Next
‘त्यांची’ कृती ठरली अभिमानास्पद
प्रशांत सिनकर
Monday, August 13, 2018 | 03:16 PM
15 1 0
Share this article:

महामार्गावर पडलेले झाड

ठाणे :
एखादी आपत्ती ओढवली, की अनेकदा सरकारी यंत्रणेच्या मदतीची वाट पाहिली जाते. ती मदत वेळेवर मिळाली, तर चांगला उपयोग होतोच; पण काही वेळा सजग नागरिकांच्या तत्परतेमुळे सरकारी मदत मिळण्याआधीही बरेच काही घडू शकते. ठाण्यातील पत्रकार आणि नासा (NASA)  या पर्यावरणविषयक संस्थेचे राजीव डाके यांनी नुकतेच हे दाखवून दिले. राजीव यांच्यासह सामाजिक भान असलेल्या दोन युवकांनी मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावर पडलेले झाड बाजूला केले. 

शनिवारी (११ ऑगस्ट २०१८) सकाळपासून होत असलेल्या पावसामुळे मुलुंड परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्गावर सकाळच्या वेळेत एक मोठे झाड ऐन रस्त्यावर पडले होते. या झाडामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पडलेल्या झाडाला वळसा घालून वाहनचालक एकेरी पदराचा वापर करून दाटीवाटीने जात होते; पण एकानेही खाली उतरून वाहतुकीला अडथळा ठरत असलेले हे झाड बाजूला करण्याची तसदी घेतली नव्हती; मात्र काही वेळाने राजीव डाके मोटरसायकलवरून तेथून जात असताना त्यांनी हे झाड पाहिले. मोटरसायकल थांबवून ते एकटेच झाड ओढून बाजूला सारण्याचा प्रयत्न करू लागले; मात्र झाड मोठे असल्याने त्यांना ते शक्य होत नव्हते. त्यांचा हा प्रयत्न पाहून रवी नावाचा आणखी एक मोटरसायकलस्वार तेथे थांबून राजीव यांना मदत करू लागला. काही मिनिटांत आणखी एक मोटरसायकलस्वारही तेथे थांबला आणि त्याने त्यांना मदतीचा हात दिला. 

तिघांनी झाड बाजूला केल्यावर महामार्गा मोकळा झाला.

या वेळी मुसळधार पाऊस पडत होता; पण त्याची पर्वा न करता त्या तिघांनी कसेबसे ते झाड रस्त्याच्या बाजूला सरकवले. त्यामुळे रस्ता मोकळा होऊन वाहतूक कोंडीही दूर झाली. या तिघांनी वाहतूक पोलीस अथवा अग्निशमन दल यांना फोन न करता स्वतः पुढाकार घेऊन कर्तव्य पार पाडले. त्या दोघांची नावे विचारण्याचा प्रयत्न केला असता एकाने फक्त रवी असे सांगितले, तर दुसऱ्याने तेही सांगितले नाही. हे आमचे कर्तव्यच होते असे सांगून आणखी काही विचारण्याच्या आत ते दोघेही पुढे निघून गेले.

काही वेळाने या ठिकाणी आढाव आणि जाधव हे वाहतूक शाखेचे दोन पोलीस तेथे आले. पडलेले झाड बाजूला केल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. जवळच उभ्या असलेल्या राजीव डाके यांना याबाबत विचारले असता, ‘आम्ही तिघांनी मिळून हे झाड बाजूला केले,’ असे सांगितले. तेव्हा वाहतूक शाखेच्या हवालदारांनी तिघांचेही आभार मानून समाधान व्यक्त केले.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search