Next
कर्णबधिरांची ‘वाचासिद्धीदात्री’
BOI
Thursday, September 28, 2017 | 04:00 PM
15 0 0
Share this article:

जयप्रदा आणि योगेशकुमार भांगे आपला मुलगा प्रसूनसह.

आपला मुलगा जन्मतःच कर्णबधिर असल्याचे आणि बोलू शकत नसल्याचे जयप्रदा आणि योगेशकुमार भांगे यांना दीड वर्षाने कळले; पण खचून न जाता त्यांनी स्पीच थेरपीचा वापर करून मुलाला बोलते केले. जयप्रदाताईंनी आपल्या अनुभवाचा उपयोग अशाच अन्य बालकांसाठी करायचे ठरवले आणि १३ वर्षांत ८५ कर्णबधिर मुले बोलू लागली. आज (२८ सप्टेंबर) जागतिक कर्णबधिर दिनाच्या औचित्याने सोलापुरातील शेटफळ येथे त्यांच्या ‘बोलवाडी’ या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. त्या निमित्ताने ‘तुजऐसी नाही’ या मालिकेत आज पाहू या कर्णबधिरांना ‘वाचासिद्धी’ देणाऱ्या या माऊलीची गोष्ट...
..........
वडिलांशी बोलताना प्रसूनमुक्या मुलांना बोलता येणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारणे कदाचित वेडेपणाचे ठरू शकेल; पण कर्णबधिरत्व असल्यामुळे जी मुले मुकी आहेत, त्यांना नक्कीच बोलता येणे शक्य आहे. शहरी भागांत राहणाऱ्यांसाठी कदाचित यात नावीन्य नसेल; पण कर्णबधिरत्व असल्यामुळे मुकेपण आलेल्या ८५ बालकांना सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील शेटफळ नावाच्या गावातील एका माऊलीने गेल्या १३ वर्षांत बोलते केले आहे. तिचे नाव आहे जयप्रदा योगेशकुमार भांगे. या महिलेची गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे.

सोलापूर-पुणे हायवेवर सोलापूरपासून साठ किलोमीटर अंतरावर शेटफळ नावाचे खेडेगाव आहे. जयप्रदा आणि त्यांचे पती योगेशकुमार भांगे या दाम्पत्याने काही वर्षांपूर्वी नव्या आयुष्याची सुरुवात केली. अनेक सुख स्वप्ने रंगवत असतानाच मुलगा झाल्याने त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. प्रसून असे त्याचे नाव ठेवण्यात आले. पहिले एक-दीड वर्ष चांगले गेल्यानंतर एकदा तपासणीला गेलेले असताना प्रसूनला अजिबातच ऐकायला येत नसल्याचे आणि तो जन्मतःच बहिरा असल्याचे त्यांना समजले. हे दाम्पत्य दवाखान्यातच रडू लागले. थोड्याच वेळापूर्वी एका गोंडस बाळाला घेऊन हसत-खेळत दवाखान्यात आलेल्या या जोडप्याला नेमके काय झाले, हे कोणालाही कळत नव्हते. अखेर त्यांनी स्वतःला सावरले आणि घरचा रस्ता धरला. साहजिकच त्यांना मुलाच्या भावी आयुष्याची काळजी वाटू लागली.

बोलवाडीआपल्याला समाज काय म्हणेल? तो शाळा शिकेल का, असे असंख्य प्रश्न त्यांना पडत होते. प्रसून आता आपल्याला कधीच आई म्हणून हाक मारणार नाही का, या प्रश्नाने मात्र त्या आईचे काळीज चिरून गेले. त्यामुळे जयप्रदाताई आतल्या आत झुरू लागल्या होत्या. त्यातही पदरी असे मूल आले म्हणून त्यांनाच दोषी धरून पतीला दुसऱ्या विवाहास  प्रवृत्त करणाऱ्या, तसेच अंधश्रद्धा आणि देवभोळेपणाच्या प्रतिकूल वातावरणातही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. अर्थात, पतीनेही कुठल्याच अंधश्रद्धा अथवा इतर बाबींचा विचार न करता त्यांना खंबीरपणे साथ दिली.

