Next
‘व्हॉट्सअॅप’ने जपला नात्यांमधील ओलावा...
BOI
Friday, November 23, 2018 | 05:01 PM
15 0 0
Share this story


आजच्या या डिजिटल युगात सोशल मीडियामुळे माणसं एकमेकांपासून दुरावत आहेत, अशी ओरड सगळे करतात, परंतु याच सोशल मीडियाचा योग्य वापर केला, तर माणसा-माणसांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासही तो उपयोगी ठरतो. अशाच एका व्हॉट्सअॅप ग्रुपने नात्यांना टिकवून ठेवलेल्या एका कुटुंबाबद्दल सांगत आहेत, याच कुटुंबाच्या एक सदस्य अमृता आर्ते.... 
..................
अमृता आर्तेमोबाइलमधली झेंडूची फुलं, आपट्यांची पानं सगळी साफ केली, कोजागिरीला २०-२५ लिटर दूध गोळा झाले होते, तेही काढून टाकले. दिवाळीचा फराळ जमा झालेला सगळ्यांना वाटून टाकला आणि मोबाइल स्वच्छ केला. आता लग्नांच्या निमंत्रण पत्रिका आणि नंतर सांताक्लॉजच्या गिफ्ट्ससाठी जागा पाहिजे ना. ‘व्हॉट्सअॅप’वरचा हा मेसेज वाचला आणि विचार केला, खरंच घरात साचलेला कचरा, धूळ तर आपण रोजच साफ करत असतो; पण मनावर आलेलं मळभ, नात्यांमधे निर्माण झालेली दरी दूर करायला सणांचंच निमित्त हवं. 

लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला; पण राजकीय पक्षांनी तिथेही आपली मक्तेदारी सोडली नाही. एक तर मालमत्ता, हक्क यांमुळे घरा-घरांत द्वेष, वैमनस्य आहे. नोकरी, व्यवसाय किंवा एकंदरीतच करिअरमुळे आताची पिढी स्वकेंद्रित बनली आहे. अभ्यासातील वाढत्या स्पर्धेमुळे मुलांचं घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे आणि अशा परिस्थितीत जर आपल्या कुटुंबाला एकजूट ठेवायचं असेल, तर ते काम फक्त आणि फक्त आपले सण-समारंभच करू शकतात. 

‘हॅपी फॅमिली’ नावाचा आमचा हजारे कुटुंबीयांचा व्हॉट्सअॅप ग्रुप. देहानं आम्ही सगळे दूर; पण मनानं कायम जवळ. आम्ही एकत्र असलेल्या या ग्रुपमध्ये हाय, हॅलो, गुड मॉर्निंग अशा फॉरवर्ड मेसेजेसपेक्षा प्रेमानं मारलेल्या गप्पा, एकमेकांची केलेली विचारपूस, वाढदिवसाचे अभीष्टचिंतन, संजू (भाई)ची मार्मिक टिप्पणी, स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल केलेले कौतुक, कीर्तीच्या उत्स्फूर्त कविता आणि मंगलताईच्या विनोदी कमेंट्स यांनी सुरू होणारी सकाळ रोज नवीन उमेद देते, धीर देते, पाठिंबा देते आणि भक्कम आधारही देते.     
                    आपली माणसं, 
              बाजारात मिळत नसतात!
                 नाती-गोती जपून ती 
            निर्माण करावी लागतात!

नातेवाईकांबद्दल किंवा मित्रपरिवाराबद्दल मनात कितीही ओढ असली, तरीही रोजच्या धावपळीत एकमेकांना भेटणं शक्य होत नाही. मग वाट पाहिली जाते ती सणांची. संक्रांत, होळी, रक्षाबंधन, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, भाऊबीज या सणांना आम्ही सगळे वेळात वेळ काढून एकत्र येतोच. सणांच्या निमित्तानं भेटणं तर होतंच, पण त्याचबरोबर मिळणारा आनंद, उत्साह हा अवर्णनीय असतो. डिजिटल भाषेत सांगायचं झालं, तर जणू काही १०० टक्के चार्ज होते.  

आमचा गणपती उत्सव दीड दिवसाचा असतो. त्यात मग त्याची आरास करण्यापासून ते जेवणापर्यंत सगळ्यांचा एकत्र सहभाग असतो. स्त्री-पुरुष, लहान-मोठे असा काहीच भेदभाव नसतो. प्रत्येक जण आपापल्या परीनं मदत करत असतो. सगळ्यांनी मिळून केलेली मस्ती, धमाल आमच्या नात्याला अधिक परिपक्व बनवत असते. 

दिवाळी म्हणजे गुलाबी थंडी, सुवासिक उटणं, अभ्यंगस्नान, आकाशकंदील, रांगोळ्या, फटाके, खमंग, खुसखुशीत फराळ आणि त्याचबरोबर नात्यातील प्रेमाचे बंध अजून घट्ट करणारे क्षण. भाऊबीज हा आमचा सर्वांचा आवडता दिवस. मी, दीपाली व पूनम आम्ही तिघी चुलत बहिणी मिळून पारंपरिक पद्धतीनं औक्षण करूनच आमची भाऊबीज एकत्र साजरी करतो. सख्खे, चुलत, आत्ये, मावस असे मिळून आठ-दहा भाऊ व त्यांचे परिवार असे सगळे मिळून जवळपास २५-३० जण आम्ही ठाण्याला आईच्या घरी जमतो. भावांची ओवाळणी, सगळ्यांच्या आवडीचा घरगुती बेत, आम्हांला मिळालेले गिफ्ट्स या सगळ्याबरोबरच मामा-भाच्याचं प्रेम, मामीनं आठवणीनं बच्चे कंपनीसाठी पाठवलेली चॉकलेट्स आणि गिफ्ट्स आणि या सगळ्यासोबत भरपूर गप्पा मारत आम्ही भाऊबीज साजरी करतो. धम्माल करतो.  

आता वेळ गेला, काळ बदलला. जो तो आपापल्या संसारात  व्यग्र झाला. एकत्र येणं जमेनासं झालं, असं कित्येकांच्या बाबतीत हल्ली होताना दिसतं. यामुळेच मात्र आम्ही स्वतःला नशीबवान समजतो, की आजही आम्ही हजारे कुटुंब एकत्र सगळे सण साजरे करतो. 
दुःख उरात दाबून वेड्या,
झोप येत नसते!
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते..
                       
संपर्क : अमृता नीलेश आर्ते, वसई
ई-मेल : 1.anagha@gmail.com

(कुटुंबीयांसोबतची दिवाळी या विषयावरील अमृता आर्ते यांचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link