Next
नॉटिंग हिल
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Tuesday, November 07 | 02:42 PM
15 0 0
Share this story

आपल्याकडच्या नेहमीच्या लव्ह स्टोरीजमध्ये एक गोष्ट असावी लागते ती म्हणजे प्रेमीयुगलामधल्या दोघांची वेगळी पार्श्वभूमी! म्हणजे कधी त्यांचा धर्म वेगळा असतो, तर कधी जात. कधी भाषा वेगळी असते, तर कधी शिक्षणाचा दर्जा. कधी एक जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा, तर दुसरा हटकून सज्जन किंवा थेट पोलिसच! हॉलिवूडमध्ये मात्र जात आणि धर्माच्या भेदापेक्षा ‘स्टेटस’भोवती आणि योगायोगाच्या भेटींमधून अनेक प्रेमकथा जन्म घेतात. ‘नॉटिंग हिल’ या अशाच एका वेगळ्या प्रेमकथेविषयी पाहू या आजच्या ‘सिनेसफर’मध्ये...
.............
रिचर्ड कर्टिस हा ब्रिटिश कथाकार म्हणजे ज्याला ‘रॉमकॉम’ (रोमॅन्टिक कॉमेडी) म्हणतात अशा नर्मविनोदी अंगाने जाणाऱ्या रोमँटिक कथा मांडणारा गेल्या दोन दशकांतला यशस्वी लेखक-दिग्दर्शक. १९९९ साली पडद्यावर आलेला त्याचा ‘नॉटिंग हिल’ हा असाच एक हिट रोमँटिक सिनेमा! लंडनच्या उपनगरात पर्यटनविषयक पुस्तकांचं एक दुकान चालवणारा विल्यम ‘विल’ थॅकर (ह्यू ग्रँट) हा एक सीधासाधा ब्रिटिश तरुण आणि अॅना स्कॉट (ज्युलिया रॉबर्टस्) ही एक गोड अमेरिकन सेलेब्रिटी-फिल्मस्टार यांची ही प्रेमकथा. 

नॉटिंग हिल हा लंडनच्या केन्सिंग्टनच्या उत्तर भागातला एक कॉस्मोपॉलिटन मेल्टिंग पॉट! व्हिक्टोरियन शैलीची घरं असणारा आणि माणसांची वाढती वर्दळ असलेला. तिथेच विल थॅकर राहतो आणि घराच्या जवळच त्याचं पुस्तकांचं दुकान आहे. विलचा घटस्फोट झालाय आणि सध्या त्याच्याबरोबर घरात त्याचा स्पाइक (रीस इव्हान्स) हा एक महाविक्षिप्त वेल्श मित्र राहतोय. हा स्पाइक म्हणजे एक भन्नाट नमुनाच आहे. विल हा टोकाचा सज्जन असल्यामुळेच स्पाइक या अफलातून वल्लीला सहन करू शकतोय. 

सिनेमाची टायटल्स येतात ती अमेरिकेतल्या अॅना स्कॉट या हिरॉइनची लोकप्रियता आणि वलय दाखवत आणि पुढे सरकत कॅमेरा आपल्याला नेतो नॉटिंग हिलमधल्या पोर्टोबेलो रोडवरून, लोकांच्या दैनंदिन आयुष्याची झलक दाखवत. लोकांचे एकेक नमुने. (उदाहरणार्थ, एका टॅटू पार्लरमधून आपल्या बलदंड दंडावर टॅटू गोंदून माणूस बाहेर पडलाय आणि त्याला दारू उतरल्यावर प्रश्न पडलाय की आपण दंडावर ‘आय लव्ह केन’ का बरं गोंदवून घेतलं?)... 

विलच्या निवेदनातून आपल्याला कळतंय, की आज वीकेंड आहे आणि त्यामुळे वेगवेगळे स्टॉल्स मांडून रस्ते गजबजून जातायत, पार नॉटिंग हिल गेटपर्यंत.... विल गर्दीतून वाट काढत निळं दार असलेल्या त्याच्या घरात शिरतो. स्पाइक डेटवर निघालाय जेनीनबरोबर आणि त्याच्या भयंकर विक्षिप्तपणाची पहिलीच झलक आपल्याला मिळते ती त्याचे टी-शर्टचे चॉइस बघून! त्या टी-शर्टवरच्या ग्राफिटीज वाचूनच आपली हसायला सुरुवात. इथे रिचर्ड कर्टिसच्या लेखणीने आपल्याला हळूच खिशात टाकायला सुरुवात केलेली असते. विल तयार होऊन जवळच असलेल्या त्याच्या पुस्तकाच्या दुकानात येतो. त्याला काय माहीत, आजचा दिवस त्याच्या जीवनात काय उलथापालथ घडवून आणणार आहे ते?!

