Next
प्रेषित येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अखेरचे भोजन (दी लास्ट सपर)
BOI
Sunday, September 15, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो द विंची याने काढलेले ‘दी लास्ट सपर’चे भित्तिचित्र

ख्रिश्चन धर्माचे प्रवर्तक येशू ख्रिस्त यांना क्रूसावर चढवले, त्याच्या आदल्या रात्री जेरूसलेममध्ये आपल्या १२ प्रिय शिष्यांसमवेत त्यांनी केलेले भोजन ‘दी लास्ट सपर’ या नावाने प्रसिद्ध झाले. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत ‘दी लास्ट सपर’बद्दल...
.........
ख्रिश्च.न धर्माचे प्रवर्तक येशू ख्रिस्त यांना क्रूसावर चढवले, त्याच्या आदल्या रात्री जेरूसलेममध्ये आपल्या १२ प्रिय शिष्यांसमवेत त्यांनी केलेले भोजन ‘दी लास्ट सपर’ या नावाने प्रसिद्ध झाले. त्याला ‘होली कम्युनियन’ (पवित्र भोजनोत्सव) किंवा ‘दी लॉर्डस् सपर’ असेही म्हणण्याची प्रथा आहे. त्या घटनेनंतर निर्माण झालेल्या धार्मिक वाङ्मयात (गॉस्पेल्स) ‘अखेरच्या भोजना’चा उल्लेख आढळतो. इटलीतल्या मिलानमधील ‘सांता मारिया कॉन्व्हेंट’ येथे ख्यातनाम चित्रकार लिओनार्दो द विंची याने काढलेले ‘दी लास्ट सपर’चे अप्रतिम भित्तिचित्र (म्युरल पेंटिंग) जगभर गाजलेले आहे. इतर अनेक कलाकारांनीही तो प्रसंग ठिकठिकाणी चितारलेला आहे.

सांता मारिया कॉन्व्हेन्ट, मिलान, इटली.

येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याची शिकवण आणि त्याच्या हातून घडलेले चमत्कार या गोष्टींची कोट्यवधी ख्रिस्ती धर्मीयांनाच नव्हे, तर साऱ्या दुनियेला मोहिनी पडलेली आहे. ‘बायबल’ हा जगातील सर्वाधिक खपाचा ग्रंथ आहे. येशूचा आपल्या शिष्यांना शेवटचा संदेश असा होता, की ‘तुम्ही माझ्यावर जसं प्रेम करता, तसं एकमेकांवर करा.’ त्याने सर्व शिष्यांना आणि अनुयायांना बंधू किंवा मित्र मानले होते. अखेरच्या रात्री येशूने आपल्या संभाषणातून, भावी धर्मप्रसारक शिष्यांना आपला शेवट अगदी जवळ आल्याची कल्पना देऊन त्यांच्या मनाची तयारी केली होती. त्या ‘लास्ट सपर’च्या स्मृतिप्रीत्यर्थ, येशूसारखा दयाळू देवदूत जगाच्या कल्याणासाठी पाठवल्याबद्दल भोजन समारंभ आयोजित करून त्यात ईश्वराचे आभार मानण्याची परंपरा सुरू झाली.

प्रेषित येशू ख्रिस्तख्रिश्चन धर्माच्या इतिहासात येशूच्या १२ शिष्यांना फार महत्त्वाचे स्थान होते. ‘अखेरच्या भोजना’ला ते हजर होते. अर्थात, येशू आधीही त्यांना ‘देवाच्या कामा’त सहभागी होण्यासाठी वेळोवेळी बोलावून घेत असे. प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगवेगळी होती. परंतु समाजात त्यांना वजन होते. मानवजातीच्या उद्धारासाठी त्यांची मोठी मदत होणार होती. पुढे आधुनिक प्रकारची चर्चेस उभारण्यात त्या शिष्यांनी पुढाकार घेतला. त्यांची थोडक्यात ओळख अशी - 

१) अँड्र्यू : हा जोनासचा मुलगा आणि पीटरचा भाऊ होता. ते लोक कोळी होते. अँड्र्यू येशूच्या अत्यंत जवळचा होता. लोकांना तो येशूकडे घेऊन येत असे. जगाला ‘धन्या’ची ओळख सांगत असे. ग्रीसमधल्या पॅट्रा गावी त्यालाही तिथल्या राज्यपालांच्या आज्ञेवरून सुळावर चढवण्यात आले.

