Next
सिमेंटविना घरे बांधणाऱ्या जोडप्याची गोष्ट
प्राची गावस्कर
Friday, April 19, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

प्रियांका गुंजीकर आणि ध्रुवांग हिंगमिरे

पुण्याचे ध्रुवांग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर हे युवा स्थापत्यविशारद जोडपे सिमेंट, लोखंड यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक घरांची उभारणी करते. हे जोडपे माती, चुना, लाकूड यांचा वापर करून जुन्या काळातील बांधकाम तंत्राच्या साह्याने घरे उभारते. पर्यावरणाला हानिकारक घटकांचा वापर टाळून निसर्गाशी एकरूप होणाऱ्या घरांच्या बांधकामाचा प्रसार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
...............


- सिमेंट, वाळू, लोखंड याशिवाय बांधकामाचा आज विचारच होऊ शकत नाही. अशा काळात तुम्ही जुन्या पद्धतीने म्हणजे माती, चुना यांचा वापर करून बांधकाम करण्याकडे का आणि कसे वळलात?

- ध्रुवांग : मी आणि प्रियांका, आम्ही दोघेही मुंबईच्या रचना संसद या स्थापत्यशास्त्र महाविद्यालयात स्थापत्यशास्त्राचे शिक्षण घेत होतो. आम्हाला अभ्यासक्रमात पर्यावरणपूरक स्थापत्यशास्त्र असा एक विषय होता. मालकसिंग गिल हे वास्तुविशारद आम्हाला हा विषय शिकवायचे. ज्येष्ठ गांधीवादी स्थापत्यविशारद लॉरी बेकर यांचे ते शिष्य. ते स्वतः पर्यावरणपूरक म्हणजेच सिमेंट, लोखंड यांचा अत्यंत कमी वापर करून किंवा वापर पूर्णतः टाळून स्थानिक उपलब्ध घटकांच्या साह्याने वास्तू उभारण्याचे काम करतात. त्यांनी आम्हाला पर्यावरणाबद्दल विचार करायला शिकवले. आजकाल सिमेंट आणि लोखंड याशिवाय बांधकामाचा विचारच होऊ शकत नाही. मजबुती आणि कमी देखभाल हे त्यातील दोन महत्त्वाचे निकष मानले जातात; पण आपल्या जुन्या ऐतिहासिक वास्तू बघितल्या, तर त्या चुना, माती, लाकूड यांचा वापर करूनच बांधलेल्या आहेत. शेकडो वर्षे होऊन गेली, तरी त्या उभ्या आहेत. भूकंप झाला तरी या मातीच्या इमारतींपासून होणारी हानी सिमेंटच्या इमारती कोसळून होणाऱ्या हानीपेक्षा कमी असते. आजच्या काळात बांधकामासाठी ज्या साहित्याचा वापर केला जातो, ते खरेच पर्यावरणासाठी योग्य आहे का, याचा विचार आम्ही मालकसिंग यांच्याबरोबर वेगवेगळ्या वास्तूंचा अभ्यास करताना करू लागलो. 

दिवंगत स्थापत्यविशारद लॉरी बेकर आणि त्यांची एक वास्तुरचना

जुन्या गोष्टींकडे आपण पाठ फिरवली आहे; पण आजच्या काळातही त्या टिकाऊ आणि निसर्गाला कोणतीही हानी पोहोचवणाऱ्या नसतील तर त्यांचा वापर का केला जात नाही? आधुनिक बांधकाम तंत्रात वापरले जाणारे साहित्य निसर्गासाठी योग्य आहे का, असे प्रश्न आम्ही स्वतःला विचारू लागलो. शिकत असताना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील स्थापत्यशास्त्र कसे आहे, याचा अभ्यास करायचो. 

वास्तुविशारद मालकसिंग गिल
एकदा साताऱ्याजवळच्या गावात गेलो होतो. तिथे एका वृद्ध महिलेचे छोटेसे घर होते. मी तिला विचारले, घर कधी, कोणी, कसे बांधले? दगड, माती आणि लाकूड यांचा वापर करून बांधलेल्या त्या छोट्याशा घराला शेणाचे लिंपण केले होते. त्याला काचेच्या बांगड्यांचे तुकडे लावले होते. ते खूप आकर्षक दिसत होते. घराची देखभाल शक्य होत नसल्याने त्याची अवस्था फार चांगली नव्हती; पण ते मजबूत होते. इतर विद्यार्थी आजूबाजूच्या घरांची चित्रे काढण्यात मग्न होते; पण वास्तुविशारद म्हणजे फक्त आराखडा कागदावर काढून देणे नव्हे, असे मला वाटते. या भेटीने मी पर्यावरणपूरक घरांच्या बांधकामाकडे अधिक आकर्षित झालो.  


