. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर तीन लाख ८४ हजार किलोमीटर आहे. त्यानंतर आठ दिवसांनी यानाचा वेग कमी केला जाईल, जेणेकरून ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत खेचले जाईल. हा या मोहिमेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असेल.

उड्डाणापासून ४३व्या दिवशी ऑर्बायटरपासून विक्रम लँडर वेगळा होईल. या विक्रम लँडरमध्ये प्रज्ञान नावाचा रोव्हर आहे, जो प्रत्यक्ष चंद्रावर उतरून संशोधन करणार आहे. ४८व्या दिवशी विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल. ही १५ मिनिटांची प्रक्रिया अत्यंत थरारक असेल, असे डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे. विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्रावर उतरले, तर भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल.

विक्रम चंद्रावर उतरल्यानंतर चार तासांनी प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल. एक सेंटिमीटर प्रति सेकंद या वेगाने प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहे. एक चांद्र दिवस (म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस) एवढ्या कालावधीत प्रज्ञान चंद्रावर ५०० मीटर अंतर फिरणार असून, गोळा केलेली माहिती तो विक्रम किंवा ऑर्बायटरच्या माध्यमातून १५ मिनिटांत पृथ्वीवर पाठवणार आहे. 

या यानातून भारतासह विविध देशांनी मिळून एकूण १३ उपकरणे (पेलोड्स) चंद्रावर पाठवली आहेत. नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेनेही एक पेलोड पाठवले असून, ते चंद्राचे पृथ्वीपासूनचे नेमके अंतर मोजणार आहे. तसेच लँडर चंद्रावर नेमके कोठे आहे, याचा वेधही त्याच्या साह्याने घेतला जाणार आहे. अन्य पेलोड्सच्या साह्याने चंद्राच्या पृष्ठभागाची उंची, रचना, रासायनिक घटक, खनिजे, वातावरणातील घटक आदींचा अभ्यास केला जाणार आहे. 

मोहिमेची वैशिष्ट्ये : 
- मुथय्या वनिता आणि रितू करिधल या दोन महिलांच्या हाती मोहिमेचे नेतृत्व.

- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे (सॉफ्ट लँडिंग) चांद्रयान-२ हे जगातील पहिले यान ठरणार. आतापर्यंतच्या मोहिमांत कोणत्याही देशाचे यान चंद्राच्या या भागावर गेले नव्हते.

- चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरविणारी आणि देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आलेली पहिलीच मोहीम.

लाँचर (प्रक्षेपक)- देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या आधारे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणारी भारताची पहिलीच मोहीम

- चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरणार. (रशिया, अमेरिका आणि चीननंतर)

- यातून हाती लागणारी माहिती केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी उपयोगी ठरणार.

- पुढील लांब अंतरावरील मोहिमांसाठी आवश्यक अनुभव मिळणार.

- ज्यावर संशोधन करून माहितीची नोंद करता येईल, असा चंद्र हा अंतराळातील पृथ्वीच्या सर्वांत जवळचा घटक आहे. 

- चंद्रावरील संशोधनामुळे आपली अवकाशाविषयीची समज आणखी वाढणार आणि आणखी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत होणार.

- चंद्राची निर्मिती कशी झाली, याचा अधिक सखोल पद्धतीने अभ्यास करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

- चांद्रयान-१ने चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे पुरावे शोधले होते. त्या पाण्याचे प्रमाण पृष्ठभागाखाली किती आहे आणि वातावरणात किती आहे, हे आता शोधले
जाणार.

- चंद्राचा दक्षिण ध्रुव अंधारात असतो आणि या भागाचे क्षेत्रफळ उत्तर ध्रुवापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे कायमस्वरूपी अंधारात असलेल्या प्रदेशात पाणी असण्याची जास्त आहे.

- दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात खड्डे (क्रेटर्स) आहेत आणि सौरमालेच्या सुरुवातीच्या काळातील काही जीवाश्मरूपी पुरावे येथून सापडण्याची शक्यता आहे. 

- जीएसएलव्ही एमके-थ्री या भारताच्या आतापर्यंतच्या सर्वांत शक्तिशाली आणि पूर्णतः देशी बनावटीच्या प्रक्षेपकाद्वारे चांद्रयानाचे प्रक्षेपण झाले.

- ऑर्बायटर, लँडर आणि रोव्हर हे यानाचे तीन भाग आहेत.

ऑर्बायटर

- ऑर्बायटर चंद्राच्या भोवती परिभ्रमण करील आणि चंद्राच्या पृष्ठभागावर नजर ठेवील. विक्रम नावाचा लँडर आणि पृथ्वी यांच्यामधील तो दुवा असेल.

विक्रम लँडर

- विक्रम नावाचा लँडर प्रज्ञान नावाच्या रोव्हरला घेऊन चंद्रावर उतरेल.

प्रज्ञान रोव्हर

- प्रज्ञान नावाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर प्रत्यक्ष फिरणार आहे. त्याला सहा चाके असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे त्याचे कामकाज चालणार आहे. 

- सात सप्टेंबर २०१९ रोजी यान चंद्रावर उतरणार आहे.

- एक चांद्र दिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस.

- हे यान एक चांद्र दिवस एवढा कालावधी संशोधन करणार आहे. 

- चंद्राभोवती फिरणाऱ्या यानाचा प्रयोग वर्षभर सुरू राहणार.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shobhana Tirthali About 34 Days ago
थोडक्यात पण नेमकी माहिती.
0
0

Select Language
Share Link
 
Search