Next
साधेपणा असलेली कलात्मक वारसा वास्तू
BOI
Sunday, November 26, 2017 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

‘युनेस्को’तर्फे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये यंदा देशातील सात वारसा वास्तूंचा समावेश असून, त्यापैकी चार वास्तू मुंबईतील आहेत. त्यापैकी ख्रिस्त चर्च (भायखळा चर्च) आणि रॉयल बॉम्बे ऑपेरा हाउस या वास्तूंना गुणवत्ता पुरस्कार, तर बोमनजी होरमर्जी वाडिया फाउंटन अँड क्लॉक टॉवर आणि वेलिंग्टन फाउंटन या वास्तूंना विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या चारही वास्तूंची वास्तुसौंदर्याच्या दृष्टीने ओळख करून देणारे लेख मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे ‘बाइट्स ऑफ इंडिया’साठी लिहिणार आहेत. त्यापैकी हा पहिला लेख ‘बोमनजी होरमर्जी वाडिया फाउंटन अँड क्लॉक टॉवर’बद्दलचा...
.........
नूतनीकरणापूर्वीची वास्तूएकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसर म्हणजे एक छोटेखानी शहरच होते. तटबंदीने घेरलेल्या परिसराला तीन प्रवेशद्वारे होती. बझार गेट हे त्यापैकी एक. त्या काळात मुंबईतील एतद्देशीय व पारसी उद्योगपती लोकहिताचे काम करण्यात पुढाकार घेत असत. प्रेमचंद रायचंद, कावसजी जहांगीर या उद्योगपतींनी दिलेल्या देणग्यांतून राजाबाई टॉवर, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांसारख्या दर्जेदार इमारती उभारल्या, ज्या आजतागायत कार्यरत आहेत. तसेच लोकहितवादी नाना शंकरशेट, जमशेटजी जीजीभॉय, फ्रामजी कावसजी बामाजी, कर्सेटजी जमशेटजी जीजीभॉय, बोमनजी होरमर्जी वाडिया या मंडळींनी दिलेले शिक्षण व इतर क्षेत्रांतील योगदानही तेवढेच मोलाचे होते. तत्कालीन मुंबईतील सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सर येर्स्कीन पेरी यांनी फ्रामजी कावसजींच्या निधनानंतर बोमनजी वाडियांना शैक्षणिक बोर्डावर नेमले. मुंबई पालिकेत जस्टिस ऑफ पीस व सन १८५९मध्ये त्यांनी शेरीफ म्हणूनही कार्यभार सांभाळला होता. 

बोमनजी वाडियाबोमनजी वाडिया यांचे तीन जुलै १८६२ रोजी निधन झाले. ब्रिटिशांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उघड्या विहिरी बंद करून फाउंटन आणि पाणपोया बांधण्याचा पायंडा पाडला. गजबजलेल्या फोर्ट परिसरात कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांना पिण्याचे पाणी व स्थानिक रहिवाशांसाठी वेळदर्शक घड्याळ अशा उदात्त भावनेतून ‘फाउंटन व क्लॉक टॉवर’ सन १८८२मध्ये स्मारक रूपाने साकारण्यात आले होते. या स्मारकाचे स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्य व वारसारूपी महत्त्व ओळखून २०१७चा विशेष उल्लेखनीय पुरस्कार ‘युनेस्को’ने या वास्तूला जाहीर केला आहे. तब्बल २५ वर्षे मी या पुरातन परिसराचा एक भाग बनून होतो. पेरीन नरीमन स्ट्रीटवरील माझ्या कार्यालयापासून हे स्मारक जेमतेम २० मीटर अंतरावर असावे. २००५मध्ये मी फोर्ट सोडले. परंतु स्मृती अद्यापही ताज्या आहेत. या वाडिया स्मारकाचा वास्तुकलेच्या अनुषंगाने आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

