Next
दिन महाराष्ट्राचा, कैफियत मराठीची!
BOI
Monday, April 30 | 06:45 AM
15 0 0
Share this story

आज मराठी भाषा व शिक्षणातील मराठी माध्यम याकडे दुर्लक्ष होत आहे - अगदी ठरवून केल्यासारखे दुर्लक्ष! मातृभाषेला दूर लोटून इंग्रजीची आराधना करणे, हे भविष्यातील अनेक समस्यांना निमंत्रण देणेच आहे. आपल्या वाडवडिलांनी मराठीच्या रूपाने आपल्याला भाषेचा व सुरेल जगण्याचा जो मंत्र दिला, तो जपण्यासाठीच महाराष्ट्र दिनाचे निमित्त व्हायला हवे. अन् त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. उद्याच्या महाराष्ट्र दिनानिमित्त विचारप्रवृत्त करणारा विशेष लेख....
..........
उद्या (मंगळवारी) महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ५८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल समारंभ होतील. वेगवेगळे कार्यक्रम होऊन इतिहासाची उजळणी होईल. आपले पूर्वज किती शूर, आपले पूर्वसुरी किती थोर, इतिहासकालीन व्यक्ती किती महान याचे पाढे म्हणून होतील; पण या सर्वांमध्ये आपण भविष्यात काय करणार आहोत आणि पुढची वाटचाल कशी असेल याबद्दल काही चर्चा होईल की नाही, हे हा लेख लिहिताना तरी सांगणे अवघड आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे १९६० रोजी झाली. वेगळे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले म्हणजे काय झाले? महाराष्ट्र राज्याची निर्मिती का झाली? तर ती मराठी भाषकांचे वेगळे राज्य म्हणून! आता मराठी भाषकांचे राज्य असणे म्हणजे काय, याचा विचार या वर्धापनदिनाच्या निमित्ताने होणार की नाही? केवळ अभिमानाच्या मखरात मांडून या ऐतिहासिक दिवसाला आपण उत्सवी स्वरूप देणार आहोत का? 

एकीकडे महाराष्ट्र राज्याने ऐतिहासिक टप्पा पार केलेला असताना त्या राज्याची राज्यभाषा कोणत्या परिस्थितीत आहे? देश पारतंत्र्यात असताना, आपले राज्य नसताना ‘मराठी असे आमुचि मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे’ असे म्हणून तेव्हाच्या लोकांनी तिची जपणूक केली. आज ती राजभाषा असताना तरी राजवैभव उपभोगत आहे का?मराठी ही या राज्याच्या नागरिकांची मातृभाषा असून, या भाषेला गौरवशाली परंपरा आहे. साहित्य आणि अभिव्यक्तीची समृद्धी एवढाच निकष लावायचा झाला, तरी ही भाषा कोणाला हार जाणारी नाही. ज्ञानेश्वर-तुकारामांसारख्या संतांनी या भाषेला संपन्न केले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मराठी फौजा मुलुखगिरीसाठी भारतभरात गेल्या. या निमित्ताने मराठी भाषा सर्वत्र पसरली. इंदूर, ग्वाल्हेर, वाराणसी अशा अनेक भागांत आजही मराठी भाषकांची मोठ्या संख्येने वस्ती आहे. तंजावूरमध्ये राहणारे मराठी लोक आणि त्यांची भाषा याबद्दल गेल्याच आठवड्यात मी लिहिले होते. 

केवळ मुलुखगिरी करणारे शिपाई कशाला, संत-महंतांनीही ही भाषा देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात नेली. संत नामदेवांनी ती पंजाबमध्ये नेली. तिला एवढी उंची दिली, की गुरू ग्रंथसाहिब या शीखांच्या धर्मग्रंथात ती समाविष्ट झाली. रामदास स्वामी, तुकाराम महाराज हेही अनेक ठिकाणी गेले होते. तमिळ माणसापर्यंत वि. स. खांडेकर पोहोचले. मराठी भाषेने देशाला आणि पर्यायाने जगाला खूप काही दिले आहे. अशी ही मराठी भाषा टिकवणे आणि ती आपल्या वापरात जास्तीत जास्त आणणे हे आपले कर्तव्य आहे. माणसाचा विकास भाषेशिवाय होऊच शकत नाही. माणूस ज्या परिसरात वावरतो, जे ऐकतो तीच त्याची भाषा होते. भाषाच त्याला विचार करायला प्रवृत्त करते. इतके, की आपण एखादा विचारदेखील मनातल्या मनात करायचे ठरवले, तर तोदेखील भाषेतूनच करत असतो. म्हणून भाषेशिवाय माणूस नाही. भाषा ही संस्कृतीला घेऊनच येते, किंबहुना भाषेशिवाय संस्कृती नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता हे सगळे शब्द आपल्याला वापरायचे असतील आणि त्यांना व्यवहारात आणायचे असेल तर मराठी ही आपल्या मनीमानसी वसली पाहिजे. ती केवळ मनात न राहता मेंदूतही उतरली पाहिजे.

