Next
पुण्यात ‘शंकर रामायण, अयोध्याकांड’चे प्रकाशन
प्रेस रिलीज
Monday, July 15, 2019 | 04:07 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘गुरुदेव अभ्यंकर यांनी लिहिलेले ‘शंकर रामायण, अयोध्याकांड’ म्हणजे मराठी सारस्वताचा अलंकार असून, वाल्मिकी रामायणावरील अशी व्यापक ओवीबद्ध टीका संत एकनाथानंतर मराठी भाषेत प्रथमच सिद्ध होत आहे,’ असे गौरवोद्गार वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी ‘शंकर रामायण, अयोध्याकांड’ ग्रंथ प्रकाशनप्रसंगी काढले. 

आषाढी एकादशीनिमित्त विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर लिखित ‘शंकर रामायण, अयोध्याकांड’ या ग्रंथाचे नुकतेच टिळक स्मारक मंदिर प्रेक्षागृहात प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचागकर्ते मोहनराव दाते, अपर्णा अभ्यंकर, धर्मदाय आयुक्त लक्ष्मीकांत देशमुख, कवी शंकर अभ्यंकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.


सुमारे एक हजार पृष्ठांचा आणि सोळा हजार ओव्या असलेल्या या बृहद् काव्यातील सौंदर्यस्थळे अपर्णा अभ्यंकर यांनी ‘रसपरितोष अमृत। ते हे रामचन्द्रचरित।’ अशा मार्मिक ओव्यांतून उलगडताना अयोध्याकांडात करुण रसाचा परोत्कर्ष असल्याचे प्रतिपादन केले. या महाकाव्याचा बालकांड हा प्रथम खंड दोन वर्षांपूर्वीच प्रसिद्ध झाला असून, पुढे अजून पाच कांडे प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे शंकर रामायणाची एकूण ओवीसंख्या पाऊण ते एक लाख इतकी होण्याची शक्यता आहे.

या प्रसंगी पुण्यातील आदित्य प्रतिष्ठान या संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर यांनी नागपूरच्या ‘प्रज्ञालोक’ या द्वैमासिकासाठी संपादक श. म. हळदे यांना २५ हजार रुपयांचा भारतीय संस्कृती गौरव पुरस्कार व मानचिन्ह प्रदान केले. त्यानंतर दोन तास रंगलेल्या ‘भावार्थ सापडे निरुपणी’ या वारकरी कीर्तनात उच्च विद्याविभूषित तरुण टाळकऱ्यांना साथीला घेऊन शंकर अभ्यंकरांनी श्रोत्यांना भक्तिरंगात न्हाऊ घातले. कार्यक्रमाचे निवेदन रश्मी तुळजापूरकर यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search