Next
तलाश - द आन्सर लाईज विदिन : रंजक व गूढ अनुभूती
BOI
Tuesday, August 06, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


अलगदपणे पडद्यावर उलगडत जाणारी सशक्त पटकथा, सर्व गोष्टींचं अत्यंत विचारपूर्वक केलेलं नियोजन, सिनेमाचं एकंदर वातावरण, सेट्स, मुख्य व्यक्तिरेखेने स्वतःचा शोध घेत राहणं, हे सगळंच ‘तलाश’ अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवतो... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘तलाश’ या बॉलीवूडपटाबद्दल....
..................................
‘तलाश : द आन्सर लाईज विदिन’, ही पडद्यावर अतिशय रंजकपणे उलगडत जाणारी गूढकथा आहे. जाणिवांसह नेणिवांनाही स्पर्श करणारी. २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या या ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’ प्रकारात मोडणाऱ्या चित्रपटाला, प्रेक्षकांच्या उलटसुलट प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. कथेत मांडलेलं लॉजिक, शेवटाकडे उलगडणारं रहस्य, काही जणांच्या पचनी पडलं, तर काही जणांना ते चक्क अर्थहीन भासलं. तलाश ही एका शोधाची कथा आहे. 

चित्रपटात अरमान कपूर नावाच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याची गाडी एके रात्री रस्त्यातून अचानक वळते आणि थेट समुद्रात जाऊन कोसळते. शेवटच्या क्षणापर्यंत सीटबेल्ट लावून असणाऱ्या, कोणत्याही नशेत नसणाऱ्या अरमान कपूरचा गाडीवरचा ताबा अचानक का सुटावा? गाडीसमोर कुणीही आलेलं नसताना त्याने असं का करावं, हे एक मोठं कोडं असतं. या हाय-प्रोफाइल केसचा तपास करायचं काम, सुर्जनसिंग शेखावत या नव्याने बदली होऊन आलेल्या वरिष्ठ पोलिस इन्स्पेक्टरकडे आलेलं असतं. तपासाला सुरुवात होते तसं एक एक मुद्दे समोर येऊ लागतात. हे प्रकरण प्रथमदर्शनी वाटतं तितकं सोपं नाही हे जाणवू लागतं. हा अपघात नेमका कसा घडला, याचा शोध घेताना काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागतात. 

काही वर्षांपूर्वी एका अपघातात, वरिष्ठ पोलिस इन्स्पेक्टर सुर्जनसिंग शेखावतने (आमीर खान) आपल्या मुलाला गमावलेलं आहे. त्या अपघाताला आपण जबाबदार आहोत अशी समजूत सुर्जनने करून घेतलेली आहे. ही हृदयद्रावक घटना घडून अनेक वर्षं उलटून गेल्यावरही सुर्जन स्वतःला माफ करू शकलेला नाही. अपराधी भावनेनं त्याला पुरतं गिळून टाकलेलं आहे. यामुळे त्याला निद्रानाश जडलेला आहे. अनेक रात्री तो शांत चित्ताने झोपलेला नाही. पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) आणि सुर्जनमधे एक अबोल आणि असह्य असा ताण आहे. अपघात घडून मुलगा गमावल्यानंतर त्यांचं विश्व पुरतं बदलून गेलेलं आहे. त्यांच्यात सहज संवाद घडत नाही. जो घडतो, तो अतिशय कृत्रिम स्वरूपाचा आणि जेवढ्यास तेवढा. या दोन्ही घटना एकमेकांना समांतर अशा टाइमलाइनवर चालत राहतात. 

