Next
टायगर नेस्ट मॉनेस्ट्री : आनंददायी भूतानचा विस्मयकारक ठेवा!
BOI
Tuesday, December 11, 2018 | 03:23 PM
15 0 0
Share this article:

पारो घाटीतून दिसणारी टायगर नेस्ट मॉनेस्ट्री

चिपळूणच्या धीरज वाटेकर यांनी भूतान पर्यावरण अभ्यास दौऱ्यांतर्गत भूतानमधील ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’ हा ट्रेक नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण केला. आज ११ डिसेंबर, जागतिक पर्वत दिन. या निमित्ताने तेथील पर्वतरांगा, पारो शहर, पवित्र बौद्ध ठिकाणे, अत्यंत कल्पकतेने बांधलेली मॉनेस्ट्री अशा अनेक बाबींवर त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेख...
........................... 
सहा-सात महिन्यांपूर्वी आमचा ‘भूतान पर्यावरण अभ्यास दौरा’ निश्चित झाल्यापासून तेथील ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’ मनात घर करून राहिली होती. भूतानची जागतिक ओळख असलेले टायगर नेस्ट मॉनेस्ट्री (तक्तसांग मठ-तक्तसांग मॉनेस्ट्री) हे पारो शहराच्या घाटीतील सर्वांत पवित्र आणि अद्भुत बौद्ध ठिकाण. समुद्रसपाटीपासून ३१२० मीटर (१० हजार २४० फूट) उंच पर्वतावर एका कड्यात अत्यंत कल्पकतेने बांधलेल्या या मॉनेस्ट्रीपर्यंत पोहोचणे सहजसाध्य नसल्याच्या जाणिवेतून मनात निर्माण झालेल्या साऱ्या प्रश्नांना अखेर ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’चा महत्त्वपूर्ण ट्रेक यशस्वी झाल्यावर (१५ नोव्हेंबर २०१८) उत्तरे मिळाली. आजच्या आधुनिक काळात अशा पर्वतांचे महत्त्व जपण्याची गरज लक्षात घेऊन युनोने सन २००३पासून दर वर्षी ११ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक पर्वत दिन’ घोषित केला. गिरी-पर्वतांचा, निसर्गाचा आणि वन्यजीवनाचा जवळचा संबंध आहे. आपल्याकडे बर्फाळ डोंगर भागातही पूर्वापार मनुष्यवस्ती आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने दूर डोंगरी राहणारे लोक त्यांच्या आदिम वस्त्या, त्यांच्या परंपरा, संस्कृती यांचे स्मरण करण्याचा, त्यांची स्थिती, समस्या जाणून घेण्याचा हेतू असतो. आजच्या निमित्ताने आपण ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’ या आनंददायी भूतानच्या विस्मयकारक ठेव्याबद्दल जाणून घेऊ या.


आपला सह्याद्री आणि पूर्वेकडील हिमालयासह जगभरातील पर्वतांचे आकर्षण सर्वांनाच आहे. सुमारे साडे तेवीस हजार फुटांपेक्षा अधिक उंची असलेली १०९ पर्वतशिखरे पृथ्वीवर आहेत. त्यातली बरीचशी आपल्या हिमालयातच आहेत. मानवी संस्कृतीच्या विकासात पर्वतांच्या अस्तित्वाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्वतांना मानवी, दैवी रूपातही चित्रित केले गेले आहे. या पर्वतांत आपण पूजनीय व्यवस्थाही अनेकदा पाहतो. जगातील छोट्या-छोट्या जमातीही प्राचीन काळापासून पर्वतांच्या आश्रयाने राहत आहेत. या लोकांची स्वतंत्र जीवनशैली, संस्कृती असते आणि ती त्यांची वेशभूषा, दाग-दागिने, संगीत यातून व्यक्त होत असते. भूतानमधील पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या लोकांनी पिढ्यान्-पिढ्या पर्यावरणाचा समतोल जपल्याचे आपल्याला चांगलेच जाणवते. पर्वतांच्या अस्तित्वामुळे जगात मोठ्या, खोल नद्या निर्माण झाल्या. या नद्यांच्या काठावर विविध संस्कृतींचा विकास झाला. पर्वतांनी काळे ढग अडवून पाऊस पाडून जगभरातील विशाल नद्यांना पाणी पुरवले आहे. आजच्या आधुनिक काळात जगातले सर्वच पर्वत ‘पर्यटनक्षेत्र’ झाले आहेत. अनेक ठिकाणी पर्यटनाची शिस्त कमी-कमी होत गेली आहे. हिमालयातही प्लास्टिकचा कचरा ढिगाने दिसू लागला आहे. स्वच्छ पाण्याच्या नद्या, अनेक औषधी वनस्पतींची जंगले वाढवणारे पर्वत आणि त्यावरील निसर्गतः संतुलित वन्यजीवन, विकासाच्या नावाखाली आपण  बिघडवायला सुरुवात केली. पर्वतीय मार्गांची गरज सांगून तिथे वाहनांच्या प्रदूषणाचा त्रासही आता जाणवू लागला आहे. या साऱ्यांपासून काही अंशी आज तरी टायगर नेस्ट दूर आहे. अशा स्थितीत ते पाहण्याचे भाग्य मिळाले, हे महत्त्वाचे.