आपल्या असिस्टंटला कापुचिनो आणायला पिटाळून विल उभा असतानाच त्याच्या दुकानात अॅना स्कॉटचं आगमन होतं. विल एक क्षण गोठलेला. साक्षात अॅना स्कॉट आपल्या दुकानात? तिच्याशी बोलत असतानाच विलचं लक्ष सीसीटीव्ही मॉनिटरवर जातं आणि तो पुस्तक चोरून लपवणाऱ्या चोराला हटकतो आणि अत्यंत मृदू भाषेत ते पुस्तक पुन्हा जागेवर ठेवायला सांगतो... आणि न ऐकल्यास पोलिसांना बोलवण्याची वेळ येईल असंही अत्यंत मृदू भाषेत सांगतो. त्याचं हे सगळं वर्तन अॅना पाहत असते. तेवढ्यात तो चोर विलच्या डेस्कजवळ येतो. अॅनाला पाहून आपलं नाव सांगून तिची स्वाक्षरी मागतो. अॅना काही तरी खरडून देते. त्यावर लिहिलेलं असतं ‘रुफस, यू बिलोंग इन जेल’... इथे अॅनाच्या स्वभावाचा पहिला पैलू दिसतो. पुस्तक विकत घेऊन पैसे देताना विलची टकळी सुरूच असते; पण ते तिला मजेशीर वाटतं. पैसे देऊन ती निघते आणि त्याचा असिस्टंट कॉफी घेऊन येतो. गप्पा मारताना दोघांचं कॉफीपाठोपाठ ऑरेंज ज्यूस प्यायचं ठरतं आणि या वेळी विल ज्यूस आणायला जातो. 

ज्यूस घेऊन येताना एका वळणावर त्याची अॅनाशी टक्कर होते आणि सगळा ज्यूस तिच्या अंगावर सांडतो. विल ओशाळा होऊन पुन्हापुन्हा सॉरी म्हणत तिला फ्रेश होण्यसाठी आपलं जवळच १८ यार्डांवर असलेलं घर दाखवतो. ती त्याच्या घरी जाते. वरच्या बाथरूममध्ये ड्रेस चेंज करते आणि ती उतरताना तिच्याकडे बघणारा विल वेडा होतो. इतकी सुंदर जगद्विख्यात हॉलिवूड स्टार आपल्या घरात?... सगळं स्वप्नवतच जणू!... ती त्याचे आभार मानून निघते.
‘I better be going. Thanks for your help’.
‘You’re welcome and may I also say...heavenly!’ त्याच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर येतात.
Thank you.’
तिला दरवाजापर्यंत सोडताना त्यच्या तोंडून आणखी एक वाक्य येतं –‘Nice to meet you. Surreal but nice.’ 
ती जाते. तो आत जायला निघतो; पण परत बेल वाजते. ती दारात उभी, ‘माझी दुसरी बॅग?..’ 
अं....हो देतो’ म्हणून तो आतून बॅग आणून देतो. पुन्हा ती ‘थँक्स’ म्हणते. दोघं समोरासमोर उभे. नजरा एकमेकात अडकलेल्या. काही सेकंद तसेच जातात आणि अचानक पुढे होऊन ती त्याचं चुंबन घेते. तो ठार वेडा. हे काय?...एक जगप्रसिद्ध सुंदर हिरॉइन आपल्या घरात येते काय आणि तिने चक्क आपलं चुंबन घेतलं?....तो स्तब्ध. तेवढ्यात लॅच उघडून स्पाइक आत येतो. तो स्वतःच्याच तंद्रीत. त्यांना बघून काहीही आश्चर्य व्यक्त न करत एक भयंकर काहीच्या काही वाक्य म्हणत आत जातो. अॅना स्वतःला सावरत विलला विनंती करते, की दोघांच्यात आज जे काही घडलंय ते त्यानं कुणाला सांगू नये म्हणून.... विल उत्तरतो, ‘हो..हो..काळजीच नको.. कुणाला नाही सांगणार... हां मलाच सांगेन कधीमधी; पण माझाच विश्वास बसणार नाही ह्यावर.....’ ती जाते. 

