Next
घर की मुर्गी दाल बराबर...
BOI
Monday, April 09, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

‘राष्ट्रीय’ म्हणविणाऱ्या नेत्यांना हिंदीशिवाय अन्य भारतीय भाषांचा गंधही नसल्याची उदाहरणे अनेकदा पाहायला मिळतात. तशी ती गेल्या काही दिवसांतही पाहायला मिळाली. इंग्रजीसारखी परकीय भाषा येत असली, तरी अन्य भारतीय भाषा येत नसल्याने त्या प्रांतातील लोकांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी त्यांना इतरांच्या भाषांतरावर आणि मदतीवर अवलंबून राहावे लागते. त्याची परिणती फटफजितीत होते.....
..........
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका ऐन भरात आल्या आहेत. दोन्ही बाजूंनी तुंबळ (हा खास कन्नड शब्द आहे. तुंबा म्हणजे खूप, तुंबळ म्हणजे जोरदार!) वाक्-युद्ध चालू आहे. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांची वैगुण्ये काढणेही सुरू आहे. यातील दोन घटनांनी गेल्या आठवड्यात लक्ष वेधून घेतले आणि आपण एकमेकांशी किती तुटलेलो आहोत, याची जाणीव करून दिली.

सुरुवात झाली राज्यसभेचे खासदार राजीव चंद्रशेखर यांनी २६ मार्च रोजी केलेल्या ट्वीटने. चंद्रशेखर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला. त्यात राहुल गांधी यांना महान भारतीय अभियंते, विद्वान आणि प्रशासक सर एम. विश्वेश्वरय्या यांचे नाव घेताना अडचण होत होती. सुमारे आठ सेकंदांच्या त्या व्हिडिओत राहुल गांधी हे विश्वेश्वरय्या यांचे नाव घेताना अडखळतात आणि त्यानंतर जो काही उच्चार ते करतात, तोही चुकीचा! 

‘नवकर्नाटकाच्या निर्माणाचा दावा करणाऱ्यांना कर्नाटकाचे महान सुपुत्र आणि भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांचे नावही माहीत नाही,’ अशी खोचक टिप्पणी चंद्रशेखर यांनी केली. विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकात झाला होता. ब्रिटिश राजवटीत १९१२पासून १९१८पर्यंत ते म्हैसूर राज्याचे दिवाण होते. भारतात दर वर्षी १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जन्मदिनानिमित्त अभियंता दिन साजरा केला जातो. तेव्हा म्हैसूरच्या महान सुपुत्रांची यादी राहुल गांधी सांगत होते; मात्र त्यात विश्वेश्वरय्या यांचे नाव आले, तेव्हा त्यांना अडखळायला झाले.

याच कर्नाटकात फजितीचा पुढचा प्रसंग आला राहुल यांचे प्रतिस्पर्धी अमित शहा यांच्यावर. दावणगिरे येथे शहा यांची सभा होती. त्या वेळी शहा यांनी सभेला संबोधित करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. ‘मोदींवर विश्वास ठेवून तुम्ही येडीयुरप्पांनाच मत द्या,’ असे आवाहन शहा यांनी जनतेला केले. शहा भाषण हिंदीतून करत होते; पण अर्थात कर्नाटकातील जनतेला कन्नडशिवाय दुसरी भाषा कोठून येणार? म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या भाषणाचे भाषांतर होऊ लागले. धारवाडचे खासदार प्रल्हाद जोशी यांनी हिंदी भाषण कन्नडमध्ये आणण्याची जबाबदारी घेतली. परंतु जोशी यांनी शहा यांच्या भाषणाचा तर्जुमा करण्याऐवजी पार ‘ध’चा ‘मा’ केला.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब, मागास, दलित व दुर्लक्षित लोकांसाठी काहीच करणार नाहीत. ते देशाची वाट लावतील. यामुळे तुम्ही त्यांनाच मत द्या,’  असे उफराटे भाषांतर त्यांनी केले. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोदींनी बेंगळुरू येथे हिंदीतून भाषण केले होते. तेही कन्नड जनतेच्या डोक्यावरून गेले होते. दोन वर्षांपूर्वी तमिळनाडूसह चार राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्या वेळी चेन्नईतील सभेत राहुल यांच्या इंग्रजी भाषणाचा तत्काळ तमिळ अनुवाद ‘द्रमुक’चे नेते करत होते.

या सर्व उदाहरणांचा लघुत्तम साधारण विभाजक एकच आहे - तो म्हणजे ‘राष्ट्रीय’ म्हणविणाऱ्या नेत्यांना नसलेला दाक्षिणात्य (किंवा हिंदीशिवाय अन्य भारतीय) भाषांचा गंध. म्हणून मग लोकांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी त्यांना इतरांच्या भाषांतरावर आणि मदतीवर अवलंबून राहावे लागते. त्याची परिणती अशा फटफजितीत होते.

