Next
चित्रपट जतन आणि संवर्धन ही काळाची गरज : पंतप्रधान
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
BOI
Tuesday, January 22, 2019 | 04:16 PM
15 0 0
Share this article:


मुंबई  : ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान, इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच नवीन पिढीपर्यंत सिनेमाचा इतिहास पोहोचण्यासाठी एक नवे माध्यम उपलब्ध झाले आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

पेडर रोड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ‘सिनेमा आणि समाज हे एकमेकांचे प्रतिबिंब आहेत. जे आपल्याला समाजात दिसते, ते आपल्याला सिनेमात दिसते तसेच जे आपण सिनेमात पाहतो, ते आपल्याला समाजात घडताना दिसते. आज भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून कलाकार पुढे येत असून हे कलाकार आपली कलाकृती समोर आणत आहेत. आजचा समाज बदलत असून बदलत्या समाजाचा, सिनेमा हा आरसा आहे. सिनेमातून जसे प्रश्न कळतात तशी उत्तरेही मिळतात. पूर्वीच्या काळी एखादा सिनेमा बनविण्यासाठी किती वर्षे लागली यावरून त्याची ओळख व्हायची. आता मोठमोठे चित्रपट कमीत कमी वेळात पूर्ण होतात यावरून आपण नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे हे कळून येते. जेव्हा चांगली कला आणि कलाकार एकत्र येतात, तेव्हा चांगल्या कलाकृतींची निर्मिती होते असे मला वाटते. सध्याचा काळ हा सामाजिक माध्यमांचा काळ असल्याने कलाकारांनी आपण करत असलेले काम, परिश्रम लोकांसमोर मांडल्याने या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. आज अनेक व्यक्तींचे चरित्रपट बनत असताना विज्ञान, प्रयोगावर आधारित चित्रपट बनणे आवश्यक आहे.’

या उद्घाटनाच्या प्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्यासह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित होते.

भारतात चित्रपट ही संस्कृती आहे. चित्रपट जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे चित्रपट चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असून या संग्रहालयाद्वारे चित्रपटाचे जतन करण्याबरोबरच समाजाचेच दस्ताऐवजीकरण करण्याचे महत्त्वूपर्ण काम होत आहे. चित्रपट जतनासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय करत असलेले प्रयत्न नक्कीच महत्त्वाचे आहेत. आज संपूर्ण भारतात बॅटमॅनचे जेवढे चाहते आहेत, तेवढेच बाहुबलीचे चाहते आहेत. यावरून भारतीय कलाकारांना, कलाकृतींना एक ‘ग्लोबल ॲप्रोच’ आहे हे सिद्ध होते. सिनेमा हा मूकनायक म्हणजेच ‘सायलेंट पॉवर’ आहे, यामध्ये एक वेगळीच ताकद आहे कारण सिनेमा मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधन, नवे विचार देखील प्रेक्षकांना देत असतो. हागणदारीमुक्त भारत, क्रीडा, महिला सक्षमीकरण यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आज माहितीपूर्ण नवीन कलाकृती बनत असून या विषयांवरील सिनेमांना चांगला प्रेक्षकवर्गही लाभत आहे’, असेही प्रधानमंत्री या वेळी म्हणाले. 

‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या धर्तीवर ‘इज ऑफ सिनेमा’ :
सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगार तर मिळतोच, पण यामुळे पर्यटन क्षेत्राचीही वृद्धी होत आहे. यापुढील काळात भारतात सिनेमाचे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांना चित्रीकरणासाठी देशांतर्गत परवानगी तातडीने मिळावी यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टिम उभारण्यात येत आहे. लवकरच सिनेमा चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी एक विशेष वेबपोर्टल तयार करण्यात येणार असून एनएफडीसीबाबत परवानग्या मिळणार आहेत. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या धर्तीवर आता ‘इज ऑफ सिनेमाची संकल्पना यामुळे रुजण्यास मदत होईल असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. 

पायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार :
पायरसी रोखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. श्रम आणि सामर्थ्याचा अपमान पायरसीमुळे होतो. पायरसी रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून येणाऱ्या काळात पायरसी रोखण्यासाठी अधिक कडक नियम करण्यात येणार आहे. तसेच अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठीसुद्धा स्वतंत्र सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितले.

भारतात होणार इंटरनॅशनल फिल्म समिट :
‘डाओस’मध्ये ‘इंटरनॅशनल बिझनेस समिट’ होते आता याच धर्तीवर भारतातदेखील ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट परिषद’ घेण्याचा विचार केंद्र शासन करत आहे. येणाऱ्या काळात भारतात बनत असलेले सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोट करण्यासाठी या परिषदेचा नक्की फायदा होईल.

केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड या वेळी बोलताना म्हणाले, ‘मुंबई ही सिनेमा सिटी असून आज सिनेमा सिटीमध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सुरू होणे, ही महत्त्वाची बाब आहे. सिनेमात काम करणारे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधनही करतात ही एक प्रकारची देशसेवाच आहे. येणाऱ्या काळात आपल्या भारतीय सिनेमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कान्स फिल्म फेस्टिव्हल, ऑस्कर यांसारख्या ठिकाणी सिनेमा प्रमोट करण्यासाठी केंद्र शासनामार्फत आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.’

संग्रहालयात व्हिज्युअल्स, ग्राफिक्स, मल्टीमिडिया व इंटरॅक्टिव्ह एक्सीबीट्स आदींचा समावेश असलेल्या या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे. संग्रहालय दोन इमारतींमध्ये उभारण्यात आले असून नवीन संग्रहालय इमारत व १९व्या शतकातील ऐतिहासिक गुलशन महल येथे आहे. नवीन संग्रहालयात ‘गांधी आणि चित्रपट’, ‘मुलांचा चित्रपट स्टुडिओ’, ‘तंत्रज्ञान, सर्जनशीलता व भारतीय चित्रपट’ आणि ‘भारतातील चित्रपट’ अशी दालने आहेत. गुलशन महल ही भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वारसा इमारत असून ती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचाच भाग आहे. याठिकाणी 9 दालने असून याद्वारे भारतीय चित्रपटाचा शंभर वर्षांचा प्रवास दर्शविण्यात आला आहे.यामध्ये प्राचीन कलाकृतीचे प्रदर्शन आणि कालक्रमानुसार भारतीय चित्रपटांचा प्रवास उलगडण्यात आला आहे.

कार्यक्रमासाठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार, रणधीर कपूर, जितेंद्र, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पंडित शिवकुमार शर्मा, आशा पारेख, पूनम धिल्लोन, आमिर खान, ए. आर. रेहमान, परिणीती चोप्रा, कंगना राणावत, दिव्या दत्ता, कार्तिक आर्यन, दिग्दर्शक सुभाष घई, करण जोहर, रोहित शेट्टी, मधुर भांडारकर, आदी उपस्थित होते. 

राष्ट्रीय संग्रहालयाची वैशिष्ट्ये :
- भारतातील सिनेमासाठी प्रथमच खास संग्रहालयाची निर्मिती
- १०० वर्षांच्या भारतीय सिनेमाच्या कारकीर्दीचे मूल्यांकन आणि विकास
- कलाकृती आणि संस्मरणांचा विस्तृत संग्रह
- पूर्णत: मुलांचा संवादात्मक चित्रपट स्टुडिओ
- गांधी आणि सिनेमा यांवरील विशेष प्रदर्शनी
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search