Next
शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी ‘धनाचे श्लोक’
BOI
Sunday, January 28 | 03:45 PM
15 0 0
Share this story

शेअर बाजारात गुंतवणूक करताना आठ पथ्ये पाळावी लागतात, त्याची माहिती  देणारे ‘धनाचे श्लोक’ आणि गुंतवणूक करण्यायोग्य शेअर्सची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
.......
शेअर बाजार हा एक पैसे मिळवून देणारा एक पर्याय आहे; पण त्यात कुणीही पडून चालत नाही. त्याची काही पथ्ये पाळावी लागतात. आपण किती जोखीम कुठे घ्यायची हे अभ्यास करून ठरवायला लागते. दर वर्षाच्या सुरुवातीला आपण एक संकल्प करतो. तो विरणाऱ्या वस्त्राप्रमाणे विरून जातो. त्यामुळे फायदा मिळवायचा असेल तर अष्टावधानी असावे लागते. त्यात कुठली आठ पथ्ये पाळावीत, ती खालील ‘धनाच्या श्लोकां’त दिली आहेत. ते समर्थांच्या ‘मनाच्या श्लोकां’सारखेच आहेत. 

मना येथे सातत्य आहे अवश्य।
तयानेच लक्ष्मी तुला होय वश्य।।
मना येथे श्रद्धा सदा बाळगावी।
तशी संयमांचीच इच्छा  धरावी।।
सदा भागभांडारी वैविध्या ठेव।
नफ्याचीच इच्छा, नको ठेवू हाव।। 
तुझे भागभांडार वाढावयास।
हवे त्यात सातत्य तैसा प्रयास।। 
नृपे कधी वैखरो जाण त्यांची |
निवेशास पथ्ये हवी आठ साची।।
मनाचे तसे हे धनाचेही श्लोक। 
जरा कान देऊन तू नीट ऐक।।

ही आठ पथ्ये पाळूनही कित्येकदा बाह्य कारणांमुळे, गणित चुकते. तोटा होतो; पण प्रत्येक चेंडूवर फलंदाजाला धाव काढता येत नाही, तसेच प्रत्येक गुंतवणुकीवर नफाच होईल, असे समजणे वेडेपणा ठरेल.

या आठवड्यात ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची त्याचे नाव ‘थिरुमलाई केमिकल्स’ असे आहे. थॅलिक अनहायड्राइड, मौलिना अॅसिड, फ्युमॅरिक अॅसिडचे उत्पादन ही कंपनी करते आणि ३४ देशांत विकते. अन्नपदार्थ, अनेक औषधे, पशुखाद्य, पेये, कन्फेक्शनरी या व्यवसायांत या गोष्टी लागतात. 

डिसेंबर २०१७च्या तिमाहीत तिची विक्री ३४५.६२ कोटी रुपये होती, तर करोत्तर नफा ५१.४६ कोटी रुपये होता. डिसेंबर२०१६ तिमाहीच्या १५.०९ कोटी रुपयांत तिपटीपेक्षा जास्त वाढ आहे. तिची २०१७ मार्चअखेरच्या पूर्ण वर्षाची विक्री १०३२ कोटी रुपये होती. करोत्तर नफा ७० कोटी रुपये होता. तिचे भागभांडवल १०.२० कोटी रुपये आहे. मार्च २०१८, २०१९ व २०२० या तीन वर्षांची तिची संभाव्य विक्री अनुक्रमे १३६७ कोटी रुपये, १७७५ कोटी रुपये व २९०० कोटी रुपये असू शकेल. ‘थिरुमलाई केमिकल्स’चा शेअर सध्या २२०० रुपयांच्या आसपास आहे; पण उपार्जन वाढीचा विचार करता तो वर्षभरात २८०० रुपयांवर व दोन वर्षांनी ३३०० रुपयांवर जावा.

- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link