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१४ ते २०१६पर्यंत आम्ही मालकसिंग गिल यांच्याबरोबर काम केले. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर आम्ही प्रत्यक्ष जाऊन काम केले. विटा कशा बनवायच्या, मातीचे प्लास्टर कसे करायचे अशा अनेक गोष्टी स्वतः केल्या. त्यानंतर २०१६-१७मध्ये पुण्यात आल्यानंतर आम्ही निर्णय घेतला, की पर्यावरणपूरक घरांच्या बांधकाम क्षेत्रातच काम करायचे. सिमेंट, लोखंडाचा वापर न करता माती, चुना, लाकूड अशा पारंपरिक साहित्याचा वापर करून घरे बांधायची. पर्यावरणपूरक शाश्वत बांधकामाचा प्रसार करायचा. 

माझे आई-वडीलही स्थापत्यविशारद आहेत. त्यांनीही मला अशा प्रकारच्या बांधकामाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले. प्रियांका सुवर्णपदकविजेती आहे. तिलाही याच क्षेत्रात काम करायचे होते. त्यामुळे आम्ही दोघांनीही हे काम करण्याचा निर्णय घेतला. 


- पर्यावरणपूरक शाश्वत बांधकाम पद्धत म्हणजे नेमके काय? 

- पर्यावरणपूरक शाश्वत बांधकाम पद्धत म्हणजे स्थानिक पातळीवरील साहित्याचा, नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर करून निसर्गाला हानी न पोहोचवणारे बांधकाम होय. आम्ही अशी घरे उभारताना सिमेंट, वाळू, लोखंड यांचा वापर करत नाही. माती, विटेचा चुरा, चुना, लाकूड यांचा वापर करतो. अपरिहार्य असेल, तरच सिमेंटचा वापर केला जातो; मात्र तो अत्यंत अल्प असतो. मातीच्या विटाही भट्टीत भाजून घेण्याऐवजी उन्हात वाळवलेल्या असतील, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. अर्थात, सगळीकडे हे शक्य होत नाही; पण जिथे शक्य आहे तिथे त्यांचा वापर केला जातो. हे घटक नैसर्गिकरीत्या उपलब्ध असतात. त्यांचा पुनर्वापर करता येतो. तसेच ते मातीत मिसळून जाऊ शकतात. त्यापासून प्रदूषण होत नाही. त्याशिवाय अशा घरांमध्ये वारा, उजेड नैसर्गिकरीत्या जास्तीत जास्त उपलब्ध होईल, अशी रचना केली जाते. आजकाल आपण मानवाकडून होणारी निसर्गाची हानी, नैसर्गिक स्रोतांचा बेजबाबदार वापर, तापमानवाढ, प्रदूषण याबद्दल ऐकतो, वाचतो. निसर्गाचे संरक्षण केले नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांना भीषण संकटांना तोंड द्यावे लागेल, याची जाणीव आपल्याला आहे; पण तरीही आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आधुनिकतेच्या नावाखाली अंधानुकरण करतो. बांधकाम क्षेत्रही याला अपवाद नाही. सिमेंटची जंगले उभारून आपण निसर्गाला धोका निर्माण करत आहोत. सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे सिमेंटच्या घरात सौर ऊर्जेचा वापर, पर्जन्यजलसंचय अशा तंत्रांचा वापर करून ही घरे पर्यावरणपूरक ठरवत आहोत. आपल्या जुन्या पद्धतीच्या बांधकामांना कालबाह्य ठरवत आहोत. निसर्गाला हानी न पोहोचवता नैसर्गिकरीत्या उपलब्ध साहित्याचा वापर करून आणि त्या त्या ठिकाणच्या वातावरणाला अनुकूल ठरेल अशी घरे बांधण्यावर आम्ही भर देत आहोत. 

