Next
‘वैद्यकीय विद्यार्थ्यांना ‘माझी गोष्ट’ मार्गदर्शक ठरेल’
शतायुषी स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. लीला गोखले (रानडे) यांच्या आत्मकथनाचे प्रकाशन
BOI
Friday, January 04, 2019 | 11:44 AM
15 0 0
Share this article:

‘माझी गोष्ट’ पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन करताना डावीकडून ‘बुकगंगा’च्या गौरी बापट, सुप्रिया लिमये, ‘मौज’चे श्रीकांत भागवत, किरण नगरकर, मोनिका गजेंद्रगडकर, डॉ. लीला गोखले, डॉ. सुभाष काळे.

पुणे : ‘वैद्यकीय व्यवसाय हा आज व्यवसाय न राहता धंदा बनला आहे आणि तरीही प्रामाणिक, मार्गदर्शक डॉक्टर या व्यवसायात आहेत. या प्रामाणिक वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये डॉ. लीला गोखले (रानडे) यांचे स्थान अतिशय वरचे आहे. ‘माझी गोष्ट’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की मार्गदर्शक ठरेल,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी काढले.

पुण्यातील जुन्या पिढीतील शतायुषी स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. लीला गोखले (रानडे) यांच्या ‘माझी गोष्ट’ या आत्मकथनाचे आणि ई-बुकचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक नगरकर यांच्या हस्ते तीन जानेवारी २०१९ रोजी झाले. त्या वेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम पुण्यातील नॅशनल फिल्म अर्काइव्हज सभागृहात झाला. डॉ. गोखले या १०१ वर्षे वयाच्या आहेत.हे आत्मकथन मौज प्रकाशनाने प्रकाशित केले असून, ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’ने प्रकाशित केले आहे. या प्रसंगी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुभाष काळे, मौज प्रकाशनचे श्रीकांत भागवत, मोनिका गजेंद्रगडकर, अतुल गोखले, अनिता बेनिंजर-गोखले, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, ‘बुकगंगा’च्या सुप्रिया लिमये, गौरी बापट उपस्थित होत्या.

नगरकर म्हणाले, ‘एक स्त्री आणि एक डॉक्टर किती मोठे  काम करू शकते याचे दर्शन डॉ. लीला गोखले यांच्या पुस्तकातून होते. आजच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना हे पुस्तक वस्तुपाठ म्हणून उपयोगी ठरेल. सुविधा असलेल्या प्रतिकूल काळात गोखले यांच्या पिढीने अत्यंत चिकाटीने आणि प्रामाणिकपणे हा व्यवसाय केला. वैद्यकीय व्यवसाय हा आज व्यवसाय न राहता धंदा बनला आहे आणि तरीही प्रामाणिक, मार्गदर्शक डॉक्टर या व्यवसायात अपवादात्मक आहेत. या प्रामाणिक, अपवादात्मक वैद्यकीय व्यावसायिकात डॉ. गोखले यांचे स्थान अतिशय वरचे आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचे प्रतिबिंब या आत्मकथनात पडले आहे.'

‘माझी गोष्ट’च्या ई-बुकविषयी डॉ. लीला गोखले यांना माहिती देताना ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या सुप्रिया लिमयेडॉ. काळे म्हणाले, ‘आरोग्य या विषयाकडे शासनाचे प्रथमपासून दुर्लक्ष आहे. वाढत्या लोकसंख्येच्या भयानक धोक्याबाबत कोणताही पक्ष बोलत नाही, मतदारही त्यांना याबाबत प्रश्न विचारत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर डॉ. लीला गोखले यांनी जुन्या काळात केलेले कुटुंबनियोजनाचे काम आणि स्पष्ट विचार महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांच्या मेडिकल रेकॉर्ड ठेवण्याच्या पद्धती आजच्या काळात पाहायला मिळणेही दुरापास्त झाले आहे. कोणाचेही दडपण न मानता, मिळकतीकडे लक्ष न देता रुग्णसेवा केली. प्रसूतीसाठी आलेल्या स्त्री रुग्णांना घरचे जेवण आणि तुपाच्या बरण्या देणाऱ्या डॉ. गोखले आज दंतकथाच वाटतील.’

‘मौज’ची पुस्तके ‘ई-बुक’ स्वरूपात ‘बुकगंगा’वर
‘हे पुस्तक ई-बुक स्वरूपात प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे,’ अशी भावना ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी व्यक्त केली. ‘हे पुस्तक ऑडिओ बुक स्वरूपातही आणल्यास अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत जायला मदत होईल,’ असे त्यांनी सुचविले. मौज प्रकाशन आणि ‘बुकगंगा डॉट कॉम’ यांच्यामध्ये करार झाला असून, त्यामुळे आता ‘मौज’ची दर्जेदार पुस्तके वाचकांना ‘बुकगंगा’वर ‘ई-बुक’ स्वरूपातही उपलब्ध होणार आहेत.

मोनिका गजेंद्रगडकर यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. अतुल गोखले यांनी सूत्रसंचालन केले.

(‘माझी गोष्ट’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी, तसेच ‘ई-बुक’  खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search