सुदैवाने आधुनिक तंत्रज्ञानाने आपले काम सोपे केले आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात मराठीचे संवर्धन करणे गरजेचे आहे, ही चिंता आपल्याला वाटायला नको. तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या भाषांसोबत मराठी भाषेचे वापरकर्तेही वाढत आहेत. मराठीचे पाईक म्हणून आपल्यासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब होय. 

...पण तरीही भविष्याच्या लोंढ्यात मराठी टिकणार की नाही, ही कालवाकालव सर्व मराठीप्रेमींच्या मनात का होत राहते? मायभाषेच्या भविष्याबाबत निश्चिंत का होता येत नाही? त्याला कारण मराठी भाषक हेच होत! आज मराठी भाषा व शिक्षणातील मराठी माध्यम याकडे दुर्लक्ष होत आहे - अगदी ठरवून केल्यासारखे दुर्लक्ष! मातृभाषेला दूर लोटून इंग्रजीची आराधना करणे, हे भविष्यातील अनेक समस्यांना निमंत्रण देणेच आहे.

मायभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे लहान मुलांना कुटुंब व समाजाविषयी आस्था निर्माण होते. वाचनाची, कवितांची गोडी लागते आणि सामाजिक समरसता निर्माण होते; पण आपल्या पाल्याला इंग्रजी शिक्षण देण्यावर गेल्या काही दशकांपासून पालकांचा भर आहे. मराठी किंवा मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे उच्च शिक्षण घेताना इंग्रजी भाषेची समस्या निर्माण होईल, असे काही पालकांना वाटते. याची परिणती अशी होते, की पालकांच्या आग्रहामुळे मुलाला नीट इंग्रजीही येत नाही वा पूर्णपणे आपली मातृभाषाही बोलता येत नाही.

‘मुलांना चांगलं इंग्रजी आलं पाहिजे; पण त्यासाठी माध्यम भाषा इंग्रजी पाहिजे असे नाही,’ असे डॉ. अशोक केळकर या प्रसिद्ध भाषातज्ज्ञांनी म्हटले होते. चांगले इंग्रजी शिकवणारे शिक्षक मराठी शाळेत पाहिजेत आणि चांगले मराठी शिकवणारे शिक्षक इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाहिजेत. दुर्दैवाने दोन्हीकडे याचीच कमतरता पाहायला मिळते. शिक्षण मातृभाषेतून द्यायला हवे, हे शिक्षणशास्त्रज्ञांनाही मान्य आहे. आपल्या आजूबाजूला उच्चशिक्षित आणि यशस्वी संशोधक, डॉक्टर, अभियंते पाहिले, तर त्यांनी मायभाषेतच शिक्षण घेऊन प्रगती केली आहे; पण लक्षात कोण घेतो? आता तर राज्यातील ५० लाख विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे विशेष धडे द्यायचे सरकारने ठरवले आहे. यासाठी राज्य सरकारने ब्रिटिश कौन्सिल व टाटा ट्रस्टशी सामंजस्य करार केला आहे. त्यासाठी त्याप्रमाणे ३० हजार शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. अन् त्यासाठीचा युक्तिवाद नेहमीचाच आहे. तोच तो – राज्यातील भावी पिढीला जागतिक स्तरावर सक्षम करण्याचा! मराठी भाषा एवीतेवी नष्टच होणार आहे, हे सरकारने गृहीत धरले आहे की काय, असा प्रश्न पडला तर नवल नव्हे!

‘मराठी भाषेचे राज्य यशस्वी करण्यासाठी, मराठी माणसांच्या मनात जो ज्ञानेश्वर आहे, जो रामदास आहे, जो तुकाराम आहे आणि त्यांच्या मनात जी मराठी माऊली आहे, त्या सर्वांना जागे करण्याचा, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी प्रयत्न करीन,’ असे यशवंतराव चव्हाण म्हणत. दुर्दैवाने त्यांच्यानंतरच्या कोणत्याही राज्यकर्त्याने ही बूज राखली नाही. 

आपल्या वाडवडिलांनी मराठीच्या रूपाने आपल्याला भाषेचा व सुरेल जगण्याचा जो मंत्र दिला, तो जपण्यासाठीच महाराष्ट्र दिनाचे निमित्त व्हायला हवे. अन् त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठीची ही कैफियत कोण ऐकणार!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link