भोरमधील पहिल्या प्रकल्पातील आतील रचना

- तुमचा पहिला प्रकल्प कधी आणि कुठे केलात? आतापर्यंत किती प्रकल्प केले आहेत ?

- आमचा पहिला प्रकल्प आम्ही २०१७मध्ये भोरला (जि. पुणे) केला. अॅड. अमोघ परळीकर यांना पर्यावरणपूरक घर बांधायचे होते. हे घर बांधताना आम्ही सिमेंट, वाळू यांचा वापर न करता स्टोन डस्टचा वापर केला. तेथील स्थानिक घरांचा अभ्यास केल्यावर लक्षात आले, की काळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. आम्ही सात फुटांपर्यंत दगडांचा वापर केला आणि त्यानंतर विटांचा वापर केला. 


सेंद्रिय शौचालयाची संकल्पनाही तेथे राबवली. गरम पाण्यासाठी भिंतीत तांब्याचा हंडा बसवला. त्याला चुलीप्रमाणे खालून विस्तव करण्याचीही सोय आहे. त्यामुळे कमीतकमी खर्चात गरम पाणी मिळते. सिमेंट, लोखंडाचा वापर नसल्याने घर कायम थंड राहते. एसी, पंखे यांची गरज भासत नाही. एका प्रकल्पात घरमालकांना वारंवार देखभालीसाठी येणे शक्य नसल्याने नेहमीच्या फरश्या बसवल्या; मात्र त्यासाठी चुन्याच्या प्लास्टरचा वापर केला. गिलावा करतानाही चुन्याचा वापर केला. त्यामुळे घरातील तापमानही कमी राहण्यास मदत होते.


 ग्राहकांच्या अपेक्षा, गरजा यांचाही विचार करून आम्ही जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर आम्ही भोरजवळील एका गावात, तसेच कामशेत, दापोलीजवळ (जि. रत्नागिरी) असे आतापर्यंत सहा प्रकल्प केले आहेत. दापोलीजवळचा प्रकल्प करताना आम्ही तिथल्या जांभ्या दगडाचा वापर केला. लाकूडकाम करताना सर्रास सागवानाचा वापर करण्यावर भर दिला जातो; पण आम्ही ऐन, जांभूळ अशा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या लाकडांचा वापर करतो. सध्या चाकणजवळ एक प्रकल्प सुरू आहे.

चाकणजवळ सुरू असलेला प्रकल्प

- कोणताही प्रकल्प उभारताना काय पूर्वतयारी करावी लागते? 

- कोणताही प्रकल्प करताना आम्ही आधी जागेवर प्रत्यक्ष जाऊन तेथील माती, पाणी, वारा, हवामान यांचा अभ्यास करतो. तेथील स्थानिक बांधकाम कसे आहे, याची माहिती घेतो. ग्रामीण भागात आजकाल सिमेंटचे बांधकाम होत असले, तरी जुने वाडे अजूनही शाबूत आहेत. त्यामुळे गावात आजही जुन्या दगडी वास्तू बघायला मिळतात. त्यांच्या रचना अभ्यासतो. त्यानंतर आमच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करतो. स्थानिक कामगारांकडून काम करून घेण्यावर आमचा भर असतो. त्यामुळे गावातच रोजगार उपलब्ध होतो. तसेच कालौघात नष्ट होत चाललेली पारंपरिक कौशल्येही जतन करण्यास मदत होते. अनेकदा घरासाठी लाकूडकाम करणारे कसबी सुतार मिळत नाहीत. लोखंडाचाच वापर केला जात असल्याने, सुतारकाम करणारी तरुण पिढी फर्निचरचे काम करताना दिसते. त्यामुळे त्यांना बांधकामासाठी आवश्यक असलेले लाकूडकाम येत नाही. अशा वेळी जुन्या कारागिरांना शोधावे लागते. यामुळे गावातील बांधकामांसाठी आता लोकांना शहरावर अवलंबून राहावे लागते, जे पूर्वी गावातल्या गावात होत असे. कच्चा माल, कारागीर सगळे गावातच उपलब्ध होत असे. त्यामुळे तिथली अर्थव्यवस्थाही टिकून रहात असे. आधुनिक पद्धतीमुळे हे सगळे हरवत चालले आहे. 