वास्तविक कन्नड काय किंवा हिंदी काय, या काही परकीय भाषा नाहीत. उलट भारतातील सर्व भाषा एकाच मूळ भाषेचे (तत्त्वाचे) वेगवेगळे अवतार आहेत, असे अनेक तज्ज्ञांनी साधार दाखवून दिले आहे. गौरी शंकर नावाच्या लेखकाचे ‘प्राचीन भारतीय लिपीमाला’ नावाचे पुस्तक आहे. त्यात ठाशीव पुराव्यांसह सर्व भारतीय लिपींचा विकास दाखवलेला आहे आणि सर्व भारतीय लिपी एकाच ब्राह्मी लिपीच्या वारस कशा आहेत, हे दाखवून दिले आहे. राम मनोहर लोहिया म्हणत, की देवनागरी लिपी आडवी केली की कन्नड लिपी तयार होते. यात अतिशयोक्ती असली, तरी सर्व आधुनिक भारतीय भाषांच्या लिप्या एकच असल्याचे पुराव्यांसह दाखवता येते, हे खरे आहे. आपल्या विश्वनाथ नरवणे यांनी ‘व्यवहारकोश’ या पुस्तकातून १२ भारतीय भाषांतील शब्दसंग्रह आणि त्यांच्या लिप्या दिल्या आहेत. त्यांनी ‘भारतीय कहावत संग्रह’ नावाचे अनेक खंडाचे संग्रहही काढले आहेत. त्यावर एक नजर टाकली, तरी भारतीय भाषांमधील शब्द आणि व्याकरणातील साधर्म्य नजरेत भरते.

परंतु गुजराती भाषक असलेले अमित शहा ज्या सहजतेने इंग्रजी बोलू शकतात, त्या सहजतेने ते कन्नड का बोलू शकत नाहीत. त्यांचे हिंदीवरील प्रभुत्व समजून घेता येईल, परंतु इंग्रजीबाबत काय? वास्तविक औपचारिक (किंवा आपल्याकडे ज्याला सर्वसामान्यपणे प्रमाण किंवा शुद्ध म्हणतात ती) कन्नड ही भाषा अन्य कुठल्याही संस्कृतनिष्ठ भाषेसारखीच आहे. उदाहरणार्थ हा मासला पाहा – ‘बिजेपिय ३८ने संस्थापना दिनद अंगवागि मुंबैनल्लि नडेद ऱ्य़ालियल्लि अमित् शा विरोध पक्षगळ विरुद्द टीका प्रहार माडिद्दारॆ’ हे त्यांच्या मुंबईतील सभेच्या बातमीतील वाक्य. निव्वळ पहिल्यांदा हे वाक्य वाचणारी व्यक्तीही सांगू शकेल, की हे वाक्य मराठी-हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांच्याच जातकुळीतील आहे.

तेच राहुल गांधींबद्दल. मूळ इटालियन असलेल्या त्यांच्या आईंनी भारतीय लोकांच्यात वावरायचे म्हणून हिंदी खास शिकून घेतली. कितीही चेष्टा झाली तरी त्यांनी हिंदीची सार्वजनिक सभांतून उजळणी केली. ते कष्ट घ्यायची तयारी राहुल का दाखवू शकत नाहीत? अन् जे राहुल गांधींचे तेच तुमचे-आमचे-सर्वांचे!

डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन, इमॅन्युएल मॅक्राँ, जेम्स बाँड ही नावे लिहिताना जो नेमकेपणा बाळगण्याचा आग्रह आपण धरतो, इंग्रजीतील स्पेलिंग बरोबरच आले पाहिजे म्हणून बालकांना वेठीला धरतो तोच आग्रह द्रविड मुन्नेट्र कऴगम, तिरुवनंतपुरम, पळनीस्वामी, दिनकरन, चंद्रबाबू नायडू हे शब्द लिहिताना आपण का धरू शकत नाही? आपल्याच भाषांशी दुरावा बाळगून आपण काय साध्य करतो? महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले, तेव्हा त्यांचे बहुतेक मोकिल (मुवक्किल) तमिळभाषक होते. त्यांच्या संपर्कात राहायचे आणि त्यांच्याशी एकरूप व्हावे, यासाठी त्यांनी तमिळ भाषा शिकून घेतली. नंतर राष्ट्रीय राजकारणात व्यग्र झाल्यानंतर त्यांना त्या भाषेशी तेवढी सलगी ठेवता आली नाही. तरीही तमिळमधून स्वतःची स्वाक्षरी करण्याएवढे प्रभुत्व त्यांनी ठेवले होते. तिरुवळ्ळुवर (हाही शब्द त्याच्या मूळ स्वरूपात वाचणे हे तसे दुर्मीळच) या संताचे ‘तिरुक्कुरळ’ वाचण्यासाठी मला तमिळ शिकण्याची इच्छा आहे, असे ते म्हणत.

ही सिद्धता आज किती जण दाखवतात. ती दाखवत नाहीत म्हणूनच ओशाळण्याचे प्रसंग येतात. हे प्रसंग म्हणजे ‘घर की मुर्गी दाल बराबर’चा वारंवार होणारा आविष्कार आहे. फार नाही, काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकात हिंदीला विरोध करण्यासाठी उग्र आंदोलने झाली होती. अशा आविष्कारांमुळे त्या आंदोलनांनाच बळ मिळते. ते बळ मिळू द्यायचे नसेल, तर घरातील कोंबडी वनातील मोराच्याच योग्यतेची मानायला हवी.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link