‘तलाश’ ही शोधाची कथा आहे. अपघातास जबाबदार कोण, हा प्रश्न, घडून गेलेल्या दोन्ही अपघातांबाबत सुर्जनच्या मनात सलतो आहे. अरमान कपूरच्या अपघाताशी सबंधित घटनांचा शोध घेत असताना, सुर्जन एकीकडे स्वतःचादेखील शोध घेतो आहे. सायकॉलॉजिकल थ्रिलर प्रकारच्या चित्रपटांमधे जशा अनेक घटना, अनेक प्रसंग असतात, तसे यातही आहेत. या चित्रपटाची मांडणीदेखील या त्याच्या जान्रला साजेशीच आहे. दाखवण्यात येणाऱ्या प्रसंगांमध्ये प्रेक्षक पूर्णपणे गुंतून राहतो, पण त्याचबरोबर, हा चित्रपट अनेक घटना दाखवून, एकेक रहस्य उघड करत, प्रेक्षकाला नुसताच आश्चर्यचकित करत नाही, तर तो प्रेक्षकाला विचारदेखील करायला लावतो. त्याच्या जाणिवांना तर स्पर्श करतोच, पण नेणिवांनादेखील साद घालतो. अनेक घटना, अनेक प्रसंग असूनही, तलाशची मांडणी अकारण गुंतागुंतीची नाही. पटकथा आणि संकलन विचारपूर्वक केलेलं आहे. मोठ्या लांबीची आणि दोन मुख्य टाइमलाइन असणारी ही कथा, तीन वेगवेगळ्या काळांचे संदर्भ असणारी आहे. या कथेत असंख्य पात्रे आहेत. कथानकाला अनेक पदर आहेत. प्रत्येक पात्राचा स्वभाव वेगवेगळा आहे. काळानुसार बदलत जाणारा आहे. प्रत्येक पात्राला वेगवेगळ्या छटा आहेत. या सगळ्याची उत्तम सांगड दिग्दर्शिका रीमा कागतीने घातली आहे. 

तलाश सिनेमामध्ये मध्यवर्ती घटना या दोन वेगवेगळ्या अपघातांच्या आहेत. हे अपघात वेगळ्या जागी आणि वेगवेगळ्या काळात होतात. या दोन्ही अपघातांशी कोणत्या न कोणत्या प्रकारे ‘सुर्जन’ ही मुख्य आणि केंद्रस्थानी असणारी व्यक्तिरेखा जोडली गेलेली आहे. रहस्य, त्या रहस्याचा शोध आणि शोध सुरू असताना पात्रांची हळूहळू उलगडत जाणारी सायकी, ही तलाश चित्रपटाची बलस्थाने आहेत. गुन्हा, गुन्हा अन्वेषणाची पोलिसांची पद्धत, त्या गुन्ह्याशी संबंधित असणारे लोक, त्यांचे मिश्र पद्धतीचे स्वभाव, त्यामागे जोडलेल्या असणाऱ्या आदिम प्रेरणा, त्यानुसार त्यांना असणाऱ्या गरजा आणि त्यांनी केलेली बरी-वाईट दृश्ये, हे सगळंच दिग्दर्शिकेने बारकाईनं रेखाटलं आहे. 

तलाशची कथा पटकथा रीमा कागती आणि झोया अख्तरने मिळून लिहिली आहे. संवाद फरहान अख्तरचे आहेत. काही संवाद अनुराग कश्यपने लिहिले आहेत. यात असलेल्या प्रत्येक पात्राचा स्वभाव बारकाईने उभा करताना या सगळ्याच स्वतंत्र बुद्धीच्या आणि अतिशय सर्जनशील लोकांच्या विचारात सुसूत्रता जाणवते. सर्वांचा विचार एका दिशेने, संगनमताने झाला आहे आणि त्यावर मेहनत घेऊन हे काम केलं गेलं आहे, हे जागोजागी जाणवतं. राम संपथ या अत्यंत हुशार संगीतकाराने तलाशला संगीत आणि पार्श्वसंगीत दिलं आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत, हा या चित्रपटाचा आत्मा आहे. ‘मुस्काने झूठी है..’ या सुरुवातीच्या गीतापासूनच हे संगीत आपला ताबा घेऊ लागतं. अतिशय समर्पक गाणी, त्यांचा सुयोग्य वापर आणि सुरेल, प्रभावी पार्श्वसंगीत यांमुळे चित्रपटाच्या कथेला साजेसं वातावरण उभं राहतं. संगीत आणि पार्श्वसंगीत इतकं सुयोग्य नसतं, तर तलाश इतका परिणामकारक वाटूच शकला नसता. संगीत आणि पार्श्वसंगीत, ही जणू या चित्रपटातील महत्त्वाची पात्रं असल्याइतकं हे काम जबरदस्त आहे. सिनेमाचं एकंदर वातावरण, त्याचा पोत, हे सगळं प्रेक्षकापर्यंत पोहोचतं, ते यातल्या संगीतामुळे. ओपनिंग सीनपासूनच, सुरुवातीच्या गाण्यापासूनच मुंबईचं नाइटलाइफ आणि त्यातलं वैचित्र्य दिसायला सुरुवात होते. त्यातली गूढता आणि बकालपण अंगावर येऊ लागतं. सावकाशीने वेळ घेत, तरीही एकही लूज मोमेंट न-आणता, तलाशची कथा पडद्यावर उलगडत जाते. 