स्थान महत्त्व : 
नगर चौकातून फिरोजशहा मेहता रोडकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव पेरीन नरीमन स्ट्रीट (बझार गेट रोड) असे आहे. ब्रिटिशकालीन फोर्ट परिसर हे एकमेव निवासी व व्यावसायिक केंद्र होते. या परिसरातील व्यापारी व स्थानिक रहिवाशांच्या संरक्षणासाठी सूर्यास्तानंतर तटबंदीचे मुख्य दरवाजे बंद केले जात असत. सन १८५४मध्ये बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर रेल्वे सुरू झाल्यामुळे व्यापाराला गती मिळाली व परिसरातील रहदारीचे प्रमाण वाढत गेले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर बझार गेट प्रवेशद्वार असल्यामुळे माहीम, शीव, माटुंगा व भायखळा भागातून येणाऱ्या सर्व स्तरांतील लोकांच्या सोयीसाठी पेरीन नरीमन स्ट्रीट व फिरोजशहा मेहता रोडच्या मध्यावर ‘फाउंटन व क्लॉक टॉवर’ उभारण्यात आले होते.

गणितातील अधिक (+) चिन्हाप्रमाणे असलेला आकारस्थापत्यशैली, वास्तुरचना व बाह्य रचना : 
तत्कालीन मुंबई पालिकेतील मुख्य स्थापत्य अभियंता रायेन्झी वॉल्ट यांनी पारसी अग्यारी ज्या शैलीत बांधली जातात त्या ‘पर्सेपोलिस’ शैलीत पाणपोईचा आराखडा बनवला आहे. स्मारक जोत्याची लांबी, रुंदी अंदाजे १० x १० मीटर व उंची १५ मीटर असावी. जोते ०.७५ मीटर व घड्याळाचा मध्य आठ मीटर उंचीवर असावा. स्मारकाची रचना गणितीय अधिक (+) चिन्हाच्या आकारात आहे. या रचनेतून, सर्व दृष्टिकोनातून एकाधिक बाह्यांगाचा उपयोग करून घेण्यात रचनाकाराचे कसब दिसून येते. पादचाऱ्यांना कोणत्याही कोनातून स्मारकाचे दृश्य त्रिमितीय दिसावे हा त्यामागचा हेतू असावा. 

लमास्सूस्मारकाच्या चारही दिशांतील आठ एस्कियन दगडी प्रतिमा सर्वाधिक लक्षवेधी ठरतात. कारण त्या मानवी दृष्टिक्षेपात येतील अशाच जागेवर बसवल्या आहेत आणि त्या स्मारकाचे आधारस्तंभ असल्यागत भासतात. यांसारख्या मानवी उंचीतील प्रतिमा पारसी अग्यारीचे प्रवेशद्वार व दर्शनी भिंतींवर आढळतात. या प्रतिमांना पारसी धर्मानुसार पवित्र व संरक्षक द्योतके मानले जाते. या प्रतिमांच्या अर्ध्या भागात मानवी चेहरा असतो व उर्वरित भाग बैल किंवा सिंहाच्या शरीराचा असतो. त्याला पक्ष्यांसारखे पंख असतात. अशा प्रतिमांना पर्शियन भाषेत ‘लमास्सू’ (Lamassu) असे म्हणतात. या स्मारकावरील प्रतिमा अंदाजे २.५ मीटर उंच असाव्यात. उत्तरेकडील प्रवेशद्वारावरील मार्बलवर स्मारकाविषयीचा मजकूर इंग्रजीत व दक्षिण प्रवेशद्वारावर पर्शियन भाषेत कोरला आहे. एकूणच स्मारकाचे शिल्पकाम अप्रतिम आहेच. परंतु दगडात कोरलेल्या मानवी चेहऱ्यांच्या तपशीलातील बारकावे शब्दबद्ध करणे अवघड आहे! या वास्तूच्या बाह्य दर्शनातून ती पाणपोई असल्याचे कोणतेही दाखले नजरेस पडत नाहीत. मनोऱ्यावरील चारही दिशांतील घड्याळे हेच या स्मारकाचे एकमेव वैशिष्ट्य आहे.

काही गोष्टी प्रकर्षाने खटकतात त्या अशा - पूर्वेकडील आवारात एस्कियन दगडी प्रतिमेला खेटून असलेली छोटेखानी टपरी (Tin shed), तसेच खिडक्यांचे संरक्षक कवच, स्मारक संरक्षणासाठी बसवलेल्या लोखंडी कवचाखालील भिंत इत्यादी घटक मूळ स्मारकाचा अविभाज्य भाग नसावेत. त्यामुळे स्मारकाचे सौंदर्य न्याहाळताना त्या संवेदनशील नजरेस खटकतात! एकेकाळी लोकहितार्थ बांधलेल्या पुरातन वास्तूंना सुरक्षित ठेवण्यासाठी वर्तमानात संरक्षक कवच बसवावे लागते. अन्यथा त्या जागेचा दुरुपयोग होतो किंवा त्यांची नासधूस करण्याची प्रवृत्ती बळावते! समाजातील ही मानसिकता दुर्दैवी आहे. ती बदलणे गरजेचे आहे.

