पुणे : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (एआयटी) पुण्यातील त्यांच्या दिघी कॅंपसमध्ये एक ते तीन ऑक्टोबर २०१८ दरम्यान ‘इनर्व्ह’ (Innerve) या हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
हॅकेथॉन म्हणजे चोवीस तासांच्या आत संबंधित प्रश्नावर शून्यातून पर्याय शोधून काढण्यासाठी कठोर मेहनतीची मॅरेथॉन. यंदा संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ‘इनर्व्ह’ आधीच्या सर्व कार्यक्रमांपेक्षा हा अधिक भव्य आणि अधिक चांगला असेल. ‘एआयटी’मध्ये होणाऱ्या हॅकेथॉनमध्ये देशभरातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यासाठी यंदा २५० अशा विक्रमी संख्येने अर्ज आले आहेत. या तीन दिवसीय स्पर्धेत विजेत्याला सर्व लाभांसहित तीन लाखांचे रोख रकमेचे पारितोषिक मिळणार आहे.
स्मार्ट सिटी उपक्रमाशी संबंधित माहितीवर आधारित चर्चा सुरू करण्याच्या उद्देशासह ‘स्मार्ट सिटी’ ही ‘एआयटी इनर्व्ह हॅकेथॉन २०१८’ची मुख्य संकल्पना असणार आहे. यंदा ऑटोमेशन, हेल्थकेअर, वेलनेस, ब्लॉक चेन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स/मशिन लर्निंग आणि सिक्युरिटी अॅप्लिकेशन अशा इतर संकल्पनांचाही समावेश करण्यात आला आहे.
सहभागी होणाऱ्या संघांमध्ये विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचा आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यांत विभागली गेली असून, पहिल्या भागात संकल्पनांवर चर्चा होईल. यात उद्घाटनाच्या दिवशी विद्यार्थी परीक्षकांना आपला प्रकल्प काय आहे, हे सांगणार, तर दुसऱ्या भागात २४ तासांत या प्रकल्पाची उभारणी केली जाईल. नोंदणी केलेल्या संघांपैकी फक्त १५ संघ अंतिम फेरीत पोहोचतील. या फेरीत त्यांचा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यरत करावा लागणार आहे.
अंतिम दिवशी म्हणजेच ‘डी-डे’ला प्रकल्पांचे परीक्षण होईल आणि विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. पहिले बक्षिस एक लाख, दुसरे बक्षिस ५० हजार रुपयांचे आहे. झेब्रोनिक्स, ट्विलिओ, ब्ल्यूब्रिक्स, एफटी४२ आणि ‘एआयटी’ अल्युमनी असोसिएशनतर्फे हा कार्यक्रम प्रायोजित केला जात आहे. सहभागींना झेब्रोनिक्सच्या भेटवस्तू आणि ट्विलिओचे २ हजार ५०० डॉलरचे क्रेडिट जिंकण्याचीही संधी आहे. आघाडीच्या दोन संघांना ब्ल्यूब्रिक्समध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल.
या प्रसंगी आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक (निवृत्त) ब्रिगेडिअर अभय भट म्हणाले, ‘हॅकेथॉन एका स्पर्धेहून अधिक काही आहे. इथे लहान-लहान कल्पना प्रत्यक्षात येतात. रोजच्या कामातून बाहेर पडून विद्यार्थ्यांना ताजेतवाने करणे आणि समाजोपयोगी भविष्यकालीन तंत्रज्ञान आणि पर्याय निर्माण करण्यासाठी, त्यावर काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा यामागील मूळ उद्देश आहे. आजच्या वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात फक्त एक पर्याय म्हणून नाही, तर टिकून राहण्याची एकमेव पद्धत ठरणाऱ्या नाविन्यतेचे प्रदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांना हॅकेथॉन हे सुयोग्य व्यासपीठ आहे.’
सहभागींचे मनोरंजन व्हावे, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘इनर्व्ह’मध्ये कोडिंग सेशनसोबतच जॅम सेशन्स आणि ताणतणाव दूर करणारे टेक टॉक्स, तसेच इतर मनोरंजन उपक्रम असणार आहेत.