Next
‘सोनचिरैया’त भूमी डाकूच्या भूमिकेत
एक मार्चला चित्रपट प्रदर्शित होणार
BOI
Thursday, February 14, 2019 | 02:49 PM
15 0 0
Share this article:


पुणे : वैविध्यपूर्ण भूमिका आणि कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर आता ‘सोनचिरैया’ या डाकूपटातून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एक मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत भूमी अतिशय उत्सुक असून, त्यासाठी अतिशय कठोर मेहनत घेतल्याचे तिने सांगितले. 

पुण्यातील सी. टी. पंडोल या घड्याळांच्या प्रसिद्ध दालनात स्विस वॉच ब्रँड लाँजिन्सच्या नवीन रेकॉर्ड कलेक्शनचे नुकतेच तिने अनावरण केले. त्या वेळी तिने आपल्या आगामी चित्रपटाबद्दल संवाद साधला. 

अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘सोनचिरैया’ या चित्रपटात चंबळच्या खोऱ्यातील इंदुमती नावाच्या डाकूची भूमिका भूमी साकारत असून, सुशांतसिंग राजपूत, मनोज वाजपेयी, रणवीर शौरी आणि आशुतोष राणा असे तगडे कलाकार या चित्रपटात आहेत. यातील भूमिकेबाबत विचारले असता भूमी म्हणाली, ‘अभिषेक चौबेबरोबर काम करण्याची माझी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली. ‘सोनचिरैया’ हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. यात माझी मुख्य भूमिका असून, ती एका डाकू महिलेची आहे. अशा प्रकारचा माझा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यासाठी मी प्रथमच बंदूक हातात धरली. चंबळच्या खोऱ्यात याचे चित्रीकरण झाले आहे. चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी तब्बल आठ महिने मी इंदुमती या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला. तीन महिने याचे चित्रीकरण चालले. या भूमिकेत मी इतकी गुंतून गेले, की यातून बाहेर येणे मला खूप अवघड गेले. आतापर्यंत असा अनुभव कधी आला नव्हता. इंदुमतीच्या निमित्ताने मी एका वेगळ्याच अनुभवविश्वाशी जोडले गेले. त्यामुळे मी या चित्रपटात वापरलेल्या साड्या जपून ठेवल्या आहेत.’

‘या चित्रपटात माझ्याबरोबर सुशांतसिंग राजपूत, मनोज वाजपेयी, रणवीर शौरी आणि आशुतोष राणा हे दिग्गज कलाकार आहेत. मनोज वाजपेयी यांची मी खूप आधीपासून चाहती आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणे हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे,’ असेही तिने नमूद केले. 

आतापर्यंत ‘दम लगा के हैशा’ या सिनेमातील संध्या, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’मधील घरात शौचालय नसल्याने नवऱ्याला सोडणारी जया, ‘शुभमंगल सावधान’मधील सुगंधा अशा वेगळ्या विषयांवरील चित्रपटांमधून पुढे आलेल्या भूमीने उत्तम अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या तिने वजन कमी केले असून, स्वतःच्या लूकवरही ती आता अधिक लक्ष देत असल्याचे दिसत आहे. 

ती सध्या नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्येही काम करत असून, यातील भूमिकेबाबत बोलताना ती म्हणाली, ‘स्वतःच्या लैंगिक इच्छा मुक्तपणे व्यक्त करणाऱ्या स्त्रीची यातील भूमिका खूप आव्हानात्मक होती. सहजासहजी अशी भूमिका मिळत नाही. विशेष म्हणजे झोया अख्तरने अत्यंत दर्जेदारपणे याचे दिग्दर्शन केले आहे. ही भूमिका मी केली याचा मला खूप आनंद आहे. आपली मूल्ये, विश्वास याचेच प्रतिबिंब आपल्या कामातून दिसत असते. त्यामुळे आपल्याला पटेल त्याच भूमिका निवडण्याकडे माझा कल असतो.’ 

पुण्यातील सी. टी. पंडोल या घड्याळांच्या दालनात लाँजिन्सच्या नवीन रेकॉर्ड कलेक्शनचे अनावरण करताना अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि सी. टी. पंडोलचे व्यवस्थापकीय संचालक कावस पंडोल.

घड्याळाशी भावनिक नाते 

आपल्या पहिल्या घड्याळाची आठवण सांगताना भूमी म्हणाली, ‘आपले पहिले घड्याळ आपण नेहमीच जपून ठेवतो. माझे सर्वांत पहिले घड्याळ माझ्या वडिलांनी दिले होते, जे आजही माझ्यासोबत आहे. घड्याळ ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असते आणि आपल्या अनेक आठवणींची साक्षीदार असते. म्हणूनच भावनिकरीत्या आपण त्याच्याशी जोडलेले असतो.’

‘वक्तशीरपणा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. वेळ ही अचूक हवी आणि कुठेही वेळेवर उपस्थित असणे गरजेचे आहे. प्रत्येक मूडसाठी वेगळी घड्याळे असतात आणि लोक वेगवेगळ्या प्रकारची आणि आकाराची घड्याळे वापरतात. एका अर्थी घड्याळ हे आपले व्यक्तिमत्त्व दर्शवत असते. घड्याळ हे स्टाइल स्टेटमेंट आहे. मी सिनेमा बघण्यासाठी बाहेर जाते, तेव्हा डेनिम्स, टी शर्ट घालते, त्या वेळी मी आवर्जून घड्याळ घालते. कारण त्यामुळे त्या पेहरावाची पूर्तता होते, असे मला वाटते. दुसऱ्या कोणत्या कार्यक्रमासाठी जात असेन, तर मी त्या वेळी केलेल्या पेहरावाला साजेल असे घड्याळ घालते. माझा घड्याळांचा संग्रह आता वाढत आहे.’
 
लाँजिन्स ब्रँडबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘ लाँजिन्स हा ८५ वर्षांची परंपरा असलेला ब्रँड आहे. त्यांचे हे नवीन कलेक्शन प्रत्येक मूडसाठी बनलेले आहे. भारदस्त, नाजूक, रोज गोल्ड, हिरेजडित अशा सर्व धाटणीची घड्याळे या कलेक्शनमध्ये उपलब्ध होतील. या नवीन कलेक्शनमधील घड्याळे ‘व्हॅलेंटाइन डे’साठी भेटवस्तू देण्यास योग्य ठरतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search