Next
मोरी छम छम बाजे पायलिया...
BOI
Sunday, December 02, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘अनारकली’सह अनेक उत्तमोत्तम भूमिका केलेली जुन्या काळातील अभिनेत्री म्हणजे बीना रॉय. सहा डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘मोरी छम छम बाजे पायलिया...’ या गीताचा...
............
१९४१च्या सुमारासची ही हकीकत आहे. लक्स साबण बनवणाऱ्या कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये त्यांनी जाहीर केले होते, की ग्राहकाने जर कंपनीला विनंतीपत्र पाठवले, तर त्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस हिचा स्वाक्षरीसहितचा एक अतिसुंदर फोटोग्राफ मोफत पाठवण्यात येईल. नऊ वर्षांच्या कृष्णा सरीन या शाळकरी मुलीने तसे पत्र पाठवले आणि आठवड्याभरात भल्या मोठ्या पाकिटातून सुव्यवस्थितरीत्या पाठवलेला लीला चिटणीसचा तो देखणा फोटो कृष्णाच्या हातात आला. कृष्णाचा आनंद गगनात मावेना. 

शालेय वयातच कृष्णाला चित्रपट पाहण्याचा नाद लागला होता. गानकोकिळा खुर्शीद, अभिनेता अशोककुमार, अभिनेत्री लीला चिटणीस हे तिचे आवडते कलावंत होते. त्यामुळे तिने लीला चिटणीसचा फोटो मिळवला. परंतु शालेय वयात चित्रपट कलावंतांबद्दल प्रेम असणारी ही मुलगी तेव्हा हे जाणत नव्हती, की भविष्यात आपणही असे स्टार बनणार आहोत. शालेय वयात सिनेमा बघणारे अनेक असतात; पण तरुणपणी कोणाच्या नशिबात काय लिहून ठेवले आहे, हे कोठे कोणाला ज्ञात असते? 

वयाच्या अठराव्या वर्षी वृत्तपत्रातील जाहिरात वाचून कृष्णाने आपला अर्ज व दोन फोटो घरात कोणाला न सांगता पाठवून दिले. ती जाहिरात सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक किशोर साहू यांनी नव्या चित्रपटासाठी नायिका मिळवण्याकरिता दिली होती. १९५० हे ते वर्ष होते. नायिका म्हणून निवडल्यास त्या तरुणीला पंचवीस हजार रुपये मिळणार होते. 

तिच्या त्या अर्जाप्रमाणे तिला बोलावणे आले. त्याच वेळी मुंबईमध्ये कृष्णाच्या एका नातेवाईकांचे लग्न होते. त्यासाठी म्हणून ती मुंबईला गेली व स्क्रीन टेस्ट देऊन आली. आश्चर्य म्हणजे नायिका म्हणून तिची निवड झाली. हे सगळे घरच्यांना कळताच तिचे वडील जाम चिडले; पण किशोर साहूंनी तिच्या वडिलांना समजावले. पदवीधर, सुशिक्षित असलेल्या किशोर साहूंमुळे कृष्णाचे वडील तयार झाले. 

किशोर साहूंच्या ‘काली घटा’ या नव्या चित्रपटाची नायिका म्हणून एका देखण्या फ्रेंच युवतीच्या भूमिकेत चमकण्यासाठी कृष्ण सरीनचे ‘बीना रॉय’ असे नामकरण करण्यात आले, ‘काली घटा’ या चित्रपटामधून १३ जुलै १९५१ रोजी पडद्यावर आलेली सुदृढ प्रकृतीची, शेलाट्या डौलदार बांध्याची, पसरट चेहऱ्यावरच्या काहीशा बसकट नाकाची, पण लाडिक, हसतमुख चेहऱ्याची तरतरीत बीना रॉय सर्वांनाच पसंत पडली, आवडली. 

‘काली घटा’नंतर लगेचच तिचा ‘सपना’ हा चित्रपट पडद्यावर आला. आणि या दोन चित्रपटांच्या आधारावर बीना रॉयला फिल्मिस्तान चित्रसंस्थेचा ‘अनारकली’ हा चित्रपट मिळाला. त्या वेळी ‘अनारकली’च्या कथानकाची लाट चित्रपटसृष्टीत होती. त्यामुळे त्याच वेळी के. असिफ यांनी तेच कथानक घेऊन मधुबालाला अनारकली म्हणून घोषित केले. ‘फिल्मकार’ संस्थेने अनारकलीच्याच कथानकावर चित्रपटाची घोषणा करून मीनाकुमारीला अनारकली म्हणून घोषित केले. त्यामुळे बीना रॉयपुढे एक आव्हान उभे ठाकले. 

