Next
सन्मान स्वरनिष्ठेचा!
BOI
Monday, January 29 | 07:25 AM
15 0 0
Share this storyसंगीतज्ञानी इळैयाराजा यांना यंदाचा पद्मविभूषण सन्मान मिळणार असल्याचे जाहीर झाले आहे. गेली चार दशके तमिळ संगीत आणि इळैयाराजा हे एक घट्ट समीकरण बनले आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम्, कन्नड आणि हिंदी अशा विविध भाषांमधून ८००पेक्षा जास्त चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. त्यांच्याबद्दलचा हा विशेष लेख...
..........
संगीतज्ञानी इळैयाराजा यांना यंदाचा पद्मविभूषण सन्मान मिळणार हे ऐकल्यानंतर सर्व रसिकांच्या मनाच्या तारा झंकारल्या असतील. गिटारची तार छेडताच जसे आव्हानात्मक झंकार उमटतात आणि माणूस आपसूकच गाऊ लागतो, तसे या बातमीमुळे झाले. दोनच दिवसांपूर्वी देशात वसंत पंचमी साजरी झाली. देवी सरस्वतीची आराधना करण्याचा हा दिवस; मात्र आपल्या साधकाला मिळालेला हा सन्मान ऐकून खुद्द शारदाही हरखली असेल. इळैय म्हणजे तरुण; मात्र इळैयाराजा यांच्या नावात जेवढे तारुण्य आहे, त्याच्या कैकपटीने अधिक तारुण्य त्यांच्या संगीतात आहे. एक धीरगंभीर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम्, कन्नड आणि हिंदी अशा विविध भाषांमधून ८००पेक्षा जास्त चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. ‘हॅलो जयहिंद’ हा मराठी सिनेमाही त्यांच्या संगीताने नटला होता.

आज चार दशके झाली, तमिळ संगीत (केवळ चित्रपटांचेच नाही, तर भक्ती आणि लोकगीतेही) आणि इळैयाराजा हे एक घट्ट समीकरण बनले आहे.म्हणूनच ‘केंद्र शासनाने माझा गौरव केलेला नाही, तर तमिळनाडूचा, तमिळ जनतेचा गौरव केल्याचे मी मानतो,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आदरार्ह असलेले व्यक्तिमत्त्व म्हणूनच सर्व थरांतून त्यांचा निर्देश केला जातो. म्हणूनच होतकरू राजकारणी नट रजनीकांत व कमल हासन आणि विद्यमान राजकारणी मु. क. स्टॅलिन, विजयकांत यांनीही त्यांचे अभिनंदन केले. विद्वान सर्वत्र पूज्यते या न्यायाने सर्व वादांच्या पलीकडे आणि विशिष्ट उंचीवरचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आदर मिळविला आहे.

या पुरस्काराची माहिती त्यांना कशी मिळाली, हे त्यांनीच तमिळ माध्यमांना सांगितले आहे. ते त्यांच्याच शब्दांत - ‘केंद्रीय माहिती व दळणवळण खात्याच्या कार्यालयातून पद्म पुरस्कारासाठी संमती घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. मी संमती देतानाच त्याच्या समारंभातही सहभागी होईन, असे सांगितले. त्या वेळी माहिती खात्यातील संयुक्त सचिव म्हणाले, ‘या पुरस्काराचाच यामुळे गौरव झाला आहे.’ यातून लोक मला किती आदर देतात, माझ्याबद्दल काय विचार करतात, हे कळाले.’ तेनी जिल्ह्यातील पण्णैपूर या छोट्याशा खेडेगावातील एक मुलगा संगीत शिकतो काय आणि बघता-बघता आपल्या संगीताने जगाला मंत्रमुग्ध करतो काय! रागदेवन, माएस्ट्रो, इसैज्ञानी (संगीतज्ञ) अशा अनेक पदव्यांनी रसिक चाहते त्याला गौरवतात काय, सगळेच अद्भुत!