आम्ही गावात काम करताना तिथल्या नवीन पिढीतल्या लोकांनाही प्रशिक्षण देतो. कागदावर आराखडा काढून दाखविण्यापेक्षा कार्डबोर्डचे प्रत्यक्ष मॉडेल करून कसे काम करायचे आहे हे दाखवतो. त्यामुळे स्थानिक पातळीवरच कामगार उपलब्ध होतात. खर्चात बचत होण्यासाठीही याची मदत होते. अनेकदा नवीन पिढीतील कामगार ‘लाकूड कशाला वापरायचे, लोखंड वापरून लवकर काम होते, लाकूड महागही आहे,’ असे प्रश्न विचारतात. त्यांना समजून सांगितले की त्यांनाही ते पटते. त्यामुळे ते स्वतःहून अशा प्रकारचे बांधकाम करण्यास तयार होतात. 

- सिमेंट, लोखंडाची घरे देखभाल करण्यास सोपी आणि मजबूत, सुरक्षित असतात. अशा वेळी मातीची घरे कोणी का बांधावीत? सिमेंटच्या घरांनी निसर्गाला काय धोका पोहोचतो?

- पूर्वीच्या घरांच्या रचना बघितल्यास लक्षात येईल, की त्यांच्या रचना त्या त्या प्रदेशातील हवामानानुसार केल्या आहेत. कोकणातील घरांची छपरे कौलारू आणि उतरती असतात; पण कौलांमुळे पावसाळ्यात गळती होण्याचा त्रास होतो, अर्थात तेही नीट शाकारणी झाली नसेल तरच. अलीकडे कौल शाकारणीसाठी लोक मिळत नाहीत. अशा अडचणी आणि अंधानुकरण यामुळे आपण सिमेंटच्या घरांकडे वळलो आहोत. त्यामुळे कोकणातील दमट हवामानात जिथे कौलारू घरे हवेशीर आणि थंड असायची तिथे सिमेंटच्या घरात उकाड्याचा अनुभव घेतला जातो. उकाडा कमी करण्यासाठी एसी, कूलर यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन होते, घनकचऱ्याची निर्मिती होते. वीज, पाणी यांचा वापर वाढतो. सुरक्षिततेबाबत बोलायचे असेल, तर जुन्या ऐतिहासिक वास्तू आपण सगळेच बघतो. शेकडो वर्षे त्या उभ्या आहेत. चुना, माती यांचाच वापर करून त्यांचे बांधकाम झाले आहे. माती आपल्याला बांधकाम जिथे करायचे आहे तिथेच उपलब्ध होते. सिमेंटसाठी मात्र डोंगर फोडावे लागतात. त्यावर प्रक्रिया करावी लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात मानवी ऊर्जा खर्च होते. वाळूसाठी नदीपात्रात खोदकाम केले जाते. सिमेंट लगेच लोखंडाभोवती घट्ट होते. काही वर्षे ते मजबूत असते; पण नंतर त्याची मजबुती कमी होते. सतत पाणी लागले की त्याची मजबुती कमी होते. लोखंड गंजते. सिमेंट, लोखंड यांचा वापर केलेले बांधकाम पडले, की सिमेंटचा दगड झालेला असतो. तो विरघळत नाही. त्याचा पुनर्वापरही करता येत नाही. माती, चुना यांचा वापर केला असेल, तर ते मजबूत व्हायला सिमेंटच्या तुलनेत थोडा वेळ लागतो; पण एकदा ते घट्ट झाले, की त्याची मजबुती प्रचंड असते. मातीच्या भिंती सहजासहजी तुटत नाहीत. चुना, मातीचे बांधकाम पडल्यानंतर माती, चुना हे घटक मातीत मिसळून जातात. पाण्यात विरघळू शकतात. त्यांचा पुनर्वापरही शक्य होतो. लाकूडकाम करताना चुना, तसेच हिरडा, गूळ, हळद यांचे मिश्रण वापरले तर वाळवी लागत नाही; पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपण अंधानुकरण करून सिमेंट आणि लोखंडाचा बेसुमार वापर करत आहोत. यातून निर्माण होणारा कचरा, प्रदूषण, कार्बन उत्सर्जन आणि यामुळे होणारे नैसर्गिक संपत्तीचे नुकसान भविष्यासाठी घातक आहे. 

