Next
‘आबा बागुलांसारख्या व्यक्तींना प्रोत्साहन दिलेच पाहिजे’
शरद पवार यांच्या हस्ते कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमचा लोकार्पण सोहळा
प्रेस रिलीज
Tuesday, November 27, 2018 | 04:16 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘समाजाप्रती आस्था असणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन दिलेच पाहिजे. कर्तृत्वान असणाऱ्या आबा बागुल यांना कसे सहाय्य करायचे हे आम्ही ठरविले आहे. काँग्रेस की राष्ट्रवादी पक्ष न पाहता चांगल्या व्यक्तींना प्रोत्साहन दिले जाईल अशी ग्वाही देताना महाराष्ट्राचा गाडा पुन्हा नीटनेटका चालविण्यासाठी आता हातात हात घालून काम करावे लागेल,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केले.

माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक आबा बागुल यांच्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तळजाई टेकडी येथे साकारलेल्या क्रिकेटपटू कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते आणि कै. सदू शिंदे यांच्या कन्या व शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व कुटुंबियांच्या विशेष  उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विश्वजित कदम, क्रिकेटपटू चंदू बोर्डे, सदानंद मोहोळ, खासदार वंदना चव्हाण, विठ्ठलशेठ मणियार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, विरोधीपक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक महेश वाबळे, संयोजक व माजी उपमहापौर व स्थानिक नगरसेवक आबा बागुल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘आबा बागुल यांच्या पुढाकारातून चांगला प्रकल्प झाला आहे. सर्व घटकांचा विचार करून पर्यावरणपूरक प्रकल्प ते येथे राबवित आहेत, ही चांगली बाब आहे. पुण्याचे स्थान क्रिकेटमध्ये मोठे होते. ज्या देवधरांच्या पुण्याने अनेक खेळाडू दिले त्या पुण्यात कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम साकारले आहे. या स्टेडियममध्ये प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. सामान्य आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना वाव देण्यासाठी या स्टेडियममध्ये प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारू नये. आज क्रिकेट क्षेत्रात महिलांचे स्थान अव्वल आहे, त्यांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे.’‘माझ्या कारकिर्दीत मी अनेक खेळांना प्रोत्साहन दिले. जुन्या खेळाडूंकडून मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. इतकेच नाहीतर निवृत्त खेळाडूंना पेन्शन योजनाही राबविली. सदू शिंदे यांनी क्रिकेट क्षेत्रात नाव केले. मी त्यांचा खेळ पाहिला नाही; पण चंदू बोर्डे यांच्या पुस्तकात त्यांच्याविषयी असलेला उल्लेख खूप महत्त्वपूर्ण आहे. आज त्यांच्या नावाने साकारलेल्या या स्टेडियमध्ये इनडोअर क्रिकेट अॅकॅडमी सुरू करावी त्यासाठी सर्व नगरसेवकांनी मुंबईत आम्ही सुरू केलेले इनडोअर स्टेडियम पाहावे,’ असे आवाहन पवार यांनी केले.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘देशातील सर्व महापालिकांनी आदर्श घ्यावा असे प्रकल्प, स्टेडियम आबा बागुल यांनी साकारले आहेत. केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्षात अनेक प्रकल्प उभे केले आहेत. त्याचा मी साक्षीदार आहे. ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प असो किंवा राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल हे मी पाहिले आहे. जैव वैविध्य उद्यानामुळे पर्यावरण शास्त्राचा लाभ पुणेकरांना होणार आहे. कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियममुळे चांगले खेळाडू निर्माण होतील. आता नगरसेवक बास, पवार साहेबांचा आशीर्वाद मिळाला, तर चांगला लोकप्रतिनिधी पुढे जाईल.’

विश्वजित कदम म्हणाले, ‘पतंगराव कदम यांच्यासमोर आबा बागुल यांनी जैववैविध्य उद्यानाचा आराखडा मांडला होता. जिद्द आणि कल्पकतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आबा बागुल.’ माजी आमदार उल्हास पवार यांनी शहराचा विकास सर्वांनी मिळून करण्याची अपेक्षा व्यक्त केली.माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी आजच्या काळात जुन्या खेळाडूंना कुणी विचारत नाही, असे असताना आबा बागुल यांनी मात्र जुन्या खेळाडूंना लक्षात ठेवले आहे. आज सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्यात टॉस झाल्यावर शरद पवारांनी बॉलिंग घेतली कारण त्यांना खेळपट्टीची चांगली माहिती आहे, असे मिश्कीलपणे नमूद करताना स्टेडियमची देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

बागुल म्हणाले, ‘२५ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. पक्षहित न पाहता आजवर कार्यरत आहे. लोकांना उपयोगी पडणाऱ्या प्रकल्पामुळेच आज सलग सहावेळा निवडून येत आहे. जैव वैविध्य उद्यानाचा आराखडा सर्वप्रथम माजी वनमंत्री कै. पतंगराव कदम यांच्यासमोर मांडला होता याकडेही त्यांनी लक्ष वेधले.’

उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक अविनाश बागवे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search