पायथ्याचा पटरी बाजार  (लेखातील सर्व छायाचित्रे - धीरज वाटेकर)

आज संपूर्ण जगभरात ‘टायगर नेस्ट’ हे भूतानची ओळख बनले आहे. पारो शहराच्या बाहेर एका उंच डोंगरावर तक्तसांग वसलेले आहे. पारोपासून येथे येण्यासाठी टॅक्सी ८०० ते १००० रुपये भाडे घेते. तक्तसांग ही तिबेटी बौद्ध धर्माची एक प्रसिद्ध मॉनेस्ट्री आहे. पारो व्हॅलीत ३१२० मीटर उंच टेकडीवर ह्या मॉनेस्ट्रीपर्यंत जाणारा पदभ्रमणाचा मार्ग आव्हानात्मक आहे. शहरातील रस्त्यापासून दूरवर या मॉनेस्ट्रीकडे नजर टाकली असता, तिथे पोहोचणे अशक्यच वाटते. या उंच धार्मिक स्थळावर पोहोचण्यासाठी पगडंडीनुमामार्गे पायी चालत (ट्रेकींग) जावे लागते. पारो शहरापासून पगडंडीनुमा हे ट्रेकिंगच्या बेसचे ठिकाण १२ किमी असून येथून ९०० मीटर खडी चढण चढावी लागते. वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही (धीरज वाटेकर), आमचे सहकारी- पर्यावरणवादी चळवळीतील कार्यकर्ते विलास महाडिक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारतीचे सदस्य बाळासाहेब चोपडे (पलूस-सांगली), गुरूवर्य प्राथमिक शिक्षक मार्गदर्शक पुस्तिकेचे उपसंपादक- शिक्षक तुकाराम अडसूळ (पारनेर-अहमदनगर) आणि मुक्त पत्रकार संतोष दिवे (संगमनेर-अहमदनगर) यांच्यासह १५ नोव्हेंबर २०१८ला सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत हा ट्रेक पूर्ण केला. या वेळेत परिसरात सरासरी ६°से. तापमान होते. हा ट्रेक करू इच्छिणाऱ्यांनी शक्य तितक्या पहाटे लवकर प्रवास सुरू करावा. पगडंडीनुमा येथे पायथ्याशी आपल्याला तिकीट काऊंटरवर प्रतिव्यक्ती ५०० रुपये देऊन तिकीट घ्यावे लागते. हे तिकीट जपून ठेऊन पुढे मॉनेस्ट्रीच्या मुख्य दरवाजावर तपासले जाऊनच प्रवेश दिला जातो. आपण जिथे आपल्या गाड्या थांबवून ट्रेकिंग सुरू करतो, त्या मार्गावर सुरुवातीला ‘पटरीबाजार’ आहे. येथे हस्तकौशल्यातून साकारलेल्या कोरीवकाम केलेल्या बौद्ध संस्कृती दर्शविणाऱ्या लाकडी वस्तू, छोट्या मूर्त्या, वज्राच्या प्रतिकृती मिळतात. चालायला सुरुवात करताना तिथे पन्नास रुपये भाड्याने मिळणारी काठी अवश्य घ्यावी. ट्रेकिंगदरम्यान स्वच्छता आणि शिस्त कमालीची जाणवते. पायथ्याशी खाद्यपदार्थ विकणारे लोक नाहीत. पटरीबाजारापासून थोडे पुढे गेले, की ‘इथून पुढे दुकाने लावायला परवानगी नाही’, असे लिहिलेला बोर्ड दिसतो. महत्त्वाची गोष्ट अशी, की भूतानमध्ये बोर्डवरच्या सूचनांचा लोक आदर करतात.

