Next
शिवधनुष्य पेललेली मेघा!
BOI
Friday, May 25, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


धनुर्विद्या अर्थात तिरंदाजी या खेळात नावारूपाला येत असलेली पुण्याची खेळाडू म्हणजे मेघा अगरवाल. विविध स्पर्धांतील तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्र सरकारने तिला यंदा शिवछत्रपती पुरस्कारानेही गौरवले आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून तिने या खेळातील प्रावीण्य हे एकच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जणू शिवधनुष्यच पेलले आहे. ‘क्रीडारत्ने’ सदरात आज पाहू या तिरंदाजीतील रत्न असलेल्या मेघाबद्दल...
......
धनुर्विद्या अर्थात तिरंदाजी ही खरे तर प्राचीन भारतीय कला; पण ज्या काळात याच्या खेळ म्हणून स्पर्धा सुरू झाल्या, तेव्हा मात्र जागतिक पातळीवर भारतीय खेळाडू या प्रकारात सातत्याने मागे राहिले. डोला बॅनर्जी, दीपिका कुमारी, लिंबाराम यांनी ऑलिंपिकपर्यंत मजल मारली, हे गौरवास्पदच; मात्र पदकांच्या बाबत समाधान मानण्यासारखी स्थिती नाही. या पार्श्वभूमीवर, पुण्यातून मेघा अगरवाल नावाची एक खेळाडू तिरंदाजीत नावारूपाला येत आहे.

दीपिका कुमारीयुवा विश्वकरंडक, विश्वकरंडक पात्रता आणि काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होऊन मेघा अगरवालने आपली छाप पाडली आहे. शाळा, महाविद्यालय, तसेच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे यंदा महाराष्ट्र सरकारने तिला शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे. तिरंदाजीतील ‘कंपाउंड’ प्रकारातच तिने या खेळाला सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षापासून तिने हे एकच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जणू शिवधनुष्यच पेलले आहे. रणजित चामले या अत्यंत निष्णात प्रशिक्षकाकडे तिने तिरंदाजीचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. चामले यांनी २००५मध्ये एक खेळाडू म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. विद्यार्थिदशेतच त्यांनी खेळ आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. क्रीडामानस शास्त्रज्ञ दिवंगत भीष्मराज बाम यांचे सहायक म्हणूनही त्यांनी काम केले. स्वतः खेळत असतानाच २००४पासूनच त्यांनी ‘तिरंदाजी अकादमी’ सुरू केली. या अकादमीने आतापर्यंत सबज्युनिअर, ज्युनिअर, वरिष्ठ गटांत अनेक खेळाडू घडवले. याच मुशीतून मेघा अगरवालच्या रूपाने राष्ट्रीय खेळाडू तयार झाली आहे. तिरंदाजी या खेळाशी संबंधित विषयावर चामले सर ‘पीएचडी’देखील करत आहेत. आपला एक तरी शिष्य ऑलिंपिक पदक पटकावत नाही, तोपर्यंत हे प्रशिक्षणाचे काम थांबवायचे नाही, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. मेघाच्या रूपाने त्यांना आशेचा किरण दिसला आहे. मेघाकडे उत्तम नजर आहे. तीर आणि धनुष्यावर अप्रतिम नियंत्रण ठेवण्याचे कसब आहे. ही मुलगी देशाला तिरंदाजीतील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून देईल, असा विश्वास त्यांना वाटतो.

मेघाचे पालक सुनील आणि आशा आगरवाल यांचा तिला चांगला पाठिंबा आहे. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वतोपरी मदत ते करतात. सध्या भारतीय स्तरावर दीपिकाकुमारी या एकाच खेळाडूवर आपल्या आशा केंद्रित आहेत; मात्र मेघा ज्या वेगाने प्रगती करत आहे, ते पाहता ती लवकरच दीपिकाकुमारीची बरोबरी करील, असे वाटते.

थायलंडमध्ये अलीकडेच झालेल्या प्रिन्सेस करंडक स्पर्धेत मेघाने पदक मिळवले. या कामगिरीच्या जोरावर तिची जुलैमध्ये चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात निवड झाली आहे. तिरंदाजीतील कंपाउंड प्रकारात राष्ट्रीय पातळीवर आजवर सातत्यपूर्ण कामगिरी करताना तिने २० स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. सध्या ती ‘एमआयटी’मधून बीबीए करत असून, तिचे शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. मेघाने आशियाई स्पर्धेत पदक पटकावले, तर ती सप्टेंबर महिन्यापासून विविध देशांत होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धांसाठी पात्र ठरेल. तिने ज्युनिअर, तसेच वरिष्ठ गटातही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आता ती सज्ज झाली आहे चीनमधील स्पर्धेत यशस्वी कामगिरी करण्यासाठी. 

मुंबई महापौर करंडक इनडोअर राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत मेघाच्या जबरदस्त कामगिरीमुळे महाराष्ट्राला विजेतेपद मिळाले होते. या स्पर्धेत सर्व राज्यांचे संघ सहभागी झाले होते. झारखंड राज्याला तिरंदाजांची खाण समजले जाते; मात्र या स्पर्धेत त्यांना दुसऱ्या स्थानावर, तर उत्तर प्रदेशला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतूनच भारताच्या आशियाई संघाची निवड झाली. मेघाच्या कामगिरीवर लक्ष टाकले, तर राज्याला सर्वांत जास्त पदके तिनेच मिळवून दिली असल्याचे लक्षात येते. या स्पर्धेत महाराष्ट्राने ३१ सुवर्ण, ३४ रौप्य आणि ३६ ब्राँझ अशी एकूण १०१ पदके पटकावली आणि ३९९ गुण मिळवून स्पर्धा जिंकली. या स्पर्धेपूर्वी तिने भुवनेश्वर येथील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. ५० प्लस ५० मीटर कंपाउंड प्रकारात सध्या भारतात मेघाइतकी निपुण खेळाडू विरळाच. सध्या जागतिक मानांकनात ती १९७व्या स्थानावर आहे; मात्र आशियाई स्पर्धेत तिने पदक पटकावले, तर पहिल्या ५० खेळाडूंपर्यंत तिची गुणांमुळे प्रगती झालेली दिसेल.

गेल्या काही वर्षांत पुण्याने राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला आहे. नागपूरमध्ये अलीकडेच झालेल्या स्पर्धेत पुण्याने २१ सुवर्ण, १७ रौप्य आणि आठ ब्राँझ अशी ४६ पदके पटकावून विजेतेपद मिळवले. यातही मेघाची कामगिरीच जास्त चर्चिली गेली. मेघाने या स्पर्धेत तीन सुवर्ण आणि एक रौप्य अशी चार पदके मिळवून इतर खेळाडूंपेक्षा सरस कामगिरी केली. 

सध्या मेघा चामले सरांच्या अकादमीत तासन् तास कसून सराव करत आहे तो आशियाई स्पर्धेतील पदक जिंकण्यासाठी. या स्पर्धेतील पदक तिला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देईल. या स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांत तिला थेट प्रवेश मिळेल. त्यातूनच तिला टोकियोत २०२०मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठीच्या पात्रता स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे. हे सगळे अडथळे पार करून ती टोकियोतील स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिथे जाऊनही यशस्वी झाली, तर ती भारताची पहिली ऑलिंपिक पदकविजेती महिला तिरंदाज ठरेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘क्रीडारत्ने’ या त्यांच्या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search