Next
‘कायदा नव्हे माणूस समजणे महत्त्वाचे’
BOI
Monday, March 12 | 02:15 PM
15 0 0
Share this story

हिंदू महिला सभेच्या वतीने संगीता धायगुडे यांना सौदामिनी पुरस्कार ‘गरवारे बालभवन’च्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या शोभा भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले आदी मान्यवर

पुणे : ‘प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपण सेवक आहोत आणि समोरचा याचक नाही, ही भावना कायम मनात असायला हवी. याबरोबरच राजकारणी आणि नागरिक या दोघांना एकत्र घेऊन आपल्याला काम करावे लागणार आहे, हे स्वत:शी पक्के करा. त्यामुळे जेव्हा तुम्हाला यामधील आव्हानांचा सामना करावा लागेल, त्या वेळी तुम्ही तयार असाल आणि योग्य तो निर्णय घेऊ शकाल. एक वेळ तुम्हाला कायदा समजला नाही तरी चालेल, पण माणूस समजायला हवा,’ असे मत मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांनी व्यक्त केले. 

शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात कार्यरत असलेल्या हिंदू महिला सभेच्या वतीने संगीता धायगुडे यांना शनिवारी, १० मार्च रोजी सौदामिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘गरवारे बालभवन’च्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या शोभा भागवत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी धायगुडे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी धायगुडे बोलत होत्या. 

हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले या वेळी उपस्थित होत्या. सीडीएस परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकाविलेली श्रुती श्रीखंडे आणि पुणे महापालिकेच्या नगरसेविका दिशा माने, स्मिता वस्ते, अश्विनी भागवत, मंजुश्री खर्डेकर, दीपाली धुमाळ, मनीषा खाडे यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. 

सुधीर गाडगीळ आणि संगीता धायगुडे
‘खुर्ची म्हणजे जबाबदारी’
संगीता धायगुडे म्हणाल्या, ‘प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत असताना अनेकदा आपण खुर्ची हे पद आहे असे समजत काम करतो; मात्र ते पद ही नागरिकांप्रति आपली असलेली जबाबदारी आहे. याची जाण खूप कमी प्रशासकीय अधिकारी बाळगतात. नागरिकांप्रति असलेली हीच जबाबदारी लक्षात ठेवून वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत कार्यरत राहिले पाहिजे.’ 

‘ मालेगाव शहर हे खरे तर धार्मिकदृष्ट्या खूप संवेदनशील आहे. त्यामुळे तिथे नियुक्ती झाली, तेव्हा धाकधूक होती; मात्र वरिष्ठांनी विश्वासाने टाकलेली जबाबदारी समजून जिद्दीने ते पोस्टिंग स्वीकारलं आणि गेले अकरा महिने चांगल्या पद्धतीने काम करू शकले याचे समाधान आहे. हे करीत असताना सामाजिक बांधिलकी जपली; पण त्याबरोबरच कायद्याच्या हद्दीत राहूनच काम केले. पूर्वी ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, म्हणजे काम दाखवा नाही, तर घरी बसा,’ असा कठोर खाक्या होत्या. आता अनुभव, वयानुरूप येणारी प्रगल्भता, तसेच एका आध्यात्मिक संस्थेशी जोडली गेल्याने स्वभावात फरक पडला आहे. त्यामुळे आता लोकांना आपली भूमिका पटवून देऊन, काम करून घेते. अर्थात जिथे शक्य नसेल तिथे कठोर भूमिका घेतेच. ज्याप्रमाणे राजकारणी आणि कायद्याचा दबाव असतो, तसाच सामान्य नागरिकांच्या अपेक्षांचादेखील ताण येतो,’ असे सांगून संगीता धायगुडे यांनी त्यांचा सातारा जिल्ह्यातील दुर्गम आंधळी गावापासून सुरू झालेला आपला प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. 

