Next
पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नागरिकांकडून मदतीचा ओघ; आणखी मदतीची गरज
सुप्रिया परदेशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद
BOI
Tuesday, August 06, 2019 | 05:16 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पुराचा फटका बसलेल्या पुणे शहरातील सुमारे पाच हजार नागरिकांनी महापालिकेच्या विविध ठिकाणच्या शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यांच्याकरिता पोळी-भाजी देण्याचे आवाहन महापालिकेच्या कर्मचारी सुप्रिया परदेशी यांनी केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, माणुसकीचे हात संकटाशी सामना करण्यासाठी पुढे आले आहेत. अजून पाऊस सुरूच असल्याने आणखी एखाद-दुसरा दिवस अशाच मदतीची गरज आहे.


सोमवारी (पाच ऑगस्ट) सायंकाळपर्यंत सुमारे पाच हजार नागरिकांना सुखरूपपणे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यात वृद्ध, महिला, मुलांपासून अगदी छोटी बाळेही होती. या सर्वांच्या दोन घासांची सोय करणे हे सर्वांत मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. स्वयंसेवी संस्था, नगरसेवक सर्वांनी मदतीला सुरुवात केली; पण संकटग्रस्त लोकांची संख्या बघता जितकी मदत मिळेल तितकी कमीच होती. हे लक्षात घेऊन महापालिकेच्या कर्मचारी सुप्रिया परदेशी यांनी नागरिकांना पोळी-भाजी देण्याचे आवाहन केले. 

समाजमाध्यमांवरून हा संदेश अनेक ठिकाणी पोहोचला आणि माणुसकीचे अनेक हात मदतीसाठी आले. मंगळवारी (सहा ऑगस्ट) सकाळी ११ ते १२ या वेळेत अनेक लोकांनी व्यवस्थित पॅक केलेल्या पोळ्या आणि भाजी सुप्रिया परदेशी यांच्यापर्यंत पोहोचवली. कोणी फळे, बिस्किटे दिली. काहींनी त्यांच्यासोबत शाळांमध्ये येऊन नागरिकांना मदत करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यामुळे चारशे ते पाचशे लोकांना पोटभर जेवण मिळेल इतकी व्यवस्था झाली. 

आश्रय घेतलेल्यांमध्ये लहान बाळे, तसेच मुलेही असल्याने सर्दी, तापासारख्या आजारांवरील तात्पुरत्या उपचारांसाठी औषधांचीही गरज होती. त्यासाठी सुप्रिया परदेशी यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना आवाहन करताच काही जणांनी औषधे पाठवली. तसेच ती कशासाठी आहेत याची नेमकी माहितीही त्यावर लिहिलेली होती. भारत न्यू इंग्लिश स्कूल आणि रोकडोबा मंदिराजवळील शाळा क्रमांक १४मध्ये आश्रय घेतलेल्या पूरग्रस्त नागरिकांना या जेवणाचे मंगळवारी दुपारी वाटप करण्यात आले. 

त्यांनी दिला आपला डबा...

सुप्रिया परदेशी यांनी सोमवारी संध्याकाळी केलेल्या या आवाहनाबद्दल महापालिकेत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना माहिती नव्हती. मंगळवारी सकाळी कामावर आल्यावर त्यांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी आपला जेवणाचा डबा आपली मदत म्हणून दिला. स्वतः कामावरून घरी जाऊन जेवू असे त्यांनी सांगितले. 

सुप्रिया परदेशी आणि त्यांच्या विभागातील सहकाऱ्यांनी पैसे जमवून पन्नास ते शंभर लोकांसाठी एकाच ठिकाणाहून जेवण बनवून घेऊन ते या लोकांना देण्याचे ठरवले आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारीही यात कामात सहभागी झाले आहेत.

‘हजारो लोकांना मदतीची गरज असल्याने नगरसेवक, स्वयंसेवी संस्थाही मदतीसाठी धावून आल्या आहेत; स्थानिक लोकही पूरग्रस्तांसाठी जेवण, औषधे आणि अन्य गरजेच्या वस्तूंची सोय करत आहेत. पावसाची स्थिती बघता, आणखी किमान एक-दोन दिवस या लोकांना या ठिकाणीच राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांच्या मदतीची गरज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शक्य तेवढ्या लोकांनी या कामात सहकार्य करावे,’ असे आवाहन सुप्रिया परदेशी यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balasaheb Londhe About 70 Days ago
Excellent work and should be rewarded. Best wishes.
0
0

Select Language
Share Link
 
Search