विलला पुढे टीव्हीवरच्या मूव्हीतून, तर कधी बसवरच्या सिनेमांच्या जाहिरातीतून अॅना दिसत राहते... त्याच्या मनात ती अजून रेंगाळतेच आहे. आणि साहजिकच आहे की ते!

नंतरच्या दृश्यात टेरेसवर बसून गप्पा मारताना स्पाइक त्याला अगदी कॅज्युअली बोलताना ‘तीन दिवसांपूर्वी एका अमेरिकन मुलीचा फोन येऊन गेला. तिने ‘हाय, मी अॅना बोलतेय’ अशी सुरुवात करून ‘मला रिट्झला भेट’ असं सांगून ‘तिथे मी वेगळ्या नावाने उतरले आहे’ असं सांगून फोन ठेवला’ असं सांगतो. विल त्याला खोदून खोदून तिनं काय नाव सांगितलं ते विचारतो; पण त्या खुळ्याला ते कुठचं आठवायला? विल बिचारा उत्साहाने रिट्झ हॉटेलला फोन लावतो; पण अॅना नावाचं तिथे कुणीच नसतं. नंतरच्या दृश्यात दोघे घरात असताना गंभीरपणे पेपर वाचणारा स्पाइक अचानक ‘फ्लिंटस्टोन’ असं नाव घेतो. आणि विलला कळतं, की अॅना त्या नावानं हॉटेलवर उतरलीय, म्हणून. तो लगेच फोन लावतो आणि घडलेला प्रकार सांगतो. ती त्याला तिथे भेटायला बोलावते; पण जास्त वेळ देता येणार नाही असं सांगते. विल तयार होऊन तिथे जातो. आणि तिथे आलेल्या पत्रकारांना पाहून आपणही पत्रकार असल्याची बतावणी करतो. हा सीन खूपच धमाल. तिची सेक्रेटरी प्रत्येकाला कोणत्या मासिकाचे प्रतिनिधी विचारात असताना विलची नजर टेबलवर पडलेल्या ‘हॉर्स अँड हाउंड’ मासिकावर जाते आणि तो बिनधास्त त्याच मासिकाचे प्रतिनिधी असल्याचं ठोकून देतो. पुढे त्यांची भेट. जेमतेम दोन-तीन वाक्यं बोलेपर्यंत प्रॉडक्शन कंपनीचा माणूस तिथे हजर होतो आणि मग त्यांना भलतंच काही बोलावं लागतं. धमाल संभाषण; पण त्यांना अगदी काही सेकंद एकांत मिळतो. पहिल्या भेटीत तिने घेतलेल्या चुंबनाबद्दल ती माफी मागते. ‘काय झालं आणि का आणि कसं घडलं ते सांगताच येत नाही’ वगैरे वगैरे बोलते... तेवढ्यात विल तिला विचारतो, ती रात्री भेटू शकेल का आणि ती नाही म्हणते. भेट संपल्याचं सांगत तो प्रॉडक्शनचा माणूस आत येतो. भेट संपते. आणखी काही अॅक्टर्सचे जबरदस्तीने घ्यावे लागलेले इंटरव्ह्यू संपवून तो हताश होऊन निघणार तेवढ्यात अॅनाची सेक्रेटरी त्याला बोलावते. तो जातो. अॅना तिच्या स्विटमध्ये एकटीच. ती संध्याकाळच्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून त्याच्याबरोबर यायला तयार असल्याचं सांगते. नेमकं त्याला संध्याकाळी बहिणीच्या बर्थडे पार्टीला जायची आठवण होते; पण अॅना त्याची ‘डेट’ म्हणून त्याच्याबरोबर जायला तयार होते. 

विलच्या बहिणीच्या घरची पार्टी आणि अॅनाला तिथे बघून सगळ्यांना वाटलेला विलचा हेवा. अॅना अगदी सहज त्या पार्टीत वावरते. रात्र झाली आहे. विल अॅनाला घेऊन निघतो. दोघं निर्मनुष्य रोडवरून चालत निघाले आहेत. अचानक एक गार्डन दिसतं. उंच कुंपण असलेलं. तिनं आव्हान दिल्यावर तो कुंपणावरून पलीकडे जायला तयार होतो. चढू पाहताना दोनदा पडतो. त्याच्या तोंडून अगदी लहान मुलं अशा वेळी काढतात तसे उद्गार येतात. तिला त्याच्यामधल्या त्या निरागस लहान मुलाचं कौतुक आणि आश्चर्य वाटतं... त्याच्या आधी ती सहजच कुंपणावरून चढून पलीकडे उडी मारते. मग तोही मोठ्या प्रयत्नानं कसाबसा पलीकडे उतरतो....
सुंदर गार्डन. रात्रीची नीरव शांतता. एखाद्या चुकार पक्ष्याचा किलकिलाट. फक्त ती दोघंच त्या रात्री तिथे. तो विचारतो, ‘Now seriously -- what in the world in this garden could make that ordeal worthwhile?’... अॅना काहीच बोलत नाही. वळते आणि त्याला मिठीत घेऊन झक्कपैकी एक गोड किस घेते. मोहरलेला विल त्यावर ‘नाइस गार्डन’ एवढंच म्हणू शकतो. 

