Next
‘कुमारांसाठी साहित्यनिर्मिती हवी’
BOI
Sunday, December 17 | 12:24 AM
15 0 0
Share this story

‘दर्या’चे प्रकाशन करताना (डावीकडून) मंदार जोगळेकर, मिथिला पालकर, अमेय वाघ, समीर कुलकर्णी, विक्रम पटवर्धन, आमीरखान पठाण, क्षितिज पटवर्धन, गौरी भाडळे, कौस्तुभ भाडळे.

पुणे : ‘लहान मुले किंवा टीनएजर्सचे मनोरंजन हा जगभरात वेगवेगळ्या व्यासपीठांवर आणि विविध प्रकारच्या साहित्यविश्वात मोठा व्यवसाय आहे. त्यामध्ये किती क्षमता आहे, हे आम्हाला अनेकांशी चर्चा केल्यावर जाणवले. सध्या मराठीत या गटासाठी साहित्यनिर्मिती होत नाही. ती होण्याची गरज कोणाला वाटत नाही आणि मराठी तरुणांचे साहित्याकडे लक्ष नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे ‘दर्या’साठी एकत्र आलेल्या काही तरुण मुलांना पाठिंबा देऊन आम्ही ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न केला,’ अशी भूमिका चित्रपट लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याने मांडली. ‘कुमार गटासाठी दर वर्षी एक तरी चांगले पुस्तक यायला हवे आणि चांगल्या कल्पनांना आम्ही जरूर साह्य करू,’ असेही त्याने सांगितले. क्षितिजचा भाऊ आणि पेशाने फोटोजर्नालिस्ट असलेल्या विक्रम पटवर्धन याने लिहिलेल्या ‘दर्या’ या ग्राफिक नॉव्हेलचे (चित्ररूप कादंबरी) प्रकाशन शनिवारी (१६ डिसेंबर) पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात झाले. त्या वेळी क्षितिज बोलत होता.

अमेय वाघ आणि मिथिला पालकर या आजच्या पिढीच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या हस्ते ‘दर्या’ या ग्राफिक नॉव्हेलच्या मराठी आणि इंग्रजी अशा दोन आवृत्त्यांचे प्रकाशन एकाच वेळी झाले. या वेळी लेखक विक्रम पटवर्धन, ‘ग्राफिक नॉव्हेल’चे निर्माते क्षितिज पटवर्धन, गौरी आणि कौस्तुभ भाडळे, ‘बुकगंगा डॉट कॉम’चे सीईओ मंदार जोगळेकर, पुस्तकाचे इलस्ट्रेटर आमीरखान पठाण, पुस्तकाचे इंग्रजी अनुवादक समीर कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. या ‘ग्राफिक नॉव्हेल’चे ई-बुक ‘बुकगंगा’तर्फे तयार करण्यात आले असून, त्याचेही प्रकाशन या वेळी करण्यात आले. आशय फिल्म क्लब, क्षितिज पटवर्धन आणि गौरी भाडळे यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आशय’च्या सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. ‘आशय’चे सचिव वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. गेल्या ३२ वर्षांत ‘आशय’च्या व्यासपीठावर २५० पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल आणि ‘दर्या’सारखे तरुणांचा सहभाग असलेले आगळेवेगळे पुस्तक या व्यासपीठावर प्रकाशित झाल्याबद्दल चित्राव यांनी आनंद व्यक्त केला. ‘काळानुसार पुस्तकांची शैली बदलली आहे. एकविसावे शतक पर्यावरणविषयक समस्या आणि दृकश्राव्य माध्यमांचे असेल,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर लेखक विक्रमने आपले मनोगत व्यक्त केले. 

मनोगत व्यक्त करताना मंदार जोगळेकर.‘दर्या’चे ई-बुक साखरपा या कोकणातील छोट्याशा गावातील मुलींनी केल्याचे ‘बुकगंगा’चे मंदार जोगळेकर यांनी या वेळी सांगितले आणि ‘बुकगंगा’च्या उपक्रमांबद्दल सांगून, भूमिका मांडली. ‘दर्या’चे ऑडिओ बुकही करावे, अशी कल्पनाही त्यांनी सुचवली. ‘विक्रमच्या ‘दर्या’ या पुस्तकाच्या प्री-बुकिंगची सुविधा ‘बुकगंगा’च्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली होती. तिला भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच ‘दर्या’ची इंग्रजी आवृत्तीही त्याच वेळी प्रकाशित झाली आहे. मराठी पुस्तकाच्या बाबतीत हे दोन नवे पायंडे या पुस्तकाने सुरू केले आहेत,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. 

