हिंदी ही भाषा देशातील विविध भागांना व लोकांना जोडते; मात्र ती अशा प्रकारे जोडत असल्यामुळे मूळ हिंदी भाषकांना अन्य भाषा शिकण्याची गरज वाटत नाही. बहुभाषक होण्याच्या बाबतीत हिंदी वा बंगाली भाषकांची संख्या अत्यंत कमी आहे. एकभाषी व्यक्ती या आजच्या जगातील निरक्षर व्यक्ती होत, असे तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे हिंदी काय किंवा अन्य भाषकांना काय, पुढे जायचे असेल तर आपली वृत्ती बदलणे, हाच उपाय आहे. बहुभाषकवादाचा टक्का वाढलाच पाहिजे!................
कर्नाटक राज्यातील जैन धर्मीयांचे पवित्र महाक्षेत्र असलेले श्रवणबेळगोळ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. मराठी भाषकांच्या दृष्टीने तर खासच. कारण येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याच्या डाव्या पायामधील कोनाड्यासारख्या जागेत जी ओळ कोरलेली आहे, ती मराठीतील आद्य शिलालेखांपैकी एक मानली जाते. ‘श्री चावुण्डराये करवियले; गंग राजे सुत्ताले करवियले’ ही ती ओळ. आता-आतापर्यंत तर मराठी भाषेचा हा पहिला लिखित पुरावा मानला जात होता; मात्र याच पुतळ्याच्या पायथ्याशी, याच ओळीच्या शेजारी मराठीशिवाय तमिळ आणि कन्नड भाषांमध्येही शिलालेख कोरला आहे. हे शिलालेख इ. स. ९८३मध्ये कोरले असावेत, असे बहुतेक तज्ज्ञ मानतात.
‘गुरुग्रंथसाहिब’ हा शीख पंथीयांचा धर्मग्रंथ होय. या ग्रंथाला आदराचे आणि श्रद्धेचे स्थान आहे. या ग्रंथात संत नामदेवांच्या ६२ अभंगांचा समावेश आहे. या अभंगरचना हिंदी भाषेतील आहेत. संत नामदेवांसोबतच संत कबीर व अन्य संतांच्या रचनांनाही येथे बरोबरीने स्थान देण्यात आले आहे. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत भारतात विविध भाषा कशा एकत्र नांदत होत्या, याची ही केवळ दोन उदाहरणे. कोणताही भेदभाव न करता सर्व प्रकारच्या भाषा येथे नांदल्या व वाढल्याही. भारताच्या बहुभाषकत्वाचे एक उदाहरण राज्यघटनेतील अधिकृत भाषांच्या वाढीतही दिसून येते. ही राज्यघटना झाली, तेव्हा या यादीत केवळ १४ भाषा होत्या. आज त्या २२ भाषा आहेत. शिवाय गारो, खासी अशा भाषांचा या यादीत समावेश करण्याची मागणी प्रलंबित आहे ती आहेच!
आजच्या मुलांचा विचार केला तर आपण पाहतो - ती शाळेत एक भाषा बोलतात (बहुतांश इंग्रजी), घरी दुसरी भाषा बोलतात (बहुतांश मराठी) आणि मित्रांसोबत इतर कोणत्या तरी भाषेत बोलतात (बहुतांश हिंदी). ज्या घरात गुजराती, मराठी किंवा तेलुगू भाषा बोलली जात असेल आणि शाळेचे माध्यम इंग्रजी असेल, तर असे मूल स्वाभाविकपणे बहुभाषक होत जाते. भारत हा मुळातच बहुभाषक देश आहे. प्राचीन काळापासून विविध प्रांतांतील लोक एकापेक्षा जास्त भाषा शिकून एकमेकांशी संपर्क साधत होते. पूर्ण भारतभरातील लोकांनी काशीला जाऊन धार्मिक कार्ये करणे किंवा पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा मध्य प्रदेशातील लोकांनी करावी, यातूनच त्याची चुणूक दिसून येते.