फिनिक्स भरारी
‘आंधळी गावात फक्त सातवीपर्यंत शाळा होती, त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मामाकडे माळेगावला आले; पण दहावी झाल्याबरोबर, लग्न झाले आणि पोलीस अधिकारी असलेल्या पतीसमवेत मुंबईत आले. दोन मुले झाली; मात्र अचानक पतिनिधनाचा डोंगर कोसळला. एक सुरक्षित, स्थिर आयुष्य संपून, दुःखाचे, निराशेच्या गर्तेत ढकलणारे आयुष्य पुढे आले. या काळात आधार दिला पुस्तकांनी आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी. डॉ. मनू कोठारी यांच्यासारख्या प्रेमळ, सकारात्मक व्यक्तीमुळे निराशेवर मात करणे शक्य झाले. पोलीस मुख्यालयात लिपिक म्हणून नोकरी मिळाली; पण आर्थिक स्थिती प्रतिकूल होती. त्याच वेळी लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायचा निर्णय घेतला. नोकरीतून वर्षभर रजा घेतली आणि अभ्यास सुरू केला. दिवसाचे वीस तास फक्त अभ्यास आणि अभ्यास करत होते. या काळात मुलांनी जमेल तसे जेवण बनवून खायला घातले. धीर दिला. कधी कधी दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडत असे. तरीही मदत म्हणून मिळणारी मोठी रक्कम नाकारली. कोणत्याही पांगुळगाड्याशिवाय आपल्या पायावर उभे राहायचे हे पक्के केले होते. निराशेने मन व्यापून जात असे. अशा वेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या लेखकांनी लिहून ठेवलेली प्रेरणादायी वाक्य वाचत असे. त्याचे फलकच घरभर लावून ठेवले होते. अखेर महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची कठीण परीक्षा उत्तीर्ण झाले आणि माझ्या धडपडीचे, मुलांच्या, मित्र-मैत्रिणींच्या विश्वासाचे, मदतीचे सार्थक झाले,’ अशा शब्दांत धायगुडे यांनी आपला प्रवास उलगडला.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, प्रचंड चिकाटीने, मेहनतीने संगीता धायगुडे यांनी एक गृहिणी ते प्रशासकीय अधिकारी होण्यापर्यंत घेतलेल्या या फिनिक्स भरारीला उपस्थित प्रेक्षकांनी सलाम केला आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. 

प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी महानगरपालिका सहआयुक्त पदावर ठाणे, धुळे अशा आव्हानात्मक जिल्ह्यांमध्ये काम केले. या जिल्ह्यांत काम करत असताना त्यांना आलेले अनुभव ऐकताना उपस्थित भारावून गेले होते. ठाण्यातील बेकायदा बांधकामे तोडताना आलेले अनुभव, धुळ्यात नोटाबंदीच्या काळात करवसुलीचे ध्येय साध्य करतानाचा त्यांचा अनुभव त्यांच्यातील कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकाऱ्याचे दर्शन घडवणारा होता. 

‘मोठी स्वप्ने पाहा, कष्ट करा’
‘ज्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती वेगळी, स्वभाव वेगळे असतात तसे शहर, शहराची मानसिकता हीदेखील वेगळी असते, हे समजून घेऊन काम केल्याचा फायदा झाला. यानंतरही हा प्रयत्न करीत राहीन,’ असे त्या म्हणाल्या. ‘स्वप्ने पाहताना ती अंथरुणापेक्षा मोठी पाहा आणि त्यासाठी शक्य तेवढे कष्ट करा,’ असा संदेश धायगुडे यांनी या वेळी उपस्थितांना दिला. आपल्या आजवरच्या प्रवासात आपली मुले, वरिष्ठ, मित्रपरिवार यांनी केलेली मदत, दाखविलेला विश्वास सार्थ केल्याचे समाधान त्यांनी या वेळी व्यक्त केले.

‘आयुष्य हे शिकण्यासाठीच...’ 
कोणत्याही वयात काहीही शिकता येते, हे दाखवून देऊन त्यांनी जपान, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका असा २२ देशांचा प्रवास करत असताना आलेले अनुभवही या वेळी मांडले. अवघ्या सहा महिन्यांत जर्मन भाषा आत्मसात करून त्यांनी जर्मन अधिकाऱ्यांनादेखील चकित केले. या कठीण भाषेत कविता करण्यापर्यंतचे प्रभुत्व त्यांनी मिळवले. जर्मन भाषेतील कविताही त्यांनी ऐकवली. त्यांचे ‘हुमान’ हे आत्मचरित्र आणि काही कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. त्यांनी या वेळी सादर केलेली ‘आत्म्याला जाळ लागू द्या’ ही त्यांची कविताही रसिकांना रोमांचित करून गेली. त्यामुळे एक संवेदनशील साहित्यिक म्हणून त्यांची ओळखही या वेळी अधिक अधोरेखित झाली. 

‘वेदनेतून लेखनाकडे’
आपल्या लेखनाबद्दल त्या म्हणाल्या, ‘जसजशी वेदना अनुभवाला येत होती, तसतशी मी कविता आणि लेखनाकडे ओढली गेले. आज हाच प्रवास माझ्या पुस्तकांच्या रूपाने तुम्हा सर्वांसमोर आहे. वाचन आणि कबड्डी खेळणे हेच आयुष्य असलेल्या खेड्यातील मुलीला लग्नानंतर एक सुरक्षित, स्थिर वैवाहिक आयुष्य लाभले; पण अचानक पतिनिधनाच्या धक्क्याने सगळे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या धक्क्यातून सावरण्यासाठी याच पुस्तकांनी, त्यातल्या नायक-नायिकांनी मनाला उभारी दिली. त्यामुळे त्यांची नेहमीच आभारी राहीन.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ganesh dhaigude About 211 Days ago
Madam dhannyvad tumhi aamchasathi perana aahat .aamhi tumhal kup kup Miss karato
0
0

Select Language
Share Link