Next
अनोखे रक्षाबंधन; रक्षणकर्त्या एनडीआरएफ जवानांना बांधल्या राख्या!
BOI
Monday, August 12, 2019 | 04:09 PM
15 0 0
Share this article:

मिरजमधील पाकिजा मशीद भागातील एका अंध मुलीने जवानांना राखी बांधली.

सांगली : 
सांगली आणि कोल्हापूर येथील महापुरात अडकलेल्या असंख्य नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान रात्रंदिवस कार्यरत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्या या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगली, मिरज, कोल्हापूर येथील अनेक महिलांनी जवानांना राख्या बांधल्या. 

या जवानांचे आभार मानताना, कौतुक करताना या महिलांचे डोळे भरून येत होते. केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषही या रक्षाबंधनाच्या अनौपचारिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. जवानांनी केलेल्या उपकारांचे ऋण कधीही फिटणार नाही; पण त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता दर्शविण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याची भावना त्यांच्या मनात होती. मिरजमधील पाकिजा मशीद भागातील नागरिकांनी या जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले. अन्य महिलांसोबतच या भागातील एका अंध मुलीनेही या जवानांना राखी बांधली. ‘या नागरिकांची ही कृती हृदयाला हात घालणारी होती. अशा चांगल्या प्रतिसादामुळेच जवान उत्तम पद्धतीने कार्य करू शकतात. यातूनच सातत्याने आणि संवेदनशीलपणे काम करण्याची प्रेरणा, ऊर्जा मिळते,’ अशी भावना ‘एनडीआरएफ’चे अधिकारी सच्चिदानंद गावडे यांनी व्यक्त केली. सांगलीतील झुलेलाल चौकात झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात महिला पोलिस अधिकाऱ्यांनीही जवानांना राख्या बांधल्या. ‘आमच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात सहभागी झालेल्या महिला पोलिसांनीही आमच्या जवानांना राख्या बांधल्या. हे अत्यंत अनोखे रक्षाबंधन होते,’ अशी भावना गावडे यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, मदतकार्यात प्रामुख्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांचा समावेश असून, राज्य आपत्ती निवारण दल, लष्कर, नौदल, वायुदल आदींमधील जवानही कार्यरत आहेत. ‘एनडीआरफ’ची १७ पथके सांगलीत, तर सात पथके कोल्हापुरात कार्यरत आहेत. ८० बोटींच्या साह्याने त्यांचे कार्य अहोरात्र सुरू आहे. 

(सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search