Next
पाच हजार विद्यार्थ्यांनी दिला वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त घोषवाक्य व चित्रकला स्पर्धा
प्रशांत सिनकर
Thursday, February 14, 2019 | 11:31 AM
15 0 0
Share this story



ठाणे : अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत हा संदेश घेऊन जनजागृती करण्यासाठी पाच हजार शालेय विद्यार्थ्यांनी घोषवाक्य (स्लोगन) व चित्रकला स्पर्धेतून संदेश देण्याचा प्रयत्न केला. ठाणे वाहतूक पोलीस, रेमंड लिमिटेड आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन (डब्ल्यूआयएए) यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे येथील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या वेळी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ‘रेमंड’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया, ‘डब्ल्यूआयएए’चे कार्यकारी संचालक नितीन डोसा आदी उपस्थित होते. दर वर्षी महाराष्ट्रात वाहनांची संख्या वाढत असून, रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, तसेच रस्ते वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती व्हावी या हेतूने ठाण्यातील सिंघानिया हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि स्लोगन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत विविध चित्र रेखाटली, तसेच घोषवाक्य तयार केली.



या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करून त्यांना जनजागृती करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. सिंघानिया यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पारितोषिके वाटप करण्यात आली.



या वेळी बोलताना फणसळकर यांनी या विद्यार्थ्यांची प्रशंसा करावी तितकी कमीच असल्याचे सांगून हे विद्यार्थी उद्याचे भविष्य असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत ‘रेमंड’ने या उपक्रमाचे कौतुक केले. सिंघानिया यांनी लहानपणापासून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देणे गरजेचे आहे जेणेकरून हे विद्यार्थी पुढे याबाबत जागृत राहतील, असे सांगितले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link