तरुणाईशी गप्पा
प्रकाशन कार्यक्रमानंतर ‘तरुणाईच्या दर्याशी गप्पा’ हा एक अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम झाला. त्या वेळी एमजे बंड्या यांनी ‘दर्या’च्या टीमशी खुसखुशीत शैलीत संवाद साधून त्यांना विविध विषयांवर बोलते केले. त्यातून ‘दर्या’च्या निर्मितीची कथा तर उलगडलीच; पण मराठी साहित्याबद्दलच्या काही मुद्द्यांवरही चर्चा झाली. या वेळी अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांनी ‘दर्या’च्या अनुक्रमे मराठी आणि इंग्रजी आवृत्तीतील एकेका प्रकरणाचे अभिवाचन केले. 

मनोगत व्यक्त करताना विक्रम पटवर्धन.‘पाच-सहा वर्षांपूर्वी कोकणात फिरत असताना या पुस्तकाची कल्पना सुचली. मी काही लेखक नव्हे; पण या कल्पनेबद्दल क्षितिजशी सहज बोललो, तेव्हा त्याला ती आवडली; पण त्याने अधिक काम करायला सांगितले. त्यानंतर, अडीच वर्षांपूर्वी मी ४५ पानी ड्राफ्ट तयार केला. ही एका कोळ्याच्या मुलाची आणि ‘दर्या’ नावाच्या बेटावर घडणारी कथा आहे. त्यात पाच मुख्य पात्रे आहेत. सुरुवातीला या नॉव्हेलचे नाव शांताराम असे ठरवले होते; पण नंतर कथेचा फोकस एका पात्रावरून बेटावर गेला. त्यामुळे ते नाव नॉव्हेलला दिले. टीनएजर्स आणि त्यावरील वयाचा ‘टार्गेट ऑडियन्स’ डोळ्यासमोर होता. त्यामुळे त्याची भाषा सोपी असावी आणि त्याला चित्रांची जोड असावी, असे डोक्यात होते. फेब्रुवारी २०१६मध्ये फेसबुकवर इलस्ट्रेटरसाठी रेकमंडेशन्स मागवली. त्यातून आमीरखान पठाणची ओळख झाली आणि पुढे त्यानेच ‘दर्या’साठी सुरेख चित्रे काढली. बेटाच्या चित्रासाठी १५ दिवस काम केले. मुख्य पात्राचे डोळे, कोळ्यांची घरे, होड्या, मासे किंवा अन्य बारीकसारीक घटकही कसे असावेत, यासाठी बरेच ‘ब्रेनस्टॉर्मिंग’ केले. कल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे फीलिंग खूप वेगळे आहे,’ अशा भावना विक्रमने व्यक्त केल्या.

‘१३० पानांच्या या पुस्तकात ५३ चॅप्टर आणि ६० चित्रे आहेत. याआधी अख्ख्या पुस्तकासाठी अशी चित्रे कधी काढली नव्हती. चित्रे चांगली येण्यासाठी आधी क्ले मॉडेल तयार केले. दशहिशा या पात्राच्या डोळ्यांत आवश्यक तशी ‘इंटेन्सिटी’ दिसण्यासाठी त्याची जवळपास १०० चित्रे काढली आणि अखेरीस सर्वांत पहिल्यांदा काढलेले ड्रॉइंगच आवडले,’ अशा आठवणी इलस्ट्रेटर आमीरखान पठाण याने सांगितल्या.

‘या नॉव्हेलच्या अनुवादाचे काम चॅलेजिंग होते आणि ते करताना मजा आली,’ असे अनुवादक समीर कुलकर्णी याने सांगितले. ‘आमचे हे मित्र काही तरी चांगले, क्रिएटिव्ह करत आहेत, तर त्यांना पाठिंबा देणे गरजेचे होते, म्हणून ‘दर्या’ची निर्मिती केली,’ असे गौरी भाडळे यांनी सांगितले.

‘लेखकाने प्रामाणिक असणे गरजेचे’
‘भावाने लिहिलेल्या कल्पनेबद्दल प्रतिक्रिया विचारली, तेव्हा तू प्रामाणिकपणे त्याला अधिक काम करायला सांगितलेस. त्या वेळी तुझ्यातील लेखक जागा झाला का,’ असा प्रश्न एमजे बंड्याने क्षितिजला विचारला. त्यावर तो म्हणाला, ‘त्याने लिहिलेले चांगले होते; पण त्यावर अधिक काम करणे आवश्यक होते. तू जे तुझे बेस्ट म्हणून लिहिले आहेस, ते अधिक चांगले होऊ शकते, हे सांगणे आवश्यक होते. लेखक म्हणून प्रामाणिक असणे गरजेचे असते. त्याची उगाचच स्तुती केली असती, तर तो हुरळून गेला असता किंवा ‘चांगले नाही आहे’ असे सांगितले असते, तर वाईट परिणाम झाला असता. योग्य वेळी योग्य ते प्रामाणिकपणे सांगणे गरजेचे असते.’ 
‘कल्पनेतून काय शक्यता निर्माण होत आहेत, त्यावर विचार व्हायला हवा. साहित्य असो किंवा सिनेमा, त्याच्या कल्पनेवर काम व्हायला पाहिजे. एखादी कल्पना शिजायला जेवढा वेळ दिला पाहिजे, तेवढा आपल्याकडे दिला जात नाही,’ असे निरीक्षणही क्षितिजने मांडले. ‘क्रिएटिव्ह माणूस कल्पनेशी रोमान्स करतो, तेव्हा फार सुंदर निर्मिती होते. विक्रम दोन-अडीच वर्षे त्याच्या कल्पनेसोबत होता, ही गोष्ट मला आवडली. आपल्या मातीतला नायक तयार होण्याची क्षमता यात आहे, हे मला जाणवले. सध्या, सिनेमे, नाटके देशी होऊ लागली आहेत. बाहुबली, सुलतान, फास्टर फेणे असे देशी नायक तयार होण्याच्या काळात देशी नायक असलेली, आपल्या मातीतली ‘दर्या’सारखी कादंबरी पुढे यायला पाहिजे, असे प्रकर्षाने वाटले. ते किती कष्टाचे काम आहे, याची जाणीव त्यांना होत राहावी, म्हणून मी त्यांना थोडी थंड प्रतिक्रिया देत राहिलो,’ असे क्षितिज म्हणाला. ‘यात मी विक्रमला फक्त विरामचिन्हे सुचवली आहेत. बाकी सगळी विक्रमचीच निर्मिती आहे. कारण ‘क्राफ्ट’पेक्षा ‘इंट्यूशन’ महत्त्वाचे असते,’ असेही क्षितिजने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