अलीकडच्या काळात आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक कारणांमुळे नागरिकांचे स्थलांतर वाढले आहे. त्याउपर राज्यघटनेने निवास स्वातंत्र्य दिलेले असल्यामुळे एका राज्यातील नागरिकांनी दुसऱ्या राज्याच्या शहरांमध्ये स्थायिक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मुंबईसारख्या महानगरांतच नव्हे, पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरीच नव्हे, तर अगदी लहान- मोठ्या शहरांमध्येही बहुभाषकत्व व बहुसांस्कृतिकत्व (ज्याला कॉस्मोपॉलिटनिझम म्हणायची पद्धत आहे) वाढत आहे; मात्र मुळात बहुभाषक असलेल्या भारतात इंग्रजीच्या प्रभावामुळे बहुभाषकतेकडे साधन म्हणून पाहण्याऐवजी एक समस्या म्हणून पाहिले जाते. वास्तविक तसे नाही.
तीन वर्षांपूर्वी भोपाळ येथे आयोजित दहाव्या जागतिक हिंदी संमेलनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, ‘माझी मातृभाषा हिंदी नाही, गुजराती आहे; मात्र मी कधीकधी विचार करतो की जर मला हिंदी बोलता आले नसते, समजले नसते, तर माझे काय झाले असते? मी लोकांपर्यंत कसा पोहोचलो असतो? त्यांचे म्हणणे कसे जाणून घेतले असते? हिंदी भाषेची काय ताकद असते हे मला व्यक्तिगतरीत्या माहिती आहे. आणि लक्षात घ्या की मी येथे हिंदी साहित्याविषयी नाही, तर हिंदी भाषेविषयी बोलतो आहे. आपल्या देशात हिंदी भाषेचे आंदोलन ज्या लोकांनी चालवले त्यात बहुसंख्य नेत्यांची मातृभाषा हिंदी नव्हती. सुभाषाचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, काकासाहेब कालेलकर, राजगोपालाचारी अशी कितीतरी नावे, ज्यांनी हिंदी भाषेचे संरक्षण आणि संवर्धनासाठी दूरदृष्टीने प्रयत्न केले, अशा कोणाचीच मातृभाषा हिंदी नव्हती. त्यांचे कार्य आपल्यासाठी आजही प्रेरक आहे.’
थोडक्यात म्हणजे भारताच्या सर्व लोकांना एकमेकांशी जोडण्याचे श्रेय बव्हंशी हिंदीला दिले जाते आणि ते काही अनाठायी नाही; मात्र हिंदीचे हेच बलस्थान भारतातील बहुभाषकत्व कायम ठेवण्याच्या मार्गात आड येत आहे. हिंदीची व्यापकता अशी वाढत असल्यामुळेच असावे कदाचित; पण हिंदी भाषकांना अन्य भाषांची गरज वाटेनाशी झाली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीतून तरी असेच दिसते.
या जनगणनेनुसार, लोकांनी १६५२ भाषांना मायबोलीचा दर्जा दिला आहे. या मायबोलींचे १९३ भाषांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. भारतात हिंदी आणि बंगाली बोलणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे; मात्र बहुभाषक होण्याच्या बाबतीत हेच दोन गट मागे पडल्याचे दिसते. एकापेक्षा अधिक भाषा जाणणाऱ्या हिंदी वा बंगाली भाषकांची संख्या अत्यंत कमी आहे. देशात हिंदी भाषकांची संख्या ५१ कोटी आहे; मात्र त्यातील केवळ १२ टक्के म्हणजे सहा कोटी २५ लाख लोक द्विभाषक आहेत, तर तीन भाषा येणाऱ्यांची संख्या केवळ ७९ लाख आहे. विशेष म्हणजे द्विभाषक असलेल्या ५० टक्के हिंदी भाषकांना (तीन कोटी २० लाख) इंग्रजी येते आणि त्या खालोखाल येणारी भाषा ही मराठी (६० लाख ५० हजार) आहे. दुसरीकडे मातृभाषा उर्दू असलेल्यांमध्ये ६२ टक्के बहुभाषक आहेत. अर्थातच त्यातील बहुतांश लोकांना हिंदी चांगली येते.