प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनविलेले प्रार्थना चक्र

आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या सायप्रस, पाईन वृक्षांच्या जंगलातून आमचा प्रवास सुरू झाला. थोडे पुढे गेल्यानंतर एक धबधबा आपले स्वागत करतो. तेथे झऱ्याच्या पाण्याच्या मदतीने गोल फिरणारे बौद्ध प्रार्थना चक्र पाहून विशेष वाटले. बौद्ध धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी पताका भरपूर दिसल्या. हा संपूर्ण मार्ग कच्चा आहे. त्यामुळे काळजीपूर्वक चालणे शहाणपणाचे आहे. बऱ्याच ठिकाणाहून पारो व्हॅलीचे सुंदर दृश्य दिसते. अर्धा प्रवास पूर्ण केल्यावर एक मोठे प्रार्थना चक्र दृष्टीस पडले. इथपर्यंत येण्यासाठी घोडे/खेचरे उपलब्ध असतात. प्रति माणसी त्यांचा दर सहाशे रुपये इतका आहे. आपल्याजवळील वेळेच्या उपलब्धीनुसार आपण याबाबतचा निर्णय घेऊ शकतो. मात्र यापुढचे दोन अत्यंत कठीण टप्पे आपल्याला आपल्याच पायाने सर करावे लागतात. उतरतानाही आपल्याला आपल्याच पायाने संपूर्ण टायगर नेस्ट मॉनेस्ट्री उतरावी लागते. काठीची गरज म्हणूनच असते. सायप्रस वृक्षांच्या दाटीवाटीतून आकाशाच्या दिशेने जाणारी वाट आपल्याला चांगलीच दमवते. अर्धे अंतर पार केल्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनविलेले प्रार्थनाचक्र त्याच्या रंगसंगतीमुळे लक्ष वेधून घेते. अति उंची (हाय अल्टिट्यूड), विरळ हवा, थंडी आणि खडी चढण यांचा सामना करत लवकर दमछाक होणाऱा असा हा प्रवास करावा लागतो. रस्त्यात काही ठिकाणी पिण्यासाठी झऱ्याचे पाणी (खनिजातील शुद्ध पाणी) आहे. पहिल्या टप्प्यावर मुख्य रस्त्यापासून थोडा दूर खानपान व्यवस्था पुरविणारा एक कॅफेएरिया/रेस्टॉरंट आहे. आपण आवश्यकतेनुसार येथे आराम करू शकता. कॅफेटेरिया सामन्यात: महागडा आहे. पर्यटक शक्यतो ट्रेकवरून परतताना येथे वेळ घालवितातच.

‘व्ह्यूपॉईंट’वरून दिसणारी टायगर नेस्ट मॉनेस्ट्री

इथून पुढे आपल्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरु होतो, जो आपल्याला टायगर नेस्ट ‘व्ह्यू पॉईंट’पर्यंत नेतो. चालताना उजव्या हाताला डोंगर उतारावर झाडेच झाडे नजरेस पडत होती. त्यांच्या विविध रंगांच्या शेड्स फोटो क्लिक करायला भाग पाडत होत्या. कुणीतरी विचार करून गर्द आणि फिकट रंगाची झाडे लावली असावीत, असेही वाटले. व्ह्यू पॉईंटवरून आपल्याला मॉनेस्ट्रीसमोरच अगदी जवळ दिसते. संपूर्ण मॉनेस्ट्रीचे देखणे फोटोज आपल्याला येथून टिपता येतात. आपण इथपर्यंत आल्याच्या क्षणांनाही आपण कमेऱ्यात क्लिक करू शकता. पारो रस्त्यावरून पाहताना, जिथे पोहोचणे जवळपास अशक्य वाटते, ते आता इथे पोहोचल्यावर काहीसे सोपे वाटू लागते.

