Next
‘एकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Monday, August 13, 2018 | 06:18 PM
15 0 0
Share this article:

'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे'च्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, आमीर खान, किरण राव यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे

पुणे : ‘एकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू’,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे’च्या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पानी फाउंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८’ मध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी (आंधळी) गावाला ७५ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. ७५ तालुक्यांतील सुमारे चार हजार गावांनी या उपक्रमातून या वर्षी २२ हजार २६९ कोटी लिटर पाणी साठविल्याचे; तसेच या पाण्याची किंमत सुमारे चार  हजार ४५४ कोटी रुपये असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.  

‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे’चा पुरस्कार वितरण सोहळा बालेवाडीच्या क्रीडा संकुलात पार पाडला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, पानी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते आमीर खान, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, जलसंपदा मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ व्यासपीठावर उपस्थित होते.

५० लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार माणमधील भांडवली आणि मोताळा तालुक्यातील सिंदखेड यांना विभागून  देण्यात आला, तर ४० लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार आष्टी तालुक्यातील आनंदवाडी आणि नारखेड तालुक्यातील उमठा गावाला विभागून देण्यात आला.

या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘जलसंधारणाची चळवळ ही लोकचळवळ झाली, तरच महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल. लोक एकत्र आले तरच काम होते, हे या स्पर्धेमुळे पुढे आले आहे. कोणतीही योजना ही सरकारी न राहता लोकांची होणे गरजेचे आहे. एकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची आपण सगळेच निर्मिती करू.’

‘या स्पर्धेचे काम ७५ तालुक्यांमध्ये झाले आहे, ते यापुढे १०० तालुक्यांमध्ये व्हावे;तसेच पाण्याचा वापर योग्य रीतीने व्हावा यासाठी यापुढे पीक पद्धती बदलण्यासाठी काम करण्याची गरज आहे’, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार मिळालेल्या गावाला २५ लाख रुपये, दुसरा पुरस्कार मिळालेल्या गावाला १५ लाख रुपये आणि तिसरे पुरस्कार मिळालेल्या गावाला १० लाख रुपये राज्य सरकारतर्फे देण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.  

या उपक्रमात आलेले अनुभव सांगून, आमीर खान म्हणाले, ‘महाराष्ट्र दुष्काळमुक्त करून पाणीदार करण्याचे महाराष्ट्राच्या ११ कोटी लोकांचे स्वप्न आहे. ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. ही प्रक्रिया किती काळ चालेल, हे सांगता येत नाही, मात्र या उपक्रमाची प्रक्रिया, हा अतिशय आनंदाचा भाग आहे.’

या वेळी अशोक चव्हाण म्हणाले, ‘महाराष्ट्रात लोक एकत्र आले तर काहीच अशक्य नाही, हे अमीर खान यांनी दाखवून दिले आहे. अनेकवर्षे शासकीय योजना यशस्वी झाल्या नसतानाही, हा उपक्रम केवळ लोक सहभागी झाल्याने यशस्वी झाला आहे.’

आमीर खान यांनी कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून अजित पवार म्हणाले, ‘हे काम राजकारण विरहीत असले पाहिजे. पुढच्या वर्षी निवडणुका असल्या तरीही हा उपक्रम सुरु राहायला हवा. पाणी योग्य रीतीने वापरण्यासाठी, पिक पद्धती बदलण्याचीही गरज आहे. या उपक्रमातून पाणी वाचविल्यानंतर ऊस, केळी यांसारखी पिके वाढली, की पाण्याचा पुन्हा मोठ्या प्रमाणावर उपसा होईल. ते थांबविण्यासाठी काम केले पाहिजे.’

राज ठाकरे म्हणाले, ‘हा उपक्रम म्हणजे जात, पक्ष आणि मतभेद यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आहे. लोकांचा या उपक्रमातील सहभाग महत्वाचा आहे.’ उपस्थित प्रेक्षकांनी आग्रह केल्यानंतर, या उपक्रमामध्ये श्रमदान करण्यासाठी पुढच्यावर्षी सहभागी होणार असल्याचेही, राज ठाकरे यांनी या वेळी जाहीर केले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हाणाले, ‘इतक्या वर्षांच्या राजकारणातून जे शक्य झाले नाही, ते या उपक्रमातून शक्य झाले आहे. आपण सगळेच माहाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी एकत्र येऊयात.’

विजय शिवतारे म्हणाले, ‘या उपक्रमातून जलसंधारणाबरोरच मन संधारणाचेही काम झाले आहे.’

सत्यजित भटकळ यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, ‘प्रत्येक गावाने आपापले पाणी साठविले, तरच माहाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ शकेल, यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, हा विचार या उपक्रमामागे आहे. प्रशिक्षण, श्रमदान आणि आनंद, ही या उपक्रमाची त्रिसूत्री आहे.’

‘या उपक्रमामध्ये एक हजार ६५० जेसीबी मशिनने काम केले आहे’, असे यात सहभागी असणाऱ्या भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी सांगितले.

या वेळी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली; तसेच या उपक्रमामध्ये एकेकटे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती देऊन, त्यावर तयार करण्यात आलेल्या गाण्याची चित्रफीत किरण राव यांनी सादर केली.

अभिनेते जितेंद्र जोशी आणि स्पृहा जोशी यांनी पुरस्कार सोहळ्याचे निवेदन केले. संगीतकार अजय-अतुल यांनी झिंगाट आणि इतर गाणे सादर करून सोहळ्यात रंगत आणली. या वेळी सोनाली कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, आशुतोष गोवारीकर, पुष्कर श्रोत्री, गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर आदी सिनेकलाकार उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search