... पण बीना रॉय भाग्यवान ठरली. फिल्मिस्तानच्या चित्रपटाव्यतिरिक्त अन्य दोन चित्रपट रेंगाळले. आणि नऊ जानेवारी १९५३ रोजी बीना रॉयची ‘फिल्मिस्तान’ निर्मित ‘अनारकली’ मुंबईत झळकली. सी. रामचंद्र यांच्या संगीतामुळे तो चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. प्रदीपकुमार तिचा नायक होता. ‘अनारकली’व्यक्तिरिक्त चार चित्रपटांत ही जोडी निर्मात्यांनी वापरली. 

प्रदीपकुमारव्यतिरिक्त अशोककुमार, भारतभूषण. किशोर साहू, रहमान, देव आनंद, अजित, शम्मी कपूर या नायकांबरोबर ती रसिकांना पडद्यावर दिसली. परंतु अभिनेता प्रेमनाथबरोबर तिचे सहा चित्रपट पडद्यावर आले आणि तो तिच्या जीवनाचाही नायक बनला! ‘औरत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांच्या प्रेमाचे अनेक किस्से सांगितले जातात. त्या दोघांनी अल्पावधीतच विवाह केला. 

परंतु या दोघांचा प्रेमविवाह सुखावह झाला नाही. बीना रॉयच्या फिल्मी करिअरवर त्याचा विपरीत परिणाम झाला. प्रेमनाथशिवाय दुसऱ्या नायकाबरोबर आपण काम करणार नाही, असे तिने जाहीर केले. प्रेमनाथची लोकप्रियता झपाट्याने उतरू लागताच तिची पंचाईत होऊ लागली. तशातच प्रेमनाथचा उतावीळ व अति महत्त्वाकांक्षी स्वभाव आडवा आला. पुढे त्याने स्वतःची ‘पी. एन. फिल्म्स’ संस्था स्थापन करून ‘शगुफा’ चित्रपट पडद्यावर आणला. यामध्ये वेडाचे झटके येणाऱ्या नायिकेची भूमिका करून बीना रॉयने आपले अभिनयसामर्थ्य दाखवले होते. याच चित्रपटात बीना रॉय महाराष्ट्रीय पद्धतीच्या नऊवारी साडीत काही दृश्यांत दिसली होती. तिचे त्या पोशाखातील सौंदर्यही पाहण्यासारखे होते. ‘शगुफा’नंतर प्रेमनाथ-बीना रॉय या जोडीचे ‘गोवलकोंडाका कैदी,’ ‘हमारा वतन,’ ‘चंगेझखान’, ‘समुंदर’ असे काही चित्रपट आले व गेले. त्यामुळे अन्य नायकांबरोबर काम करणे बीना रॉयला भाग पडले. 

‘अनारकली’नंतर तिचा गाजलेला पोषाखी चित्रपट म्हणजे ‘ताजमहल.’ साहिरची अर्थपूर्ण गाणी, रोशनचे चित्रपटाच्या प्रकृतीला साजेसे कर्णमधुर संगीत ‘ताजमहल’ला रौप्यमहोत्सवी यश देऊन गेले. अशोककुमारबरोबर पाच चित्रपटांत असलेल्या तिच्या भूमिकांत वैविध्य होते व अभिनयातील निपुणता होती. विजय भट्ट यांनी ‘रामराज्य’ हा चित्रपट निर्माण केला, त्या वेळी सीतेची भूमिका नूतनने करावी, अशी विजय भट्ट यांची इच्छा होती. कारण नूतनच्या आई शोभना समर्थ यांनी एके काळी केलेली सीतेची भूमिका खूप गाजली होती, साजेशी ठरली होती; पण नूतनने विजय भट्ट यांची मागणी मान्य केली नाही. तेव्हा ती सीतेची भूमिका बीना रॉयकडे आली. मराठीतील कुमार दिघे त्या चित्रपटात ‘राम’ म्हणून चमकले होते. तो चित्रपट चालला नाही; मात्र बीना रॉय सीता म्हणून शोभून दिसली होती. 

पुढे पुढे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या अभावामुळे त्रस्त झालेली बीना रॉय चित्रपटसृष्टीपासून दूर राहू लागली! ती मानसिकदृष्ट्या दुर्बल झाली होती असे म्हणतात. ऋषी कपूर-नीतू सिंगच्या विवाहसोहळ्यात ती लोकांना दिसली होती. नंतर ती फारशी दिसली नव्हती. तीन नोव्हेंबर १९९२ रोजी प्रेमनाथच्या निधनानंतर तर ती पूर्ण एकाकी पडली होती. तिचा मुलगा प्रेमकिशन चित्रपटात आला; पण तो आई-वडिलांसारखा दीर्घ काळ टिकू शकला नाही; पण आईला त्याने सांभाळले. 