आमीर खान, राणी मुखर्जी, करीना कपूर, नवाझुद्दिन सिद्दिकी, राजकुमार राव, शेरनाझ पटेल अशी कलाकारांची तगडी फळी तलाशमध्ये आहे. सशक्त कथा, प्रभावी दिग्दर्शन आणि विचारपूर्वक विणलेल्या पटकथेला कलाकार कशी जोमदार साथ देतात हे पाहण्यासारखं आहे. सर्वांचाच अभिनय उत्कृष्ट झाला असला, तरी लक्षात राहतो तो आमीर खान. खूप वेगळ्या धाटणीची आणि अनेक पदर असलेली ‘सुर्जन सिंग’ नामक व्यक्तिरेखा त्याने अतिशय जोमदारपणे साकारली आहे. मुलाच्या अपघाताला स्वतःला जबाबदार मानणारा बाप, त्याची अस्वस्थता, त्याला जडलेला निद्रानाशाचा विकार, त्याचा शिस्तशीर स्वभाव, नजरेत असलेली जरब, अत्यंत प्रभावी देहबोली आणि संवादफेक, हे सगळंच तो अतिशय समर्थपणे साकारतो. सुर्जन शेखावत ही त्याची आजवरच्या कारकीर्दीत साकारलेली सर्वाधिक प्रभावी भूमिकांपैकी एक भूमिका ठरावी. त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. मन:स्वास्थ्याला पूर्णपणे हादरवून टाकणारी ही भूमिका आहे. 

तणावपूर्ण वातावरण आणि त्यातली मरगळ तात्पुरती झटकण्याकरिता, एकदा सुर्जनला त्याची बायको रोशनी म्हणते, की सिनेमाला जाऊ या. अनिच्छेनं का होईना, पण तिचं मन राखण्याकरिता तो तयार होतो. अतिशय विनोदी प्रसंग असणारा तो सिनेमा बघून, संपूर्ण थिएटर खदाखदा हसत असतं. रोशनीलाही हसू आवरणं कठीण होतं. ती हळूहळू रिलॅक्स होते नि हसू लागते. सिनेमा सुरू आहे. सुर्जन अतिशय गंभीर. निश्चलपणे बसून आहे. अत्यंत टोकाच्या अलिप्ततेनं सिनेमा पाहतो आहे. रोशनी मात्र खळाळून हसते आहे. ती हसताना किती आनंदी आणि मोहक दिसते आहे, ते आता सुर्जन पाहतो आहे. रोशनी आणि संपूर्ण थिएटरचे डोळे पडद्याकडे लागलेले आहेत आणि सुर्जन मात्र, आपल्या पाणीदार डोळ्यांनी तिच्याकडे बघतो आहे. अगदी एकटक! जरा वेळानं, सुर्जन पडद्याऐवजी आपल्याचकडे बघतो आहे, हे रोशनीच्या लक्षात येतं. ती हळूच त्याचा हात आपल्या हातात घेते. हातात हात मिसळतात आणि सीन डिझॉल्व्ह होऊन तिथेच कट होतो. तलाशमध्ये हृदयाची तार छेडणाऱ्या या व अशा कैक चमकदार जागा आहेत. हळुवार प्रसंग आहेत. मानवी भावभावना आणि त्यांचे कंगोरे दाखवणारा हा एक देखणा सोहळा आहे. 