दरम्यान, पुण्याच्या अरुणा सांगेकर यांनी त्यांना आधार दिला आणि त्यांना पुण्यात प्रभात रोडच्या दहाव्या गल्लीत राहणाऱ्या अलका हुदलीकर यांचा पत्ता दिला. अलकाताईंनी जयप्रदाताईंना त्यांच्या पतीसोबत ‘स्पीच थेरपी’चे धडे दिले. शेटफळपासून पुणे २०० किलोमीटर अंतरावर. बसच्या प्रवासात प्रचंड त्रास व्हायचा. एकदा तर मुका प्रसून चुकून दुसऱ्या बसमध्ये चढला. संवाद साधणेही कठीण होते. त्यामुळे, ‘माझ्या अशा लेकराला भविष्यात किती संकटे येतील,’ या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर शहारे आले होते; पण ‘काहीही होवो, माझ्या प्रसूनला बोलायला शिकवणारच’ या जिद्दीने त्या पेटून उठल्या आणि त्यात यशस्वी झाल्या.

प्रसूनला ऐकू येण्यासाठी दोन्ही कानात मशीन बसविले गेले. त्यानंत  जयप्रदाताई त्याला बोलण्यास शिकवू लागल्या. सरावाने तो अडखळत अडखळत उच्चार करू लागला. एके दिवशी त्याने पहिला शब्द उच्चारला.... आणि तो शब्द होता ‘आई.’ तेव्हा जयप्रदाताईंना आकाश ठेंगणे झाले होते. प्रसून नंतर हळूहळू इतरही काही शब्द उच्चारू लागला. त्यानंतर तो चांगले बोलू लागला. मुकी बालकेही चांगली बोलू शकतील, असा विश्वास तेव्हा जयप्रदाताईंना आला.

‘ती’ मुलंही आता बोलू लागली आहेत.मुलाला बोलायला आल्यानंतरच्या आनंदात त्या हुरळून गेल्या नाहीत. जयप्रदाताईंना मिळालेल्या या यशामुळे शहरातील डॉक्टरांनी त्यांना ‘स्पीच थेरपिस्ट’ म्हणून काम करण्याची ऑफर दिली होती; पण ज्यांना शहराचा रस्ताच माहीत नाही असे मजुरी करणारे पालक, त्यांच्या मुक्या लेकरांच्या डोळ्यांत यांना स्वत:चा ‘प्रसून’ दिसला आणि त्यांचा समाजसेवेचा यज्ञ सुरू झाला! आपल्याला जो मार्ग दिसला, त्या मार्गावरून एकट्यानेच न चालता बाकीच्यांनाही ती वाट दाखवायचा निर्णय त्यांनी घेतला. गावाकडे साधने नाहीत. कुठली शाळा नाही की कोणती शासकीय योजना. अशा परिस्थितीत त्यांनी घरातल्याच १० बाय १०च्या एका खोलीत महाराष्ट्राला दिशा देणारे हे काम इतर कर्णबधिर मुक्या बालकांसाठी सुरू केले. खेड्यात सुरू झालेल्या त्यांच्या या कामातून गेल्या १३ वर्षांत ८५ मुक्या लेकरांना या माऊलीने बोलते केले आहे. आता तर उलटा प्रवास करून शहरातूनही अनेक बालके खेड्यातल्या त्यांच्या घराकडे येऊ लागली आहेत. त्यांचा प्रसूनही आता खेड्यातल्याच ‘नॉर्मल’ शाळेत बारावीत शिकतोय.
 
‘व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस’ अभियान
या सगळ्या प्रवासात भेटलेल्या सहकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जयप्रदा आणि योगेश भांगे या दोघांनी ‘व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस अभियान’ या सामाजिक संस्थेची अधिकृत नोंदणी केली. कर्णबधिर बालकांना बोलायला आलेच पाहिजे या उद्देशाने ही संस्था काम करते आहे. या संस्थेने मुंबईच्या ‘कोरो’ या सामाजिक संस्थेच्या मदतीने सोलापूर जिल्ह्यातील मुकेपणाच्या समस्येचा शोध घेण्यासाठी एक संशोधन केले. या संशोधनातून कर्णबधिर व्यक्तींच्या समस्येचे वास्तव पुढे आले. ते असे, की मूल जन्मानंतरच्या तीन वर्षांच्या आतच भाषा ऐकायला आणि बोलायला शिकत असते. त्या कालावधीत ज्यांना ऐकू येत नाही, ती मुकी बनतात. सर्वेक्षणात आढळले आहे, की तीन वर्षांच्या आत बाळाला ऐकू येते का याची  चाचणी करण्याचे आणि पालकांना बोलण्यासाठी उपाय (स्पीच थेरपी) सांगण्याचे  कोणतेही  शासकीय धोरण आपल्याकडे नाही. माहिती अधिकारातून समजले, की  या विषयावर जी काही धोरणे सरकारी आहेत, ती चार-पाच वर्षे वयाच्या पुढील बालकांसाठी आहेत. म्हणजे पैसा खर्च होतोय; पण  बोलण्याचे वय निघून गेल्यावर, अशी वस्तुस्थिती आहे.

