Next
‘आयुष्मान भारत योजने’ला समर्पित देशातील पहिल्या रुग्णालयाचे लोकार्पण
केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी डिजिटल पद्धतीने केले उद्घाटन
BOI
Monday, March 11, 2019 | 06:01 PM
15 0 0
Share this story


पुणे : पंतप्रधानप्रेरित ‘आयुष्मान भारत योजना’ व ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने’साठी संपूर्णपणे समर्पित ‘सूर्या-सह्याद्री’ या भारतातील पहिल्या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी या उपक्रमाचे डिजिटल पध्दतीने उद्घाटन केले.

या वेळी राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. चारूदत्त आपटे, कार्यकारी संचालिका डॉ. जयश्री आपटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, ‘आयुष्मान भारत ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य सेवा योजना असून याचा लाभ १० कोटी ७४ लाख कुटुंबातील ५५ कोटी लोकांना होणार आहे. अशी भव्य संकल्पना एवढ्या कमी वेळात कार्यान्वित करून भारताने दाखवली असून याचा जगात अभ्यास होईल. चार महिन्यांपूर्वी कार्यान्वित झालेल्या या योजनेचा आजवर देशात साडे चौदा लाख लोकांना लाभ मिळाला आहे. सूर्या-सह्याद्री रुग्णालयाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असून इतर खासगी रुग्णालये याचे अनुकरण करतील अशी अपेक्षा आहे.’

राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले, ‘एमपीजेएवाय व पीएमजेएवाय या योजनांसाठी संपूर्णपणे समर्पित होणाऱ्या सूर्या-सह्याद्री रुग्णालयाचे मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या लोकांना आर्थिकदृष्ट्या इलाज करून घेणे शक्य नाही, अशा लोकांना या योजनेमुळे एक नवसंजीवनी मिळणार आहे.’
याप्रसंगी बोलताना सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. चारूदत्त आपटे म्हणाले, ‘आपण नेहमी सरकार आपल्यासाठी सर्वकाही करेल अशी आशा बाळगतो. मात्र सुजाण नागरिक म्हणून आपण सरकारशी भागीदारी करणे गरजेचे असून यामुळे समाज पुढे जाण्यास हातभार लागतो.’

दरम्यान शहराच्या मध्यभागी असलेले हे अत्याधुनिक रुग्णालय असून एकाच छताखाली कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी, न्युरो सर्जरी, कॅन्सर केअर यांसारख्या सुपर स्पेशालिटीज गरजू रूग्णांसाठी उपलब्ध आहेत. १०० खाटांच्या या रुग्णालयात सर्व अद्ययावत व अत्याधुनिक सुविधा आहेत. रुग्णालयाला एनएबीएच प्रमाणपत्र मिळाले असून एमपीजेएवाय क्वालिटी सेलचे गुणवत्तेसाठी उच्च दर्जाचे मानांकन मिळाले आहे. 

या वेळी एमपीजेएवायचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, नॅशनल इन्श्युरन्स कंपनीचे सीआरएम रवी अय्यर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे गव्हर्नर इलेक्ट रवी धोत्रे, सह्याद्री हॉस्पिटल्सचे युनिट प्रमुख केतन आपटे, मुख्य कामकाज अधिकारी डॉ. सुनील राव, सूर्या सह्याद्री हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. जयसिंग शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link