Next
‘दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲप’
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन
BOI
Thursday, April 04, 2019 | 01:36 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘लोकसभा निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. सर्व मतदारांबाबत विशेष करून दिव्यांग मतदारांच्या बाबतीत (पीपल विथ डिसॲबिलिटी– पीडब्ल्यूडी) अधिक जागरूक राहून त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’ (PWD App) तयार केले आहे,’ अशी माहिती विभागीय आयुक्त तथा प्रवेश योग्यता निरीक्षक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर हे दिव्यांग मतदारांसाठी ॲक्सेसिबिलिटी ऑब्झर्व्हर म्हणून काम पाहत आहेत. या लोकसभा निवडणुकांचे ब्रीदवाक्य ‘सुलभ निवडणुका’ हे आहे. कोणत्याही प्रकारचा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहता कामा नये, यासाठी दिव्यांग मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी साह्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे काम या कार्यक्रमाद्वारे होत आहे.

‘मतदान प्रक्रियेपासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहू नयेत, तसेच त्यांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन विशेष सोयी-सवलती उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष मोहीमही राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद कार्यालयांनी दिव्यांग उन्नत अभियांनातर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण केले आहे. मतदान केंद्रांवरील दिव्यांग मतदारांची एकूण संख्या विचारात घेऊन अशा मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. अंध व दृष्टी अधू असलेल्या मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठी, मतदार मार्गदर्शक पुस्तिका, काचेचे भिंग, ब्रेल लिपीतील मतपत्रिका देण्यात येईल,’ असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’ (PWD App) तयार केले आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना काही मदतीची आवश्यकता असल्यास त्यांना ‘पीडब्ल्यूडी ॲप’ मोबाइलवर डाउनलोड करावे. या ॲपद्वारे मदतीचे स्वरूप नोंदवता येते. तसेच १९५० किंवा १८०० १११ ९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास जिल्हा प्रशासनातर्फे व्हीलचेअर अथवा वाहनाची सोय करून दिली जाईल. इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँन्ड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये हे ॲप डाउनलोड करता येते. या ॲपची नोंद करणाऱ्या नागरिकाला त्यांच्या मोबाइलवर मदतीची नोंद केल्यानंतर युनिक आयडी मिळेल, त्यामुळे त्याला नोंद झाल्याचे लक्षात येईल.

‘लोकसभा निवडणुका हा राष्ट्रीय उत्सव आहे. या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवे. मतदान करणे हे आपले कर्तव्य असून, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा,’ असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

(अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search