Next
दुर्मिळ स्तन कर्करोगग्रस्त महिलेवर ‘सह्याद्री’मध्ये यशस्वी उपचार
शस्त्रक्रियेविना महिलेचा केमोथेरपी उपचारांना चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, March 25, 2019 | 03:52 PM
15 0 0
Share this article:

पुणे : स्तन कर्करोगाच्या दुर्मिळ प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ६७ वर्षीय महिलेवर सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले.

या महिलेच्या डोळ्यांना दोन महिन्यांपासून समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांनी नेत्रतज्ज्ञांची भेट घेतली. त्यांच्या डोळ्यांच्या तपासणीनंतर असे लक्षात आले की, त्यांच्या डोळ्यात मास जमा झाले होते. त्यानंतर त्यांना पुढील निदान व उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. डोळ्याच्या तपासणीमध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये असलेला मास हा घातक ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले व याचा फैलाव स्तनापासून झाला होता. त्यांच्या डाव्या स्तनामध्ये एक छोटीशी गाठ दिसून आली होती.

याबद्दल अधिक माहिती देताना सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे रेडिएशन आँकोलॉजिस्ट डॉ. संजय एम. एच. म्हणाले, ‘ही महिला आमच्याकडे आली तेव्हा ती डोळ्याला आलेली सूज, नेत्रगोल पुढे येणे, डिप्लोपिया (दुहेरी दृष्टी) आणि दृष्टीत बिघाडाचा इतिहास या समस्यांनी ग्रस्त होती. तपासणीत असे दिसून आले की, डोळ्यात आलेले मास ही एक प्रकारची गाठ आहे आणि पुढील प्राथमिक तपासणींनंतर आम्हाला असे आढळले की, या गाठीचा प्रसार त्यांच्या स्तनातून झाला आहे. या स्थितीला कार्सिनोमा ब्रेस्ट विथ ऑरबिटल मेटॅस्टॅसिस म्हणतात. ही स्थिती दुर्मिळ असून, केवळ दोन ते तीन टक्के रुग्णांमध्ये आढळते. त्यांची हार्मोन रिसेप्टर्सची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी तपासणी करण्यात आली. या तपासणीतून त्या ईआर/पीआर पॉझिटिव्ह आहेत म्हणजेच रोगनिदान चांगल्या रीतीने होऊ शकते असे दिसले.’

स्तनाच्या कर्करोगात हार्मोन रिसेप्टर्स ही स्तनामधील आणि स्तनाच्या आजूबाजूच्या पेशींमधील प्रथिने असतात. स्तनाच्या कर्करोगादरम्यान, हार्मोन रिसेप्टर्स कर्करोगाच्या पेशींना अनियंत्रितपणे वाढण्यास पोषक वातावरण देतात आणि ट्यूमरची निर्मिती होते. तपासणीचे परिणाम हे उपचार ठरविताना महत्त्वाचे असतात. कुठल्या प्रकारचे उपचार निवडावे हे तपासणीच्या परिणामावर अवलंबून असते. अशा स्थितीमध्ये कर्करोग पेशींना वाढीस प्रोत्साहित करणार्‍या हार्मोन्सच्या कार्यात हस्तक्षेप करणार्‍या हार्मोनल औषधांना शरीर चांगला प्रतिसाद देत असल्याचे डॉ. संजय यांनी सांगितले.

‘त्यांचे वय, कर्करोगाची स्थिती आणि त्यांची इआर/पीआर पॉझिटिव्ह परिणाम पाहून आम्ही दोन टप्प्यात उपचार करायचे ठरवले. यामध्ये हार्मोनल औषधांच्या गोळ्या आणि इमेज गाइडेड रेडिएशन थेरेपी (आयजीआरटी) स्वरूपात हार्मोन थेरपी दिली जाते. आयजीआरटी ही एक केंद्रित रेडिएशन उपचारपद्धती आहे, जी डोळ्यातील नसांना कुठलीही हानी न पोहचविता केवळ ट्युमरला केंद्रित करते, ज्यामुळे दृष्टी आणखी कमी होणार नाही. ही उपचारपद्धती अत्यंत अचूक असून, रुग्णाच्या उपचाराच्या पाचही सत्रात याचा वापर करण्यात आला. कर्करोग आधीच पसरला असल्याने शस्त्रक्रिया हा पर्याय नव्हता आणि केमोथेरपी डोळ्यावर प्रभावीपणे प्रवेश करू शकत नाही त्यामुळे तो पर्यायदेखील वगळण्यात आला,’ अशी माहिती त्यांनी दिली.

जगातील सर्व ज्ञात कर्करोगांपैकी स्तन कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. महिलांमध्ये होणार्‍या कर्करोगामध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वांधिक आढळला जातो आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेंशन अ‍ॅंड रिसर्चच्या अनुसार स्तन कर्करोग आढळणार्‍या प्रत्येक दोन महिलांपैकी एकीचा मृत्यू होतो. कर्करोगाचा प्रसार शरीराच्या इतर भागात होतो तेव्हा त्याला मेटास्टॅटिक कर्करोग असे म्हणतात. याला चौथ्या टप्प्यातील कर्करोगदेखील म्हणतात व कर्करोगाच्या पहिल्या काही टप्प्यातील उपचार यशस्वी झाले नाही, तर हा रोग होऊ शकतो. सहसा याच्यावर उपचार होत नाहीत असे मानले जाते.

मेटास्टॅटिक कर्करोगाचे नेहमीच लक्षणे दिसतील असे नाही; मात्र लक्षणे दिसायला लागतात, तेव्हा त्याचा प्रकार व प्रमाण, मेटास्टॅटिक ट्युमर कुठे झाला आहे व त्याचा आकार यावर अवलंबून असते. सामान्यत: मेटास्टॅटिक ट्युमरच्या लक्षणांमध्ये हाडांमध्ये याचा प्रसार झाल्यास वेदना व फ्रॅक्चर, मेंदूमध्ये प्रसार झाल्यास डोके दुखणे, झटके व चक्कर येणे आणि फुफ्फुसांमध्ये याचा प्रसार झाल्यास श्‍वास घेताना त्रास होणे व सतत खोकला येणे यांचा समावेश आहे. या शिवाय डोळ्यांमध्ये सूज, दुहेरी दृष्टी (डबल व्हीजन), दृष्टीदोष यांचादेखील समावेश असून, ही दुर्मिळ स्थिती या महिलेच्या बाबतीत होती.

या महिलेवर उपचार सुरू असून, काही महिन्यांतच ती प्रगतीपथावर आहे. तिच्यावर हार्मोनल उपचार सुरू असून, तिची दृष्टी आता पूर्ववत झाली आहे. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या मेडिकल आँकोलॉजिस्ट आणि आँकोलॉजी विभागाच्या संचालिका डॉ. शोना नाग म्हणाल्या, ‘पुढील टप्प्यातील स्तन कर्करोग असणार्‍या महिलांसाठी हा यशस्वी उपचार महत्त्वाचा टप्पा असून, आधुनिक रेडिओ थेरपी तंत्रज्ञानाचा आपल्या रुग्णांना होणारा फायदा दर्शवितो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search