ती प्रचंड खूश आहे त्याच्या सहवासात त्या रात्री. ते फिरत फिरत एका बेंचजवळ येतात. त्यावर कुण्या ‘जून’साठी ‘जोसेफ’नं कोरलेलं असतं, ‘माझ्या जूनसाठी जिला हे गार्डन फारच प्रिय होतं. जोसेफकडून जो नेहमी तिच्या बाजूला बसून असे.’ आणि बाजूला तिच्या मरणाचीही तारीख असते. अॅना भावूक झाली आहे, ‘काही माणसं कसं आपलं आयुष्य आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर घालवतात नाही?’ तो न बोलता मान हलवतो..... कॅमेरा दोघांपासून दूर... ती दोघंच तिथे...

दुसऱ्या दिवशी अॅना आणि विल एका थेटरात सिनेमा एंजॉय करतात. रात्री जेवणासाठी हॉटेलात. विल तिला आपली लाइफस्टोरी सांगत असताना मागच्या टेबलवरून अॅना तिथे आहे हे माहीत नसणारे काही जण तिच्याबद्दल असभ्य बोलतात. न राहवून विल त्यांना चार शब्द सुनवायला जातो; पण अॅना दुरूनच त्याला जवळ बोलावते आणि नंतर स्वतः जाऊन त्या लोकांची बोलती बंद करते.... तिला हॉटेलपर्यंत सोडायला गेलेल्या आणि मग तिच्या रूमवर गेलेल्या विलला जबरदस्त धक्का बसतो, जेव्हा अॅनाचा बॉयफ्रेंड तिथे अचानक येतो. हादरलेला विल तिथून निराश होऊन निघतो. स्वप्नवत वाटणारा तिचा सहवास किती क्षणभंगुर होता हे त्याला कळून चुकतं...

त्याचे पुढचे काही दिवस भयंकर जातात. तो उद्ध्वस्त झालाय. आपण तिच्यात शक्य नसूनही का अडकत गेलो हे त्याला कळत नाहीये. ती अशी का वागली हेही कळत नाही; पण त्याच्या  मित्रांना मात्र तिला बॉयफ्रेंड असल्याचं पेपर्समध्ये वाचून माहीत असल्याने उलट विलचंच आश्चर्य वाटतं. 

काही काळ उलटतो. दरम्यान अॅनाच्या काही जुन्या भडक फोटोंवरून वादंग होतो. लंडनमध्ये पुन्हा आलेल्या अॅनाला ते सहन करणं कठीण जाऊन ती विलच्या घरी येते. दोघांमध्ये पुन्हा जवळीक; पण अॅनाच्या मागे लागलेले पापाराझ्झी विलच्या घराबाहेर येऊन तमाशा करतात. अॅना भयंकर संतापून आपल्या युनिटच्या लोकांना फोन करून तिथून सुरक्षित बाहेर काढून न्यायला सांगते. पुन्हा एकदा विल आणि अॅनाची ताटातूट. 