२) बार्थोलोम्यू : गॅलिलीमधील कॅना गावी हा राहत असे. तो राजघराण्यातला होता. येशू त्याला सच्चा इस्रायली म्हणत असे. तो धर्मग्रंथांचा चांगला अभ्यासक होता. तोही आत्यंतिक छळ सोसून हुतात्मा ठरला. जिवंतपणी त्याच्या सर्व अंगावरची कातडी चाकूंनी सोलण्यात आली.

३) जेम्स (झेबुदी पुत्र) : हा (येशूचा शिष्य) जॉनचा भाऊ. मासेमारी हा व्यवसाय. तोही येशूच्या अंतर्गोटातला होता. जेरुसलेममध्ये तो धर्मप्रसार करी. ज्युडियाचा रोमन राजा हेरॉड याने त्याचे मुंडके उडवले. बारा प्रसिद्ध शिष्यांपैकी हाच पहिला हुतात्मा ठरला.

४) अल्फियसपुत्र जेम्स : बारांपैकी एक शिष्य ज्यूड याचा भाऊ. तो फारसा प्रसिद्ध नव्हता; पण कडक स्वभावाचा आणि स्पष्टवक्ता होता. त्याच्याही देहाचे तुकडे करण्यात आले.

५) जॉन : झेबुदीचा मुलगा आणि जेम्सचा भाऊ. तो जेरुसलेम आणि आजूबाजूच्या गावात राही. व्यवसायाने कोळी. पीटरच्या जवळचा आणि अंतर्गोटातला. तो भडक माथ्याचा, कठोरहृदयी आणि महत्त्वाकांक्षी होता. त्याने आपल्या नावाने तीन ग्रंथ आणि बायबलच्या नव्या करारातील शेवटचा भाग (ईश्वराने स्वत: विषयी प्रकट केलेले ज्ञान) लिहिला. याला मारण्याचे प्रयत्न झाले; पण त्यातून सुदैवाने तो वाचला आणि त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला.

६) ज्युडास इस्कारियत : हा केरिओथचा रहिवासी. यानेच येशूचा घात केला. ‘दगाबाज’ म्हणजे ‘ज्युडास’ हा प्रतिशब्द पुढे वापरला जाऊ लागला. चांदीच्या तीस नाण्यांच्या बदल्यात त्याने येशूला शत्रूच्या ताब्यात दिले. आदल्या रात्री येशूने सर्वांना सांगितले होते, की ‘येथील एक जण दगा देणार आहे!’ तसेच झाले. परंतु आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊन ज्युडासने नाणी परत देऊन स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.

७) ज्यूड : अल्फियसपुत्र जेम्सचा हा भाऊ. तो गॅलिलीत राहत असे. अनेक ठिकाणी जाऊन तो ‘प्रभूचा उपदेश आणि शिकवण’ (गॉस्पेल्स) लोकांना सांगत असे. त्याने बऱ्याच जणांचे आजारही बरे केले. ‘अरावत’ विभागात बाणांच्या माऱ्याने त्याची हत्या करण्यात आली.

