Next
पुणे येथे ‘वाचून मोठे होऊया’ उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, April 11 | 05:34 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून विकास कांबळे, मंदार जोशी, शशिकांत कांबळे व दत्ता पवार.पुणे : ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प हाती घेण्यात आला असून, या संकल्पाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे १४ एप्रिलला डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी महापुरुषांच्या दहा हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर विचाररथ’ तयार करण्यात आला आहे,’ अशी माहिती समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी समितीचे सल्लागार दत्ता पवार, युवा अध्यक्ष विकास कांबळे व ‘आरपीआय’चे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी उपस्थित होते. या उपक्रमाचे उद्घाटन ११ एप्रिल २०१८ रोजी सकाळी पद्मावती येथे झाले. या कार्यक्रमासाठी आमदार भीमराव तापकीर, सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, ‘डॉ. आंबेडकर यांच्या प्रभावशाली विचारांतून प्रेरणा घेऊन युवापिढी घडली पाहिजे; मात्र आजच्या घडीला जयंती साजरी करण्याची युवकांची पद्धत पाहून आपण खरेच बाबासाहेबांचे अनुयायी आहोत का, असा प्रश्न पडतो. केवळ डीजेपुढे नाचणे म्हणजे जयंती साजरी करणे नव्हे. बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र घेऊन त्यांना अभिप्रेत समाजाची निर्मिती व्हायला हवी. याच विचारांतून यंदाच्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प आम्ही सोडला आहे. १४ एप्रिल रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत सारसबागेसमोरील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ या ‘छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर विचाररथा’मार्फत १० हजार पुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, विनायक निम्हण, माजी उपमहापौर दीपक मानकर, गटनेते वसंत मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, ज्येष्ठ संपादक अरूण खोरे यांच्या हस्ते हे विचारधन वाटले जाणार आहे.’

‘जयंतीदिनाच्या आधी ११ ते १३ एप्रिल या कालावधीत ‘छत्रपती-शाहू-फुले-आंबेडकर विचाररथ’ पुण्यातील विविध दलित वसाहतींमध्ये फिरणार आहे. पर्वती, कासेवाडी, राजेवाडी, ढोले पाटील रोड, विश्रांतवाडी, बोपोडी, औंध, रामनगर, वारजे, धनकवडी, पद्मावती, मंगळवार पेठ, कामगार पुतळा आदी भागातील दलित वसाहतींचा यामध्ये समावेश आहे. या रथाद्वारे पुस्तक वाटपासह जनजागृती केली जाणार आहे. महापुरुषांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे कांबळे यांनी नमूद केले.

उपक्रमाविषयी :
दिवस : १४ एप्रिल २०१८
वेळ : सायंकाळी चार ते सहा
स्थळ : अण्णाभाऊ साठे पुतळा, सारसबाग, स्वारगेट, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link