सर्वेक्षणात हेही आढळले आहे, पालकांच्यात शिक्षणाचा व माहितीचा  अभाव आहे. बहुतेक पालकांना या विषयाची खरी  माहिती मिळते, ती  आपल्या बाळाचे बोलण्याचे वय निघून गेल्यावर. ‘व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस’ने केलेल्या प्रयोगात हे सिद्ध झाले आहे, की कमी वयात मुलांवर उपचार केले तर अशी बालके बोलू शकतात आणि शासनासोबत काम करून अशा बालकांना शोधणे सहज शक्य आहे.

ताटवाटी चाचणी
या संशोधनाला आणि कर्णबधिर बालकांना कमी वयातच शोधण्याच्या ‘ताटवाटी चाचणी’ या आगळ्या-वेगळ्या प्रयोगासाठी तत्कालीन  जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. जिल्हा प्रशासनासोबत संस्थेने सुमारे साडेचार हजार अंगणवाडी कार्यकर्त्यांना ‘ताटवाटी चाचणी’ प्रशिक्षण दिले. पुढे या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील तब्बल दोन लाख ८७ हजार बालकांची ‘ताटवाटी चाचणी’ घेतली. यातून ८९ कर्णबधिर बालकांचा शोध लागला. पालकांच्यात कमालीची जागृती झाली आणि हा उपक्रम जिल्हाभर यशस्वी झाला.

बोलवाडी प्रकल्पाचे २८ सप्टेंबर २०१७ रोजी लोकार्पण झाले.‘बोलवाडी’ प्रकल्प
स्वप्नांना अंत नसतो म्हणतात ना तसंच जयप्रदाताईंचेही आहे. या सगळ्या कामातून एक आदर्श मॉडेल उभे राहावे यासाठी शेटफळ येथेच त्यांनी ‘बोलवाडी’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील कर्णबधिर बालकांच्या पालकांना एकत्र करणे आणि त्यांच्या मुलांसोबतच राज्यभरातील कर्णबधिर बालकांना बोलते करण्यासाठी योजना आखणे हा या प्रकल्पाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वास्तूच्या बांधकामासाठी सोलापूरच्या प्रिसिजन ग्रुपचे यतीन शहा यांनी मदत केली. प्रकल्पासाठी जागा भांगे कुटुंबीयांनीच दान दिली. आज (२८ सप्टेंबर २०१७) जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने ‘बोलवाडी’चे लोकार्पण झाले. 

वाचासिद्धी म्हणजे जे बोलू ते खरे करण्याची सिद्धी. जे मुके आहेत त्यांच्यासाठी मात्र बोलता येणे हीच मोठी सिद्धी आहे. त्या अर्थाने जयप्रदाताई या मुलांसाठी ‘वाचासिद्धीदात्री’च ठरल्या आहेत. त्यांच्या उपक्रमाला अनेक शुभेच्छा.

संपर्क : जयप्रदा भांगे - ९९२२० ६०५९९
ई-मेल : yogeshkumar.bhange25@gmail.com

- मोहन काळे

(‘तुजऐसी नाही’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/idhJdV या लिंकवर उपलब्ध असतील.)

(जयप्रदा, योगेशकुमार आणि त्यांचा मुलगा प्रसून याचे मनोगत सोबतच्या व्हिडिओत आहे. तसेच ‘बोलवाडी’ प्रकल्पाच्या लोकार्पणावेळी कर्णबधिर मुलांनी त्यांना शिकवलेल्या कविता, गोष्टी सादर केल्या. तेही आपल्याला त्या व्हिडिओत पाहता येईल. जयप्रदाताईंच्या कार्याची झलक दाखवणारा दुसरा व्हिडिओही सोबत दिला आहे.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr. Mahavir R. Shah About
खुपच अभिनंदनीय व प्रशंसनीय कार्य व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा
1
0

Select Language
Share Link
 
Search