दगडी पाकळ्यांचा आकृतिबंध

उत्तरेकडील प्रवेशद्वारआतील रचना : 
स्मारकाचा अंतर्भागही बाह्यभागाप्रमाणेच कमालीचा साधा, पण तेवढाच उत्कृष्ट अभिरुचीने बनवलेला आहे. पूर्व-पश्चिम दिशेतील खिडक्या जमिनीपासून सज्ज्यापर्यंत आहेत. तसेच, वायुविजनासाठी ठेवलेल्या छोट्या तावदानांमुळे दालनात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती आहे. ब्रिटिशकालीन जलकुंड, नळजोडणी व पाण्याच्या तोट्या अद्यापही शाबूत आहेत! अरुंद रस्ता व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून बंदिस्त दालनातील जलकुंड, दक्षिण-उत्तर दिशेतील प्रवेशद्वारे व उत्तरेकडील प्रवेशद्वारालगत बसवलेला वाडियांचा अर्धपुतळा इत्यादींचे स्थान भारतीय वास्तुशास्त्रास धरून आहे. दालनावरील लाकडी छताचे वासे व आकर्षक वळणदार दगडी पाकळ्यांसदृश आकृतीबंधाची पुनरुक्ती अंतर्भागातही दिसून येते. त्यामुळे दालने अधिक उठून दिसतात. एकंदरीत हे स्मारक ज्या उद्देशाने उभारले आहे, त्या कार्यास ते साजेसे बनवले होते!

बांधकाम साहित्य : 
स्मारकासाठी मालाड व कुर्ला खाणीतील फिकट पिवळसर आणि निळसर करड्या छटेतील बसॉल्टचे दगडी चिरे वापरले आहेत. दगडाचा पृष्ठभाग गुळगुळीत ठेवल्यामुळे दगडातील चमक व सौंदर्य खुलून दिसते. दोन्ही दगडांतील फिकट रंगछटांचा मिश्र उपयोग खुलून दिसतो. बांधकामातील शून्य सांधेजोड साधण्यासाठी पिष्टमय चुन्याचा वापर करून स्मारकाचे सौंदर्य खुलवले आहे; यातून रचनाकाराचा वास्तुकला-सौंदर्यविवेक दिसून येतो. त्या काळात बांधकामासाठी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले चुना व दगड हे एकमेव टिकाऊ बांधकाम साहित्य वापरात होते.

अताशस्मारक सौंदर्य : 
छतावरील आयताकृती चबुतरे दोन भागांत विभागले आहेत. चबुतऱ्याच्या शीर्षस्थानी प्रतीकात्मक अग्निसदृश द्योतक (Flames of fire) बसवले आहे. या द्योतकास पर्शियन भाषेत कॉपोलाला किंवा ‘अताश’ म्हणतात; झोराष्ट्रीयन त्यास पवित्र मानतात. चबुतऱ्याच्या चारी बाजूंना मोठ्या आकारातील घड्याळे वर्तुळाकार दगडी खोबणीत कोंदण करून बसवली आहेत. म्हणून घड्याळे उठावदार दिसतात. घड्याळ मनोऱ्याखाली अर्ध दंडगोलाकार आकृतिबंधाची एकल व द्वि-पदरी लयबद्ध रचना ठशठशीत व साधी आहे. दंडगोलाकार आकारात डामडौल वगळून केलेली सरळमार्गी दगडी जडणघडण व साध्या-सोप्या आकृतिबंधातील सुबक कोरीव नक्षीकाम खूपच मोहक व प्रसन्नचित्त आहे. मनोरा स्मारकाच्या मध्यावर असल्याने स्मारकाचे छत चार भागांत विभागले गेले आहे. छतावरील संरक्षक भिंतीवरील पाण्याची गळती रोखणारी त्रिपदरी उतरत्या दगडी कंगोऱ्यांची कलात्मक व आटोपशीर ठेवण, सुबकता, कला-संवेदन मनास आकर्षित करणारे आहे. थोडक्यात, स्मारकरचनेतील ‘साधेपणा’ हेच या लोकोपयोगी स्मारकाचे वैशिष्ट्य आहे! 