या आकेडवारीतील आणखी काही माहितीचे तुकडे नोंद घेण्यासारखे आहेत. केवळ बंगाली भाषकांची संख्या नऊ कोटी ७० लाख असताना त्यातील केवळ १८ टक्के जणांना (सुमारे १ कोटी ७० लाख) दोन भाषा येतात. यातील अर्ध्या जणांना हिंदी येते. बहुभाषक लोकांमध्ये मराठी लोकांची संख्याही चांगलीच म्हणजे ४७ टक्के आहे. मराठी भाषकांची संख्या आठ कोटी ३० लाख आहे, तर त्यातील तीन कोटी ४० लाख जणांना हिंदी ही दुसरी भाषा म्हणून अवगत आहे. बहुभाषक लोकांमध्ये पंजाबी भाषकांची संख्याही जास्त असून, यातील ५२ टक्के लोक द्विभाषक आहेत. यातील ११ टक्के लोकांना इंग्रजी येते, तर बाकीच्या ८७ टक्के जणांना हिंदी येते.
याचाच अर्थ हिंदी देशातील विविध भागांना व लोकांना जोडते; मात्र ती अशा प्रकारे जोडत असल्यामुळे मूळ हिंदी भाषकांना अन्य भाषा शिकण्याची गरज वाटत नाही. ब्रिटन किंवा अमेरिकेतील इंग्रजी भाषकांना ज्या प्रकारे इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषा शिकण्याची गरज वाटत नाही, त्याचप्रमाणे हिंदी भाषकांनाही अन्य भाषा शिकण्याची गरज वाटत नाही, असे व्हायला नको. केवळ एकच एक भाषा घेऊन आपण कामच करू शकणार नाही. ग्रेग रॉबर्टस् नावाच्या तज्ज्ञाच्या मते तर एकभाषी व्यक्ती या आजच्या जगातील - २१व्या शतकातील - निरक्षर होत. ‘सीएनएन मनी’ वाहिनीने २०१३ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार, परदेशी भाषा हे नोकरीसाठीचे सर्वोत्तम कौशल्य ठरले होते.
‘युरोपीय आयोगाने २००५मध्ये आपल्या २५ सदस्य देशांमध्ये सर्वेक्षण केले होते. त्यात ब्रिटन आणि आयर्लंड हे सर्वांत कमी द्विभाषक लोक असलेले देश आढळले होते. तेथील सुमारे दोन-तृतीयांश लोक फक्त इंग्रजी बोलतात. अमेरिकेत केवळ २५ टक्के व्यक्ती इंग्रजीशिवाय आणखी एखादी भाषा बोलू शकतात. ऑस्ट्रेलियात हे प्रमाण आणखी कमी आहे; मात्र दोन किंवा अधिक भाषा बोलणे हे मेंदूसाठी चांगले असते. एकापेक्षा जास्त भाषेत बोलण्याने मेंदूची अनेक कार्ये एकत्र करण्याची क्षमता सुधारते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे द्विभाषिक असल्याने वृद्ध होण्याची आणि स्मृतिभ्रंश होण्याची प्रक्रिया मंदावते,’ असे संशोधन न्यू सायंटिस्ट या नियतकालिकात सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते.
त्यामुळे हिंदी काय किंवा अन्य भाषकांना काय, पुढे जायचे असेल तर आपली वृत्ती बदलणे, हाच उपाय आहे. हिंदी पट्ट्यात ४९ लोकभाषा आहेत. या सर्वांना हिंदीच्या एका छत्राखाली घेण्यात आले आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे, की दाक्षिणात्य आणि अन्य गैर-हिंदी भाषकांमध्ये हिंदीविरोध वाढत आहे. असे व्हायला नको असेल, तर बहुभाषकता, बहुसांस्कृतिकता वाढलीच पाहिजे. जे हिंदी भाषकांना लागू तेच इतरांनाही लागू आहे. बहुभाषकवादाचा टक्का वाढलाच पाहिजे!