...पण पुन्हा तिचं फिरून लंडनला शूटसाठी येणं आणि त्यांचं तिला भेटण्यासाठी जाणं; पण फिल्म सेटवरची ती भेटही त्याला विलक्षण दर्द देणारी ठरते.... तिनं एकाशी बोलताना त्याचा विचित्र केलेला उल्लेख त्याला खटकतो... विलला कळत नाही हे काय झालंय... असं का होतंय?... पण पुन्हा अॅना त्याच्याकडे येते. त्याच्या दुकानात. तो हैराण. तिनं काही प्रेझेंट आणलंय त्याला. गेल्या दोन्ही वेळचं तिचं तुटक वागणं आणि दु:खी अनुभव लक्षात घेऊन विल तिच्याशी अंतर राखून बोलतोय; पण या वेळी अॅनाच त्याच्याकडे  झालं गेलं विसरून तिचं प्रेम स्वीकारण्याची मागणी करते. विल बिचारा आधीच्या धक्क्यांमधून सावरला नसल्याने तो अत्यंत नम्रपणे तिला आपली व्यथा सांगतो, ‘.......can I just say ‘no’ to your kind request and leave it at that?....with you, I’m in real danger. It took like a perfect situation, apart from that foul temper of yours - but my relatively inexperienced heart would, I fear, not recover if I was once again . cast aside, which I would absolutely expect to be...’ म्हणत तिला नकार देतो..... त्यावर अत्यंत घायाळ झालेली अॅना त्याला साश्रूनयनांनी विनवते, ‘The fame thing isn’t really real, you know.  Don’t forget - I’m also just a girl. Standing in front of a boy. Asking him to love her..’ ती निघून जाते...

दुसऱ्या दिवशी ही सारी हकीकत आपल्या साऱ्या दोस्तांना सांगून अॅनाला नकार देण्याच्या आपल्या निर्णयावर तो त्यांचं मत विचारत असताना... बोलता बोलता त्याला आपली चूक कळून येते... तिनं पाणावलेल्या डोळ्यांनी म्हटलेलं ते शेवटचं वाक्य ‘मी पण एक मुलगीच आहे रे. एका मुलासमोर उभं राहून त्यानं आपल्यावर प्रेम करावं अशी याचना करणारी...’  हे वाक्य आठवून तो अस्वस्थ होतो... आणि लंडनमधली शेवटची प्रेस कॉन्फरन्स संपवून ती कायमची पुन्हा अमेरिकेला परत जाण्यासाठी काहीच मिनिटं राहिली आहेत हे जाणवून धावत सुटतो... त्याचे मित्र त्याला साथ द्यायला त्याच्या बरोबर... सर्वांची एकच तारांबळ... रस्त्यावर गाड्यांची गर्दी... तिची प्रेस कॉन्फरन्स संपत आली आहे.. विल कसाबसा तिथे पोहोचतो आणि शेवटचा तो खऱ्या अर्थानं उत्कंठावर्धक सीन.....

ती पत्रकार परिषदेत.. आणि पत्रकारांच्या घोळक्यात घुसून मागच्या रांगेत तो जेमतेम उभा राहत असताना एका पत्रकारानं तिला ‘लंडनमधल्या एका इंग्लिश युवका’च्या आणि तिच्या संबंधाबद्दल तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिनं ‘He was just a friend - I think we’re still friends’ असं  दिल्याचं तो ऐकतो. त्यानं हात वर केल्यावर तिच्या सेक्रेटरीनं त्याला शेवटचा एकच प्रश्न विचारायची दिलेली परवानगी.... आणि त्याचा तिला प्रश्न –
Yes -- Miss Scott -- are there any circumstances in which you two might be more than just friends?’
‘I hoped there might be -- but no, I’m assured there aren’t.’
‘And what would you say... I just wondered whether if it turned out that this... person... realized he’d been a daft prick and got down on his knees and begged you to reconsider, whether you would...reconsider?’...
या वेळी एक प्रचंड मोठा पॉझ... शांतता... आणि तिचं उत्तर --
Yes, I’m pretty sure I would’
That’s very good news. The readers of ‘Horse and Hound’ will be absolutely delighted’ ... तो आनंदलाय. 
आणि ती एका पत्रकारानं आधी विचारलेला प्रश्न त्या पत्रकाराला पुन्हा विचारायला लावते. तो विचारतो- ‘Yes -- Anna -- how long are you intending to stay here in Briton?’
विल आणि त्याच्या मित्रांच्या चेहऱ्यांवर एक अपेक्षित उत्कंठा..आणि तिचं उत्तर- ‘Indefinitely!’.....

विल आणि मित्रांच्या डोळ्यांत आनंदाश्रू... एकमेकांना मिठ्या....

...आणि आपण प्रेक्षकसुद्धा तो आनंदी शेवट बघत डोळ्यांच्या कडांना जमलेले चुकार अश्रू पुसायला रुमाल डोळ्यांकडे नेतो......

ह्यू ग्रँट आणि ज्युलिया रॉबर्टस् यांनी अभिनय केलेली ही हलकीफुलकी गोड प्रेमकहाणी. नक्की बघा. आवडेल. 

(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेसफर’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/YbA9uN या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun Gadgil About
Excellent story telling skills. Loved the lovers
0
0

Select Language
Share Link