दगडी खोबणीत कोंदण करून बसवलेले घड्याळ
मधल्या काळात केलेल्या जुजबी डागडुजीनंतर तब्बल १३५ वर्षांनंतर पुरातन क्लॉक टॉवरचे नूतनीकरण जानेवारी २०१६मध्ये हाती घेण्यात आले. फेब्रुवारी २०१७मध्ये मुंबई महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त अजॉय मेहता यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. एकेकाळी लोकोपयोगी वास्तू म्हणून उभारलेल्या व परिसर सौंदर्याचा भाग असलेल्या या पुरातन वास्तूचा सध्याच्या घिसाडघाईच्या जमान्यात काही उपयोग नसेल. परंतु समयोचित संवर्धनामुळे शहर सौंदर्याबरोबरच इतिहासाचा साक्षीदार म्हणून ही पुरातन वास्तू पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक बनून राहील, यात शंका नाही! एकेकाळी लोकोपयोगी व शहरसौंदर्याचा अविभाज्य घटक म्हणून ओळख असलेल्या स्मारकाच्या नूतनीकरणानंतर थोड्याच अवधीत ‘युनेस्को’ने विशेष पुरस्कार जाहीर केला, ही बाब मुंबईसाठी खूपच अभिमानास्पद आहे!

गोलाकार दंडांची सुबक रचनासंवर्धन : 
राज्य पुरातत्त्व खात्याने या स्मारकाचे ‘ग्रेड-३’मध्ये वर्गीकरण केले आहे. वास्तविक पाहता पुरातन वास्तूंचे संवर्धन करणे म्हणजे केवळ संस्थेचा फलक लावणे अथवा संवर्धन म्हणजे तात्पुरती डागडुजी करणे असे नव्हे, तर ‘जी वास्तू ज्या काळात जशी बांधली होती, ती तशीच्या तशी पुनर्प्रस्थापित करणे हेच होय.’ मुंबईतील काळा घोडा असोसिएशनने पुरातन स्मारकाची सद्यस्थिती व महत्त्व ओळखून मुंबईतील स्मारकांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माणेक दावर यांनी या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम अधिक जोमाने पुढे रेटल्यामुळे वर्षभरातच पूर्ण होऊ शकले. त्यांनी घेतलेल्या कष्टांबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. तसेच, वारसा संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी यांनी त्याच स्वरूपात वास्तूचे नूतनीकरण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

मनोरा आणि घड्याळमुंबईत अनेक लहान-मोठ्या पुरातन वास्तू संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत! रस्त्यांची नावे बदलणे, पुरातन वास्तूंकडे दुर्लक्ष करणे किंवा कालांतराने त्या नष्ट होणे म्हणजे शहराची ओळख पुसण्यासारखे आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील चार वारसा स्थळांना पुरस्कार जाहीर करून देशातील नागरिक व स्थानिक प्रशासनाला जागे केल्याबद्दल ‘युनेस्को’चेही मन:पूर्वक आभार. वास्तविक पाहता आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला हा वारसा गमावणे म्हणजे एक घोर पातक आहे. तेव्हा वेळेचे भान राखून त्यांचे योग्य संवर्धन व जतन करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. पुढील पिढ्यांना अभिमान वाटावा किंवा पुढील अनेक वर्षे टिकून राहू शकतील अशा मोजक्या इमारती सोडल्यास भरीव असे दर्जात्मक काम झाल्याचे आज तरी दिसून येत नाही. तेव्हा, आपल्या पूर्वजांनी ठेवलेला पुरातन कला-सौंदर्यविवेक वारसा टिकवून ठेवण्यातच आपण सर्वांचे हित आहे.

ई-मेल : चंद्रशेखर बुरांडे - fifthwall123@gmail.com

(या वास्तूचे नूतनीकरण झाल्यानंतरचे सौंदर्य दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search