सायको-थ्रिलर प्रकारात मोडणाऱ्या चित्रपटांत इतक्या तपशीलात जाऊन रेखाटलेली पात्रं व पात्रस्वभाव पहायला मिळणं हे अतिशय दुर्मीळ असतं. तांत्रिकदृष्ट्या तर हा चित्रपट उत्तम आहेच, पण या बाबी सुरेख, चकचकीत करण्याच्या नादात तो कथा आणि तिच्या एकंदर स्वभावापासून फारकत घेत नाही. या चित्रपटात शेवटी मुख्य रहस्य उलगडताना जो जबरदस्त धक्का बसतो, तो सर्वांना पचेल असं नाही, पण हा धक्का जे पचवू शकतील, ज्यांची कथेच्या या गृहीतकाला फारशी हरकत नसेल, त्यांच्याकरता हा सिनेमा एक महत्त्वाची अनुभूती ठरेल हे नक्की. हा चित्रपट मी सर्वप्रथम पाहिला, तेव्हा मला एकंदर कथा आणि त्यात असणाऱ्या रहस्याबाबत पूर्ण कल्पना होती. असं असूनही चित्रपट पाहताना माझा एकदाही रसभंग झाला नाही. गुन्हा, गुन्ह्यामागची कारणं आणि कथेच्या तळाशी दडलेलं रहस्य, त्यामागे असलेलं लेखिका आणि दिग्दर्शिकेचं लॉजिक, या गोष्टी माझ्या मते दुय्यम ठरल्या. अलगदपणे पडद्यावर उलगडत जाणारी सशक्त पटकथा, सर्व गोष्टींचं अत्यंत विचारपूर्वक केलेलं नियोजन, सिनेमाचं एकंदर वातावरण, परिणामकारक वातावरण निर्मिती करणारे त्यातले रंग, त्यांच्या सुंदर आणि गडद छटा, सेट्स, इमारती, रस्ते, तपशीलात जाऊन रेखाटलेली पात्रे, त्यांचे आगळे-वेगळे स्वभाव आणि परस्परसंबंध, त्यातले बारकावे, असंख्य घटना, त्यांची निचिंतीने केलेली सुबक जोडणी, सुर्जन शेखावत या केंद्रस्थानी असणाऱ्या व्यक्तिरेखेने स्वतःचा शोध घेत जाणे, अतिशय हॉन्टिंग स्वरूपाचं संगीत व पार्श्वसंगीत या सर्व गोष्टी अनुभवणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं ठरलं. गुन्हे अन्वेषणाची पद्धत, मुख्य रहस्यापर्यंत पोहोचताना प्रसंग आणि घटनांचे पापुद्रे अलवारपणे उलगडत जाणे, मुख्य व्यक्तिरेखेने स्वतःचा शोध घेत राहणे, दोन्ही अपघातांमागची कारणमीमांसा काय असेल याचा अविरत चाललेला शोध, हा शोध साधारण एकाच वेळेस लागणे, शोध लागल्यानंतर, सर्व रहस्यं उलगडल्यानंतर येणारी एक शून्य अवस्था, हे सगळंच तलाश अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवतो. 

प्रेक्षकाला ही कथा गुंतवून टाकते, विचारात पाडते, कधी गोंधळात टाकते तर कधी आश्चर्याचे जबरदस्त धक्के देते. हा सिनेमा जितका दिग्दर्शिकेचा आहे, तितकाच तो कथा/पटकथा-लेखिकांचा आहे आणि तितकाच त्यातल्या अभिनेत्यांचा आहे. ‘सायको-थ्रिलर’ प्रकारच्या सिनेमात, कथेचं पुढचं वळण नेमकं काय असेल, हे प्रेक्षकाला न कळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सिनेमाचा वेगही व्यवस्थित असावा लागतो. तो फार जास्त अथवा कमी असून चालत नाही. हे सर्व नियम तर तलाश व्यवस्थित सांभाळतोच, पण कथा उलगडत असताना पात्रांचे स्वभाव, त्यातल्या बारीक-सारीक छटा आणि मानवी भावभावना तो अतिशय नेमकेपणाने दाखवतो. सर्वच पात्रांचा अतिशय ताकदवान अभिनय, सशक्त कथा, प्रभावी संवाद, संकलन आणि विचारपूर्वक योजलेलं संगीत-पार्श्वसंगीत, अशा सर्वच दृष्टीने मला हा चित्रपट परिपूर्ण वाटतो. तलाश पाहिला नसल्यास आवर्जून पाहा. बॉलीवूडचा हा महत्त्वाचा सिनेमा पाहणं शक्यतो चुकवू नका. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Geeta Bhawsar About 12 Days ago
फार सुंदर रसास्वाद.... किती तरी वेळा पाहिलाय... तरी प्रत्येक वेळी नवनवी गोष्ट उमगत जाते.तुम्ही अप्रतिम लिहिलेत...पुन्हा एकदा अनुभवला
0
0

Select Language
Share Link
 
Search