८) मॅथ्यू : हासुद्धा अल्फियसचा मुलगा. तो करवसुली अधिकारी होता. ज्यू संस्कृतीनुसार अन्यायाने पैसे लुटणाऱ्या लोकांचा तिरस्कार केला जाई. तथापि, मॅथ्यूमध्ये येशूला काही विशेष गुण आढळले. म्हणून त्याचा शिष्य म्हणून स्वीकार झाला. ‘गॉस्पेल ऑफ मॅथ्यू’ ही त्याचीच लेखनकृती. तसेच, त्यानेच प्रथम हिब्रू भाषेत ‘येशूची शिकवण’ लिहिली. विलक्षण श्रद्धेने आपले कार्य करत त्याने संपूर्ण जीवन वेचले.

९) मॅथियास : ज्युडासने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या जागी याची निवड झाली. कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यांवर त्याने धर्मप्रसार केला. इ. स. ८०पर्यंत तो जगला.

१०) सायमन पीटर : हा जोनासचा मुलगा. येशूच्या आतल्या गोटातला. त्याने बॅबिलॉनपर्यंत जाऊन प्रचार-प्रसाराचे काम केले. बायबलची दोन प्रकरणे त्याने लिहिली. पीटर एक आणि पीटर दोन. त्यालाही क्रॉसवर चढवण्यात आले. आपण प्रभूच्या योग्यतेचे नसल्यामुळे ‘खाली डोके, वर पाय’ अशा स्थितीत सुळावर चढवावे, ही त्याची विनंती मान्य करण्यात आली.

११) फिलिप : पीटर आणि अँड्र्यूप्रमाणे हा बेथेस्डाचा रहिवासी. जॉनच्या ‘गॉस्पेल’ लेखनात फिलिपची व्यक्तिरेखा समाविष्ट आहे. ‘माझ्या उपदेशाचे पालन कर’ असे येशूने पहिल्यांदा ज्याला सांगितले, तो फिलिप होता. त्याला फासावर चढवण्यात आले.

१२) सायमन द झीलट : बायबलमध्ये याचा उल्लेख आहे. तो गॅलिलीचा रहिवासी आणि धर्मवेडा होता. राष्ट्रभक्त ज्यू म्हणून अतिरेकी विचारांचा होता. पुढे तो मवाळ झाला. येशूवर त्याची भरपूर श्रद्धा निर्माण झाली. त्यासाठी अखेर प्राणार्पण करावे लागले.

१३) थॉमस : हासुद्धा गॅलिलीत राहायचा. सुरुवातीला निराशावादी, पण धैर्यवान होता. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर त्याचा विश्वास नसे; परंतु येशूच्या पुनरुत्थानानंतर, तो समोर दिसल्यानंतर थॉमसमध्ये श्रद्धेचा उदय झाला. एका भारतीय राजासाठी राजवाडा बांधण्याचे काम त्याला मिळाले. भाल्याने भोसकल्यामुळे तो ठार (हुतात्मा) झाला.

अशा प्रकारे एकूण १३ शिष्यांपैकी एकाने आत्महत्या केली, नऊ जणांना ठार करण्यात आले आणि फक्त तीन जणांना नैसर्गिक मृत्यू आला. ख्रिश्चन धर्मप्रसाराला प्रथम त्यांनी सुरुवात केली आणि पुढे जगभर त्या धर्माचे कोट्यवधी अनुयायी निर्माण झाले.

‘त्या’ काळरात्री झालेल्या भोजनप्रसंगी येशूने भाकीत केल्याप्रमाणे ज्युडास दुसऱ्या दिवशी रोमन सैनिकांना घेऊन येशूकडे आला. ‘प्रभू’च्या गालाचा मुका घेऊन त्याने ‘हेच ते’ असे दाखवून दिले आणि येशूला पकडण्यात आले. येशूने असेही सांगितले होते, की ‘उद्या पीटर तीन वेळा मला ओळखत असल्याचं नाकारेल.’ खरोखर, ‘हाच तो येशू का?’ असे विचारल्यावर त्याने तीनदा ‘ठाऊक नाही’ असे सांगितले. ख्रिश्चन धार्मिक वाङ्मयात अनेक ठिकाणी ‘लास्ट सपर’चा उल्लेख आहे. एक घटना म्हणून नव्हे, तर ‘देवाचा शोध’ घेण्याच्या प्रयत्नातील एक पायरी या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे. भोजनापूर्वी येशूने सर्व शिष्यांचे पाय धुतले, असा ‘जॉन १३’मध्ये उल्लेख आहे. नंतर त्याने शिष्यांना अखेरचे उपदेशपर प्रवचन दिले. जगभर ‘प्रेमाचा संदेश’ पोहोचवण्याचे आवाहन केले.