स्त्री सौंदर्याचे प्रकार पाडता येत नाहीत. खरे तर सौंदर्य ते सौंदर्यच! पण तरीही अनेक वेळा खट्याळपणातले सौंदर्य, खानदानी सौंदर्य, सोज्वळ सौंदर्य असे प्रकार पाडले जातात आणि मग अशा वेळी एक शायराने बीना रॉयला दिलेली उपाधी आठवते, ती म्हणजे ‘संजिदा हुस्न!’ संजिदा म्हणजे शांत, गंभीर. हुस्न म्हणजे सौंदर्य! 

अशा या बीना रॉयचा स्मृतिदिन सहा डिसेंबर रोजी असतो. २००९मध्ये ती हे जग सोडून गेली. बीना रॉयच्या कारकिर्दीवर नजर टाकता या सर्वांव्यतिरिक्त दोन गोष्टींचा उल्लेख आवश्यक ठरतो! एक म्हणजे १३ या अंकाचे तिच्या जीवनातील महत्त्व! इंग्रज लोक तो अंक अशुभ मानतात; पण बीना रॉयला मात्र तो शुभ ठरला. तिचा जन्म १३ जुलैचा. ते १९३२ हे वर्ष होते. १९५०च्या १३ जुलैला तिचा चित्रपटाचा पहिला करार झाला! तो चित्रपट १९५१च्या १३ जुलैला मुंबईत झळकला! १९५२च्या १३ जुलैला प्रेमनाथबरोबर तिचा साखरपुडा झाला होता. 

दुसरी गोष्ट म्हणजे बीना रॉयच्या वाट्याला आलेली गीते! अनारकली, काली घटा, औरत (१९५३) शगुफा, मिनार (१९५४) समुंदर, चंद्रकांता, हिल स्टेशन, ताजमहल अशा तिच्या चित्रपटांतील मधुर गीते आजही आवर्जून ऐकावी अशी आहेत. अशाच एका ‘सुनहऱ्या’ गीताकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. ‘घूंघट’ हा १९६०चा, मद्रासच्या जेमिनी पिक्चर्सचा कौटुंबिक जिव्हाळ्याचा चित्रपट! यामधील भूमिकेकरीता तिला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या ‘नौका डूबी’ या कथेवरून घेतलेल्या बॉम्बे टॉकीजच्या ‘मिलन’ चित्रपटाची नक्कल होती. बीना रॉयची संयमपूर्ण भूमिका हे ‘घूंघट’चे आकर्षण होते. त्या चित्रपटात शकील बदायुनींनी लिहिलेली व संगीतकार रवी यांनी संगीतबद्ध केलेली दहा गीते होती. 

यापैकीच एक आनंदाचे, सुखद गीत आज पाहू या! स्वरसम्राज्ञीच्या स्वरांचा एक मधुर आविष्कार! दीर्घ प्रतीक्षेनंतर प्राप्त झालेल्या प्रियकरामुळे आनंदी बनलेली प्रेयसी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते - 

आज मिले है मोरे साँवरिया

आज माझ्या प्रियाची भेट झाल्यामुळे (तर नव्हे ना) माझे हे पैंजण छुम छुम आवाज करीत आहेत. (खरेच ते किती छानपणे छुम छुम आवाज करीत वाजत आहेत.)

पुढे ती म्हणते -

बडी मुद्दत में दिल के सहारे मिले 
आज डूबे हुओं को किनारे मिले
कभी मुस्काए मन, कभी शरमाए मन 
कभी नैनों की छलके गागरिया

एका दीर्घ कालावधीनंतर माझ्या हृदयाला/मनाला आधार मिळाला आहे (जणू काही) बुडणाऱ्यांना किनारा गवसला आहे. (खरेच या त्यांच्या प्राप्तीमुळे) कधी माझे मन हास्य करते, (तर) कधी ते लाजेने चूर होते. (आणि) कधी हे डोळे सौख्याच्या अश्रूंनी भरून येतात. 

मनाच्या या आनंदी अवस्थेत ती सर्वांना सांगते - 

चाँद तारों के गहने पहना दो मुझे
कोई आ के दुल्हनियाँ बना दो मुझे 
नहीं बस में जिया कैसा जादू किया 
पिया आज हुई रे मैं तो बावरिया

चंद्र, तारका हेच मला दागिने म्हणून या आनंदाच्या प्रसंगी हवेत. मला वधू समजून त्यांचाच शृंगार करा! अति सौख्यामुळे माझे मन माझ्याच ताब्यात राहीनासे झाले आहे (माझ्या प्रियकरा) ही तू कशी जादू केली आहेस (की ज्यामुळे) मी बावरून गेले आहे. 

दोनच कडव्यांचे गीत, पण समर्पक शब्द व मधुर चाल, संगीत व स्वर यामुळे ते ‘सुनहरे’ बनले आहे. तशात पडद्यावर बीना रॉयचे एक शांत, सुखद सौंदर्य! सारेच ‘सुनहरे!’

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search