Next
राज्य नाट्य स्पर्धेची रत्नागिरीतील प्राथमिक फेरी सुरू
BOI
Friday, November 16, 2018 | 05:22 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
‘रत्नागिरी हे कोकणाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. त्यामुळे येथील नाट्यगृहाच्या नूतनीकरणासंबंधी निर्णय घेताना स्थानिक रंगकर्मींच्या कल्पनांना महत्त्वाचे स्थान दिले आहे,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले. ५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीचा शुभारंभ स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी झाला. त्या वेळी ते बोलत होते. 

पंडित यांनी नटराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन केले. ‘नाटक बघता बघता प्रेक्षकही नाटक जगायला लागतात, ही नाटकाची ताकद आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नाट्यरसिकांना मेजवानी मिळत आहे,’ असे उद्गार सुनील चव्हाण यांनी काढले.

उद्घाटन समारंभाच्या वेळी रंगमंचावर प्रा. रमेश कोटस्थाने, प्रवीण तथा पी. डी. कुलकर्णी आणि वैशाली खरे या ज्येष्ठ रंगकर्मींची परीक्षक म्हणून उपस्थिती होती. बालनाट्यामध्ये विशेष रस असणारे प्रा. कोटस्थाने यांनी ‘घरात हसरे तारे’ हे नाटक लिहिले आहे. श्री. कुलकर्णी हे रंगभूमीविषयक सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आहेत. वैशाली खरे या उत्कृष्ट स्त्री-अभिनयाच्या पारितोषिकविजेत्या असून नाट्यक्षेत्रातील जाणकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 

स्थानिक ज्येष्ठ रंगकर्मी अजित पाटील आणि मराठी नाट्यपरिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांचाही व्यासपीठावरील मान्यवरांत समावेश होता. पहिल्या दिवशी गणेशगुळे येथील अजिंक्यतारा थिएटर्सने योगेश सोमण लिखित ‘अचानक’ हे नाटक सादर केले. दशरथ रांगणकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. (या नाटकाचे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेले परीक्षण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात २७ नोव्हेंबरपर्यंत ही प्राथमिक फेरी चालणार असून, त्यात एकूण ११ नाटके सादर होणार आहेत. केवळ १५ आणि १० रुपयांच्या तिकिटात रसिकांना या नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे. सर्व नाटके सायंकाळी सात वाजता सादर होणार आहेत.

नाटकांचे वेळापत्रक असे - 
१६ नोव्हेंबर : हमीदाबाईची कोठी (लेखक : अनिल बर्वे, दिग्दर्शक : अभिजित काटदरे, सादरकर्ते : कै. डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान, चिपळूण)
१९ नोव्हेंबर : सभ्य गृहस्थ हो (लेखक : जयवंत दळवी, दिग्दर्शक : उदय सावरकर, सादरकर्ते : कलाविकास रंगभूमी, गुहागर)
२० नोव्हेंबर : सुंदर मी होणार (लेखक : पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक : मनोहर जोशी, सादरकर्ते : खल्वायन, रत्नागिरी)
२१ नोव्हेंबर : चौकटीतलं राज्य (लेखक : रामविजय परब, दिग्दर्शक : जयप्रकाश पाखरे, सादरकर्ते : नेहरू युवा कलादर्शन, पाली)
२२ नोव्हेंबर : नटरंग (लेखक : विलास पडळकर, दिग्दर्शक : संजय सावंत, सादरकर्ते : संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कला मंच, देवरुख)
२३ नोव्हेंबर : भर चौकात गांधी पुतळ्यासमोर (लेखक : राजेंद्र पोळ, दिग्दर्शक : गणेश गुळवणी, सादरकर्ते : संकल्प कला मंच, रत्नागिरी)
२४ नोव्हेंबर : नूर मोहम्मद साठे (लेखक : प्रेमानंद गज्वी, दिग्दर्शक : अविनाश पांचाळ, सादरकर्ते : श्री जाकादेवी देवस्थान, खालगाव, जि. रत्नागिरी)
२५ नोव्हेंबर : कॉफिन (लेखक : चैतन्य सरदेशपांडे, दिग्दर्शक : ओंकार पाटील, सादरकर्ते : शिवोली सेवा मंडळ, रत्नागिरी)
२६ नोव्हेंबर : अंतरीच्या श्रावणसरी : (लेखक आणि दिग्दर्शक : सुनील जाधव, सादरकर्ते : श्री देवी जुगाई कला मंच, कोसुंब)
२७ नोव्हेंबर : जीना इसी का नाम है (लेखक : संध्या देशपांडे, दिग्दर्शक : ऋत्विज आपटे, सादरकर्ते : श्रीरंग, रत्नागिरी)

(१५ नोव्हेंबरला सादर झालेल्या ‘अचानक’ या नाटकाचे परीक्षण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search