Next
गुंतागुंतीचे हृदय हे...
BOI
Wednesday, February 07 | 09:45 AM
15 0 0
Share this story


हृदयविकाराची कारणे अनेक असतात; पण आहारातील चुकांमुळे जो प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होणे. अरुंद रक्तवाहिन्या पूर्ण क्षमतेने रक्तपुरवठा करू शकत नाहीत आणि ही रक्तवाहिनी जर हृदयालाच रक्तपुरवठा करणारी असेल, तर रक्ताचा पुरवठा न झाल्यामुळे जी अवस्था होते त्याला अॅथेरोस्केलेसीस म्हणतात... ‘पोषणमंत्र’मध्ये आज पाहू या हृदय आणि आहार यांची सांगड कशी घालायची  ते शिकवणारा मंत्र...
......................................
हृदयावर जेवढी गाणी किंवा कविता होतात, तेवढ्या इतर कुठल्याही अवयवावर होत नाहीत, कारण हृदय व डोळे हे दोन अवयव भावना व्यक्त करणारी अवयव असतात. अविरतपणे म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत २४ x ७ काम करणारे हृदय हे अत्यंत लयबद्ध काम करत असते. या लयबद्धतेला वैद्यकशास्त्रातसुद्धा अतिशय महत्व आहे. म्हणूनच दैनंदिन वापरातही ‘हृदयाचा ठोका चुकला’ किंवा ‘हृदयाची धडधड वाढली’ हे वाक्प्रचार आपल्या भावना व्यक्त करत असतात. हृदयाचा हा लयबद्ध  ठेका जर चुकायला लागला, ताल बिघडला, तर आयुष्यात बरीच गडबड सुरू होते. 

प्राणवायूयूक्त रक्त संपूर्ण शरीराला पुरवण्याचे काम हृदयाचे असते. रक्तवाहिन्या रक्त वाहून नेतात. हृदयातील व निलांमधील झडपा सतत उघडझाप करत असतात व त्यामुळे हे कार्य व्यवस्थित सुरू राहते.  हृदयाचा आकार हा साधारणपणे प्रत्येकाच्या मुठीएवढा असतो. एवढेसे हृदय, पण काय कमालीचे काम करते! अशा ह्या हृदयाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव लहानपणापासून असावी आणि त्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले पाहिजेत.

जंकफूड, बेकरी पदार्थ, रस्त्यावरील तळलेले पदार्थ, परत परत तेच तेल टाळण्यासाठी वापरणे, क्रीम, मांसाहार, आईस्क्रीम यांसारखे पदार्थ, सिगारेट, मद्यपान इत्यादी गोष्टी आपल्या तब्येतीस घातक असतात. हे आपणास माहित आहे. पण तब्येत म्हणजे हे सर्व पदार्थ आपल्या हृदयावर प्रत्यक्षपणे परिणाम करत असतात. असे पदार्थ सतत खाल्ल्यास रोगांची मालिकाच सुरू होते. प्रथम वजन वाढायला लागते. नंतर उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह अशी रोगांची मालिका मग यामुळे तरुण वयातच सुरू होते. आजकालचे बैठे काम, शरीराच्या कमी झालेल्या हालचाली, व्यायाम न करणे, कामाचा ताणतणाव, या सगळ्यांची मग यात भरच पडते.   

आजकाल अनेक कंपन्यांमध्ये दर वर्षी वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात.   त्यामुळे खरे तर लोकांना वेळीच आपल्या चुका कळू शकतात, पण तरी वेळ नाही म्हणून या सगळ्याकडे दुर्लक्ष केले जाते. खास करून बॉर्डरवर असलेली साखर बॉर्डरलाईन लिपीड प्रोफाईलचे अहवाल ही एक धोक्याची घंटा असते. यावेळी खरे तर तातडीने डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ गाठणे गरजेचे असते. तसे न करता, काही दिवस आपण वाचलेले, ऐकलेले, प्रयोग करतो आणि तरी जिना चढायला लागल्यावर धाप लागते. दिवस संपता संपता थकवा जाणवतो आणि मग आम्ही डॉक्टर गाठतो.  

हृदयविकाराची कारणे अनेक असतात; पण आहारातील चुकांमुळे जो प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होणे. अरुंद रक्तवाहिन्या पूर्ण क्षमतेने रक्तपुरवठा करू शकत नाहीत आणि ही रक्तवाहिनी जर हृदयालाच रक्तपुरवठा करणारी असेल, तर रक्ताचा पुरवठा न झाल्यामुळे जी अवस्था होते त्याला अॅथेरोस्केलेसीस म्हणतात. कोलेस्टेरॉल कमी व जास्त घनतेची लायपोप्रोटीन्स, संतृप्त व असंत्रुप्त मेद अशाही काही संकल्पना आहेत. आता प्रत्यक्ष हृदयरोगात आहार कसा असावा, हे पाहू या...

