Next
‘स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’; ‘एमटीडीसी’चा अनोखा उपक्रम
नववर्षाच्या सूर्योदयाचे छायाचित्र काढून पाठवण्याचे आवाहन
BOI
Monday, December 31, 2018 | 04:19 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : नव्या वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सूर्योदय सर्वप्रथम गोंदिया जिल्ह्यात, तर सर्वात शेवटी मुंबईमध्ये होतो. या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांची अर्थात सूर्योदयाची अनोखी छायाचित्रे काढून ती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. छायाचित्रे dgiprsocialmedia@gmail.com या ईमेलवर पाठवावीत. त्यातील निवडक छायाचित्रांना शासनाच्या विविध माध्यमांमधून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.


गोंदिया हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा, तर मुंबई हा अतिपश्चिमेकडील जिल्हा. गोंदियाला महाराष्ट्राचा ‘उगवत्या सूर्याचा जिल्हा’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात पहिला सूर्योदय गोंदियामध्ये होतो. तिथे सूर्योदय झाल्यानंतर साधारणत: २७ मिनिटांनंतर मुंबईत सूर्योदय होतो. मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण उत्साहात असतात; पण काहीजण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगळी वाट चोखाळतात.


महाराष्ट्रातल्या गोंदिया आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी नववर्षातील पहिल्या सूर्यकिरणांचे स्वागत करणाऱ्या निसर्गप्रेमी आणि पर्यटनप्रेमींसाठी ‘एमटीडीसी’ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पर्यटक, छायाचित्रकार, विद्यार्थी, नागरिक यांनी गोंदिया आणि मुंबईतील नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांची अनोखी छायाचित्रे काढून ती कल्पक फोटोओळींसह पाठवावी. 

पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रकारांना एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये तीन दिवस राहण्याचे बक्षीस देण्यात येईल. निवडक छायचित्रांना शासनाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी देण्यात येईल ‘एमटीडीसी’च्या देशविदेशात नेण्यात येणाऱ्या प्रसिद्धी सामग्रीत या छायाचित्रांचा समावेश करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि एमटीडीसीची वेबसाईट, सोशल मीडिया पेजेस यावर ही छायाचित्रे छायाचित्रकाराच्या नावासह प्रसिद्ध करण्यात येतील. 

निसर्गात रमणाऱ्या पर्यटकांसाठी गोंदिया आकर्षण केंद्र
गोंदिया हा जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यालगत आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. दाट वनसंपदेने वेढलेला एक निसर्गरम्य जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. नागझिरा वने, नवेगाव राष्ट्रीय उद्यान यामध्ये विपूल वनसंपदा आणि जैवविविधता आहे. धानाचे कोठार आणि तलावांचा जिल्हा अशीही गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे निसर्गात रमणाऱ्या पर्यटकांसाठी हा जिल्हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्रावर पडणारी पहिली सूर्यकिरणे या जिल्ह्यावरच पडतात. 

गोंदियानंतर मुंबईत २७ मिनिटे उशिरा सूर्योदय
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही पश्चिमेकडे असून, मुंबई हे एक प्रमुख शेवटचे टोक आहे. महाराष्ट्राचा सूर्यास्त कोकण किनारपट्टीवर होतो. कोकण किनारपट्टी आणि मुंबई शहर हे अतिपश्चिमेकडे असल्याने येथे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही उशिरा होतात. गोंदिया जिल्ह्याच्या तुलनेत मुंबईत साधारण २७ मिनिटे उशिरा सूर्योदय होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुमारे ९९४ किलोमीटर इतके अंतर आहे. पृथ्वीला परिवलनाद्वारे हे अंतर पार करण्यास साधारण २७ मिनिटे लागतात.

(स्रोत : महान्यूज) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search