Next
भीमथडी जत्रेतील ‘अन्नदाता विभाग - विषमुक्त अन्न’ विभागाला उदंड प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, December 25, 2017 | 12:56 PM
15 0 0
Share this article:

पुणे : 'अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती'तर्फे पुण्यात भरणाऱ्या 'भीमथडी जत्रे'त या वर्षी सुनंदा पवार यांनी 'अन्नदाता विभाग - विषमुक्त अन्न' हा विभाग सुरु करून, खऱ्या अर्थाने पुणेकरांची विषमुक्त अन्नाची गरज भागविली आहे. अन्नदाता विभाग - विषमुक्त अन्न या माध्यमातून निर्विष, निर्भेळ व सुरक्षित अन्नधान्य पुणेकरांना देण्याचा एक स्तुत्य उपक्रम भीमथडीने सुरु केला आहे. 

नैसर्गिक व संद्रीय खते वापरून लाल तांदूळ, पिवळी ज्वारी, खपली गहू, काकवी, मध, शेंदाडाचे लोणचे, देव अंबाडीचा जाम, निरगुडीचे तेल, आंबी हळद, गोमुत्र व शेण यापासून बनविलेले साबण, धूप आणि  अगरबत्ती, तुळशीचा चहा, नाचणी व ज्वारीचे नुडल्स, कडधान्ये, लिंबाच्या सालीची वडी, कडीपत्ता व शेवग्याच्या पानाची पावडर, इत्यादी  माल या विभागात ठेवला आहे. 

प्रसिद्ध गायक कलाकार रघु दिक्षित यांच्या हिंदी – कन्नड गीतांचा 'सृजन म्युझिक फेस्टिवल शो'देखील पुणेकरांच्या पसंतीस उतरला. या वर्षीच्या भीमथडीमध्ये महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू, महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन या सर्व बाबींचा एकाच छताखाली पुणेकरांना आस्वाद घेता येत आहे. भीमथडीच्या पॅकिंग विभागातील कोलकत्याची ज्वेलरी व मॅटस्, मुंबईतील महिला बचत गटाची कापडी उत्पादने, माथेरानमधील महिला बचत गटाचे शूज व चप्पल्स, कोल्हापूर मधील महिला बचत गटाचे मातीची भांडी आणि गुळपट्टी या बाबी पुणेकरांना अधिक आकर्षित करत आहेत. 

मान तालुक्यातील पांगरी गावाच्या ३५ कलाकारांचे 'गज नृत्य' भीमथडीचे आगळे आकर्षण होते. गज नृत्य हा धनगरी पारंपरिक लोककलेचा प्रकार असून, डोक्याला फेटा, पायात घुंगरू आणि हातात रुमाल अशी वेशभूषा परिधान करणाऱ्या मानच्या या कलापथकाचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव झालेला आहे. 
भीमथडी जत्रेत राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलापथक आपला कार्यक्रम सादर करणार असून त्यांचे आजपर्यंत चार हजारपेक्षा जास्त कार्यक्रम झालेले आहेत. बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावातील या कला पथकातील कलाकार गेली १७ वर्ष गाव विकास, दारूबंदी, मुलगी वाचवा, वृक्षारोपण, पाणी वाचवा, स्वच्छता अभियान, तंटामुक्ती यासारख्या सामाजिक विषयावर आपली कला सादर करत आहेत. भरत शिंदे, सुभाष मदने, रामदास जगताप व सहकलाकार भीमथडीत आपली कला सदर करणार आहेत. 

२५ डिसेंबर हा भीमथडीचा शेवटचा दिवस असून, सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरु असणाऱ्या भीमथडी जत्रेला पुणेकरांनी भरपूर प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.   

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search