‘अन्नक्किळि’ या चित्रपटातून १९७६ साली या स्वरसाधकाने चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला. सुपरस्टार रजनीकांत यांच्या तमिळ चित्रपटप्रवेशाचेही हेच वर्ष. त्यामुळे या दोघांचा प्रवास हातात हात घालून गेला नसता तर नवलच. त्यात एस. पी. बालसुब्रह्मण्यम नावाच्या लोकविलक्षण गायकाची भर पडली. जोडीला आणखी एक सुपरस्टार कमल हासन आणि आणखी एक दैवी गायक येशुदास. मग पुढची दोन दशके तमिळनाडूत स्वरमधाच्या धारा बरसत राहिल्या. याच धारांनी आजही तमिळनाडूच्या तप्त हवामानातही माधुर्याची झुळुक जिवंत ठेवली आहे. अन् केवळ चित्रपट संगीतापुरतेच या राजाचे साम्राज्य राहिले असेल, असे वाटत असेल तर थांबा!

ए. आर. रहमान या आणखी एका विश्वविजयी तमिळ संगीतकाराच्या काही वर्षे आधी इळैयाराजाने रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा या जागतिक संगीत संस्थेत सिम्फनी सादर केली होती. (रहमानने इळैयाराजाच्या हाताखाली काही दिवस संगीताचे धडे गिरविले होते.) इतकेच काय पण कर्नाटक संगीतात पंचमुखी नावाचा एक स्वतंत्र राग त्याने निर्माण केला होता. तमिळमध्ये गीतांजली आणि कन्नडमध्ये मुकाम्बिकै हे त्यांचे भक्तिगीत संग्रह घरटी एका तरी भक्ताच्या कानावर पडलेले असणारच असणार! खुद्द आदि शंकराचार्यांच्या मीनाक्षीस्तोत्राला संगीत देण्याचा मान त्यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे महाकवी सुब्रह्मण्यम भारती यांच्या ‘वार्तै तवरी विट्टाल’ या कवितेला एकदा नव्हे, तर दोनदा स्वतंत्र चाल लावण्याची किमया साध्य केलेला हा कलाकार. त्यांच्या ‘तिरुवासगम - ए सिम्फोनिक ऑरेटोरियो’ या स्तोत्रावर आधारित संगीत अल्बमने तमिळनाडूत विक्रीचा इतिहास निर्माण केला होता.

गिटार, व्हायोलिन यांसारख्या वाद्यांचा निखळ आस्वाद घ्यायचा, तर तो इळैयाराजाच्या गाण्यातच घ्यायचा. दुर्दैवाने हिंदी गीतांच्या चाहत्यांसमोर इळैयाराजाची प्रतिभा पूर्णांशाने कधी झळकलीच नाही. ‘सदमा’तील ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ किंवा ‘सुरमयी अँखियों में’सारख्या गाण्यांचा काय तो अपवाद. ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ हे गाणे त्यांनी खास ‘सदमा’साठी तयार केलेले. कारण त्याच्या तमिळ आवृत्तीत म्हणजे‘मुंड्राम पिरै’ या चित्रपटात, त्याऐवजी ‘पुंगाट्रू पुदिदानदु’ हे गाणे येते. आता यात विशेष असे, की दोन्ही गाण्यांच्या मधल्या कडव्यात व्हायोलिनचा ताफा सिम्फनीचा तुकडा वाजवतो आणि तो तुकडा एकच आहे. अन् त्या तुकड्याच्या नादावर धावत येणारी पडद्यावरची रेल्वेगाडीही एकच आहे. वाद्ये तीच, आवाज तोच, पण चाल पूर्ण वेगळी. आहे की नाही गंमत? हिंदी रसिकांना आणखी एक सर्वपरिचित गाणे म्हणजे गणेशभक्तांना चेव येऊन नाचण्यासाठी कामी येणारे ‘आया है राजा’ हे गाणे.