इतिहास संशोधकांच्या अभ्यासांती ‘अखेरच्या भोजना’चा दिवस बुधवार, दिनांक एक एप्रिल, इसवी सन ३० असा मानण्यात आलेला आहे. जुन्या जेरुसलेम शहराच्या भिंतीबाहेरील ‘झिऑन टेकडी’वर ते भोजन झाले. गुरुवारी येशूला पकडण्यात आले आणि दिवसा त्याची चौकशी करण्यात आली. शुक्रवारी त्याला क्रूसावर चढवण्याची शिक्षा फर्मावण्यात आली.

लिओनार्दो द विंचीलिओनार्दोने सन १४९०च्या सुमारास ‘लास्ट सपर’चे भित्तिचित्र रंगवले. ख्रिश्चन/इटालियन कलेचा तो सर्वोत्कृष्ट वारसा आहे. कालमानानुसार चित्र, त्याचे रंग फिकट होत जातात. त्यामुळे, वेळोवेळी बराच खर्च करून त्याचा ‘उद्धार’ होत आलेला आहे. मिलानमधील ‘सांता मारिया’ चर्चला ते चित्र बघण्यासाठी दर वर्षी हजारो लोक भेट देतात. चित्र आकाराने बरेच मोठे आहे (लांबी ३५० इंच आणि रुंदी १८० इंच). त्यात, येशू आपल्या (ज्युडाससह) बारा शिष्यांसमवेत भोजन करताना दिसतो. येशू जेव्हा सांगतो, की ‘यातला एक जण लवकरच विश्वासघात करणार आहे,’ तेव्हा सर्व शिष्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले रागाचे निरनिराळे भाव चित्रकाराने जिवंतपणे उतरवलेले आहेत. 

अँड्रिया सोलारी नावाच्या चित्रकाराने केलेली 'दी लास्ट सपर' चित्राची प्रतिकृती

लिओनार्दोच्या दोन सहायक चित्रकारांनीसुद्धा ‘लास्ट सपर’च्या हुबेहूब नकला काढलेल्या आहेत. त्या जवळजवळ मूळ आकाराच्याच आहेत. अँड्रिया सोलारी नावाच्या चित्रकाराने सन १५२० च्या सुमारास केलेली (तिसरी) प्रतिकृती बेल्जियमच्या ‘लिओनार्दो दा विंची म्युझियम’मध्ये ठेवण्यात आलेली आहे.

डॅन ब्राउनच्या ‘दा विंची कोड’ या ‘बेस्टसेलर’ पुस्तकात, लिओनार्दोच्या चित्रामध्ये येशूची पत्नी मेरी मॅग्डालिन त्याच्या उजव्या बाजूला बसलेली आहे, असा दावा करण्यात आला आहे. त्याचे काही संदर्भही दिलेले आहेत. तथापि, त्या विषयात आपल्याला फार खोल जाण्याची गरज नाही.

‘दी लास्ट सपर’ ही ख्रिश्चन धर्माच्या उदयकाळातील एक अलौकिक ऐतिहासिक घटना आहे, एवढे निश्चित!

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
A V Moharir About 5 Days ago
Very nice, short, complete and informative article. Even persons from the Christian community may not be knowing the names of all the twelve apostles of Christ.
0
0

Select Language
Share Link
 
Search