Next
‘गोमू संगतीनं...’वर रसिकांनी धरला ठेका
प्रेस रिलीज
Thursday, July 26 | 04:38 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘फुलला संसार माझा...’, ‘सांगू कशी प्रिया मी...’, ‘तोच चंद्रमा नभात...’ अशा अवीट गीतांनी चढलेला बहर, ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’वर रसिक श्रोत्यांनी धरलेला ठेका, ‘देहाची तिजोरी भक्तिसाच ठेवा...’, ‘आकाशी झेप घेरे पाखरा...’ यातून उत्कट झालेला भाव अन् ‘शंभो शिवशंकरा...’, ‘सखी मंद झाल्या तारका...’, ‘निसर्गराजा ऐक सांगतो...’ अशा सुरेल गीतांनी २५ जुलैची सायंकाळ बाबूजीमय होऊन गेली.

निमित्त होते, लोकप्रिय संगीतकार, गायक सुधीर फडके अर्थात बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महक व हार्मनी इव्हेंट्सतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘रेशीम गाणी’ कार्यक्रमाचे. बरोबरच ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी व ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी बाबूजींसोबतच्या आपल्या आठवणी जागविताना ‘रेशीम गाणी’ला एका वेगळ्या उंचीवर नेले. बाबूजींनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली अजरामर गाणी सादर करत रसिकांच्या मनावर बाबूजींचे गारुड आजही कायम असल्याची प्रचिती आली.मनिषा निश्चल, गफार मोमीन, मुकुल पांडे, मनीष आपटे यांनी आपल्या सुरेल आवाजात गीते सादर केली. मुकेश देडिया यांच्या संगीत संयोजनाने, तर विनया देसाई यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगात आणली. मिहीर भडकमकर, विशाल गंड्रतवार, रोहित जाधव व सचिन वाघमारे यांनी वाद्यांची साथसंगत केली.

या वेळी प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी, आयोजक निश्चल लताड, किशोर सरपोतदार, विठ्ठल काटे, मोहन कुलकर्णी, मालिनी लताड, राजेश समर्थ आदी उपस्थित होते. पूना गेस्ट हाऊस मंच आणि नवचैतन्य हास्य योग्य परिवार यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.

बाबूजींसोबतच्या आठवणी सांगताना रवींद्र महाजनी म्हणाले, ‘धीरगंभीर आणि स्मितहास्य असणाऱ्या बाबूजींचे व्यक्तिमत्त्व भारदस्त आणि आदरयुक्त होते. त्यांचे अस्तित्व ऊर्जा निर्माण करणारे असायचे. अनेक चित्रपटांत माझ्यावर चित्रित झालेली गीते बाबूजींनी गायली आहेत किंवा संगीतबद्ध केली आहेत, हे माझे भाग्य आहे.’

आशा काळे म्हणाल्या, ‘बाबूजींचा आवाज, शब्दरचना आणि समोरच्याला दाद देण्याची त्यांची कला प्रभावित करून जायची. त्यांच्या शब्दसुमनांनी काम करताना हुरूप यायचा. उच्चार आणि भाषा शुद्धीसाठी बाबूजींकडून मला प्रेरणा मिळाली.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link