नाही म्हणायला, आनंद-मिलिंद या बंधूंनी मधली काही वर्षे इळैयाराजांच्या चालीवरच आपले दुकान चालवले होते. साथियाँ तूने क्या किया (इनाडू एदो अयिंदी), चांदनी रात है (केळडि कण्मणी), ओ प्रिया प्रिया अशा काही गाण्यांनी हिंदी गानरसिकांना रुंजी घातली; पण त्यात फिल्टर कॉफी आणि मशीनच्या कॉफीएवढा फरक होता. कॉफी कशी असते हे कळणे, एवढाच त्याचा उपयोग. कॉफीची चव कशी असते हे काही त्यातून कळणार नाही.

केवळ संगीतच नाही, तर कलावंताला साजेशा नैष्ठिक आचरणासाठीही इळैयाराजा हे आदर्शच ठरतील. चित्रपट उद्योगातील लोकांकडून फारशी अपेक्षा नसलेले तात्त्विक आचरण करणारी व्यक्ती म्हणून इळैयाराजा यांची ओळख आहे. आपल्या मधुर सर्जनाने ज्या व्यक्तीने कित्येक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले, त्यानेच आपल्या मूल्यांसाठी तडजोड करणार नसल्याचेही वारंवार दाखवून दिले आहे.

संगीत दिग्दर्शक इळैयाराजा आणि दिग्दर्शक ज्ञानराजसेकरन यांची एक खास जोडी आहे. ‘मोगा मूल’ आणि ‘भारती’ या  ज्ञानराजसेकरन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी अनेक पुरस्कार जिंकले आणि या दोन्ही चित्रपटांना इळैयाराजाचे संगीत होते. साहजिकच ज्ञानराजसेकरन यांनी तमिळनाडूचे विद्रोही विचारवंत व नेते पेरियार यांच्या जीवनावर चित्रपट काढायचे ठरविले, तेव्हा संगीतासाठी ते इळैयाराजांकडे आले होते; मात्र इळैयाराजा यांनी या चित्रपटाला संगीत देण्यास नकार दिला होता. याचे कारण म्हणजे पेरियार यांची विचारसरणी आणि इळैयाराजा यांच्या श्रद्धा एकमेकांपेक्षा वेगळ्या होत्या. ‘पेरियार यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांचे काही विचार आजही लागू पडतात; मात्र ते नास्तिक होते हे सगळ्यांना माहीत आहे आणि माझे जीवन पेरियार यांच्या कल्पना आणि विचारांपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे या चित्रपटात काम करणे योग्य ठरणार नाही, असे मला वाटले. मुख्य म्हणजे मी माझ्या कामाला न्याय देऊ शकणार नाही,’ असे त्या वेळी ते म्हणाले होते.

तमिळ चित्रपटसृष्टीतील एस. पी. बालसुब्रह्मण्यम, येशुदास, एस. जानकी आणि रजनीकांत यांच्याप्रमाणेच इळैयाराजा हे त्यांच्या धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीसाठी प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. त्या वेळी त्यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्याशी गप्पा मारायला आम्ही सर्व जण उत्सुक होतो; पण ते सकाळीच उठून नरसोबाच्या वाडीला दर्शनाला गेले होते आणि तेथून यायला उशीर झाल्यामुळे त्यांच्याशी वार्तालाप रद्द करण्यात आला होता.

अशा या कलावंताला देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणे, हा ते कोण संयुक्त सचिव म्हणतात त्याप्रमाणे त्या पुरस्काराचाच गौरव आहे. वेदांमध्ये ऋषिमुनींनी ‘भद्रं कर्णैभिः श्रृणुयाम देवा’ अशी प्रार्थना केली आहे. गेल्या वर्षी येशूदास आणि या वर्षी इळैयाराजा हे या पुरस्काराचे मानकरी ठरले. यापेक्षा ऐकायला आणखी चांगले ते काय असणार?

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link