प्रवासाचा तिसरा, पायऱ्या-पायऱ्यांचा टप्पा इथूनच सुरू होतो. पहिल्यासह पुढील दोन्हीही टप्पे आपले ट्रेकिंगचे कसब पणाला लावण्यास भाग पाडतात. अगदी शेवटच्या या टप्प्यात आपल्याला समोर मॉनेस्ट्री दिसत राहते, मात्र ती पलिकडच्या डोंगरावरील कड्यात असल्याने फूटभर उंचीच्या ४०० पायऱ्या उतरून पुन्हा ३०० पायऱ्या चढण्याची कसरत करूनच मॉनेस्ट्रीत पोहोचावे लागते. तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या ४०० पायऱ्या उतरल्यावर आपण एक पूल पार करतो. पुलाच्या डाव्या हाताला मोठा धबधबा कोसळताना दिसतो, याला पवित्र मानतात. पवित्र मानला गेलेला धबधबा, बौद्ध धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या मंत्र लिहिलेल्या रंगीबेरंगी कापडी पताका आपले लक्ष वेधून घेतात. येथून समोर पारो घाटीचे सौंदर्य तर डावीकडे कड्याला बिलगलेली ताक्सांग मॉनेस्ट्री, डोळे मिटताक्षणी ध्यान लागावे इतकी शांतता, वातावरणात पवित्र धबधब्याच्या कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून मानवी मन वेडे होऊन जाते. टायगर नेस्ट मॉनेस्ट्रीच्या समीप पोहोचल्यानंतर समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट उंचीवरील ती अनोखी शांतता आम्ही अनुभवली. रंगीबेरंगी पक्षी, वनराई यांनी युक्त असलेल्या या ठिकाणी आम्हाला कायम थंडी जाणवली. इथपर्यंत आपण मोकळेपणाने, काळजीपूर्वक फोटोग्राफी करू शकतो. पुढे प्रत्यक्ष ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’त फोटोग्राफी करण्यास मनाई आहे. कॅमेरा, पिशव्या आणि मोबाइलसारख्या किमती वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बाहेर लॉकर उपलब्ध आहेत. सिक्युरिटी केबिनमध्ये तिकीट दाखवून आत गेले, की आपल्याला लॉकर मिळतो.

मॉनेस्ट्रीत पोहोचल्यावर समोरच्या दरीतले दृश्य पाहिले आणि मन प्रसन्न झाले. समुद्रसपाटीपासून १० हजार फुटांवर पर्वताच्या एका कोपऱ्यात आम्ही उभे होतो. नजरेसमोर धुक्याने भरलेली दरी होती. धुंद करणाऱ्या वातावरणात गारवा जाणवत होता. टेकडीच्या कड्यावर बांधलेली मॉनेस्ट्री वरच्या दिशेने चार मुख्य भागांत विभागलेली आहे. या मॉनेस्ट्रीबद्दल काही आख्यायिका आहेत. सर्वांत प्रमुख मॉनेस्ट्रीत बौद्ध वज्रयान पंथाचे गुरू आचार्य पद्मसंभवा यांचे स्थान आहे. एका लोककथेनुसार तत्कालीन सम्राट पत्नी येशे सोग्याल स्वेच्छेने आचार्य पद्मसंभवा यांची पत्नी बनली. पुढे तिने स्वतःला वाघिणीच्या रूपात बदलवून येथे आणले. या परिसरात एकूण आठ गुहा आहेत. ज्या वेगवेगळ्या गुरूंच्या नावाने ओळखल्या जातात. २००५मध्ये जपान सरकारच्या सहकार्याने मॉनेस्ट्रीत सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. मंदिरात आचार्य पद्मसंभवा यांच्यासह गौतम बुद्ध यांची विशाल मूर्ती आहे. मॉनेस्ट्रीच्या निर्मितीची कथाही आचार्य पद्मसंभवा यांच्याशी संबंधित आहे. भूतानच्या लोककथांनुसार याच परिसरात  आठव्या शतकात, आचार्य पद्मसंभवा यांनी ध्यानधारणा केली होती. तिबेटच्या दिशेने एका वाघिणीच्या (काही लोककथांनुसार ही वाघीण म्हणजे त्यांची पत्नी) पाठीवर बसून या गुहेतील राक्षसाला मारण्यासाठी ते येथे आले होते. राक्षसाचा पाडाव केल्यानंतर इथले सुंदर वातावरण पाहून त्यांनी इथेच तीन महिने कडक तपश्चर्या केली. त्यानंतरही त्यांनी तीन वेळा येथे तपश्चर्या केली होती. आचार्य पद्मसंभवा यांच्या आयुष्यात त्यांनी असा मोठा मुक्काम फार कमी ठिकाणी केलेला असल्याने या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

