Next
कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना रत्नागिरीकरांकडून मोठी मदत!
BOI
Monday, August 12, 2019 | 01:49 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची रत्नागिरीतील अनेकांची इच्छा होती. त्यामुळेच, रत्नदुर्ग माउंटेनीअर्स संस्थेने ‘एक हात मदतीचा.. माणसातील माणुसकीचा’ असे आवाहन केल्यावर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन मदत गोळा करण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.

दोन दिवसांत हजारो वस्तू जमा झाल्या. रविवारी (११ ऑगस्ट) सकाळपासून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मदत देण्यासाठी लोकांची गर्दी झाली. जमा झालेले साहित्य ट्रकमधून कोल्हापूर, सांगलीला रवाना केले जाणार आहे. सोमवारीही (१२ ऑगस्ट) मदत जमा करण्याचे काम सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही या संस्थांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे अल्पावधीतच रत्नागिरीकरांची भरपूर मदत उभी राहत आहे.

पश्चिवम महाराष्ट्रात सततच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तेथील बांधवांची परीस्थिती दयनीय आहे. हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडले असून, त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त बांधवांना खरी गरज आहे ती त्या परिस्थितीत न कोलमडता टिकून राहण्याची. आर्थिक मदतीपेक्षा दैनंदिन उपयोगाच्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याकरिता मदत करावी, असे आवाहन रत्नदुर्ग माउंटेनीअर्स संस्थेने केले होते. रविवारी दिवसभरात ड्रायफ्रूट्स, केक, बिस्किटे, जुने-नवीन चांगले कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स, टॉवेल, बेबी फूड, मिनरल वॉटर, डायपर्स, सर्दी तापावरील प्राथमिक औषधे, धान्य, अंथरूण, पांघरूण, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण आदी वस्तू नागरिकांनी दिल्या. शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, कार्यकर्त्यांनी या वस्तूंचे वर्गीकरण केले.

ब्रह्मरत्न संस्थेने गोळा केलेले साहित्य

ब्रह्मरत्न संस्थेची टीम मदत घेऊन कोल्हापुरात
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत घेऊन रत्नागिरीतील ब्रह्मरत्न संस्थेची टीम तीन टेंपो घेऊन रविवारी (११ ऑगस्ट) सकाळी कोल्हापूरला रवाना झाली. रत्नागिरीतील ब्रह्मरत्न, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक संघ व खल्वायन या संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन करताच हजारो रत्नागिरीकरांनी वापरलेले चांगले कपडे आणि बेडशीट्स, चादरी, ब्लँकेट आणि अनेक प्रकारचे साहित्य आणून दिले. अवघ्या तीन तासांत मोठ्या प्रमाणावर जमा झालेले साहित्य पाहून कार्यकर्त्यांनाही हुरुप आला.

ब्रह्मरत्न संस्थेतर्फे तातडीची मदत म्हणून एक हजार बिस्किट पुडे आणि शंभर किलो चिवडा पाठवण्याचे नियोजन होते; मात्र कपड्यांची आवश्यकता असल्याने शनिवारी रात्री व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवण्यात आला. त्याला हजारो लोकांचा प्रतिसाद मिळाला. जोशी पाळंद येथील चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक संघाच्या सभागृहात साहित्य जमा करण्यासाठी रत्नागिरीकरांची गर्दी होऊ लागली. शर्ट, पँट, हाफ पँट, टी-शर्ट, साडी, पंजाबी ड्रेस, बेडशीट, चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे कपड्यांचे वर्गीकरण करण्यात आले. 

‘ब्रह्मरत्न’चे अध्यक्ष अनुप पेंडसे, सचिव कौस्तुभ जोशी, उपाध्यक्ष अमोल सहस्रबुद्धे, सदस्य कौस्तुभ सरपोतदार, यश आंबर्डेकर, ओंकार जोशी, गिरीश जोशी, मंदार लेले, प्रसाद सहस्रबुद्धे, प्रसाद पेठे, श्रीवल्लभ केळकर यांच्यासह चित्पावन ब्राह्मण संघ, खल्वायन, आनंद मराठे, क्वालिटी सर्व्हिसेस, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, श्रीनिवास जोशी, वरवडे ग्रामस्थ आदींचे या कामात विशेष सहकार्य लाभले. 

रत्नागिरीतून ‘ब्रह्मरत्न’ची टीम तीन टेम्पोमधून मदतीचे साहित्य घेऊन कोल्हापूरला रवाना झाली आहे. यामध्ये कौस्तुभ जोशी, मनोहर जोशी, भास्कर मुकादम, कौस्तुभ सरपोतदार, यश आंबर्डेकर, चेतन जोशी, मुकुंद जोशी, मारुती पंडित, मृणाल म्हैसकर, सचिन जोशी आणि सहकारी यांचा समावेश आहे.

जमा झालेले साहित्य
साड्या २५८७, शर्ट ३३५२, पँट १७७०, पंजाबी ड्रेस २७८१, लहान मुलांचे कपडे ८८५, अंथरूण ९९०, गाउन १००, टॉवेल ३७५, स्वेटर, शाली ९०, पाणी बाटल्या २०००, बिस्किट पुडे ८०००, चिवडा १०० किलो, लाडू ७००, तांदूळ, डाळ व तेल १०० किलो, सॅनिटरी नॅपकिन ५००, वैद्यकीय साहित्य १४ संच.

(व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

खालील शीर्षकांवर क्लिक करून, अधिक माहिती घेऊन तुम्हीही पूरग्रस्तांना मदत पोहोचवू शकता. 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search