Next
‘नवागतांना ‘पुलं’नी नेहमीच मदतीचा हात दिला’
‘पुलोत्सवा’तील ‘परफॉर्मर पुलं’ या परिसंवादात सहभागी मान्यवरांच्या भावना
प्रेस रिलीज
Saturday, November 24, 2018 | 10:49 AM
15 0 0
Share this article:

पुलोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या ‘परफॉर्मर पुलं’ या विषयावरील परिसंवादात सहभागी झालेले (डावीकडून) रामदास फुटाणे, फैय्याज, सुधीर गाडगीळ, दिलीप प्रभावळकर आणि डॉ. मोहन आगाशे.

पुणे : ‘आपल्यातील कलागुण रसिकांसमोर सादर करून त्यांना त्याचा आनंद घेऊ द्यावा, अशी ‘पुलं’ची धारणा होती. विविध क्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या ‘पुलं’नी परफॉर्मर म्हणूनही आपली कामगिरी उत्तमपणे बजावली. कला क्षेत्रातील नवागतांना नेहमीच मदतीचा हात दिला,’ अशी भावना साहित्य, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.

पु. ल. परिवार व आशय सांस्कृतिकच्या वतीने आणि स्क्वेअर वनच्या सहयोगाने सुरू असलेल्या ‘पुलोत्सवा’त ‘परफॉर्मर पुलं’ या विषयावरील परिसंवाद झाला. यात डॉ. मोहन आगाशे, रामदास फुटाणे, फैय्याज आणि दिलीप प्रभावळकर सहभागी झाले होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. परिसंवादापूर्वी बालगंधर्व कलादालनात दाखविण्यात आलेला मोहन वाघ निर्मित ‘कवितांजली’ या लघुपटाचा रसिकांनी आस्वाद घेतला.

या वेळी बोलताना डॉ. आगाशे म्हणाले, ‘मला ‘पुलं’चा सहवास ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाच्या निमित्ताने लाभला. जर्मन नाटकाला मराठी साज चढवून अतिशय उत्तमपणे ‘पुलं’नी ते मराठीत आणले. त्यावेळी त्या नाटकाच्या स्वामित्व हक्कांवरून निर्माण झालेल्या अडचणी ‘पुलं’नी मोठ्या जिद्दीने सोडवल्या. त्यानंतर आम्ही या नाटकाचे जवळपास दीडशे प्रयोग केले. एखाद्या कलाकृतीमुळे खरा कलावंत कसा झपाटून जातो, याचा प्रत्यय ‘पुलं’च्या सहवासात आम्हाला येत असे.’

फुटाणे म्हणाले, ‘साहित्यिक असूनही समाजाविषयीचे आपले उत्तरदायित्व ‘पुलं’नी कायम जपले. आणीबाणीविरोधात जाहीर भूमिका घेऊन त्यांनी आपले मत ठामपणे मांडले. साहित्यिक आणि कलाकारांनी समाजातील समकालीन विषयांविषयी आग्रही भूमिका घेण्याचे संस्कार ‘पुलं’नी आमच्यावर केले. त्याकाळात ‘पुलं’ना राजकारणातल्या देखील अनेक संधी चालून आल्या, पण त्यांनी त्याला नकारच दिला. ‘आहे मनोहर तरी’ हे पुस्तक वाचल्यानंतर मी दुखावलो गेलो आणि त्या पुस्तकाविषयी माझे काही आक्षेप होते. मॉरिशसमध्ये एका कार्यक्रमात मी एका वात्रटिकेच्या माध्यमातून माझ्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी सुनीताबाईंचे बंधू ठाकूर यांनी त्यांच्याकडे असलेल्या कॅमेऱ्यात माझी ही वात्रटिका रेकॉर्ड केली होती. त्यावेळी मात्र मी खूप घाबरलो. ही वात्रटिका त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, अशी माझी इच्छा होती; पण त्यानंतरही खूप मोठ्या मनाने या दोघांनी मला आपलेच मानले. मनात कोणतेही किल्मिष न ठेवता हे दोघे निस्सिमपणे आपले काम करतात आणि मोठ्या मनाने लहानांना माफ करतात, याचा प्रत्यय मला आला.’

फैय्याज म्हणाल्या, ‘वटवट सावित्रीच्या प्रयोगांच्या निमित्ताने झालेल्या संवादांच्या अनेक आठवणी आज पुन्हा जागृत झाल्या आहेत. नाटकाच्या वेळा, योग्य कपडे, भरपूर प्रॅक्टिस अशा अनेक गोष्टींच्याबाबतीत ‘पुलं’ आणि सुनीताबाई दोघेही खूप शिस्तीचे होते. नाटकाचे कितीही प्रयोग झाले असले, तरी काही कालावधीनंतर होणाऱ्या प्रयोगाच्या आधीही प्रॅक्टीस झाली पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. एकदा खुद्द अमिताभ आणि जया बच्चन एका नाटकाच्या प्रयोगाला येणार होते. त्यावेळीही पार्कींगच्या पुरेशा सोयीअभावी त्यांनी लांब गाडी आणू नये, वेळेच्या आधी येऊन स्थानापन्न व्हावे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या आणि त्यांनीही सुनीताबाईंच्या या सुचनांचे पालन केले होते. तुम्ही कलेशी प्रामाणिक असणे म्हणजे काय, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ‘पुलं’ आणि सुनीताबाई होते. दिग्गज अधिकाऱ्यांच्या घरी होणाऱ्या खासगी मैफलींना ते आम्हाला आवर्जून घेऊन जायचे. तानपुऱ्यावर साथसंगत करायला सांगायचे. आपल्यापेक्षा लहान असलेल्या, नवख्या कलाकारांचे बोट धरून त्यांना योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम या दोघांनी केले. अशाच एका मैफलीच्या निमित्ताने वसंतराव, ‘पुलं’ आणि बेगम अख्तर यांच्यातील एक बिंदू होण्याचे भाग्य मला मिळाले.

या वेळी प्रभावळकर यांनी ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील काही उतारे वाचून दाखविले आणि ‘पुलं’विषयीच्या विविध आठवणींना उजाळा दिला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search