बौद्ध धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी पताका

भूतानमध्ये बौद्ध धर्माची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. या मॉनेस्ट्रीत भगवान गौतम बुद्ध आणि आचार्य पद्मसंभवा यांच्या मुर्त्या आहेत. प्रत्येक मंदिरात प्रवेशद्वाराजवळील भिंतीनजिक बुद्धाची मूर्ती दिसते. मंदिरात प्रवेश केल्यावर सर्व प्रथम आसनास नमस्कार केला जातो. त्यानंतर मूर्तीस तीनदा गुढघे टेकून नमस्कार करण्याची पद्धत आहे. मूर्तीस फुले/पाने/अक्षता/अगरबत्ती वाहण्याची पद्धत नाही. प्रसाद म्हणून काहीही म्हणजे बिस्किट्स, मॅगी, वेफर्ससुद्धा ठेवता येतात. सर्व प्रसाद एका मोठ्या फुलपात्रात ठेवला जातो. मूर्तीसमोर पातळ केलेल्या डालडा तुपाचा दिवा लावतात. मूर्तींच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेल्या रंगीत कमानी ठेवलेल्या पाहिल्या.

भगवान गौतम बुद्धांच्या २८ अवतारांपैकी दुसरे बुद्ध ‘गुरू पद्मसंभवा’ यांनी भूतानमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. यांच्या आणि बुद्धांच्या प्रतिमेत फक्त मिशांचा फरक आहे, यांच्या चेहऱ्यावर पातळ मिशा असतात. यांना भूतानची संरक्षक देवता मानले जाते. हिनयाना, महायाना आणि वज्रयाना या बुद्धिझममधील तीन पंथांपैकी वज्रयाना पंथाला मानणारा हा देश आहे. यामध्ये नामस्मरण आणि शुद्धीकरणाला महत्त्व आहे. प्रत्येक भूतानी माणसाने आयुष्यात कधीतरी एकदा या ठिकाणी यावे, असा भूतानमधला दंडक आहे. आचार्य पद्मसंभवा यांना स्थानिक भाषेत गुरू रिम्पोचे म्हणूनही ओळखले जाते. गुरू पद्मसंभवा वाघिणीवरून ज्या गुहेतून या भागात आले त्या गुहेत उतरल्यावर एका अवचित क्षणी हृदयावर प्रचंड दबाव आलेला जाणवला. कारण सुमारे १० हजार फूट उंचीवर दोन मोठ्या दगडांच्या कपारीत अरुंद मार्गाने खोल दरीत शिरून पारो घाटीचा नजारा आणि टायगर नेस्ट पाहिल्याचा तो क्षण आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही. हा सारा वारसा समजून घेतल्यावर आम्ही भगवान गौतम बुद्धांपुढे नतमस्तक झालो. सन १६९३मध्ये येथे मॉनेस्ट्री उभारण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी मॉनेस्ट्रीचे काम होत राहिले. काही वर्षापूर्वी म्हणजे १९ एप्रिल १९९८ला मॉनेस्ट्रीला आग लागल्याने रोप वेच्या साहाय्याने आजची मॉनेस्ट्री नव्याने उभारली गेली. मूळ सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी नंतर रोपवे काढून टाकण्यात आला. हे बौद्ध भिक्षूंचे विशेष वास्तव्याचे ठिकाण आहे. मॉनेस्ट्रीच्या परिसरात भूतानची अद्भुत कला पाहता येते. आपण पर्यटक म्हणून फिरतो त्याच्यावर विद्यार्थ्यांचे एक गुरुकुल आहे. हा सारा परिसर पाहायला साधारणत दोन तास पुरतात. ही मॉनेस्ट्री पूर्वेला असल्याने भर सकाळी मॉनेस्ट्रीच्या मागून सूर्य उगवताना चांगले फोटो मिळवणे अवघड होते. परतीच्या प्रवासात दुपारी सूर्य मॉनेस्ट्रीच्या बरोबर समोर आणि आपल्या मागे असतो तेव्हा चांगले फोटो मिळू शकतात.

