Next
हवाई दलात आणखी एका ‘तेजशलाके’चा विक्रम
हीना जैस्वाल बनली पहिली महिला फ्लाइट इंजिनीअर
BOI
Friday, February 15, 2019 | 05:35 PM
15 0 0
Share this story

हीना जैस्वाल

बेंगळुरू :
भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या तिघींनी पहिल्या महिला लढाऊ विमानचालक बनून गेल्या वर्षी इतिहास घडविला होता. आता हीना जैस्वाल या तेजशलाकेने आणखी एक विक्रम केला आहे. ती भारतीय हवाई दलातील पहिली महिला फ्लाइट इंजिनीअर बनली आहे.  

फ्लाइट लेफ्टनंट हीना जैस्वालने इतिहास घडविला आहे, असे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे. यासाठी आवश्यक असलेला कोर्स हीनाने नुकताच हवाई दलाच्या कर्नाटकातील येलहांका येथील तळावर यशस्वीरीत्या पूर्ण केला. पाच जानेवारी २०१५ रोजी हीना भारतीय हवाई दलाच्या इंजिनीअरिंग विभागात रुजू झाली. फायरिंग टीमची प्रमुख म्हणून, तसेच बॅटरी कमांडरसारख्या विविध पदांची जबाबदारी तिने निभावली आहे. त्यानंतर ‘फ्लाइट इंजिनीअर’ बनण्याच्या विशेष कोर्ससाठी तिची निवड झाली. तो कोर्स यशस्वीपणे पूर्ण करून, १५ फेब्रुवारी २०१९ रोजी ती फ्लाइट इंजिनीअर बनली आहे, अशी माहिती भारतीय हवाई दलाकडून देण्यात आली. ‘यामुळे माझे स्वप्न सत्यात उतरले आहे,’ अशी भावना हीनाने व्यक्त केली आहे. 

सहा महिन्यांच्या अत्यंत कठोर अशा प्रशिक्षण काळात हीनाने पुरुष सहकाऱ्यांच्या तोडीस तोड कामगिरी केली. झोकून देऊन, चिकाटीने आणि निष्ठेने काम करण्याची तिची क्षमता या प्रशिक्षणादरम्यान अधोरेखित झाली. जवान होण्याचे आणि उंच आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न तिने लहानपणापासूनच पाहिले होते. ते स्वप्न या प्रशिक्षणानंतर पूर्ण झाले आहे. हीना चंडीगडची असून, पंजाब विद्यापीठातून ती बीई झाली. डी. के. जैस्वाल आणि अनिता जैस्वाल या दाम्पत्याची ती एकुलती एक मुलगी आहे. 

फ्लाइट इंजिनीअर म्हणून तिची भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर युनिट्समध्ये नियुक्ती केली जाईल. सियाचेनचा गोठवणारा प्रदेश असो किंवा अंदमानचा काळा समुद्र असो, अत्यंत आणीबाणीच्या आणि ताणाच्या परिस्थितीत तिला काम करावे लागणार आहे. 

संरक्षण दलांमध्ये केवळ पुरुषच कार्यरत असू शकतात, हा समज गेल्या काही वर्षांत भारतीय संरक्षण दलाने बदलला आहे. १९९३पासून भारतीय हवाई दलात ऑफिसर म्हणून महिलांची निवड केली जाऊ लागली. त्यानंतर हवाई दलाच्या विविध विभागांमध्ये वैमानिक म्हणूनही अनेक महिलांची निवड झाली. फ्लाइट इंजिनीअर या शाखेत २०१८पर्यंत केवळ पुरुषांचीच निवड व्हायची. नंतर महिलांसाठीही ती खुली करण्यात आली. 

फ्लाइट इंजिनीअर हा वैमानिकांच्या टीममधील एक असा सदस्य असतो, की जो विमानाच्या/हेलिकॉप्टरच्या गुंतगुंतीच्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवतो. त्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते.

(‘पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनीं’बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link