Next
‘कलेतून मिळते ऊर्जा’
BOI
Monday, October 08, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story

‘नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर जी काही ऊर्जा, उत्साह मिळालेला असतो, तो अधिक प्रेरणादायी, आनंददायी असतो. त्यानंतर थकायला होत नाही, उलट अधिक उत्साही वाटायला लागते,’ असे अभिनेत्री मानसी जोशीला वाटते. जीवनात यशस्वी ठरलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या सकारात्मकतेचा वेध घेणाऱ्या ‘बी पॉझिटिव्ह’ या सदरात आज मुलाखत अभिनेत्री मानसी जोशी हिची...
..................
- तुझ्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत कोणता? 
- माझ्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणजे माझी कला. नाटक, गाणे किंवा अन्य कोणतीही कला सादर करते तेव्हा मला जी ऊर्जा मिळते, ती पुढे दीर्घ काळ उपयुक्त ठरते. आपण शरीराला ताजेतवाने करण्यासाठी ‘स्पा’मध्ये जातो, त्याप्रमाणे कला सादरीकरणातून मनाला ‘स्पा’ची ट्रीटमेंट मिळते, असे मला वाटते. नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर जी काही ऊर्जा, उत्साह मिळालेला असतो, तो अधिक प्रेरणादायी, आनंददायी असतो. त्यानंतर थकायला होत नाही, उलट अधिक उत्साही वाटायला लागते. त्यामुळे अभिनय, गाणे या माझ्या कलांनाच मी माझ्या ऊर्जेचे स्रोत मानते. 

- अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली? 
- आमच्या घरी लहानपणापासूनच उत्तम साहित्य वाचण्याचे संस्कार झाले. त्यामुळे माझ्यातील कलाकार घडवण्याचे काम नकळतपणे तेव्हापासूनच होत गेले. माझे वडील पु. ल. देशपांडे यांचे निस्सीम चाहते आहेत. त्यामुळे ‘पुलं’ची सगळी पुस्तके, कॅसेट्स आमच्याकडे आहेत. लहानपणी ती पुस्तके वाचून, कॅसेट्स ऐकून आम्ही पाठ केल्या होत्या. आम्ही भावंडे जमलो, की ते सगळे एकमेकांना म्हणून दाखवायचो. यातूनच मला कुठे तरी अभिनयाची आवड निर्माण होत गेली. दहावी झाल्यानंतर पुढे काय करायचे असा प्रश्न आला, तेव्हा नाटकात काम करायचे, अभिनय करायचा हे पक्के झाले होते. त्यामुळे हळूहळू त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. 

- आयुष्यातील असा एखादा प्रसंग सांगता येईल, ज्यातून सकारात्मक ऊर्जेच्या बळावर बाहेर पडता आले?
- अशी काही खास आठवण नाही; पण मध्यंतरी मी काही वर्षे अभिनयात सक्रिय नव्हते. व्हॉइसओव्हर, डबिंगच्या कामांमध्ये खूप व्यग्र असल्याने नाटक, सिनेमा, मालिका यांत सातत्याने काम करत नव्हते. कालांतराने जेव्हा काहीतरी बदल हवाय, असे वाटायला लागले, तेव्हा अभिनय क्षेत्रात यायचे ठरवले; पण तेव्हा सुरुवातीला हातात काही कामच नव्हते. त्या काळात लुई हे या लेखिकेचे ‘सॅक्रेड’ हे पुस्तक वाचनात आले. आता जी ‘अफमेशन थेरपी’ सांगितली जाते, म्हणजे जे तुम्हाला हवे आहे, पण अद्याप मिळालेले नाही, ते आहे असेच गृहीत धरायचे, ती थेरपी त्यात मांडली आहे. ते वाचून माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. 

- सकारात्मक पद्धतीने कसे जगावे, याबद्दल लोकांना काय सांगशील?
- सकारात्मक राहणे म्हणजे दु:ख नाकारणे नव्हे. आपल्याला येणाऱ्या अडचणी, दु:खे आहेत, त्यांच्याकडे काणाडोळा करून आनंदी राहणे म्हणजे स्वतःची फसवणूक असते. तसे न करता अडचणींचा स्वीकार करून त्या परीक्षा आहेत, असे समजले पाहिजे. जीवनात माणूस म्हणून आपली नव्याने जडणघडण होण्यासाठी होत असलेल्या त्या घडामोडी आहेत, असा विचार करून त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला, तर आपण नक्कीच त्यातून बाहेर पडू शकतो. एक खंबीर व्यक्ती म्हणून उभे राहू शकतो. यातून मिळणारी ऊर्जा आपल्याला सकारात्मक बनवतेच; पण आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनाही ती प्रेरणा देते. 


(‘बी पॉझिटिव्ह’ हे सदर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होते. त्यातील सर्व मुलाखती https://goo.gl/gfcuAb या लिंकवर उपलब्ध आहेत. मानसी जोशी यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link