- खर्चात बचत कशी होते?

- पारंपरिक साहित्याचा वापर करून आणि आवश्यक तेवढेच बांधकाम करण्यावर भर दिल्यास सिमेंटच्या घरासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा या प्रकारच्या घरासाठी वीस टक्के कमी खर्च येतो. सिमेंटच्या घरांप्रमाणे या घरांना गिलावा नसतो. महागड्या फरश्यांऐवजी कोबा केला जातो किंवा टेराकोटाच्या फरश्यांचा वापर केला जातो. त्यामुळे खर्चात बचत होते. सिमेंट, लोखंड, वाळू यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या मानवी ऊर्जेचे मोल प्रचंड आहे. पर्यावरणपूरक घरांबाबत लोक उत्सुक आहेत; पण हे प्रमाण फार कमी आहे. बहुतेक वेळा सेकंडहोम किंवा फार्महाऊस बांधताना अशा घरांचा विचार करतात. ग्रामीण भागात अशा घरांचे बांधकाम करणे सोपे आहे; पण तिथे जुन्या पद्धतीची घरे पाडून नवीन सिमेंटची घरे बांधली जातात. त्याऐवजी स्थानिक साहित्याचा वापर करून घरे बांधली पाहिजेत. आहे तेच साहित्य वापरूनही घरांची सुधारणा करणे शक्य आहे. आम्ही सिंहगडावरील टिळक वाड्याचे काम अशाच पद्धतीने केले आहे. जुन्या झालेल्या या वास्तूला कोणताही धक्का न लावता, नवीन रूप दिले आहे, त्यात कोणत्याही आधुनिक बांधकाम साहित्याचा वापर केलेला नाही. 


 - तुम्ही बांधत असलेली घरे वेगळी दिसतात का? त्यामुळे लोक याकडे वळतात असे वाटते का? अशा घरांची गरज का वाटते?

- आम्ही बांधलेली घरे ही त्या भागातील इतर घरांप्रमाणेच दिसली पाहिजेत, असे आम्हाला वाटते. तरच आम्ही तेथील मातीशी, निसर्गाशी जोडणारी घरे बांधण्यात यशस्वी झालो असे म्हणता येईल. आम्ही जे आहे तेच देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले तंत्र आहेच. आपण आधुनिकीकरणाच्या नावाखाली ते नाकारले आहे. आम्ही त्या त्या स्थानिक रचनेचा अभ्यास करून तिथे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. नव्या जुन्याची सांगड घालून एक शाश्वत पर्यावरणपूरक रचना उभारण्याचा प्रयत्न करतो. ज्येष्ठ गांधीवादी स्थापत्यविशारद लॉरी बेकर यांनी सिमेंट, लोखंडाचा वापर न करता स्थानिक साहित्यातून वास्तू उभारण्याचे तंत्र विकसित केले. त्याच्या प्रचार, प्रसारासाठी आयुष्य वेचले. मालकसिंग गिल, डी. डी. कॉन्ट्रॅक्टर, जयगोपाल, शिरीष बेरी असे अनेक वास्तुविशारद अशा शाश्वत बांधकाम पद्धतीच्या प्रसारासाठी अनेक वर्षे काम करत आहेत. आम्हीही या वाटेने जाण्याचा प्रयत्न करत आहोत. 

शहरीकरणाच्या रेट्याने आज गाव सोडून शहरात सिमेंटच्या जंगलात हरवून गेलेल्या प्रत्येकाला गावाकडच्या घराची ओढ असते. एक छोटेसे टुमदार घर, पुढे अंगण, अंगणात फुललेली झाडे, परसदारी हिरव्यागार झाडांची दाट छाया... असे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते; पण गावाकडची घरेही आता शहरी चेहरा मिरवू लागली आहेत. हे चित्र बदलायला हवे असेल तर आपणच प्रयत्न केले पाहिजेत. निसर्गाची जपणूक आपण केली, तरच पुढच्या पिढीला आपण चांगले भविष्य देऊ शकू. त्याची पायाभरणी आपल्यालाच करायला हवी आहे. 

ई-मेल : dhruvang.hingmire@gmail.com ,  priyanka.gunjikar99@gmail.com
 
वेबसाइट : www.buildinginmud.com

(ध्रुवांग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search