हृदयरोगाचा आहार हा कमी उष्मांक, कमी कर्बोदके, सर्वसाधारण प्रथिने, कमी स्निग्ध पदार्थ, त्यातही कमी कोलेस्टेरॉल व बहुअसंपृक्त मेदाम्ले असलेले व सर्वसाधारण जीवनसत्वे व खनिजांचा असावा. आहारात तंतुमय पदार्थ असावेत. 

कर्बोदके : एकूणच उष्मांकाचे प्रमाण कमी करावे लागते. त्यामुळे कर्बोदकेसुद्धा आहारात कमीच असावीत. जर रोग्याला मधुमेह व लठ्ठपणा असेल तर कर्बोदाकांवर विशेष लक्ष द्यावे लागते. बटाटा, ब्रेड, साखर, साबुदाणा असे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. साखरेऐवजी गुळ खाण्याचा सल्ला चुकीचा ठरू शकतो, कारण त्यात उष्मांक एकसारखेच असतात.  गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, थोडा तांदूळही गरजेचाच आहे.

प्रथिने : प्रत्येकाच्या गरजेनुसार प्रत्येक किलो वजनामागे एक ग्रॅम प्रथिने आवश्यक आहेत. ६० किलो वजन असल्यास ६० ग्रॅम प्रथिने आहारात असावीत. डाळी, कडधान्ये, गाईचे दुध, अंड्याचा पांढरा भाग, मासे, कमी उष्मांक असलेले पनीर इत्यादींमधून प्रथिने चालतील, पण मटन, पोर्क, इत्यादी न खाल्लेलेच चांगले.

स्निग्ध पदार्थ : हृदयरोग असणाऱ्यांसाठी स्निग्ध पदार्थ हा खूपच चर्चेचा विषय असतो. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल तयार होत असते. त्यामुळे आहारातून शरीरात जाणाऱ्या कोलेस्टेरॉलबद्दल प्रत्येकाने जागरूक असणे आवश्यक आहे. लोणी, चीज, क्रीम, अंड्याचा पिवळा भाग, मांसाहारातील रेड मिटच्या किडनी, लिव्हर इत्यादी भागात कोलेस्टेरॉल जास्त असते म्हणून हे पदार्थ टाळावेत. आपण ज्याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतो, ते कमी घनतेचे लायपोप्रोटीन्स असतात आणि हेच आपल्या रक्तवाहिन्या अरुंद करतात . त्यामुळे वरील पदार्थ टाळणेच उत्तम. 

रोजच्या आहारात आपण मुख्यत्वे तेल व तुपाचा वापर करतो. तेलाच्या अनेक जाहिराती आपल्याला संभ्रमात पाडणाऱ्या असतात. काही जाहिराती झिरो कोलेस्टेरॉल तेलाच्या असतात, तर काही तेल फिल्टर किंवा रिफाईंड असतात. यावर उत्तम उपाय म्हणजे आलटून-पालटून वेगवेगळ्या कंपन्यांच्या व वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा वापर करावा.  घाण्याचे तेलपण उत्तम असते. तेलबियांपासून काढलेल्या घाण्यावरच्या तेलात स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्वेसुद्धा असतात. इतर तेलांमध्ये त्यांना फोर्टीफाय केलेले असते. ओलिव्ह मोहोरी, करडई तेल उत्तमच आहेत, या सगळ्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक माणसाला एक महिन्याला एक लिटर तेल पुरेसे आहे. वनस्पती तूप व तेल वापरून केलेले पदार्थ टाळलेलेच बरे. साजूक तूप शरीरास उत्तम आहे. प्रत्येकाने रोज २ चमचे (टी स्पून पूर्ण भरून) तूप खावे.  

तंतुमय पदार्थ : भाज्या व फळे तसेच कडधान्य व तृणधान्याचे बाहेरील आवरण तंतुमय असते. काकडी, मुळा, गाजर, सफरचंद यांचे साल न काढता ते स्वच्छ धुवावेत व सालीसकट खावे. पालेभाज्यांची कोवळी देठे पूर्ण वापरावीत. शेंगभाज्यांच्या शिरा न काढता त्या चिराव्यात म्हणजे भरपूर तंतू आपल्या पोटात जातात. हे तंतू बॅड कोलेस्टेरॉल कमी करतात व रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.  

जीवनसत्वे व खनिजे : एखादी मोठी इमारत, छोट्या विटा, त्याहून छोटे कण असलेली वाळू व सिमेंट यांची बनलेली असते. त्याचप्रमाणे जीवनसत्वे व खनिजे यांचे प्रमाण अत्यल्प असले तरीही ते अत्यंत मोठी कामे करत असतात. फळे, भाज्या, दूध, अंडी, सुका मेवा, यांमधून शरीराला याचा पुरवठा होत असतो, पण हृदयरुग्णांनी फळे व भाज्यांच्या माध्यमातूनच याचे ग्रहण करावे. 

या सगळ्यासोबत तज्ञाकडून व्यायाम शिकणे, योगासने, प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या हृदयाची धडधड अनेक वर्ष लयबद्ध होत राहावी असे वाटत असल्यास, नियमित व्यायाम, उत्तम आहार व नियमित वैद्यकीय तपासणी अत्यंत आवश्यक आहे .  

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link