‘साहित्य संमेलने होतात. त्यात तरुणांचा सहभाग किती असतो, हा प्रश्न आहे. कुमार वयोगटासाठी काही कंटेंट तयार होत नाही. तो तयार होण्याची गरज आहे. दर वर्षी या वयोगटासाठी एक तरी चांगले पुस्तक यायला हवेच आणि त्याचे चांगल्या पद्धतीने अनावरण व्हायला हवे. ही पिढी काही तरी करून पाहत असेल, तर त्यांना तशी मुभा प्रत्येकाने द्यायला हवी. तोच एक धडपडण्याचा प्रयत्न म्हणजे ‘दर्या’ आहे. पुढे त्याला कसा प्रतिसाद मिळेल हे माहिती नाही; पण एखाद्याकडे कॉमिक बुकची छान संकल्पना असेल, तर आम्हाला निश्चितच त्याची निर्मिती करायला आवडेल. तरुण लेखकांसाठी जे काही करता येईल, ते करणार आहोत,’ अशी ग्वाही क्षितिजने दिली.

मराठी साहित्याच्या प्रसारासाठी विविध माध्यमांतून काम करण्याची इच्छा असल्याचे मिथिला आणि अमेय यांनी संवादादरम्यान सांगितले. जी. ए. कुलकर्णी यांचे लेखन आवडत असल्याचे अमेयने सांगितले. मराठी प्रेक्षक भारतातील प्रगल्भ प्रेक्षकांपैकी एक असल्याचेही त्याने सांगितले. कंझ्युमर म्हणून विविध प्रकारचा भडिमार होत असताना ‘दर्या’च्या ट्रेलरसारख्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर साहित्यासाठी केला पाहिजे, असेही अमेयने सुचविले. आपले वाचन कमी असल्याची कबुली देऊन मिथिलाने काही इंग्रजी साहित्य वाचल्याचे सांगितले.

ग्लॅमरस कार्यक्रम
एरव्हीच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांपेक्षा ‘दर्या’च्या प्रकाशनाचा कार्यक्रम वेगळा होता. पुस्तकाची निर्मिती करणारी सर्व तरुण टीम, प्रकाशन तरुणाईच्याच हस्ते, कार्यक्रमाच्या उपस्थितांमध्येही तरुणांची गर्दी आणि कार्यक्रमाची भाषाही आजच्या तरुणाईचीच, असे वेगळे चित्र या वेळी दिसले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुस्तकाचा चक्क ट्रेलरही दाखविण्यात आला. या ट्रेलरला अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी आवाज दिला असून, ट्रॉय आरिफ यांनी बॅकग्राउंड म्युझिक दिले आहे, तर सागर कदम यांनी त्याची अॅनिमेशन्स केली आहेत. मराठी पुस्तकाच्या ट्रेलरच्या या नावीन्यपूर्ण प्रकारामुळे उपस्थितांमध्ये पुस्तकाबद्दलची उत्सुकता वाढली. ‘मराठी पुस्तकांनाही ग्लॅमर पाहिजे. आपल्या कल्पनेत भव्यता असेल, तर मांडणीत लाजायचे कशाला,’ असा सवाल क्षितिज पटवर्धनने चर्चेतल्या एका प्रश्नावर बोलताना केला होता. त्याची ही भूमिका या कार्यक्रमाच्या ग्लॅमरस सादरीकरणातूनही दिसली.

तरुणाईशी अनौपचारिक गप्पा.

(‘बुकगंगा डॉट कॉम’वरून ‘दर्या’च्या ऑनलाइन खरेदीसाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link