धीरज वाटेकर (लेखातील सर्व छायाचित्रे - धीरज वाटेकर)या ट्रेकिंगदरम्यान दिवसभर आम्हाला गार वारा बोचत होता. डोंगरावरील चढाई हा एक विलक्षण अनुभव असतो. आम्ही तक्तसांग ट्रेकिंग दरम्यानही तो घेतला. गार वारा, गर्द झाडी, मळलेली पायवाट आणि चढणीवर धापा टाकत उभे राहून, गुडघ्यावर हात ठेवून तर कधी झाडाच्या एखाद्या बुंध्याला टेकून दम खाण्यातली मजा काही औरच! टायगर नेस्ट मॉनेस्ट्री ट्रेकिंग करताना खूप थकायला होते. छातीतली हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येते. बागेत चालावे इतक्या सहजतेने भूतानी बाया-बाप्यांना इथे चालताना पाहिले, की त्यांच्या मागे धापा टाकत चालणाऱ्या आम्हांला आमच्या शारीरिक क्षमता समजतात. या जाताना-येतानाच्या ११ किलोमीटरच्या प्रवासात भूतानच्या सरकारने फक्त एकाच ठिकाणी पहिल्या टप्प्यावर रेस्टॉरंटला परवानगी दिली आहे. ते वगळता इतर कोठेही कोणतीही खाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे आपण आपल्याला आवश्यक ट्रेकिंगयोग्य खानपान सोबत घेतलेले योग्य. मात्र त्याचे रिकामे रॅपर्स मात्र रस्त्यात सोडू नयेत हेही तितकेच खरे. या मार्गावर आम्ही काही ठिकाणी रिकाम्या रॅपर्सचा कचरा पाहिला, विशेष म्हणजे तो आम्ही भारतीयांनीच केलेला होता. इथले स्थानिक मार्गदर्शक एकत्रितपणे चढाईचा हा संपूर्ण मार्ग नियमित स्वच्छ करतात. पारो घाटीतील एका सरळ रेषेतील सुळक्यावर टांगलेल्या अवस्थेत, पाहताना आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, अशा ठिकाणी मॉनेस्ट्री उभी आहे. साहसी पर्यटन, ट्रेकिंग, दैनंदिन चालण्याचा सराव असेल, तर हा ट्रेक थोड्या श्रमाने आपल्याला यशस्वी करणे शक्य आहे. भूतानमध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर टायगर नेस्ट मॉनेस्ट्री अवश्य अनुभवा. तो समृद्ध जीवनानुभव देऊन जाईल. त्यासोबतच भूतानमधील १६९ फूट उंच ग्रेट बुद्धा डोरडेन्मा शाक्यमुनि मूर्ती, प्राचीन संस्कृती, परंपरा, उंचच उंच डोंगररांगा, पर्यावरण, वास्तूंचे आर्किटेक्चर, येथील खानपान अनुभवा. भूतानमध्ये २०० रुपयांत तात्पुरत्या स्वरूपाचे पर्यटकांसाठीचे मोबाईल सिमकार्ड उपलब्ध होते. ते फायदेशीर ठरते. पर्यटनासाठी मार्च ते मे, तर निसर्गाच्या संस्मरणीय अनुभूतीसाठी ऑक्टोबर ते जानेवारी हा कालावधी उत्तम आहे.

टायगर नेस्ट मॉनेस्ट्री भूतानमधील बौद्धधर्माचे उगमस्थान आहे. ‘ओम मणि पद्मे हुम’ या मंत्राच्या त्रिकोणी पताका सर्वत्र दिसतात. या पताका फडकल्याने मंत्रशांती हवेत दूरवर पोहोचते, अशी श्रद्धा आहे. टायगर नेस्ट मॉनेस्ट्री हा जरा लांब पल्याचा अत्यंत कठोर ट्रेक आमच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतांची कठिण परीक्षा घेणारा ठरला. ९०० मीटर उंच चढून शिखर गाठण्याचा आनंदही अवर्णनीय होता. भूतानच्या मॉनेस्ट्रीची भव्यता, भूतानची शिस्त, परिस्थितीवर मात करून देशविकास करण्याची धडपड, हसरे चेहरे, प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य, डोळे दिपवणारी हिरवाई, स्वच्छ नद्या हे सगळे पाहून मनाला जे समाधान लाभले ते केवळ शब्दातीत...

- धीरज वाटेकर, चिपळूण
ई-मेल : dheerajwatekar@gmail.com

(लेखक हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून, कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत असलेले पत्रकार आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search