Next
कलाशिक्षकांच्या चित्रांनी चित्रप्रेमींना घातली भुरळ
BOI
Saturday, October 13, 2018 | 03:07 PM
15 0 0
Share this article:

अर्जुन माचिवले यांनी काढलेले चित्र

रत्नागिरी :
मुंबईतील आर्ट व्हिजन संस्थेने आयोजित केलेले आठवे कला प्रदर्शन सध्या वरळी-मुंबईतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये सुरू असून, ते १५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नऊ ऑक्टोबर २०१८ रोजी वास्तुविशारद, कलाप्रेमी अनिल चावडा यांनी दीपप्रज्ज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यामध्ये १० कलाशिक्षकांची १०० चित्रे झळकली असून, त्यामध्ये रत्नागिरीतील कलाशिक्षकांच्या सुंदर निसर्गचित्रांचाही समावेश आहे.

उद्घाटनप्रसंगी समाजसेवक संदीप गावडे, नेहरू सेंटरच्या संचालक व कलाप्रेमी मीना रेगे, मुंबई कलाध्यापक संघाचे अध्यक्ष हिरामण पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सर्व कलाप्रेमी पाहुण्यांनी शिक्षकांच्या चित्रांबद्दल आनंद व्यक्त केला व कामाचे कौतुक केले. त्यासाठी शक्य असेल ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आर्ट व्हिजनची स्थापना करून शिक्षकांना व्यासपीठ देण्याच्या संचालकांच्या कार्याबद्दल श्री. चावडा यांनी अभिनंदन केले व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. शालेय जबाबदारी सांभाळत असताना आपल्या कलेलाही शिक्षक जपून ठेवत आहेत, हे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.

आर्ट व्हिजन संस्थेचे संस्थापक अर्जुन माचिवले हे मूळचे रत्नागिरी तालुक्यातील तरवळ-माचिवलेवाडी येथील आहेत. ते सध्या घाटकोपर येथील आर. एन. गांधी हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासह रियाझ काझी, महेश कदम, जावेद मुल्ला यांनी एकत्र येऊन २०१२मध्ये आर्ट व्हिजन संस्थेची स्थापना केली. त्यांच्यातर्फे कलाशिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले जाते.

या प्रदर्शनामध्ये कलाशिक्षक नीलेश पावसकर (फाटक हायस्कूल, रत्नागिरी), रमेश गंधेरे (न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे), अर्जुन माचिवले (घाटकोपर), रियाझ काझी, जावेद मुल्ला, रूपेश बाईत, संजय पुराणिक, मनोहर बाविसकर, कविता पुणेकर, महेश कदम या कलाशिक्षकांनी साकारलेल्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत.

कोकणचा मनमोहक निसर्ग
या प्रदर्शनात कोकणच्या निसर्गाची विविध रूपे पाहायला मिळाली. कोकणचा निसर्ग साऱ्यांनाच भुरळ घालतो. विविध ऋतूंमध्ये मुक्तहस्ते रंगांची उधळण करणाऱ्या या निसर्गाची विविध रूपे कलाशिक्षकांनी कॅनव्हास, पेपरवर सुरेख रेखाटली आहेत. सर्व कलाशिक्षकांची कला लोकांपर्यंत पोहोचावी व मुलांना धडे शिकवत आपलीही कला वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. अशी प्रदर्शने नेहमीच भरवावीत, असे आवाहन चित्रप्रेमींनी केले.

(या प्रदर्शनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search